लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या ‘एक बदनाम आश्रम’च्या सीझन ३ मधील दुसऱ्या भागाचे प्रदर्शन २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ॲमेझॉन एमएक्स प्लेयर वर सुरू होत असलेल्या या मालिकेचे ट्रेलर थाटामाटात प्रदर्शित करण्यात आले. मालिकेत निराला बाबाची भूमिका करणाऱ्या बॉबी देओलवर उपस्थित प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला.


मालिकेचा तिसरा सीझन सुरू होत असला तरी या मालिकेत आपल्याला भूमिका कशी मिळाली, हे सांगण्याचा मोह बॉबी देओलला आवरला नाही. आई-बाबांनी नापसंती दर्शविली, पण पत्नीने हिरवा कंदिल दाखविल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचे बॉबीने सांगितले. “या भूमिकेबद्दल मला प्रेक्षकांचे एवढे प्रेम मिळाले की मी कल्पना करू शकत नाही. ये आश्रम मेरे दिल के बहुत करीब है,” असे पुढे बॉबीने सांगितले. मालिकेचे निर्माते व दिग्दर्शक प्रकाश झा यांनी चित्रपटांबाबत अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळविले आहेत. “ये सीझन आपके सामने बहुत सवाल खडे करेगा और जवाबभी देगा,” असे त्यांनी सांगितले.
ॲमेझॉन एमएक्स प्लेयरचे कंटेट हेड अमोघ दुसाद म्हणाले की, “ही भारतातील सर्वात मोठी मालिका आहे. अद्वितीय पात्रे आणि आकर्षक कथानकासह प्रचंड लोकप्रियता निर्माण केली आहे.” या प्रसंगी मालिकेतील प्रमुख कलाकार अदिती पोहनकर, दर्शन कुमार, चंदन रॉय सान्याल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.