“तीन अनोळखी स्त्रिया एकत्र भेटतात अन् आपले आयुष्य सकारात्मकतेकडे नेतात. त्यांचा हा प्रवास हसतखेळत होतो,” अशी थोडक्यात ‘गुलाबी’ चित्रपटाची कथाकल्पना अभिनेत्री अश्विनी भावेने दिली. व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स या नव्या चित्रसंस्थेचा ‘गुलाबी’ हा मराठी चित्रपट येत्या २२ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्याचे ट्रेलर आणि म्युझिक अनावरण सोहळ्यामध्ये अश्विनी भावेने व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला.
“हे सर्व युनिट नवे होते. दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर बरोबर मी पहिल्यांदाच काम केले. तरी त्याच्यामध्ये असलेली सकारात्मकता बघून माझा उत्साह द्विगुणीत झाला”, असेही ती पुढे म्हणाली.
अभ्यंगची कथा व दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे स्वप्नील भामरे, सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग व स्वतः अभ्यंग असे चार निर्माते आहेत. “ही मैत्रीची फिल्म आहे. आमची पहिलीच निर्मिती आहे. त्यामध्ये सर्व कलाकार-तंत्रज्ञांनी मन लावून काम केले, त्याबद्दल त्यांचे आभार,” अशी भावना भामरे यांनी व्यक्त केली.
“आपण आयुष्यात विश्वास शोधत असतो. तोच विश्वास ‘गुलाबी’ मधून अधोरेखित होणार आहे. तिघी जणी एकत्र येतात व मैत्रीमध्ये विश्वास दाखवतात,” असे अभ्यंग कुवळेकर यांनी सांगितले.
अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी व श्रुती मराठे या विविध वयोगटातील मैत्रिणींची कथा या चित्रपटात आहे. “या चित्रपटाचे शूटिंग पुणे आणि जयपूर मध्ये झाले आहे. संपूर्ण चित्रीकरणात माझ्यापेक्षा या दोघींची एनर्जी जास्त होती,” असे अश्विनी व मृणालच्या संदर्भात श्रुती मराठेने सांगितले. या तिघींसह प्रदीप वेलणकर, शैलेश दातार, सुहास जोशी या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत.
संगीत साई-पियुष या जोडीने दिले असून त्याचे वितरण पॅनोरमा म्युझिकने केले आहे. बेला शेंडे, आर्या आंबेकर, राहुल देशपांडे, हंसिका अय्यर, सावनी रवींद्र यांनी गाणी गायली आहेत. मंदार चोळकर व अदिती द्रविड यांनी गाणी लिहिली आहेत. राजस्थानच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे कथानक बेतले असल्याने त्यात राजस्थानी-मराठी गाणी दिसतील. शिवाय जयपूर शहराची रमणीय सफर प्रेक्षकांना घडेल.