इथिओपियाचे गतविजेते हेले लेमी बेरहानू आणि अबराश मिन्सेवो रविवारी (19 जानेवारी) होणार्या टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 या जागतिक ऍथलेटिक्स गोल्ड लेबल रेसमध्ये विजेतेपद राखण्यासाठी सज्ज आहेत.
पुरुष एलिट गटात 2023 आणि 2024 मध्ये बाजी मारल्यानंतर बेरहानू हा सलग तिसर्यांदा मुंबई मॅरेथॉन जिंकण्यास उत्सुक आहे. मागील दोन वर्षांची पुनरावृत्ती केल्यास मॅरेथॉनच्या 20 वर्षांच्या इतिहासात जेतेपदाची अनोखी हॅट्ट्रिक साधणारा तो पहिला धावपटू असेल. 2007 आणि 2008 मध्ये जिंकलेल्या केनियाच्या जॉन केलाईने यापूर्वी असा प्रयत्न केला होता. परंतु, 2009 मध्ये त्याला तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. इथिओपियन महिला धावपटू मुलू सेबोकाने मुंबई मॅरेथॉन तीनदा जिंकली असली तरी तिसरे विजेतेपद मिळवण्यापूर्वी 2007मध्ये ती सहभागी झाली नव्हती.
एलिट पुरूष आणि महिला या दोन्ही प्रकारातील पहिल्या तीन विजेत्यांना (फिनिशर्स) एकूण 389,524 अमेरिकन डॉलर्सच्या बक्षिसाच्या एकूण रकमेतून अनुक्रमे 50,000, 25,000 आणि 15,000 अमेरिकन डॉलर इतके बक्षीस मिळेल. एलिट गटात नवा स्पर्धा विक्रम रचणार्याला 15,000 डॉलरचे अतिरिक्त बक्षीस मिळेल. 2023 पासून इथिओपियाचा हेले लेमी बर्हानू (2:07:32 सेकंद) आणि अँचियालेम हेमनोटने (2:24:15 सेकंद) मॅरेथॉन रेकॉर्ड रचले आहेत. 2025 मॅरेथॉनमध्ये भाग घेणार्या अकरा पुरुष आणि सहा महिला धावपटूंची वैयक्तिक कामगिरी ही सध्याच्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या स्पर्धा विक्रमापेक्षा (कोर्स रेकॉर्ड) जास्त आहे.
एलिट अॅथलीट्सच्या उत्कृष्ट श्रेणीवर भाष्य करताना, प्रोकॅम इंटरनॅशनलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग म्हणाले की, बेरहानू आणि मिनसेवो या गतविजेत्यांच्या पुनरागमनासह आम्ही टाटा मुंबई मॅरेथॉनच्या 20व्या आवृत्तीमध्ये प्रवेश करत आहोत. ही रेस भारतातील लांब पल्ल्याच्या धावण्याच्या खेळाच्या यशासाठी प्रेरणादायी ठरली असून एलिट लाइन-अप ही टीएमएमच्या जगभरातील वाढत्या लोकप्रियतेची साक्ष आहे. रविवार, 19 जानेवारी रोजी जागतिक स्तरावरील सर्व अव्वल धावपटू त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी आतुर आहेत.