Close

सार्थक (Top Story: Sarthak)

रजनीला वाटलं अडतीस वर्षं उलटली त्या गोष्टीला. कुमार कामात गुंतत चालला आणि दुरावत चालला. आज त्रेसष्टाव्या वर्षी त्याचं करिअर कळसाला पोहोचलं आहे. एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीचा तो वित्तीय सल्लागार आहे आणि मी…
रजनी पलंगावर बसून होती. तिला काहीच करावंसं वाटत नव्हतं. टीव्हीचे चॅनल बदलले, पण ते बघण्यात मन लागलं नाही. पुस्तक तिनं हातात धरलं आणि बाजूला टाकलं. डोक्यात काहीच शिरत नव्हतं. बाहेर जायला हवं होतं, भाजी खरं तर संपली होती. भाजी आणायचं काम कधी तिने कुणावर सोपवलं नव्हतं. पण अलीकडे कंटाळा यायचा. स्वयंपाकाच्या गोदुताई यायच्या, तेव्हा त्यांच्याबरोबर पदर खोचून ती उत्साहाने एखादा पदार्थ करायची. ते पण अलीकडे बंद झालं होतं. “काय करू ताई?” असं गोदुताईंनी विचारलं की, “करा काही तरी. तुम्हाला कुमारची आवड माहीतच आहे.” असं उत्तर द्यायची. आत्ता उगीचच तिला रडू आलं. तिनं उठून तोंडावर पाणी मारलं, केस विंचरले. पण बाहेर नकोच जायला, असं वाटून ती बाल्कनीत खुर्ची घेऊन बसून राहिली. तिला आठवलं, लग्न झाल्यावर पहिल्या रात्री आपण दोघं इथे उभे होतो तेव्हा कुमार म्हणाला होता, “रजू, तुला बघितलं आणि मी तुझ्या प्रेमात पडलो. माझा होकार कळवण्याआधी तुझं उत्तर काय असेल या विचारानं मी इतका इनसिक्युअर होतो की दोन दिवस झोप नव्हती लागत. तुझ्या मैत्रिणीला मध्यस्थ घालून तुझा होकार आहे, हे समजल्यावर मन आनंदानं फुलून आलं होतं. तेव्हाही मी इथेच उभा होतो.” रजनीला वाटलं अडतीस वर्षं उलटली त्या गोष्टीला. कुमार कामात गुंतत चालला आणि दुरावत चालला. आज त्रेसष्टाव्या वर्षी त्याचं करिअर कळसाला पोहोचलं आहे. एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीचा तो वित्तीय सल्लागार आहे आणि मी…
आपणच उत्तम गृहिणी व्हायचं ठरवलं. ते साध्य उत्तम तर्‍हेने प्राप्त केलं. मग आज आपलं मन इतकं विस्कटून का गेलंय? आपल्याला नव्हतं करिअर करायचं? आईसारखी उत्तम गृहिणीच व्हायचं होतं. ते आपण झोकून देऊन केलं. सुरुवातीला खूप काटकसरीने संसार केला. खरेदीला म्हणून कधी गेलो नाही. साड्यांना
स्टार्च घरी केलं. मुलांचे कपडेही घरी शिवले. घर प्रसन्न हसतमुख ठेवलं. आला-गेला, सणवार, पैपाहुणा, नातेवाईक, स्वयंपाक, गृहसजावट,
कार्य प्रसंग… कुठे कमी पडलो नाही. समरसून संसार केला. जुन्या जुन्या आठवणींचा प्रवाह कोसळत राहिला तिच्या मना
कुमारचा आणि तिचा साखरपुडा झाला त्याच दिवशी तिचा एम.कॉम.चा रिझल्ट लागला होता. ती प्रथम श्रेणीत पास झाली होती. पुढे काय करायचं याची चर्चा सुरू होती. दुसर्‍या दिवशी कुमार आणि ती महालक्ष्मीच्या देवळात गेले. दर्शन घेऊन मग मागे समुद्रावर असलेल्या खडकांमध्ये उभे राहिले. लाटा उसळून खडकावर फुटत होत्या. सगळीकडे मलमली धुकं पसरलं होतं. त्यातून हाजीअलीचा दर्गा समुद्रातून वर उचलून धरल्यासारखा दिसत होता. किनार्‍याने मुंबईचं चपळ धावतं आयुष्य दिसत होतं. कुमार तिला म्हणाला होता, “रजनी, तू पुढे काय करायचं याबद्दल चर्चा सुरू होती तुमच्याकडे.”
