भारतीय युवा छात्रा निहारिका सिंघानिया हिने आंतरराष्ट्रीय घोडेस्वारी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून सगळ्यांना चकित केले आहे. बेल्जियम येथे आयोजित अजेलहॉफ सीएसआय लियर घोडेस्वारी स्पर्धेत निहारिकाने हे झळाळणारे यश मिळवून भारताचे नाव उंचावले आहे.

सुप्रसिद्ध उद्योगपती, रेमंड समुहाचे सीएमडी गौतम सिंघानिया यांची निहारिका ही ज्येष्ठ कन्या असून देशोदेशीच्या युवा स्पर्धकांवर तिने मात केली. तिला सुवर्ण पदक मिळाल्याची घोषणा झाली, त्या क्षणी भारताचे राष्ट्रगीत वाजविण्यात आले.
आपल्या मुलीची ही गौरवास्पद कामगिरी पाहून आनंदित झालेल्या गौतम सिंघानिया यांनी इन्स्टाग्राम व एक्स वर पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात, “निहारिकाचे हे यश तिची व्यक्तिगत कामगिरी नसून भारतातील सर्व छात्रांसाठी एक प्रेरणा आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध कलांसाठी प्रोत्साहित करणे गरजेचे असते. तिचे हे यश कठोर परिश्रम, समर्पण आणि अनुशासन यांचं महत्त्व अधोरेखित करते.”