बीड जिल्ह्यातील त्वरीतादेवी ही भक्तांच्या नवसाला हमखास पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्रात तळवाड्याच्या डोंगरपठारावर घाटात देवीची यात्रा भरत असते. याखेरीज कोजागिरी पौर्णिमा आणि दर मंगळवारी, शुक्रवारीही देवीच्या दर्शनासाठी भक्तगणांची गर्दी होते.
साडेतीन शक्तीपीठे म्हणून मान्यता असलेल्या तुळजाभवानी, माहुरची रेणुकाई, अमरावतीची अंबाबाई आणि कोल्हापूरची महालक्ष्मी यांच्या खेरीजही महाराष्ट्रात देवींची अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत. सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी (काळूबाई), मोहट्याची रेणुका, अंबाजोगाईची योगेश्वरी इत्यादी. हिमाचल प्रदेशातही ज्वालामाता, हणोगीमाता, जम्मुची वैष्णवदेवींसह इतरही देवींची स्थाने, देवालये भाविकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्याबाबतच्या कहाण्या दंतकथाही मोठ्या रोचक, प्रेरक आणि उद्बोधक आहेत.
बाराशे फूट उंचीवर त्वरीतादेवीचं मंदिर
तळवाडा (ता. गेवराई, जिल्हा बीड) येथील एका डोंगरावरील त्वरीतादेवी ही भक्तांच्या नवसाला हमखास पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणून आई जगदंबेचेच रुप असलेल्या या देवीस भाविकांनी त्वरीतादेवी असे प्रेमाने नाव दिलेले आहे. तळवाडा या छोट्याशा गावाभोवती बारा छोट्यामोठ्या वाड्या आहेत. तळवाडा हे तेरावे गाव म्हणून त्याचे मूळ नाव तेरावाडा. ते काळाच्या ओघात बदलले आणि आता तळवाडा म्हणून ओळखले जाते. ते धुळे-सोलापूर या नव्याने तयार झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर औरंगाबाद आणि बीडच्यामध्ये जवळपास समान अंतरावर म्हणजे सुमारे सत्तर किलोमीटरवर येते. मुख्य महामार्गापासून सुमारे बाराशे फूट उंचीवर एका डोंगरपठारावर त्वरीतादेवीचे मंदिर आहे. त्याचा रंगीबेरंगी एक्काव्वन फूट उंचीचा कळस लांबूनही नजरेत भरतो. थेट वरपर्यंत जाण्यासाठी तळवाडा गावातून प्रशस्त पायर्याही बांधलेल्या आहेत आणि दुसर्या बाजूने वरपर्यंत जाणारी सडकही आहे. त्यामुळे कार, छोट्या बसेस वरपर्यंत येऊ शकतात.
साडे तीन फूट उंचीची देवीची अत्यंत सुबक मूर्ती
जगदंबा देवीचे हे ठिकाण प्राचीन असले तरी आज दिसणारे दगडी चिरेबंदीचे मजबूत मंदिर सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी म्हणजे शिवकाळात बांधलेले आहे. तर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच्या दीपमाळा त्यानंतरच्या आहेत. त्या बीडच्या कोणा कुलकर्णी नामक भक्ताने बांधलेल्या आहेत.
तसा उल्लेख असलेला एक शिलालेखही आहे. प्रवेशद्वाराचे वर नगारखाना आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एखाद्या वाड्याची असावी तशी रचना आहे. तिन्ही बाजूंना ओवर्या किंवा देवड्या बांधलेल्या आहेत. त्याही दगडी आहेत. तसेच भैरवनाथाचे एक छोटेसे मंदिरही आहे.
देवीची प्रतिमा साडेतीन फूट उंचीच्या सिंहासनावर विराजमान आहे. तर देवीची काळ्या पाषाणाची अत्यंत सुबक मूर्ती आहे. तीही साडेतीन फूट उंचीची आहे. त्वरीतादेवीस वस्त्रालंकाराने सजविल्यानंतर ती पुष्कळशी तुळजापूरच्या भवानीमातेसारखी वाटते, म्हणून या देवीस भक्तगण ‘तुळजात्वरीता’ असेही संबोधतात. तळवाडा गावातून जिथे पायर्या सुरु होतात, तिथे तुळजाभवानीचे एक छोटेसे मंदिर आहे. अगोदर तिचे दर्शन घेऊन मगच पायर्या चढून वर त्वरीतादेवीच्या दर्शनास यायचे अशी प्रथा आहे. या डोंगरात एक वीस किलोमीटर लांबीचे भुयार आहे आणि त्यात अंबाजोगाईच्या योगेश्वरीचा वास आहे असे म्हणतात. अर्थात आज भुयार बुजलेले आहे. केवळ पंधरावीस फुटाचाच भाग तेवढा दिसतो. जमदग्नी ऋषींस त्वरीतादेवीशी विवाह करायचा होता, पण तो झाला नाही, अशी एक आख्यायिकाही या देवीबाबत सांगितली जाते.
नवस फेडण्याकरता भाविकांना पंगत जेवण
नवरात्रात देवीची यात्रा तळवाड्याच्या या डोंगरपठारावर घाटात भरत असते. याखेरीज कोजागिरी पौर्णिमा आणि दर मंगळवारी, शुक्रवारीही भक्तगणांची गर्दी असते. देवीचा महिमा सांगणार्या गाण्याच्या सीडीज, कॅसेटस् वगैरेही यात्रेत मिळतात. तळवाड्यातीलच लक्ष्मणराव हटकर यांच्या परिवाराकडे देवीचा ‘गोंधळ’ घालण्याचा पिढीजात मान आहे. मंदिर पठाराच्या परिसरात भोजनगृह, स्वैपाकघर, भांडीकुंडी इत्यादीही उपलब्ध आहे. नवस फेडण्याचा एक भाग म्हणून इथे भाविकांना ‘पंगत’ जेवण देण्याची पद्धतीही आहे. दैनंदिन पुजेअर्चेसोबत होमहवनही या मंदिरात होत असते. नवसाला त्वरीतादेवी पावते, असा या त्वरीतादेवीचा नावलौकिक आणि महिमा आहे. बीड वा औरंगाबादेहून अर्ध्याएक दिवसाची ही छोटीशी यात्रा आणि देवीदर्शन भाविकांना नक्कीच करता येईल.