मोकळ्या भिंतींचा ट्रेंड कधीच मागे सरलाय. भिंतींवर केलेली थोडी कलाकुसरही आपल्या घराला नवा स्टायलिश लूक देऊ शकते. अर्थातच, त्यामुळे भिंती या केवळ छताला आधार देणार्या चार भिंती न राहता घरातील सजावटीचा आकर्षक केंद्र बनू शकतात.
पूर्वी बरं होतं... दसर्या-दिवाळीपूर्वी घराला रंगरंगोटी केली की, घर सणावारासाठी नव्या रंगात नवं होऊन जायचं. मग ज्यांना ही रंगरंगोटी परवडणारी नसे, त्यांचं घर केवळ साफसफाई आणि ठेवणीतले पडदे, चादरी-अभ्रे लेवूनही कात टाकायचं. खरं तर, आताही चित्रं फारसं बदललेलं नाही. एकतर वाढत चाललेली महागाई आणि वेगाने धावणारे घड्याळाचे काटे... दरवर्षी घराला रंगरंगोटी करणं आजही अनेकांना परवडत नाही. त्यात वॉशेबल, स्टेन-फ्री पेंटच्या जमान्यात भिंतीचे रंगही वर्षानुवर्षं खराब होत नाहीत, त्यामुळे कित्येक वर्षं रंगरंगोटीची पाळीच येत नाही. त्यातही आता घराला नवंपण देण्यासाठी, ताजतवानं करण्यासाठी रंगरंगोटी हा एकमेव पर्यायही राहिलेला नाही. घरातील फर्निचरच्या रचनेत किंवा सजावटीच्या वस्तूंमध्ये फेरफार करूनही हल्ली अनेक जण घराला वरचेवर नवा लूक देत असतात. मात्र घराला नवंपण देण्याच्या या प्रक्रियेत भिंती नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात, हे नक्की. त्यामुळे ‘वॉल डेकोर’ हा स्वतंत्र विभाग उदयाला आला नसता, तरच नवल होतं.
आपल्या आवडीनिवडीनुसार, बजेटनुसार आपणही आपल्या घरातील भिंतीला वेगळा आणि आकर्षक लूक देऊ शकतो. म्हणजे आपली कलात्मकता, निसर्गाविषयीची ओढ, पुस्तकांचं वेड... सारं सारं या भिंती सामावून घेऊ शकतात, किंबहुना तोर्यात मिरवू शकतात. म्हणजे, सजावटीची सजावट आणि आपल्या मनपसंत वस्तूंच्या सान्निध्यात राहण्याचा बोनसही! तर अशा या भिंतीचा आधार घेत घराला नवा लूक देण्याच्या विचारात असाल, तर हे पर्याय जरूर अजमावून पाहा.
आपल्या घरातील एका भिंतीचं फोटो गॅलरीत रूपांतर करा. त्या संपूर्ण भिंतीवर नाना आकाराच्या लहान-मोठ्या अनेक फ्रेम्स लावा. या फ्रेममध्ये तुम्ही तुमची, प्रियजनांची छायाचित्रं लावू शकता. आठवणींची ही भिंत तुमचा मूड सदैव चांगला ठेवेल. पाहुण्यांसाठीही ती आकर्षणाचा बिंदू ठरेल. छायाचित्र लावायची नसतील, तर एखाद्या चित्रकाराच्या कलाकृतींनीही ही भिंत सजवता येईल.
सजावट करताना भिंतीवर आकर्षक शेल्फ लावल्या की, सजावट तर होतेच; सोबत तुमच्या पुस्तकांना किंवा सजावटीच्या वस्तूंना हक्काची जागाही मिळते. त्यात हल्ली फ्लोटिंग, म्हणजे छतावरून झुल्याप्रमाणे लटकणार्या शेल्फ ट्रेंडमध्ये आहेत. त्यांचाही विचार करता येईल.
घरातील एखाद्या भिंतीवर कापडापासून तयार केलेलं वॉल हँगिंग लावता येईल. कापडावर केलेली एखादी कलाकुसर फ्रेम स्वरूपातही लावता येईल.
एखाद्या खोलीची झटपट आणि तात्पुरती सजावट करायची असेल, तर रिमुव्हेबल वॉल स्टिकर्सचा पर्याय उत्तम आहे. म्हणजे, आपल्या आवडीचं लहानसं ते अगदी संपूर्ण भिंती भरून टाकेल इतकं मोठं, असं कोणतंही स्टिकर आणायचं आणि काळजीपूर्वक भिंतीवर चिकटवायचं, झाली सजावट. सजावट बदलावीशी वाटली की, केवळ स्टिकर बदललं आणि झालं काम. भाडेतत्त्वावर राहणार्या मंडळींसाठी हा प्रकार उत्तम आहे. भिंती खराबही होत नाही आणि आवडीप्रमाणे सजावटही करता येते.
भिंतींवर आरशाची कलाकुसरही शोभून दिसते. एखादा भिंतभर मोठा आरसा किंवा लहान लहान आरशांचं कोलाज... तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. आरशांमधून प्रकाश परावर्तित होऊन खोली प्रकाशमय तर होतेच, सोबत ती मोठीही भासते. शिवाय वाट्टेल तेव्हा आरशात डोकावण्याचा बोनस आहेच.