Close

शरीरसंबंध कधी टाळाल? (When To Avoid Intercourse?)


लग्न झालं की सुरुवातीच्या काही दिवसात सेक्ससंबंध क्लेशदायक ठरतात. दोघांपैकी एकाच्या किंवा दोघांच्याही जननेंद्रियात वेदना होऊ शकतात. कारण समागमाचा सराव नसतो किंवा योग्य पद्धत माहीत नसते.

सुखी वैवाहिक जीवनाचा पाया चांगल्या शरीरसंबंधावर मजबूत असतो. मानसिक, शारीरिक आणि संसारिक सुख लाभण्यासाठी कामक्रीडा गरजेची असते. पण कधीकधी त्याचे सातत्य राखता येत नाही. जोर जबरदस्ती देखील करता येत नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये कामक्रीडा करू नये, ते दोघांनी मिळून निश्‍चित केलं पाहिजे.

भांडण झालं तर…
संसारात भांड्यास भांडं लागतंच. भांडणे झाली नाहीत, तर संसार नीरस होतो, असं बव्हंशी लोकांचं मत आहे. त्यामुळे दिवसा भांडणं झालं की, रात्री बेडरूममध्ये ते मिटतं; भांडणाच्या कारणावर देखील. भांडणाच्या कारणावर देखील जोडीदाराची समजूत घाला. जर चूक आपली असेल तर माफी मागण्यात कुचराई करू नका. जोडीदाराचा मूड चांगला राहण्यासाठी त्याच्या कलाने घ्या. त्याच्या आवडीचा पदार्थ हॉटेलातून घेऊन या किंवा मागवा. शक्य असेल तर चांगली भेटवस्तू द्या. एकदा त्याचं डोकं शांत झालं की सेक्स करण्यात बाधा येणार नाही.

क्लेशदायक संबंध
लग्न झालं की सुरुवातीच्या काही दिवसात सेक्ससंबंध क्लेशदायक ठरतात. दोघांपैकी एकाच्या किंवा दोघांच्याही जननेंद्रियात वेदना होऊ शकतात. कारण समागमाचा सराव नसतो किंवा योग्य पद्धत माहीत नसते. त्यात पुन्हा, हे तर चालायचंच, असं गृहीत धरून शरीरसंबंध तसेच चालू देण्याकडे पुष्कळांचा कल असतो. बहुधा स्त्रियांना पीडा जास्त होतात. त्यामुळे त्यांना हे संबंध नकोसे वाटण्याची शक्यता असते. मनात भीती दाटून राहते. किंवा पीडा सहन होत नसल्याने पुरुषाला देखील ते नकोसे वाटण्याची शक्यता असते.

उपाय काय
शरीरसंबंध करताना जननेंद्रियात होणार्‍या वेदनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दोघांपैकी एकाला किंवा दोघांनाही जर ह्या वेदना जास्त होत असतील तर ते संबंध तसेच चालू ठेवून दोन मनांमध्ये दरी निर्माण होऊ देऊ नका. चांगल्या लैंगिक समस्या तज्ज्ञ अथवा स्त्री रोग तज्ज्ञ यांचा त्वरित सल्ला घ्या. निःसंकोचपणे त्यांना आपली समस्या सांगून उपचार करून घ्या.

गर्भधारणा झाल्यास
लग्नानंतरची स्त्रीच्या जीवनातील पवित्र अवस्था म्हणजे मातृत्व. त्यासाठी दिवस गेले की, स्त्रीच्या प्रकृतीमध्ये, वागणुकीत पुष्कळ फरक पडतो. पोटातलं हवंहवंसं ओझं सांभाळताना तिची तारांबळ उडते. प्रकृती नाजूक राहते. घरात येणार्‍या चिमुकल्या पाहुण्याच्या विचारात ती दंग असते. सतत आपल्या बाळाचेच विचार तिच्या डोक्यात असतात. त्यातच पुन्हा नवरोबाला शरीरसंबंध हवे असतील, तर तिची पंचाईत होते. गर्भावस्थेत शरीरसंबंध कसे ठेवावेत, ठेवावेत की ठेवू नयेत. अशा संभ्रमात ती असते. तज्ज्ञांच्या मते या काळात सहाव्या आठवड्यापासून बाराव्या आठवड्यापर्यंत सेक्स करता कामा नये. कारण या काळात गर्भास इजा होऊन गर्भपात होऊ शकतो. त्याचप्रमाणे शेवटच्या दोन महिन्यात देखील सेक्स करू नये. एकूणच दिवस गेलेले असताना, सेक्सची इच्छा झाल्यास मनास कसं आवरावं, हा प्रश्‍न पडतो.

