नुकताच इंडियन आयडल या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या १५ व्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडला. २४ वर्षांची मानसी घोष या शोची विजेती ठरली. या ग्रँड फिनालेनंतर तीन परीक्षकांपैकी एक विशाल ददलानीने मोठी घोषणा केली आहे. मागील सहा वर्षांपासून तो या शोमध्ये परीक्षक म्हणून काम पाहत होता, आता त्याने या शोमधून एक्झिट करत असल्याची माहिती दिली आहे.
संगीतकार आणि गायक विशाल ददलानी ‘इंडियन आयडल’चा मागील सहा सीझनपासून परीक्षक होता. आता हा सीझन संपल्यावर त्याने या शोमध्ये पुन्हा दिसणार नसल्याची घोषणा केली आहे. विशालने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांना कळवले की तो यापुढे ‘इंडियन आयडल’चा भाग नसेल. या पर्वात तो श्रेया घोषाल आणि बादशाहबरोबर परीक्षक म्हणून दिसला होता.
इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत विशालने शो सोडण्याचे कारण सांगितले. “अलविदा मित्रांनो. मी सीझन ६ मध्ये जितकी मजा केली होती त्यापेक्षा जास्त मी आता हा शो मिस करेन. या शोमुळे मला खूप जास्त प्रेम मिळाले आहे. या सर्व गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे,” असं विशालने लिहिलं.

“मला आशा आहे की हा शोही मला तितकाच मिस करेल, जेवढं मी करेन. मी इंडियन आयडल फक्त यासाठी सोडत आहे की मला वेळ हवा आहे. मी दरवर्षी ६ महिने मुंबईत राहू शकत नाही. पुन्हा संगीत तयार करण्याची वेळ झाली आहे. आता पुन्हा मंचावर उतरून कॉन्सर्ट करण्याची वेळ आली आहे. आता मी पुन्हा मेकअप करणार नाही,” असं विशाल ददलानीने लिहिलं.

विशाल ददलानीच्या या पोस्टवर आदित्य नारायणने लिहिलं, ‘एक युग संपणार आहे. इंडियन आयडल तुमच्याशिवाय आधीसारखे नसेल.’ तर युवराज सिंगची पत्नी आणि अभिनेत्री हेजल कीचनेही विशालच्या पोस्टला भावनिक म्हटलं आहे.
विशाल ददलानी हा लोकप्रिय संगीतकार व गायक आहे. त्याने त्याचा संगीतकार मित्र शेखरबरोबर ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘बँग बँग’ आणि ‘वॉर’ सारख्या बॉलीवूड हिट चित्रपटांना संगीत दिले आहे. याचबरोबर विशाल हा सामाजिक आणि राजकीय विषयांवर मोकळेपणाने त्याचे विचार मांडण्यासाठी ओळखला जातो.
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)