“आपलं नृत्यकौशल्य, अभिनय यांचा कस लागावा, अशी फुलवंतीची भूमिका आहे. ती साकारावी अशी प्राजक्ता माळीची इच्छा व स्वप्न होतं. ते आता पूर्ण झालं आहे,” अशा शब्दात दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडे यांनी प्राजक्ताचं कौतुक केलं. प्राजक्ताची प्रमुख भूमिका असलेल्या ‘फुलवंती’ या ऐतिहासिक मराठी चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण प्रसंगी त्या बोलत होत्या. सदर चित्रपट प्राजक्ताची पहिली निर्मिती असून स्नेहल यांचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न आहे. मुंबईत झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात प्राजक्ताने चित्रपटातील बहारदार लावणी नृत्य सादर केलं.
पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी चित्रपटरुपाने ११ ऑक्टोबर रोजी, नवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. या सोहळ्याला बाबासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र अमृत पुरंदरे उपस्थित होते. “या कांदबरीचे हक्क मिळविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण आम्ही ते दिले नव्हते. पण प्राजक्ता जेव्हा मला भेटली, तेव्हा तिनं या कथेवर केलेला अभ्यास आणि तिचा आत्मविश्वास पाहून आम्ही तिला होकार दिला,” असे अमृत यांनी सांगितले.
‘फुलवंती’ची कथा पेशवेकालीन आहे. नृत्यांगना आणि प्रकांडपंडित नरहर शास्त्री यांच्यातील संघर्ष यात आहे. शास्त्रींची भूमिका गश्मीर महाजनीने केली आहे. आपण यापूर्वी ऐतिहासिक चित्रपटातून आक्रमक भूमिका केल्या आहेत. या चित्रपटातील शास्त्रींमध्ये पण आक्रमकता आहे. मात्र ती बुद्धिमत्तेची आहे, असे सांगून गश्मीरने प्राजक्ता आणि स्नेहल यांच्या अभिनय व दिग्दर्शन कौशल्याची प्रशंसा केली.
पॅनोरमा स्टुडिओजने हा चित्रपट सादर केला आहे. आपण आतापावेतो ७५ चित्रपट वितरीत केले असून आणखीही मराठी चित्रपट वितरीत करण्याचा इरादा कुमार मंगत पाठक यांनी व्यक्त केला. मंगेश पवार, श्वेता माळी, स्वतः प्राजक्ता या चित्रपटाचे निर्माते आहेत. लेखन प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केलं असून संगीत अविनाश-विश्वजीत यांचं आहे. छायाचित्रण महेश लिमये यांचे आहे.
प्राजक्ता-गश्मीर यांच्यासोबत प्रसाद ओक, हृषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, गौरव मोरे हे कलावंत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.