कर्करोगाच्या जागृतीसाठी जगभरात ४ फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. दुर्दैवाने या रोगाचे प्रमाण लहान मुले व महिलांमध्ये जास्त आढळून येत आहे. म्हणून मुलांच्या कॅन्सरबाबत पालकांना मार्गदर्शन आणि स्तनाच्या कॅन्सरशी लढा देणाऱ्या महिलांसाठी नवे पर्याय याबाबत दोन निष्णात डॉक्टरांचे मोलाचे सल्ले सादर करीत आहोत.

लहान मुले या आजाराबाबत अनभिज्ञ असतात. त्यांना नेमके काय होते, हे सांगता येत नाही. तेव्हा या संबंधात पालकांनी त्यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये, असे आग्रही प्रतिपादन नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलच्या पेडियाट्रीक ऑन्कॉलॉजी, हेमॅटोलॉजी आणि बीएमटी फिजिशियन डॉ. प्रीती मेहता यांनी केले आहे. त्या पुढे म्हणतात, “मुलांमध्ये साधारणपणे पाच प्रकारची लक्षणे आढळून येतात. पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मुलाची तब्येत दीर्घकाळ बिघडत असेल, तर त्याला लगेच वैद्यकीय उपचार करा. डोळ्यामध्ये पांढरा किंवा लाल प्रकाशित डाग दिसल्यास तो एक प्रकारचा कॅन्सर असतो, हे लक्षात घ्या. अन् लगेच डॉक्टरांकडे जा.”

“शरीरात कोणत्याही प्रकारची लहान मोठी गाठ आल्यास ती कॅन्सरची गाठ आहे, हे गृहित धरून त्याची लगेच चाचणी करून घ्या. मूल अतिशय थकत असेल किंवा त्याचे वजन अचानक कमी होत असेल अथवा त्याला सतत ताप येत असेल वा रक्तस्राव होत असेल तर सावध व्हा. हाडे किंवा सांधे यांचे दुखणे साधे असेल तर ते रात्री उद्भवते. पण कॅन्सरशी संबंधित दुखणे दिवसरात्र आढळते. सकाळी उठल्यावर डोकेदुखी किंवा उलट्या होत असल्यास वेळीच सावध व्हा. किंवा त्याच्या वाणीत दोष आढळल्यास काळजी घ्या. ही ब्रेन ट्युमरची लक्षणे असू शकतात. या संदर्भात घाबरून जाऊ नका. लवकर निदान झाले तर कॅन्सर नियंत्रित होऊ शकतो.”
स्तनाच्या कॅन्सरशी लढा देणाऱ्या महिलांसाठी नवे पर्याय
स्तनाचा कॅन्सर ही भारतातील महिलांमध्ये दिसणारी प्रमुख समस्या आहे. या आजाराशी लढा देणाऱ्या युवा महिलांचे प्रमाण खूप जास्त आहे. कॅन्सरवरील उपचारांमध्ये स्तन संरक्षण शस्त्रक्रियेचे पर्याय उपलब्ध असताना देखील काही महिलांवर मॅस्टेक्टोमी (पूर्ण स्तन काढून टाकावा लागणे) करावी लागते. या संबंधी नवीन पर्यायाबद्दल अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या ब्रेस्ट सर्जरी लीड कन्सल्टन्ट डॉ. नीता नायर यांनी मोलाची माहिती दिली आहे. त्या म्हणतात –

“ज्या महिलांमध्ये मॅस्टेक्टोमी करण्याची गरज असते, त्यांना आता रोबोटिक निप्पल-स्पेअरिंगचा सल्ला दिला जातो. ही अचूक शस्त्रक्रिया दृष्टिकोन प्रदान करते, ज्यामुळे सर्जनना कॅन्सरग्रस्त पेशी काढताना निरोगी ऊतींचे नुकसान होणार नाही याची काळजी घेता येते. अचूकता वाढल्याने ऑन्कोलॉजिकल परिणाम सुधारतात. शिवाय वेदना कमी होतात आणि तब्येत जलद गतीने सुधारते. या नाविन्यपूर्ण उपचारांमळे, महिला स्तनाच्या कॅन्सरशी नवीन ताकद आणि सन्मानपूर्वक लढा देऊ शकतात. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांबरोबरच सध्या हा नवीन पर्याय उपलब्ध आहे.