Close

जोडी तुझी माझी (Top Story: Jodi Tuzi Majhi)

सुमित्राबाईंनी बटव्यातून कुंकवाचा करंडा बाहेर काढला आणि मनस्विनीच्या कपाळावर कुंकू टेकवलं, मोगर्‍याचा गजरा तिच्या लांबसडक वेणीवर माळला आणि हातांत मिठाईचा पुडा दिला. मनस्विनीनं दोन्ही खांद्यावर पदर गुंडाळून घेत सर्वांना वाकून नमस्कार केला आणि घरात निघून गेली. त्याचवेळी सुजयच्या ‘ती’ गोष्ट लक्षात आली. ‘क्लेप्टोमॅनिआ’ तो मनाशी पुटपुटला.

सुजयनं घड्याळाकडे पाहिलं.
संध्याकाळचे चार वाजले होते. ‘जावं की निघूच नये’ तो द्विधा मनःस्थितीत होता, अजून त्याचा निर्णय होत नव्हता. केबीनच्या व्हेनेशिअन ब्लाईंड्स वर उचलून त्यानं रस्त्याकडे नजर टाकली. आत्ताच निघालं तर देशमुखांकडे वेळेत पोहोचता येईल. आज सकाळचं आईचं बोलणं त्याला आठवलं,“आम्ही पाच वाजता देशमुखांच्या घरी वाट पाहतोय तुझी, लक्षात ठेव. आज आपण तिघांनी एकत्रच जाऊन त्या मुलीला पाहायचं. हे अगदी उत्तम स्थळ आहे.”
त्याचा नाइलाज होता. त्यानं रुपेशच्या केबीनचं दार लोटलं. तो क्लायंटशी बोलण्यात व्यग्र होता. त्यानं नुसतीच मान हलवली आणि सुजयला निघण्याचा इशारा केला. खरं तर केवळ आईच्या समाधानाखातर देशमुखांची मुलगी पाहायची आणि नंतर काहीतरी सबब सांगून नकार कळवायचा, असं त्यानं निश्‍चित केलंच होतं. उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला?
देशमुखांचं घर शोधायला त्याला वेळ लागला नाही. गावाबाहेर असलेली छोट्या छोट्या बंगल्यांची वसाहत होती ती. घरासभोवार फुलझाडांची लहानशी बाग. सुजयला पाहिल्यावर त्याच्या आईचा-सुमित्राबाईंचा चेहरा आनंदानं फुलून आला; देशमुखांनी सुद्धा त्याचं स्वागत मोठ्या उत्साहानं केलं. त्यांची बैठकीची खोली कलात्मक रितीनं सजवली होती. नुसतेच कांदे-पोहे नाही तर दही-वडे, काजू-कतली, बेसन लाडू इत्यादी पदार्थ मोठ्या निगुतीनं मांडले होते. मग चहाचा ट्रे घेऊन मनस्विनी बाहेर आली. देशमुखांनी तिची सर्वांशी ओळख करून दिली. त्यांच्या एकंदर रुबाबाला साजेशीच होती ती! गोरी, नाजूक, सुंदर आणि आजकाल अगदी अभावानं आढळणारी लांब केसांची पाठीवर रुळणारी वेणी! सुमित्राबाई खूष झाल्या. सुजय विशेष काहीच बोलला नाही. आपला चेहरा आणि हात रुमालानं पुसत तो गप्पच बसला होता.
जुजबी चौकशी झाल्यावर सुमित्राबाईंनी आपल्या बटव्यातून आणलेला कुंकवाचा करंडा बाहेर काढला. सायंकाळच्या मुलायम सोनेरी प्रकाशांत तो नक्षीदार डौलदार करंडा झगमगत होता. त्यातलं कुंकू त्यांनी मनस्विनीच्या कपाळावर टेकवलं, मोगर्‍याचा सुगंधी गजरा आपल्या हाताने तिच्या लांबसडक वेणीवर माळला आणि तिच्या हातांत मिठाईचा पुडा दिला. मनस्विनीनं दोन्ही खांद्यावर पदर गुंडाळून घेत सर्वांना वाकून नमस्कार केला आणि ती घरात निघून गेली. त्याचवेळी सुजयच्या ‘ती’ गोष्ट लक्षात आली. ‘क्लेप्टोमॅनिआ’ तो मनाशी पुटपुटला. त्याचा चेहरा उजळला. ‘बस्स. बस्स!’ याच मुलीशी लग्न करायचं, त्यानं ठरवलं. हीच आपल्याला समजून घेऊ शकेल, त्याला विश्‍वास वाटू लागला.
घरी परतताना सुजयला गुणगुणताना पाहून सुमित्राबाईंनी विचारलं,
“मग काय? साखरपुड्याची तारीख ठरवायची का?”
“आता तू म्हणत असशील तर…”हसत हसत सुजयनं वाक्य अर्धवट सोडून दिलं.
“अगं बाई! खरं का? कित्ती आज्ञाधारक मुलगा माझा! छान! आत्ता लगेच देशमुख मंडळींना आपला होकार कळवला पाहिजे बरं का!” त्या सुजयच्या बाबांकडे वळून म्हणाल्या.
घरी आल्यावर त्यांचा कुंकवाचा करंडा सापडेना, तेव्हा मात्र त्या
अस्वस्थ झाल्या.
“आई, अगं मार्केटमध्ये हल्ली किती छान छान शोभेच्या वस्तू मिळतात, आण दुसरा एखादा करंडा विकत,” सुजय बेपर्वाई दाखवीत उद्गारला.
“तसं नव्हे रे! आपली वडिलोपार्जित चालत आलेली जुनी वस्तू होती ती. आता बाजारात असा चांदीचा करंडा शोधूनही सापडणार नाही. मला वाटतं, देशमुखांकडेच तो करंडा राहिला असावा. आता होकार कळविण्यासाठी मी फोन करीन,
तेव्हाच विचारते त्यांना करंड्याबद्दल!”
“काही नको.” सुजयचे बाबा पटकन म्हणाले.
“अगदी पहिल्याच भेटीत आपल्यावर वेंधळेपणाचा शिक्का नको बसायला. नंतर कळणारच आहे म्हणा त्यांना
सर्व काही!”
“बरं बाई, नको तर नको,”
असं म्हणून सुमित्राबाईंनी तो विषय तिथेच संपविला.


लग्नाची तयारी धूमधडाक्यात सुरू झाली. आत्या, काकू, मावश्या त्यांच्या कुटुंबीयांसह दाखल झाले. नवे कोरे कपडे, दागिने, चपला, पर्सेस् अशा सगळ्या वस्तूंनी घर भरून गेलं. जेवणाच्या पंगती उठल्या. गप्पागोष्टी, चेष्टा-मस्करी, हास्य-विनोद यांना
अगदी ऊत आला होता. घरात नुसता गोंधळ सुरू होता. एखादी वस्तू दिसेनाशी झाली की सुजयचे बाबा टिप्पणी करीत,“अरे बाबा, वस्तू गहाळ करणे आणि मग त्या शोधून काढणे, हा या घराचा आवडता छंद आहे,” यावर मग सगळेच एकमेकांची चेष्टा करत. मग हळदी, मेहंदी, संगीत, लग्न सारं काही यथासांग पार पडलं.
सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी आत्याबाईंची नथ हरवली. त्यांना नऊवारी नेसून आणि नथ घालून नवदाम्पत्याबरोबर फोटो काढून घ्यायचा होता. ही संधी चुकली म्हणून त्या फारच खट्टू झाल्या. “माझी टपोर्‍या पाणीदार मोत्यांची नथ गेली,” असं त्यांनी बोलून दाखविल्यावर सुजयच्या बाबांनी तिला लगेच नवीन नथ आणून देण्याची तयारी दर्शवीली; पण आत्याबाईंनी त्यांचं म्हणणं उडवूनच लावलं.
“अरे, नकोय् बाबा मला नवी नथ. आता मी कुठे मिरवणार आहे, नवी नथ घालून? पण एखादी वस्तू अचानक गहाळ झाली म्हणजे चुटपुट लागून राहतेच ना जिवाला?”
तिची समजूत काढत बाबा म्हणाले,“हो ना? बघ सापडेल तुझी नथ. तुम्ही बायका म्हणजे ना मुलखाच्या वेंधळ्या. आमच्या सुजयची आई तर असा गोंधळ घालण्यात अगदी पटाईत. कुठेतरी वस्तू आपल्याच हाताने ठेवते आणि मग बसते घरभर धुंडाळत! मग ती वस्तू कधी सापडते कॉट खाली, कधी कपाटाच्या एखाद दुसर्‍या कप्प्यांत तर कधी सुजयच्या खोलीत.”
यावर सर्वचजण हसले आणि झालं अगदी तस्संच! दोन दिवसांनी आत्याबाई घरी जायला निघाल्या; तेव्हा नव्या सूनबाईनं म्हणजे मनस्विनीनं ती हरवलेली नथ त्यांना आणून दिली. नथ तिला सुजयच्या कुठल्याशा ड्रॉवरमध्ये सापडली होती. यावर सुजयचे बाबा चेष्टेने म्हणाले होते,“अरे बाबांनो, थांबा. अजून आमचा पोटमाळा साफ केला नाहीय् आम्ही. तुमची एखादी हरवलेली वस्तू सापडेल तिकडे.”
त्यावर “चला, काहीतरीच काय? अतिशयोक्ती तरी किती करायची? नव्या सूनबाईला काय वाटेल? थोडा तरी विचार करा.” सुमित्राबाईंनी सुनावलं. सुजयने नजर चुकविली आणि तो तिथून निघून गेला. अपराधीपणाची भावना त्याचं काळीज कुरतडत होती.
पाहुणे मंडळी घरी परतल्यावर सुजय-मनस्विनी हनीमूनला सापुतार्‍याला गेली. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या सीमारेषेवर असलेलं हे थंड हवेचं ठिकाण फारसं प्रसिद्ध नसल्यानं तिथे गर्दी कमीच होती. सुजयनं मुद्दामच निवडलं होतं. आपलं मनोगत आपल्याला मोकळेपणानं मनस्विनीला सांगता येईल असं त्याला वाटलं होतं, पण मनस्विनी जणू स्वर्गात विहरत होती. तिला दुखवणं त्याच्या जिवावर आलं होतं. ती दोघं राहत असलेलं ‘प्रीतम’ हॉटेल अगदी उत्तम आणि गुजराती जेवणासाठी प्रसिद्ध होतं. अनेक टूरिस्ट इथं केवळ जेवणासाठी येत. अर्थातच् त्यामुळे हॉटेलचा डायनिंग रूम अत्यंत सुंदर रितीने सजवलेला होता. हॉलच्या भिंतीवर श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध घटनांची, राधाकृष्णाच्या रासक्रिडेची चित्रं रेखाटली होती. गडद लाल पिवळ्या, नारिंगी रंगाची पखरण सर्वत्र केलेली होती. नारिंगी रंगाच्या टेबलक्लॉथवर सुंदर, चकचकीत सोनेरी कटलरी म्हणजे सुर्‍या, काटे, चमचे आकर्षक रितीने मांडले होते. जेवताना सुजय-मनस्विनी दोघांनीही त्या नक्षीदार, मोहक कटलरीचं कौतुक केलं. दुसर्‍या दिवशी मनस्विनी बाथरूममध्ये अंघोळीला गेली; तेव्हा शाम्पूची बाटली तिला देण्यासाठी सुजयने तिची सर्व पर्स उघडली आणि तो चकीतच झाला. डायनिंगरूम मधले दोन नाजूक चमचे मनस्विनीच्या पर्समध्ये आरामात पहुडले होते. सुजयने मग ते चमचे गुपचूप टिश्यू पेपरमध्ये गुंडाळले व आपल्या पॅन्टच्या खिशात टाकले.
संध्याकाळी ती दोघं फिरायला बाहेर पडली. सापुतारा तसं अगदी छोटसंच हिल-स्टेशन. आजूबाजूला फिरायला निसर्गस्थळं देखील फार नाहीत. आपसूकच सर्वांची पावलं त्यामुळे रंगबिरंगी वस्तूंनी भरलेल्या मार्केटकडे वळत. तिथे फिरताना मुद्यामच सुजयने मनस्विनीला म्हटलं,“मनू, तुला इथं काहीही वस्तू घ्यावयाची असेल तर मग मला सांग हं. संकोच नको करूस.”
“छे! छे! मला काही सुद्धा घ्यायचं नाहीय. अरे, आत्ताच लग्नाच्या वेळी तर एवढी सारी खरेदी झाली आहे. ”
सुजयने तरीही आग्रहाने तिला चनिया-चोळी आणि त्यावर मॅचिंग गळ्यातल्या माळा, डूल घेऊन दिले. नंतर तो एका गिफ्टच्या दुकानात शिरला, तिथून दुसर्‍या नंतर तिसर्‍या- “अरे, अजून काय घ्यायचंय तुला?” मनस्विनी विचारत होती. “काही नाही, सहजच बघत होतो आणखी एखादी सुंदर वस्तू दिसत्येय का? ”
शेवटी त्याला हवी ती भेटवस्तू मिळाली. वेगवेगळ्या आकाराच्या सुंदर कलाकृतीपूर्ण चमच्यांचा सेट होता तो. नाजूक, शोभिवंत, नक्षीदार चमचे! ते चमचे पाहताच तो आनंदाने जवळजवळ ओरडलाच. “मनू हा बघ, काल तुला डायनिंगमध्ये आवडला होता ना? तस्साच सेट आहे हा. घेऊया का हा आपण विकत?”
“चमच्यांचा सेट? कशाला? अरे घरी कितीतरी चमचे आहेत. काही नको हं चमचे-बिमचे! तुझं आपलं काहीतरीच. मी अगदी सहज म्हटलं होतं ते!” मनस्विनी निरागसपणे उद्गारली. सुजय हळूच हसला. त्याला तिची दया आली. मनस्विनीसुद्धा त्याच्यासारखीच ‘उचलेगिरी’च्या आजाराची शिकार होती, हे आता निश्‍चित झालं होतं. दोघांनाही एकमेकांना सांभाळून घ्यायची गरज होती. रात्री जेवताना त्याने ते दोन चमचे खिशामधून काढून डायनिंगरूम मध्ये ठेवून दिले, कुणाच्याही नकळत!
हॉटेलच्या खिडकीतून दूरवर डोंगर उतरणीवर झाडीत लपलेलं एक मंदिर होतं. न जाणो का ते देऊळ आपल्याला साद घालीत आहे, असं सुजयला वाटे. दुसर्‍या दिवशी त्याने ठरवलं, आपण त्याला भेट द्यायचीच. देऊळ जुन्या काळातलं, पण अत्यंत स्वच्छ होतं. चोरून लोण्याचा गोळा खाणारी छोटी बाळकृष्णाची स्थापना तेथे केलेली होती. मूर्तीच्या चेहर्‍यावर मिस्कील हसू विलसत होतं आणि डोळ्यात जिवंतपणा! त्या मूर्तीला पाहताक्षणीच आपलं त्या मूर्तीशी काहीएक नातं आहे, हे त्याला पटलं. तिथेच मागच्या बाजूला पंडितजींचं घर होतं. सुजयने त्यांना विचारलं, “ही मूर्ती 12-13 व्या शतकातली असेल नाही? इतक्या जुन्या मूर्ती आता देवळात दिसत नाहीत.” पुराणिकजी हसून म्हणाले,“आपल्याला पुराणवस्तूची आवड दिसते. पण ही मूर्ती तितकीशी जुनी नाही. मूळ मूर्ती तळघरात आहे. ती अशी बाहेर नाही ठेवता येत. फक्त मी त्या मूर्तीची पूजा करून येतो. केवळ दर्शनासाठी ही मूर्ती बाहेर ठेवली आहे.” सुजयला आता तळघरातल्या मूर्तीला भेटण्याची आस लागली होती.
“मी ती खरी मूर्ती पाहू शकेन का? फक्त दोन मिनिटांसाठी?” सुजयनं अजिजीनं विचारलं.
“नाही, सहसा त्या मूर्तीबद्दल मी कोणाला सांगत देखील नाही. या मंदिराची मालकी हरवंशराय सेठ यांच्याकडे आहे. त्यांची सक्त ताकीदच आहे तशी.” पुराणिकबुवांनी आपली बाजू मांडली.
“पंडितजी माझा ‘टुर्स अँड ट्रॅव्हल्स’चा व्यवसाय आहे. हे माझं कार्ड ठेवा जवळ. व्यवसायाच्या निमित्तानं भारतातील आणि जगभरातील सुद्धा खूप स्थळं पाहिली आहेत, मी. विशेषतः जुनी देवळं आणि त्यातल्या मूर्ती पाहण्यात मला रस आहे, म्हणून फक्त दोनच मिनिटं त्या मूर्तीचं मला दर्शन घेऊ द्या. का कोण जाणे, ती मूर्ती मला साद घालते आहे, असं सारखं वाटतंय मला. प्लीज, नाही म्हणू नका. तुमचे फार उपकार होतील माझ्यावर,”
सुजय हात जोडीत म्हणाला.
“ठीक आहे. फक्त दोनच मिनिटं. तुम्ही त्या मूर्तीला अजिबात हात लावायचा नाही. जवळसुद्धा जायचं नाही. दुरूनच मूर्ती पाहायची. कबूल असेल तर या माझ्यामागून.” पंडितजींनी बजावलं. सुजयचं अंग साहसाच्या कल्पनेनं रोमांचित झालं.
“कबूल. पण आपल्या पाठोपाठ कुणी भुयारात शिरलं तर?” त्यानं शंका काढली.
“माझ्या भाच्याला मी भुयाराच्या तोंडाशी उभा करतो ना? तो थोडा वेडसर आहे. त्याला काही कळत नाही.” पंडितजींनी उत्तर दिलं. मग तिघेही भुयारात शिरले. एकच माणूस एका वेळी आत शिरेल, एवढीच त्याची रुंदी होती. भुयाराच्या दोन्ही बाजूंना खाली उतरण्यासाठी मजबूत लोखंडी दोरखंड बांधलेले होते. साखळ्यांना पकडून सरपटत एकामागून एक तिघेही भुयारात उतरले. पंडितजी अर्थातच सर्वांत पुढे होते. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही, इतका अंधार आत होता. “मला फार भीती वाटतेय रे सुजय. आपण नको पुढं जाऊया” मनस्विनी म्हणत होती. तर आता थोडंसंच आत जायचंय. बघ, आत उजेड दिसतोय, असं म्हणत सुजय आत पुरोहितजींच्या मागे जात राहिला. मग हळूहळू ते भुयार उजळू लागलं. सार्‍या फुलांचा सुगंधही नाकपुड्यांना स्पर्श करू लागला. मूर्तीसमोर आल्यावर सुजय आणि मनस्विनी दोघंही स्तब्ध उभे राहिले. समोरची श्रीकृष्णाची मूर्ती तेजःपुंज तर होतीच, पण त्या मूर्तीच्या सर्वांगातून एक अलौकिक निळा प्रकाश झिरपत आहे, असंच सुजयला वाटत होतं. ‘चला आता मागे फिरा,’असे पंडितजींनी म्हटल्यावर सुजय आणि मनस्विनी भानावर आले. आणि परत फिरले. बाहेर आल्यावर सुजयने न बोलता यांत्रिकपणे दक्षिणा देण्यासाठी खिशात हात घातला, पण पुरोहितजींनी काहीही घेण्यास नकार दिला.
परतीच्या वाटेवर सुजय व मनस्विनी दोघे गप्पगप्पच होते. रात्री झोपताना सुजय मनस्विनीला म्हणाला, “काय विलक्षण मूर्ती होती ती! दैवी चमत्कारच जाणवला मला!”
“हवीय का ती मूर्ती तुला? आणू का मी आता तिथून?” मनस्विनीने हसत विचारले. “तू? चल, भित्री कुठली? झोप आता. निघायचं आहे उद्या आपल्याला लवकर.” तिच्या डोक्यावर थोपटत तो म्हणाला. पण रात्री उशिरापर्यंत तो जागाच होता, हे मनस्विनीने जाणलं.
हॉटेलमधून बाहेर पडताना मॅनेजरनं आपलं चकचकीत डौलदार पेन पुढे करत सुजयला म्हटलं, “साहेब, प्लीज या रजिस्टरमध्ये निघण्याची तारीख आणि वेळ घालून खाली सही करा. त्याच वेळी मनस्विनीचं सुजयकडे लक्ष गेलं.” त्याचा चेहरा फुलून आला होता. त्याच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते, हाताला सूक्ष्मसा कंप होता आणि डोळे लकाकत होते - पण मग तो जणू तंद्रीतून जागा झाला. रजिस्टरमध्ये सही करून तो काहीही न बोलता टॅक्सीत जाऊन बसला.