“हो. तुला काय वाटतं?”
“तुला आवडेल ते कर. पण घराकडे, माझ्या आईवडिलांकडे थोडं जास्त लक्ष दिलंस, तर मी… म्हणजे माझ्या अपेक्षा लादत नाही तुझ्यावर, पण खरं सांगू का? तू नोकरी नाही केलीस तरी चालेल. आत्ता पगार कमी आहे माझा, पण लवकरच आर्थिकदृष्टीने आपण व्यवस्थित असू.”
रजनीने गंभीरपणे म्हटलं, “हं! म्हणजे तुम्हाला स्वयंपाकीण, मेड, मुलांची गव्हर्नेस आणि आईवडिलांची परिचारिका हवी आहे.” तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या काकुळतीला आलेल्या चेहर्‍याकडे बघून तिला तो उसना गंभीरपणा टिकवता आला नाही. ती म्हणाली, “मी हेच सांगणार होते की, मला वाटलं तर एखादं छोटं काम करीनही. पण मला छान संसार करायचाय. गृहिणी म्हणूनच ओळख हवीय मला. आणि मुलंसुद्धा.” बोलता-बोलता ती थांबली. आपण फारच पुढचं काहीतरी बोललो आहोत, असं वाटून तिनं मान खाली घातली.
कुमारने तिच्या हनुवटीखाली हात धरून तिचा चेहरा उचलून धरत म्हटलं,
“मुलं किती होऊ द्यायची, तो निर्णय तुझा असेल रजनी. पण या क्षणी तुला वचन देतो की, संसारात तुला पूर्ण साथ देईन.”
रजनीच्या मनात आलं, त्यानं त्याचा शब्द पाळला. तरीही आज आपल्याला रिकामं का वाटतंय?

कुमार म्हणतो, आता आपली एन्जॉय करायची इनिंग आहे. आपल्याला का तसं वाटतं नाही? आजमितीला काय आयडेंटिटी आहे आपली? अगदी लग्न झाल्यापासून आपण या घरच्या, घरातल्या माणसांच्या, त्यांच्या भावविश्‍वाच्या केंद्रस्थानी होतो. एवढीशी दुनिया आपल्याभोवती फिरत होती. कुमारच्या आईवडिलांनी आपल्याला खूप प्रेम दिलं. आपणही त्यांचं अखेरपर्यंत प्रेमानं केलं. आईचं नि आपलं एवढं विश्‍वासाचं नातं होतं की, त्यांच्या अखेरच्या आजारपणात त्यांनी त्यांच्या बहिणींनाही सांगितलं,“माझं सारं रजनीला करू द्या. तुमच्याकडून करून घेताना संकोच वाटेल.” कुमारच्या दोन्ही मावश्या, आत्या मला थोरली सून म्हणायच्या. माझ्या सल्ल्याशिवाय कुणाचं पान हालायचं नाही. ती माणसं काळाच्या पडद्याआड गेली आणि ती कुटुंबाची, नात्यांची ओढही उरली नाही. सगळं कसं विखुरत गेलं. कोण कुणाला विचारतंय आता? इतरांचं कशाला, आपली मुलं तरी कुठे आपली आठवण काढतात? मी चांगली, उत्कृष्ट गृहिणी झाले.


आमच्या आईसारखी आई जगात नाही, असं मुलं म्हणायची. सासू-सासर्‍यांनी मुलगीच
मानलं. काकू, मामी, आत्या, मावशी, आजी सार्‍या नात्यांमध्ये मी मनापासून प्राण भरले
आज हाती काय राहिलं? उत्तम गृहिणी हा पूर्णवेळेचा नव्हे, तर नेहमीच ओव्हरटाइम करावा लागणारा व्यवसाय मी पत्करला. त्यातून काय मिळालं? कणाकणानं सारं कधी निसटून गेलं कळलंही नाही.
बाल्कनीतून उठून ती आत आली. तिनं हॉलवरून नजर फिरवली. आपल्या जुन्या घरातले तीन हॉल मावतील एवढा हा प्रचंड हॉल, पण सजावट उपरी. मुलांनी कमावून आणलेली मेडल्स, शील्डस्, कप, प्रशस्तिपत्रकं ही तेवढी अस्सल कर्तृत्वाची निशाणी. बाकी सारं पैशांनी विकत घेतलेलं. त्या पहिल्या छोट्या घराला तिनं साधंसं कापड आणून पडदे शिवले होते.
व्हेलवेटची फुलं केली होती. तिनं पेंट केलेली चित्रं इतकी उत्तम होती की त्यावर जाणकारांचीही नजर खिळून राही. सासर्‍यांचं पथ्याचं वेगळं जेवण, सासूबाईंचं चवीपरीचं जेवण ती आवडीनं रांधत असे. सासूबाई कधी गमतीनं म्हणत, ‘माझ्याकडून शिकली आणि माझ्यापेक्षा चांगलं करते. जणू मीच हिच्या हाताखाली शिकले!’ सासूबाईंच्या मनातला मत्सर कधी डोळ्यात दिसायचा. स्वयंपाकघर आणि त्यांची खोली यातल्या गोष्टी हलवलेल्या त्यांना अजिबात चालत नसत. सुरुवातीला तिला हे
माहीत नव्हतं. लग्न झाल्यानंतर आठ-नऊ
महिनेच झाले असतील. सासूबाई म्हणाल्या,
“रजनी, तू सगळं चांगलं करायला लागली आहेस. घर व्यवस्थित सांभाळते आहेस. आम्ही दोघं ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जाणार्‍या ट्रिपला जाऊन येतो. दहा दिवसांचीच ट्रिप आहे. तुझी हरकत नाही ना?”
रजनी म्हणाली, “मी सांभाळीन नं सगळं. तुम्ही जाऊन या. काही काळजी करू नका इथली.”
“बघ हो. नाही तर सगळे जण म्हणायचे, सून आल्या-आल्या सासूनं सगळा भार टाकला सुनेवर आणि स्वतः उंडारायला मोकळी!”
सासरे मजेत म्हणाले, “कुसुम, तुझं हे बोलणं कुठल्या वळणानं चाललंय? असं करता
करता, ‘मुलं लेकरं घरदार हेचि माझे पंढरपूर’
या निष्कर्षावर येशील. नि मग ट्रिपबीप
रहितच व्हायची.”
त्यावर सगळे हसलेच. मग त्यांची ट्रिपची तयारी सुरू झाली. रजनीनं पेपर प्लेट्स, नॅपकीन, थेपले, चिवडा, पुरणपोळ्या असं खूप निगुतीनं बांधून दिलं. सासूबाईंच्या ओठावर नाही आलं, तरी डोळ्यांतलं समाधान कळलं. त्या गेल्यावर रजनी उत्साहानं म्हणाली, ‘हे लोक परत येतील, त्याआधी आपण त्यांना मस्त सरप्राइज देऊया.’ तिनं फिक्या निळ्या रंगाचा वॉलपेपर लावून घेतला. पलंग, कपाटं यांच्या जागा बदलल्या. सासरे ज्ञानेश्‍वरीवर टिपणे काढीत होते. त्यांच्यासाठी लहानसं रायटिंग टेबल घेऊन ते खिडकीसमोर ठेवलं. कुमार खूप कामात होता, पण घरी आला की तिला स्वयंपाकात मदत करायचा. दोघं मजेत जेवायची. बाहेर पडायची. घरात काय काय हवं असेल, ते आणायची. तिनं त्या खोलीचं रूपच बदलून टाकलं होतं नि ते त्याला आवडलं होतं. खोलीत दारा-खिडक्यांवर साधेसे मॅचिंग पडदे झुलत होते. तिला तिच्या आईनं दोन बेडशिट्स दिल्या होत्या. त्या तिनं धुतल्या. स्वतः इस्त्री केली आणि मग त्या घातल्या. खोलीला नवं रूप चढलं. ती अगदी नव्या नवरीची तरतरीत दिसायला लागली. सासूबाई आपल्याला आता शाबासकी देतील, या अपेक्षेनं ती वाट बघायला लागली. ट्रिपहून दोघं जण आले. हातपाय धुऊन चहा घेऊन आत गेले. रजनी आतुरतेनं वाट बघू लागली. सासूबाईंचा किंचित करडा आवाज ऐकू आला. “रजनी, इकडे ये बघू.” ती मुकाट्यानं गेली. त्या म्हणाल्या, “हे उद्योग कोणी केले?” तिला आश्‍चर्य वाटलं.
ती म्हणाली, “मीच डेकोरेट केली तुमची खोली. आवडली नाही का?”
त्या म्हणाल्या, “मला निळा रंग आवडत नाही. पलंगाची जागा बदललेली मला चालत नाही. या रायटिंग टेबलची अडगळ कशाला आणली? माझं जे बस्तान बसलेलं असतं, त्यात मला विचारल्याशिवाय बदलाबदल करायची नाही. समजलं?”
तिनं मान खाली घालून होकारार्थी हलवली.
त्या म्हणाल्या, “स्वयंपाकघरातही वस्तूंच्या
जागा ठरल्या आहेत. त्या बदलायच्या नाहीत. तुमची खोली आणि हॉल यात काय नाच नाचायचे ते नाचा!”
रजनीच्या डोळ्यात पाणी आलं. थोड्या कापर्‍या आवाजात ती म्हणाली, “तुम्हाला एक सरप्राइज म्हणून मी मनापासून हे केलं. आवडलं नसेल तर माफ करा. पुन्हा नाही करणार.”
त्या म्हणाल्या, “तेच बरं राहील. मला सरप्राइज वगैरे आवडत नाही.”
रजनीने अश्रू कसेबसे आवरले. ती तडक स्वयंपाकघरात गेली. जेवणं झाली, तेव्हा मग त्या ट्रिपच्या गमतीजमती सांगायला लागल्या. त्यांनी रजनीला आणलेल्या खड्याचा सेट आणि साडी दिली. मघाच्या रागाचा मागमूसही नव्हता.
रात्री झोपताना रजनीनं कुमारजवळ विषय काढत म्हटलं, “आईंना हे आवडणार नाही, याची तुला कल्पना नव्हती?”
तो म्हणाला, “आत्तापर्यंत घरात सगळं आईच बघत आली. आम्ही तिकडे लक्षच दिलं नाही. त्यामुळे तिची अशी काही वृत्ती झाली असेल, याची कल्पनाही नव्हती रजू. मी तुला सॉरी म्हणतो. खरं तर, ती खोली इतकी प्रसन्न आणि सुंदर दिसते आहे की, मला वाटलं आई खूष होईल अगदी!”
रजनी काही बोलली नाही. पण तिनं मनाशी एक खूणगाठ बांधली. कोणतीही गोष्ट आपल्याला कितीही येत असली, तरी सासूबाईंचा सल्ला घेतल्यासारखं करायचं. म्हणजे त्यांचा मान राहील आणि आपल्या करण्यात त्यांना काही वावगं आढळायचं नाही. तसंच घडत गेलं पुढे. मग रजनी त्यांना फार जिवाभावाची झाली.
रजनीला वाटलं, हा लोकांना समजून, सांभाळून घेण्याचा मंत्र फार कामी आला. तो त्या एका क्षणी आपल्याला सुचला. त्यामुळे आपल्याशी किती माणसं जोडली गेली. पण आज असं वाटतंय की, भोवती माणसं आहेत, पण दुरावली आहेत. राजसी अमेरिकेत, रोहनने आयआयटीत प्रवेश घेतला. तो हॉस्टेलवर राहायला गेला. मग इतकं यश कमावलं की, त्याला बंगलोरच्या एका मोठ्या कंपनीनं कॅम्पस इंटरव्ह्यूमध्येच भरपूर पे-पॅकेज देऊन आपल्याकडे बोलावलं. रितेश कलेक्टर झाला. तो इथे कसा राहणार! हे घडणारच होतं. मुलांना मोठी क्षितिजं शोधायला आपणच तर शिकवलं. त्यांच्या प्रत्येक आनंदाच्या, दुःखाच्या प्रसंगी आपण सतत साथीला होतो. त्यांना हवा तेवढाच आधार दिला. त्यांनी मोठ्या आकाशात झेप घेतली, तेव्हा आपण ती भरारी आनंदानं पाहिली. मग रजनीला वाटलं आपण आपल्याशी का झगडतो आहोत? त्यांनी आपल्या पदराला बांधून राहावं अशी अपेक्षा नव्हतीच. पण मुलं कुठेही गेली तरी संवादाचा धागा तुटता कामा नये. असं वाटतं, तो धागा अगदीच क्षीण झाला आहे, म्हणून आत खोलवर दुखतं!


कुमार अगदी आनंदात घरी आला. रजनीला क्षणभर त्याचा हेवा वाटला. त्यांची जेवणं झाली. ते थोडे लवकरच झोपले. त्याला पडल्या पडल्या गाढ झोप लागली. तिला हल्ली झोप लवकर लागत नसे. जुन्या आठवणी येत राहत. आता तिला आठवलं, दोन एक महिन्यांपलीकडेच तिच्या एस.एस.सी.च्या बॅचचे गेट टुगेदर ठरवलं होतं. पस्तीस वर्षांनी सगळे जण भेटणार होते. काही जण फेसबुकवरून कनेक्टेड होते. पण बहुतेक जणांना खूप उत्सुकता होती की कोण कसं दिसतंय, कोण कोण कुठे आहेत, काय करताहेत. आपापल्या जोडीदारांना घेऊन यावं असं आमंत्रण होतं. रजनीनं कुमारला खूप आग्रह केला. त्यानेही वेळ काढला.
पहिल्यांदा भेटण्याची उत्सुकता आणि चौकश्यांचा भर ओसरल्यावर मग प्रत्येक जोडीदाराने आपआपल्या नवरा किंवा बायकोबद्दल बोलावं, असं ठरलं. म्हणजे, बॅचचे जे विद्यार्थी-विद्यार्थिनी होते, त्यांचे संबंधित जोडीदार आपापल्या पती पत्नीबद्दल बोलणार होते. तिच्या बॅचची मीरा आय.ए.एस. झाली होती. एक जण सब इन्स्पेक्टर होती, एक नाटकांतून कामं करत होती.
त्यांच्या बॅचची मुलंही मोठाल्या पोस्टवर होती. रजनीला स्वतःबद्दल अपराधी वाटलं. असं वाटलं, कुमार आपल्याबद्दल काय सांगणार? सदतीस वर्षं आपण संसार केला, दुसरं काही नाही.
कुमार बोलायला उभा राहिला. म्हणाला,
“मला सांगताना फार अभिमान वाटतो की, तुमच्या बॅचच्या रजनीनं, माझ्या पत्नीनं उत्तम गृहिणी होण्याचं ठरवलं. आपण काय व्हायचं, हे ठरवणं प्रत्येक स्त्रीच्या हातात असावं. एक घर उत्तम तर्‍हेने सांभाळणं, हे उत्तम राष्ट्र सांभाळण्याचं छोटं मॉडेल असतं. आणि तो फार मोठा, महत्त्वाचा पूर्णवेळ व्यवसाय आहे. तो सांभाळताना त्याग आणि प्रेम ही दोन मूल्यं गृहिणीच्या अंगी मुरलेली असावी लागतात. माझ्या पत्नीनं आपलं गृहिणी पदाचं ध्येय ठरवलं आणि सर्व कसोट्यांवर उतरत पूर्णत्वालाही नेलं. आम्ही, म्हणजे माझे आईवडील, मी स्वतः, आमची तीन मुलं अतिशय समाधानात राहिलो. त्याचं श्रेय रजनीला आहे. आमच्या मोठ्या विस्तारीत कुटुंब व मित्रपरिवाराला जोडून ठेवण्याचं कार्य तिने कुशलतेने केलं. मुलं आज आपापल्या करिअरमध्ये यशस्वी आहेत. माझं करिअर बहरलं, कारण आमच्यासह रजनीने कष्ट काढले. आधार दिला. आमच्यासाठी भक्कम पाया निर्माण केला. दोस्तांनो, राजा होणं कठीण आहे, पण राजा घडवणं त्याहून कठीण. आमच्या बाबतीत म्हणायचं तर, वुई मे बी किंग्ज, बट रजनी इज किंग मेकर. आय सॅल्यूट हर.”
क्षणभर त्या सभागृहात शांतता होती. मग टाळ्यांचा मोठा गजर झाला. कुमारच्या त्या कथनानं तिला जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. त्या आठवणीतून रजनी जागी झाली. पण त्यामुळे मनाला उभारी आली नाही. आपण झोकून देऊन सगळ्यांसाठी केलं, पण आज आपण एकाकी आहोत, असं वाटून तिला रडू आलं. मग भानावर येत, तिनं मनाला बजावलं… आपण कुणासाठी म्हणून काही केलं नाही. आपल्याला जे करावसं वाटलं, ते केलं. आता तक्रार नको. असा विवेक केला, तरी मन दुखावलेलं राहिलंच.
आठ दिवसांनी कुमार म्हणाला, “रजू, आपण
दहा दिवसांच्या ट्रिपला जाणार आहोत.”
“कुठे? केव्हा? तुला सुट्टी मिळाली का?”
तिनं आश्‍चर्याने विचारलं.
“आपण जाणार आहोत सिंगापूर, थायलंड, मलेशियाला. तुझ्या साठाव्या वाढदिवसानिमित्त भेट! वाढदिवसाच्या दिवशी आपण घरी परत येऊ मग आणखी सेलिब्रेट करू.” कुमारने अनपेक्षितपणे असं काही ठरवावं, यामुळे तिचं मन एकीकडे आनंदून गेलं… नवर्‍याला आठवण होती वाढदिवसाची! दुसरीकडे मन खट्टूही झालं… कारण मुलांना काही आठवण नव्हती. पण तिनं उदासपणा झटकला. तयारी केली.
थायलंडला खास स्पामध्ये ब्युटी ट्रीटमेंट आणि मसाज होता. तो कुमारने तिला घ्यायला लावला. खरेदी करताना मुलं, सुना यांच्यासाठीच खरेदी झाली. कुमार म्हणालाही, “मुलं आता कधी भेटणार कुणास ठाऊक? राजसी गेल्या अडीच वर्षांत आली नाही. रितेश आयएएस झाल्यापासून कामात इतका गर्क झालाय की, त्याला फोन करायलाही वेळ नाही. त्यानं पाण्यासाठी नॅचरल कंड्यूइट्सचा वापर करून पाच-सहा गावांना भरपूर पाणी मिळेल अशी व्यवस्था केली. गावकर्‍यांना श्रमदानाला उद्युक्त करून रस्ते बांधविले. हे सगळं आपण पेपरमध्ये वाचतो.
रोहन म्हणायला बंगलोरला, बाकी देशविदेश हिंडतो. त्याला आपल्याकडे यायला गेल्या वर्षभरात वेळ झालेला नाही. त्यांच्यासाठी कशाला करतेस इतकी खरेदी. पडून राहतील घरात.”
पण रजनीनं काही वस्तू पाहिली की, ही राजसीला हवी. हा टी-शर्ट रितेशला शोभेल. हे वेगळंच आफ्टरशेव्ह रोहनला आवडेल. हा रत्नजडित ब्रोच रितेशच्या बायकोला घेऊया. हे कानातलं रोहनच्या बायकोला सूट होईल… असंच चाललं होतं.
ट्रिप संपली. विमान मुंबईच्या एअरपोर्टवर उतरलं आणि उदासीच्या जाड पडद्याचं आच्छादन तिच्या मनावर पडलं. ड्रायव्हर गाडी घेऊन आला होता. आज आपला वाढदिवस! पण एकाही मुलाच्या लक्षात नाही. कुणाला साध्या शुभेच्छाही द्याव्याशा वाटल्या नाहीत. या विचारानं ती खिन्न झाली. असू दे. आपलं आता वय झालंय. कुमारने सरप्राइज ट्रिप ठरवली. पूर्ण वेळ आपल्याला दिला. जीवनाचा जोडीदार एवढा समजूतदार, प्रेमळ, आपल्या आनंदासाठी झटणारा आहे, हे पुरेसं आहे ना! असं तिनं आपल्या मनाला समजावलं. गाडी घरी पोहोचली. ड्रायव्हरने सामान आत नेलं. रजनी आत गेली आणि राजसी बाहेर आली. पाठोपाठ रोहन आणि रितेश आले.
मग जावई, सुना, तिन्ही नातवंडं बाहेर आली.


‘हॅपी बर्थ डे’चा एकच गजर झाला. आनंदाचा एक स्रोत तिच्या मनात उसळला. सगळी मुलं एकदमच आली होती. खास तिच्यासाठी. सुट्टी काढून! तिच्यासाठी सुरेख साडी, कुड्या,
बांगड्या असं काही काही आणलं होतं. आणि संध्याकाळी आश्‍चर्याचा आणखी मोठा धक्का होता. हॉल घेऊन सगळ्या नातेवाइकांना तिच्या साठीच्या वाढदिवसाला बोलावलं होतं. राजसीने खास व्हिडिओ फिल्म तयार केली होती. ती हॉलमध्ये लावली. राजसी बोलायला लागली. “आईच्या आठवणी म्हणजे समुद्रकिनार्‍यावर रेतीऐवजी मोती असावेत, तशी प्रत्येक आठवण मोत्यासारखी सुंदर, अनमोल. सुरुवातीला फारसे पैसे नसत घरात, तेव्हा रात्री आपल्या साड्या रफू करत बसलेली आई आठवते आणि माझ्यासाठी स्वतः मशीनवर बसून शिवलेला पंजाबी ड्रेसही आठवतो. अजून जपून ठेवलाय आई तो.
पै-पै वाचवून तिनं मला हवे असलेले चांदीचे पैंजण आणून दिले. मला आठवतं, मी नववीत होते तेव्हा अभ्यासाला मैत्रिणीकडे जाते म्हणून गेले. संध्याकाळी आईनं विचारलं कोणत्या विषयाचा अभ्यास केला? आता ती त्या विषयावर प्रश्‍न विचारणार, हे लक्षात आल्यावर मी गणिताचा अभ्यास केल्याची थाप मारली. तिनं त्या भागावर गणितं घातली. पुस्तक हातात न धरता गणितं घातली. तेव्हा लक्षात आलं की, तिनं माझ्यासाठी गणिताचा अभ्यास केला आहे. मग मी मैत्रिणींबरोबर सिनेमाला गेल्याचं उघडकीला आलं तेव्हा तिनं म्हटलं, ‘माझी परवानगी घ्यायची ना. खोटं बोलण्याची गरज नव्हती. असं वागल्याने आता विनाकारण मी प्रत्येक वेळी तू बाहेर जाशील तेव्हा संशयानं बघणार!’ ती फारशी बोलली नाही. पण कित्येक दिवस ती विशेष बोलतच नव्हती. तेवढी शिक्षा पुरेशी होती.”
मग रोहन बोलला. तो म्हणाला, “मला आठवतंय, एकदा मी न केलेल्या चुकीबद्दल मला शिक्षा झाली होती. तेव्हा ती स्वतः माझ्याबरोबर येऊन क्लास टीचरशी बोलली होती. माझी चूक नसल्याचं त्यांना पटवून दिलं होतं. मी अंधाराला घाबरायचो. तेव्हा ती मुद्दाम अंधार पडल्यावर मला अंधार्‍या रस्त्यावरून फिरवायची. मला टायफॉईड झाला, तेव्हा रात्रंदिवस माझ्या उश्या-पायथ्याशी ती असायची. घरातलं सगळं मॅनेज करून सतत माझ्याजवळ राहण्यासाठी तिनं कोणतं वर्क शेड्युलिंग केलं होतं, तीच जाणे!” रोहन बोलत राहिला.
रजनी खिळून बसली होती जागेवर! मुलांना सारं आठवत होतं! रितेश म्हणाला, “मी कॉमर्सला गेलो, तेव्हा सगळ्या लोकांना नवल वाटलं. फक्त आईनं मला पूर्ण पाठिंबा दिला. मला आय.ए.एस. करायचं होतं. तिला माहीत होतं. आमच्या सर्वांच्या परीक्षांच्या वेळी ती जागायची आमच्याबरोबर आणि रोहन वर्क शेड्युलिंगबद्दल म्हणाला,
ते तर मी तिचं बघून शिकलो. घरातली कामं ती इतक्या झटपट, स्वच्छ, वेळच्या वेळी, नेटकं करायची की आश्‍चर्य वाटे. तिचा आदर्श आम्हा भावंडांसमोर होता.”
रितेशनंतर कुमार बोलला. जे त्यानं तिच्या एस.एस.सी.बॅचच्या गेट टुगेदरच्या वेळी सांगितलं होतं तेच, पण वेगळ्या शब्दांत खूप आठवणी सांगत. कुमारच्या मावश्या, आत्या इतर नातेवाईक, सुना सगळेच बोलले थोडं थोडं.
आणि शेवटी नातवंडांनी गजर केला ‘आजी वुई सिंपली लव्ह यू!’
मुलांनी हे सगळं आधीच ठरवलं होतं. तिला सरप्राइज मिळावं म्हणून. सगळा बेत अगदी गुप्तपणे आखला. कुमारला ट्रिपला जायला सुचवणारी मुलंच होती! इथे येऊन त्यांनी
सगळी तयारी केली होती. त्यांनी आता ठरवलं होतं की, राजसीला जूनमध्ये वेळ काढता येईल आणि रितेशला मेमध्ये. रोहन दिवाळीत येणार होता. पार्टी आटोपून सगळे घरी गप्पा मारायला बसले आणि हे सारं उलगडत गेलं. तसतशी रजनी फार सुखावत गेली. या एका सरप्राइजनं मुलांनी तिच्या सार्‍या कष्टांचं सार्थक केलं होतं. डोळ्यातल्या पाण्याबरोबर जगणं निरर्थक झाल्याची भावना वाहून गेली होती. रजनी हसत असताना कुमारने तिच्या खांद्यावरून हात घातला. नातवंड तिला बिलगून होती. समोर मुलं-सुना होत्या. रजनीच्या मनात तो क्षण रुजला. आनंदाचं बीज पेरणारा तो क्षण… तिच्या कर्तृत्वावर सफलतेची मोहर उठवणारा तो क्षण… त्या क्षणाने तिच्या मनावरची अभ्रे दूर केली. सार्थकतेची भावना मनभर पसरू लागली.

  • माधवी कुंटे

Share this article