आई झाल्यानंतर यामी गौतम पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामी शाह बानोच्या जीवनावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून या घटनेनं भारताचं एका प्रकारे भविष्यच बदललं होतं.
भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासात शाहबानो हा खटला चांगलाच प्रसिद्ध आहे. या खटल्यातील निकालानंतर भारतीय समाजकारण, राजकारणाची दिशा बदलली होती. हा खटला मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाहबानो असा होता. याच खटल्यावर आता चित्रपट येतोय. या चित्रपटात यामी गौतम ६२ वर्षीय शाहबानोची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका जिंवत व्हावी यासाठी यामी गौतम आतापासूनच तयारीला लागली आहे. हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मोहम्मद अहमद खान हे शाहबानो यांचे पती होते. त्यांनी तीन तलाकच्या माध्यमातून शाहबानो यांना तलाक दिला होता. त्यानंतर शाहबानो यांनी पोटगीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र मोहम्मद खान यांनी पोटगी देण्यास नकार दिला होता. मी मुस्लीम पर्सनल लॉच्या मदतीने हा तलाक दिलेला आहे, त्यामुळे मी पोटगी देण्यास बांधील नाही, असे मत त्यांनी मांडले होते. महिलेला पोटगी फक्त इद्दतच्या वेळीच दिली जाते, असाही दावा त्यांनी केला होता. त्यानंतर हा खटला साधारण सात वर्षे चालला. एप्रिल १९८५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो यांच्या बाजूने निकाल देत हा खटला मार्गी लावला होता. या निकालानंतर भारतीय समाजकारण बदलले होते.
शाह बानोच्या जीवनावर बनत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुपरण वर्मा करणार आहेत. ज्याने यापूर्वी द फॅमिली मॅन सीझन २, राणा नायडू आणि द ट्रायलचे दिग्दर्शन केले आहे. विशाल गुरनानी आणि जुही पारिख मेहता यांच्या संयुक्त विद्यमाने जंगली पिक्चर्स या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
शाह बानोची भूमिका साकारण्यासाठी यामी खूप मेहनत घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या कारकिर्दीतील ही आयकॉनिक भूमिका असेल. या नव्या आव्हानाबद्दल ती खूप उत्सुक आहे. मुलाच्या जन्मानंतर यामीचा हा पहिलाच चित्रपट आहे. यामी गौतम हिचा धूम धाम नावाचाही चित्रपटही येतोय.