श्रीदेवी यांचं फेब्रुवारी २०१८ मध्ये जेव्हा निधन झालं, तेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी यांच्या निधनाच्या पाच वर्षांनंतर आता बोनी कपूर यांनी मौन सोडलं आहे. त्याचं निधन नैसर्गिक नव्हे तर अपघाती होतं, असा खुलासा त्यांनी केला आहे.
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनावर निर्माते बोनी कपूर यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते श्रीदेवी यांच्याविषयी आणि त्यानंतर झालेल्या चौकशीविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. श्रीदेवी यांना बऱ्याचदा मिठाशिवाय खूप कठीण डाएट फॉलो करावा लागायचा. त्यामुळे अनेकदा त्यांना चक्कर यायची, असा खुलासा त्यांनी केला. त्यांचं निधन नैसर्गिक नसून अपघाती होतं, असंही बोनी कपूर म्हणाले. त्याचप्रमाणे या विषयावर आतापर्यंत मौन का बाळगलं होतं, यामागचंही कारण त्यांनी सांगितलं.
बोनी कपूर म्हणाले, “श्रीदेवीचं निधन नैसर्गिक नव्हतं, ते अपघाती होतं. मी त्याबद्दल न बोलणंच पसंत केलं कारण आधीच मी त्याविषयी जवळपास २४ ते ४८ तास चौकशी आणि तपासादरम्यान बोललो होतो. किंबहुना तपास अधिकारी मला म्हणाले की, भारतीय माध्यमांकडून बराच दबाव असल्याने आम्हाला हे सर्व करावं लागतंय. श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणात कोणतंही कटकारस्थान नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लाय डिटेक्टर टेस्टपासून माझ्या सर्व चाचण्या झाल्या होत्या. त्यानंतर अर्थातच जो अहवाल आला, त्यात अपघाती निधन असं सांगण्यात आलं होतं.”
श्रीदेवी या त्यांच्या निधनाच्या वेळीही डाएटवर होत्या, असं बोनी कपूर यांनी स्पष्ट केलं. “ती अनेकदा उपाशीच राहायची. तिला चांगलं दिसायचं होतं. ऑनस्क्रीन आपण जाड तर दिसत नाही ना याबाबत तिला सतत काळजी असायची. माझ्याशी लग्न झाल्यानंतरही अनेकदा तिला चक्कर आली होती. त्यावेळी डॉक्टर हेच सांगायचे की तिला कमी रक्तदाबाचा त्रास आहे”, असं त्यांनी पुढे सांगितलं.
श्रीदेवी यांच्यासोबत सेटवर घडलेली एक घटना दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांनी बोनी कपूर यांना सांगितली होती. त्याच घटनेचा खुलासा करत बोनी कपूर म्हणाले, “एका शूट दरम्यान श्रीदेवी बाथरुममध्ये बेशुद्ध पडली होती. हे फार दुर्दैवी होतं. तिच्या निधनानंतर नागार्जुन जेव्हा श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ती अत्यंत कठीण डाएटवर होती. त्यावेळी शूटिंग करतानाच ती बाथरुममध्ये कोसळली आणि त्यात तिचा एक दातसुद्धा तुटला होता.”
लग्नानंतर बोनी कपूर यांना श्रीदेवी यांच्या कठीण डाएटविषयी माहिती होती. अनेकदा डिनर करतानाही त्या मिठाशिवाय जेवण जेवायच्या. हे पाहून बोनी कपूर यांनी डॉक्टरांकडेही विनंती केली होती. श्रीदेवी यांना जेवणात थोडं फार प्रमाणात मीठ खाण्याचा सल्ला द्या, असं ते डॉक्टरांना सांगायचे. “दुर्दैवाने तिने याकडे फार गांभीर्याने पाहिलं नव्हतं. तिच्या निधनाची घटना घडेपर्यंत डाएट हा विषय इतका गंभीर असू शकतो याचा मीसुद्धा विचार केला नव्हता”, अशी कबुली बोनी कपूर यांनी दिली. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवी यांचं दुबईत एका हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती.