अलीकडे लठ्ठपणा वाढला असल्याचे दिसून येते. पोटाचा, कंबरेचा घेर वाढलेली माणसे जास्त प्रमाणात दिसतात. बैठे काम, व्यायामाचा अभाव, बिघडलेली जीवनशैली यामुळे वजन वाढते. त्याचप्रमाणे अरबट चरबट पदार्थ खाल्ल्याने हे वजन वाढते. शिवाय हे खाणे अवेळी असते. म्हणजे कामाच्या झपाट्यात नको तेव्हा भूक लागते. भुकेची वेळ टळून गेल्यावर भान येतं. काहीतरी तोंडात टाकावसं वाटतं. अन् मग हाती वेफर्सचं पॅकेट येतं. पाय वडापावच्या गाडीकडे वळतात किंवा पिझ्झा-बर्गर ऑनलाइन मागवले जातात. हे पदार्थ पोटात गच्च बसतात. शरीराची हालचाल कमी झाल्याने नीट पचत नाहीत. अन् पोटाची चरबी वाढते.
- या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत. अन् वेळच्या वेळी तेलकट, मसालेदार पदार्थ पोटात न ढकलता पचायला हलके, पौष्टिक पदार्थ खाल्ले पाहिजेत. शिवाय जास्त कॅलरीयुक्त पदार्थ न खाता, सात्त्विक पदार्थ खाण्याची सवय लावून घेतली पाहिजे. कॅलरीज, कार्बोहायड्रेटस्, फॅ ट आणि प्रोटिन्स युक्त यांचे संतुलन राखणारे पदार्थ खाल्ले तर शरीरात चरबी साठून घेर वाढण्याच्या समस्या उत्पन्न होणार नाहीत. त्यासाठी खालील प्रकार प्रयत्न करून बघा. जेवणाव्यतिरिक्त आपण जे स्नॅक्स खातो, त्यामध्ये हे प्रकार अजमावून पाहा.
- ब्राऊन ब्रेडमध्ये बनविलेले एक सॅण्डवीच खा. त्यामध्ये बटर किंवा मेयॉनीज सॉस न लावता, लो फॅ ट, लो कॅलरी चीझ घाला. सोबत चहा घ्या. हा ग्रीन टी असल्यास उत्तम. किंवा चहापानाच्या वेळी हे सॅण्डवीच खा.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/majhisaheliuploads/2022/07/Uttam-Paryay2-800x640.jpg)
- मलई नसलेली लस्सी प्या. लस्सी सोबत उपमा किंवा पोहे खा.
- तळलेले पदार्थ न खाता, भाजलेले पदार्थ खा. भाजलेले तिखट पदार्थ, चणे किंवा गोड चटणी ज्यूस घ्या.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/majhisaheliuploads/2022/07/Uttam-Paryay3-800x786.jpg)
- आपल्या आवडत्या भाज्यांचे बारीक तुकडे करा. ते तुकडे उकडून घ्या. त्यावर थोडेसे मीठ आणि मिरी पावडर टाका. उपलब्ध असल्यास त्यावर व्हिनेगरचा बेस असलेले सॅलड ड्रेसिंग टाका. हा चविष्ट आणि पौष्टिक पर्याय होऊ शकतो.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/majhisaheliuploads/2022/07/Uttam-Paryay7-800x535.jpg)
- उकडलेल्या भाज्या काहींना आवडणार नाहीत. बेचव आहेत, असं वाटेल. अशा लोकांनी एक प्लेट सॅलड, ताजी फळे किंवा फ्रूट चॅट खायला हरकत नाही.
- काही लोक मधल्या वेळात चॉकलेट खातात. पण त्यामध्ये कॅलरीज् जास्त प्रमाणात असतात. म्हणून चॉकलेट खाण्याची इच्छा झाल्यास मलई नसलेल्या दुधात ड्रिंकींग चॉकलेट टाकून प्या.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/majhisaheliuploads/2022/07/Uttam-Paryay5-800x632.jpg)
- संध्याकाळी भूक लागते. अन् चमचमीत खाण्याची इच्छा होते. ही इच्छा दाबून ठेवा. चमचमीत पदार्थांऐवजी फ्रेश व्हेजिटेबल सूप प्या. पचायला हलका आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे.
- ऑफिसला जाते वेळी किंवा बाहेर पडताना सोबत बिस्किटाचा पुडा ठेवा. अर्थात् ही बिस्किटे मल्टी ग्रेन किंवा होल ग्रेन असावीत. (याचे विविध प्रकार सध्या उपलब्ध आहेत.) म्हणजे मधल्या वेळेत जंक फूड खाण्याऐवजी बिस्किट्स कामी येतील.
- वाटीभर दह्यात भाजलेले जिरे, मीठ आणि मिरी पावडर टाकून खा. भूक भागवा.
- ऑफिसला जाताना लंच बॉक्स बरोबरच एक स्नॅक्स बॉक्स सोबत ठेवा. या स्नॅक्स बॉक्समध्ये हलके स्नॅक्स ठेवा. मधल्या वेळेत खायला हे पदार्थ कामी येतील.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/majhisaheliuploads/2022/07/Uttam-Paryay6-800x632.jpg)
- एखाद्या दिवशी या स्नॅक्स बॉक्समध्ये सुकामेवा भरून न्या. काजू, किसमीस, बदाम, अक्रोड तसेच शेंगदाणे आणि गूळ असा सुकामेवा नेल्यास भूक भागेल. शिवाय वजन नियंत्रणात राहील. अन् हृदय विकाराचा धोका पण कमी राहील.
- भजी, वडा-पाव, बर्गर, समोसे असे तेलकट व चरबीयुक्त पदार्थ खाण्याऐवजी ताजी फळे खा. ती पचायला हलकी व भूक भागवणारी तसेच पौष्टिक असतात.त्यात असलेल्या व्हिटॅमिन्सने शरीरात चांगली ऊर्जा येते.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/majhisaheliuploads/2022/07/Uttam-Paryay8-800x598.jpg)