Close

दिग्गज भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगवर येणार बायोपिक (Yuvraj Singh Biopic )

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या बायोपिकची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. भूषण कुमार आणि रवी भागचंदका युवीच्या बायोपिकची निर्मिती करणार आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

युवीच्या बायोपिकची घोषणा करताना तरण आदर्श यांनी पोस्टमध्ये लिहिले - 'क्रिकेटपटू युवराज सिंगवर बायोपिकची घोषणा करत आहे... भूषण कुमार आणि रवी भागचंदका हे क्रिकेट लीजेंड युवराज सिंगचे विलक्षण आयुष्य मोठ्या पडद्यावर आणतील. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही, मात्र त्याची संपूर्ण क्रिकेट कारकीर्द आणि जीवन यात दाखवण्यात येणार आहे.

आपल्या बायोपिकबद्दल युवराज सिंग म्हणाला, 'मला खूप सन्मान वाटत आहे. माझी कथा जगभरातील लाखो चाहत्यांना दाखवली जाईल. क्रिकेट हे माझे सर्वात मोठे प्रेम आहे आणि सर्व चढ-उतारांदरम्यान शक्तीचा स्रोत आहे. मला आशा आहे की हा चित्रपट इतरांना त्यांच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा अतूट उत्कटतेने पाठपुरावा करण्यास प्रेरित करेल.

युवराज सिंग हा भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे. ६ बॉलवर ६ षटकार ठोकणारा भारतीय क्रिकेटर युवराज सिंगने क्रिकेटविश्वात अनेक विक्रम केले आहेत, ज्याची चर्चा आजही होते. तो १७ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. या कालावधीत त्याने ४० कसोटी सामन्यांमध्ये ३३.९३ च्या सरासरीने १९०० धावा, ३०४ एकदिवसीय सामन्यात ३६.५६ च्या सरासरीने ८७०१ धावा आणि ५८ टी-20 सामन्यात २८.०२ च्या सरासरीने ११७७ धावा केल्या आहेत.

या कालावधीत त्याने ७१ अर्धशतके आणि १७ शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याच्या नावावर १४८ आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. २००७ मध्ये T-20 विश्वचषक आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला ट्रॉफी जिंकून देण्यात युवीने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आता युवराजच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बायोपिकची अधिकृत घोषणा झाली असून चाहते आतापासून चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. पण युवराजची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी अद्यापही अभिनेत्याची निवड करण्यात आली नाही आहे.

Share this article