उपाय काय
गर्भधारणा झाल्यावर जेवढी काळजी पत्नीने स्वतःची घ्यायची असते, तेवढीच तिची काळजी पतीने घेतली पाहिजे. आणि घरच्यांनीही घेतली पाहिजे. ती सदैव आनंदी राहिली पाहिजे, ही जबाबदारी घरच्यांची ठरते. होणारी आई जेवढी आनंदी राहील, तेवढेच तिचे व बाळाचे स्वास्थ निरोगी राहील. या काळात पुरुषाला सेक्स करण्याची इच्छा होऊ शकते, तशी स्त्रीलादेखील होऊ शकते. तेव्हा दोघांच्या संमतीने, चौथ्या महिन्यापासून सातव्या महिन्यापर्यंत सेक्स करता येईल. मात्र डॉक्टरी सल्ल्यानेच याचा निर्णय घ्यावा. डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर पत्नीला त्रास होणार नाही, अशा बेतानेच सेक्स सुख घ्यावे.

बाळंत झाल्यावर
स्त्री जेव्हा बाळंत होते तेव्हा तिचा तो जणू पुनर्जन्मच असतो. जन्माला आलेल्या बाळानं तिचं आयुष्य आमूलाग्र बदलून जातं. तिच्या शरीर व मनात बदल होतात. बाळाचं संगोपन करण्यापुढे तिला इतर गोष्टी गौण वाटतात. त्यामुळे कामजीवनाचा विचारसुद्धा तिच्या मनाला शिवत नाही. 3 ते 6 महिन्यानंतर जेव्हा तिची मासिक पाळी परत येते, तेव्हा तिची कामेच्छा पूर्ववत होऊ शकते. जेव्हा पत्नी ओली बाळंतीण असते तेव्हा पतीने तिच्याकडून शरीरसुखाची अपेक्षा ठेऊ नये. कारण ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्यासाठी तयारच नसते.

उपाय काय
या कालखंडात पुरुषास कामेच्छा झाली तरी त्याने आपले मन आवरावे. पत्नीच्या मनःस्थितीचा, तिच्या शारीरिक व मानसिक संक्रमणावस्थेचा विचार करूनच तिच्याकडे इच्छा प्रकट करावी. तसं पाहिलं तर प्रसुतीनंतर किमान सहा आठवडे तरी सेक्स करण्यास डॉक्टरांची परवानगी नसते. त्यानंतर सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने शरीरसंबंध ठेवावे. पत्नीचे चेकअप केल्यानंतरच डॉक्टर योग्य तो सल्ला देऊ शकतात. जेणेकरून तिला शरीरसंबंध कष्टप्रद होणार नाहीत.

हृदयविकार झाल्यास
अलीकडे हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले आहे. हृदयाचा काही विकार झाल्यास किंवा झटका आल्यास संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला जातो. तेव्हा माणूस एवढा चिंतेत असतो की, त्याला कामेच्छा होतच नाही. तरी काही स्त्री-पुरुषांच्या भावना चाळवतात व त्यांना सेक्स करावासा वाटतो. त्यांनी खबरदारी घेतलीच पाहिजे. कारण आपण सगळेच जाणतो की, कामभावना उचंबळून येतात
तेव्हा शरीरात उत्तेजना येते. या उत्तेजनामुळे हृदयावर ताण पडतो. हृदयविकाराने हृदय कमकुवत झाले असते. त्याला जास्त ताण देणे हानिकारक ठरू शकते. तेव्हा आपल्या जोडीदारास जर हृदयविकार असेल तर पूर्ण काळजी घेतली पाहिजे. पूर्ण बरे झाल्यानंतर सेक्स करण्याचा विचार करावा. हीच काळजी अन्य रोगांमुळे जर शस्त्रक्रिया करण्यात आली
असेल तर घ्यावी.डॉक्टरी सल्ल्यानेचसेक्स संबंधांचाविचार करावा.

Share this article