अभिनेता मनोज कुमार यांचे आज शुक्रवार ४ एप्रिल रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ते विशेषतः त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटांसाठी ओळखले जात. त्यांना भारत कुमार म्हणूनही ओळखले जात असे. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गोस्वामी होते. त्यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी ब्रिटिश भारतातील अबोटाबाद (आता खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान) येथे झाला. त्यांच्या पश्चात पत्नी शशि गोस्वामी आणि मुलगा कुणाल आहेत.

मनोज कुमार यांचा मुलगा कुणाल याने एएनआयशी बोलताना सांगितले की, “माझे वडील मनोज कुमार यांचे आज पहाटे ३.३० वाजता कोकिलाबेन रुग्णालयात दुर्दैवी निधन झाले. ते काही दिवसांपासून अस्वस्थ होते. मात्र मोठ्या हिंमतीने ते सगळ्या त्रासाला सामोरे गेले. दैवकृपेने त्यांनी शांततेत शेवटचा श्वास घेतला. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. वयाच्या ८७ वर्षीही ते खूप आनंदी होते. सगळ्यांशी बोलायचे. नातवंडं – पतवंडांसोबत रमायचे. मात्र गेल्या बऱ्याच वर्षांपासून वयामुळे ते आजारी अन् अस्वस्थ होते एवढेच.”
#WATCH | Veteran actor Manoj Kumar passed away at the Kokilaben Dhirubhai Ambani Hospital early this morning at around 3:30 AM.
— ANI (@ANI) April 4, 2025
His son, Kunal Goswami, says, "...He has had health-related issues for a long time. It's the grace of the god that he bid adieu to this world… pic.twitter.com/bTYQnXNHcF
मनोज कुमार यांचा मुलगा कुणाल गोस्वामी याचा केटरिंगचा बिझनेस आहे. सुरुवातीला त्यांनी अभिनयात आपलं नशीब आजमावलं परंतु, त्यांना हवं तसं यश मिळालं नाही.

मनोज कुमार लहानपणापासूनच दिलीप कुमार यांचे खूप मोठे चाहते होते. मनोज कुमार यांना दिलीप साहेबांचा 'शबनम' (१९४९) हा चित्रपट इतका आवडला की त्यांनी तो अनेक वेळा पाहिला. चित्रपटात दिलीप कुमार यांचे नाव मनोज होते. जेव्हा मनोज कुमार चित्रपटांमध्ये आले तेव्हा त्यांनी दिलीप कुमार यांच्या नावावरून त्यांचे नाव मनोज कुमार असे ठेवले.

मनोज कुमार हे केवळ अभिनेते नव्हते तर ते उत्तम लेखक अन् दिग्दर्शकही होते. मनोज कुमार यांना ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. पहिला फिल्मफेअर पुरस्कार १९६८ मध्ये 'उपकार' चित्रपटासाठी मिळाला. 'उपकार' ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. १९९२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१६ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय सिनेमाच्या इतिहासात मनोज कुमार यांचं निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे.
मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली !