त्याने अभ्यासपूर्वक जाणीवपूर्वक पोलंड देशाची, त्याच्या निवासासाठी, कामासाठी निवड केलीय. त्याला आता काही वर्षे झालीत. आम्ही दोघं वॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर दररोज बोलतो. संवाद करतो. आम्हा बापलेकाचे नाते खरे तर मित्रांसारखे आहे.
माझा मुलगा पोलंडमध्ये आहे. आयटी अर्थात इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्याचा दबदबा आहे. एका विश्वविख्यात कंपनीचा तो ‘युरोप हेड’ आहे - म्हणजे युरोपातील अनेक प्रगत देशातून त्याची कामानिमित्त भरपूर भ्रमंती चालू असते. त्याला उत्तम इंग्रजी येतेच, त्यामुळे युरोपभरच्या त्याच्या कामानिमित्तच्या भ्रमंतीत भाषेची कोणतीच अडचण येत नाही. त्याशिवाय त्याला जर्मन भाषा उत्तम बोलता येते. पण तो राहतो मात्र पोलंडमध्ये. पोलिश भाषाही त्याने कामापुरती आत्मसात केलेली आहे. त्याच्या या विविध भाषाप्राविण्यामुळेच तो अन्य उमेदवारांपेक्षा कुठल्याही परिसंवाद, परिषदा वर्कशॉप्स सेमिनार्स व अन्य वाणिज्यविषयक सभासंमेलनातून फार उत्तमपणे प्रभाव पाडू शकतो. पाडतोही. आणि म्हणूनच वयाने तो जेमतेम तिशीत पोचतोय, तरीही त्याच्या कंपनीत तो खूप मोठ्या पदावर आणि अर्थातच खूप मोठ्या ‘पॅकेज’ म्हणजे आर्थिक मिळकतीच्या स्तरावर पोचलेला आहे. तसे त्याची कंपनी त्याला लंडनमध्ये राहा आणि युरोप खंडाचा कारभार पाहा, असा आग्रह करीत होती. पण त्याने अभ्यासपूर्वक जाणीवपूर्वक पोलंड देशाची, त्याच्या निवासासाठी, कामासाठी निवड केलीय. त्याला आता काही वर्षे झालीत. आम्ही दोघं वॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर दररोज बोलतो. संवाद करतो. आम्हा बापलेकाचे नाते खरे तर मित्रांसारखे आहे.
लंडन एचक्यू म्हणजे हेडक्वॉर्टर अर्थात कामाचे मुख्यालय म्हणून त्याने नाकारले. त्याबाबतची त्याची भूमिका - जी त्याच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारलेली आहे, तीही त्याने माझ्याशी मनमोकळेपणाने ‘शेअर’ केलेली आहे.
त्यानुसार ब्रिटिश लोक विलक्षण अहंकारी आणि ‘अॅटिट्युड’वाले आहेत. ते जगातल्या अन्य सर्वच देशांना, मानवी समुदायांना अत्यंत तुच्छ लेखतात. कारण आपण जगावर राज्य केलेय, आपल्या राणीच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही. हा जुना अहंकार त्यांच्यात अजूनही ओतप्रोत भरलेला आहे आणि म्हणून ते सर्वांना कस्पटासमान समजतात. तसे वागवतात, हे त्याने स्वतः अनेकदा अनुभवलेले आहे. माझा मुलगा स्वतःही विलक्षण स्वाभिमानी, देशभक्त आणि स्वातंत्र्यसैनिक कुटुंबात जन्मलेला आहे. त्याचे आजोबा म्हणजे (अर्थातच) माझे वडील यांनी ब्रिटिशांविरुद्ध आणि हैद्राबादचा त्यांचा मांडलिक संस्थानिक ‘निझाम’ याच्याविरुद्ध लढा दिलेला होता, ते ‘स्पिरिट’ माझ्या मुलामध्येही आहे. त्यामुळेच त्याने लंडन जे विमानसेवेने जगाशी आणि खास करून भारताशी उत्तमपणे जोडलेले आहे. तसेच लंडनमध्ये आणि एकूणच युके अर्थात युनायटेड किंगडममध्ये भरपूर भारतीय वस्ती असूनही माझ्या मुलाने मात्र ‘लंडन पोस्टींग‘ ला नकार दिला. आणि त्याने त्याचे एचक्यू अर्थात हेडक्वॉर्टर म्हणजे कामाचे मुख्यालय म्हणून मी पोलंड देशाच्या ’क्रॅको’ नामक शहरातून काम करेन, असे त्याच्या कंपनीस आग्रहपूर्वक कळविले. माझ्या मुलाचे ज्ञान, क्षमता, महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या कंपनीनेही ते मान्य केले. आज तो कॅक्रोमध्ये आहे, तिथून युरोप खंडातील बिझनेस तो पाहतो. हाताळतो.
ही पार्श्वभूमी विस्ताराने आरंभीच सांगण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे आणि हे म्हणजे माझा हा अविवाहित राजबिंडा मुलगा आता लग्न करू इच्छितोय. त्यासाठी भारतातील आणि परदेशातीलही अनेक उत्तमोत्तम स्थळे अर्थात मुली त्याला सांगून आल्या होत्या. परंतु ‘आत्ता लग्न नको’ म्हणून माझा मुलगाच लग्नास तयार नव्हता, पण आज अचानक त्याने मला फोनवर सांगितले,
“डॅड, आय वाँट टू मॅरी!”
ते ऐकून मला अर्थातच आरंभी आश्चर्याचा धक्का बसला आणि आनंदही वाटला. आनंद - एक पालक, एक पिता या नात्याने. कारण कोणाही पालकाची - पित्याची इच्छा हीच असते की त्याच्या मुलास चांगली मुलगी मिळावी आणि तो सुखी व्हावा! एक्झॅक्टली मलाही तसेच वाटले.
“लग्न करायचेय, तर मुलगीही तू निवडलीच असशील!” मी माझा आनंद, लपवत एकदम नॉर्मल टोन ठेवत त्याला प्रश्न केला. खरं तर मी आतून खूप एक्साईट म्हणजे उत्तेजित झालो होतो. पण तसे मी वरकरणी दाखवले नाही.
“येस डॅड, शी इज अ युक्रेनियन वुमन!”
युक्रेनियन वुमेन? माझ्या मनात प्रश्न उभा राहिला. कारण मी ही अपेक्षा करीत होतो की, कुणी मूळची भारतीय वंशाची मुलगी त्याने पसंत केली असेल. पण हा तर चक्क युक्रेनियन मुलीबद्दल मला सांगत होता.
“येस डॅड, शी इज युक्रेनियन. बट आय लव्ह हर!”
माझ्या मुलाचे पुढील संभाषण मी शांतपणे ऐकत राहिलो. कोणतेही प्रश्न न विचारता, कारण तेवढेच मी करू शकत होतो.
“तिची माझी भेट इथल्या एका चर्चमध्ये झाली! उंच, सुदृढ बांध्याची ही तरुणी पोलीश नाही हे मी लगेच ताडले. पण ती प्रत्येक रविवारी चर्चमध्ये येई. माझ्या शेजारीच बसे!”
माझा मुलगा सांगत होता. कारण तो जन्माने, संस्काराने हिंदू असला तरी गेली काही वर्षे पोलंडच्या त्या चर्चमध्ये रविवारी न चुकता जाई. कारण तिथे गेल्याने खूप बरे वाटते. नवीन ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते हे त्याने मला मागेच सांगितलेही होते. त्यावर माझा काहीच आक्षेप नव्हता. कारण कुठलीही मंदिरे, धर्मस्थळे, चर्चेस वगैरे तुम्हाला जर आनंदित करीत असतील, नवीन ऊर्जा प्रदान करीत असतील तर तुम्ही तिथे जायला काहीच हरकत नाही, असे माझे साधेसोपे तत्त्वज्ञान मी माझ्या मुलालाही बिंबविले होते.
“तिला तुझ्यात इंटरेस्ट आहे का?”
मी थेट मुद्याचाच प्रश्न उपस्थित केला. कारण लग्न विवाह हा काही पोरखेळ नाही. तो आयुष्यभराची ‘कमिटमेंट’ अर्थात ‘बांधीलकी’ असते, अशी माझी धारणा असल्याने मी प्रत्यक्ष प्रश्न केला.
“येस डॅड, तिने तिचा नवरा आणि तान्हे मूल रशिया-युक्रेन लढ्यात गमावलेत. ती पोलंडमध्ये एक शरणार्थी किंवा रेफ्युजी म्हणून आलेली आहे. सध्या ती उपजीविकेसाठी पोलंडमध्ये पडेल ते काम करते. अगदी ’हाऊसकिपिंग’ अर्थात साफसफाई, झाडूपोछा, टॉयलेट क्लिनिंग हे सगळे ती करते.”
माझा मुलगा मला सांगत होता माझ्या मनात ते सगळे ऐकून नानाविध प्रश्न उभे राहात होते. म्हणून मी त्याला विचारले, “म्हणजे ती मोलकरीण आहे की काय?”
“हो! सध्या तरी तुम्ही तिला तसे समजू शकता!”
मुलाच्या या उत्तरावर मी स्तब्ध झालो. उच्चविद्याविभूषित, जागतिक मानसन्मान त्याच्या क्षेत्रात लाभलेला माझा गुणी हॅण्डसम मुलगा एका मोलकरणीशी लग्न करायचे म्हणतोय? माझे मन अस्वस्थ झाले. भारतातल्या कितीतरी मोठ्या प्रतिष्ठित घराण्यातल्या मुली त्याला सांगून आल्या, ते मला आठवले. आर्थिक-सामाजिक - सांस्कृतिक अशा सर्वच संदर्भातील अनेक उच्च घराण्यातल्या मुली त्याला सांगून आल्या. आणि आज माझा हा मुलगा म्हणतोय की पोलंडमध्ये शरणार्थी अर्थात रेफ्युजी म्हणून आलेल्या आणि सध्या मोलकरणीची कामे करणार्या, संडासटॉयलेट साफ करणार्या युक्रेनियन मुलीशी विवाहबद्ध होऊ इच्छितोय?मी विलक्षण चक्रावलो.
“प्लीज अलौ मी ए डे. आय विल लेट यू नो माय व्ह्यूज सून!”
मी माझ्या मुलाला फोनवर उत्तर दिले खरे. पण आज खरोखरच मी विलक्षण द्धिधा मनःस्थितीत आहे. म्हणजे आपण या संभाव्य लग्नास सहमती द्यावी, स्वीकृती द्यावी की नाही, पाठिंबा द्यावा की नाही, अशी माझी द्विधावस्था आहे. माझी पत्नी, माझ्या मुलाची आई - जी विलक्षण सर्वसामान्य पारंपारिक वळणाची गृहिणी होती, तिला तरी हे सगळे पटले असते का? मान्य झाले असते का?
मी चुपचाप माझ्या पत्नीच्या, तस्वीरीसमोर येऊन उभे राहिलो. गळ्यातील ठसठशीत मंगळसूत्र, कपाळावरचे कुंकू, अंगावर पैठणी, अशा पारंपारिक मराठी वेषातील माझी पत्नी, आज केवळ तस्वीरीपुरतीच राहिलीय, तिच्यासमोर मी उभा राहिलो या अपेक्षेने, की त्यातून काही मला मार्गदर्शन मिळेल. संकेत मिळतील. तस्वीरीकडे पाहताना, आज पहिल्यांदाच माझ्या हे लक्षात आलं की, माझा मुलगा खूपसा माझ्या पत्नीसारखाच दिसतो. तो जन्मला तेव्हाचा त्याचा गुटगुटीतपणा, सौष्ठव, हे पाहून सगळेजण मुलगा अगदी तुझ्यावर गेलाय असे मला म्हणायचे. पण जसजशी वर्षे उलटू लागली तसतसा माझा मुलगा माझ्या रंगरूपाऐवजी त्याच्या आईसारखाच वाटतोय असे सर्वजण म्हणू लागले. असो.
तस्वीरीसमोर उभा राहिलो आणि माझ्या मनात, कानात शब्द घुमू लागले.
“अहो, का एवढे परेशान होताय? आपल्या मुलाने ती युक्रेयिन मुलगी निवडलीय, म्हणजे ती कुणी आलतुफालतु मुलगी तर नक्कीच असणार नाही. आपल्या मुलावर आपला विश्वास आहे ना? मग तुम्ही का काळजी करताय?”
“आज ती एक रेफ्युजी म्हणजे निर्वासित म्हणून पोलंडमध्ये आलीय, पण उद्या लढाई थांबेल. जागतिक स्तरावर एक युद्धविरोधी जनभावना किंवा सामंजस्य निर्माण होईल, तेव्हा आपली ही सून जग शांततेची एक दूत ठरेल, हे तुम्ही का विसरता?
माणूस कर्माने कधीही लहान होत नाही. साफसफाई, हाऊसकिपिंग ही महत्त्वाचीच कामे आहेत. मुलगी तरुण आहे, सुदृढ आहे. मॅच्युअर म्हणजे प्रगल्भ आहे. आपल्याला आपल्या सुनेत तुमच्या भाषेत पुढील पिढीच्या जन्मदात्रीमध्ये अजून काय हवे? तिचा आपल्या मुलावर जीव आहे, हे तुम्ही विसरू नका!”
मी तात्काळ माझ्या मुलाला पोलंडमध्ये फोन लावला आणि माझी पसंती सहर्ष आहे, हे कळविले!
- सुधीर सेवेकर