लग्नानंतर मनस्विनी प्रथमच माहेरी गेली होती. नेहमीप्रमाणे सुजय सकाळी वर्तमानपत्र वाचत बसला होता. अचानक त्याचं लक्ष एका बातमीनं वेधून घेतलं. ‘सापुतारा’येथील भुयारातील ‘ती’ मूर्ती गायब झाली होती. पुरोहितजींना अटक झाली होती. पोलीस तपास सुरू होता. सुजयला धक्काच बसला. इतक्या कडेकोट बंदोबस्तात ठेवलेली ती मूर्ती, शिवाय वर्षानुवर्षे तर पुराणिकजीच त्या मूर्तीची पूजा-अर्चा करीत होते, मग अशी अचानक मूर्ती गायब कशी झाली? तो विचार करीत होता. ‘ती’ मूर्ती पाहणारे शेवटचे आम्ही दोघंच असू कदाचित- मनस्विनी आणि मी!
पंडितजींच्या जबानीवरून आणि हॉटेलच्या रेकॉर्डवरून पोलीस आपल्यापर्यंत सहज येऊ शकतात! मनस्विनीचं तर हे काम नसेल? तिने उचललेले हॉटेलचे चमचे, आईचा कुंकवाचा करंडा, त्याच्या नजरेसमोर तरळू लागले. आपण भुयारातून बाहेर पडताना ती आपल्या मागेच होती. तेव्हा तर…? कदाचित त्यावेळी ती स्वतःला आवर घालू शकली नसेल. घरात ती मूर्ती लपून राहूच शकत नाही. त्यातून निघणारा तो तेजःपुंज प्रकाशझोत - मग त्यासाठीच ती माहेरी गेली नसेल ना? उलटसुलट विचारांनी सुजयचं डोकं भणाणून गेलं होतं.
वर्तमानपत्र वाचून मनस्विनी घाबरून गेली. सुजयच्या ‘उचलेगिरी’च्या आजाराची तिला कल्पना आली होती. आत्याची हरवलेली नथ आणि इतर काही छोट्या; पण सुबक वस्तू सुजयच्या


बंद ड्रॉवरमध्ये सापडल्या होत्या. क्षणिक मोहापायी नकळत हातून घडणारी चूक आणि त्यानंतर ग्रासून टाकणारा तो अपराधी भाव तिच्याही ओळखीचा होता. सुजय मूर्ती उचलणार नाही, असे तिचे मन एकीकडे तिला सांगत होते. तरीही जर सुजयच्या हातून ‘ती’चूक घडली असेल तर तात्काळ ती मूर्ती योग्य जागी नेऊन ठेवणं गरजेचं होतं. आईला काहीतरी सबब सांगून ती सुजयच्या घरी आली. तो ऑफिसला जाण्याच्या तयारीत होता. तिला पाहून तो चरकला. तिचा हात पकडून आपल्या बेडरूममध्ये घेऊन आला आणि धाडक्न दार बंद केल्यावर दोघांनी एकमेकांना एकच प्रश्‍न विचारला, “ती सापुतार्‍याची मूर्ती? तू? नाही ना?”
“थँक गॉडऽऽऽ…” दोघं एकदम उद्गारले.
“मनू, तुझ्या लक्षात येतंय ना? हा ‘उचलेगिरी’चा आजार आहे, हे आपण जाणतो. पण इतरांच्या दृष्टीने ही चोरीच आहे. आपल्या दोघांपैकी कुणी जर ती मूर्ती उचलली असती, तर
आज आपण तुरुंगात जाऊन बसलो असतो. त्या कृतीमागच्या समर्थनाचा काहीच उपयोग झाला नसता. केवढी बेअब्रू झाली असती आपली? छेः छेः हे असं चालणार नाही. या आजारापायीच मी लग्न करायला देखील तयार नव्हतो.” सुजय डोकं धरून मटकन् खुर्चीत बसला.
“होय रे. मी सुध्दा तोच विचार करत होते. खरं तर वस्तू उचलण्याची ती इच्छा क्षणापुरतीच असते.
त्यानंतर त्या वस्तूचं आकर्षण नाहीसं होतं. त्या क्षणावर विजय मिळविता आला पाहिजे.” मनस्विनी गंभीर
होत म्हणाली.
“एक्झॅक्टली, मनू. त्या दिवशी श्रीकृष्णानेच आपल्याला वाचवलं. तुला आठवतं ना? श्रीकृष्ण तेथे अर्जुनाच्या सारथ्याच्या रुपात उभा आहे. रथाचे घोडे म्हणजेच आपले काम, क्रोध, लोभ इत्यादी मनोविकार-कृष्णाने त्यांचे लगाम आपल्या हातात घट्ट धरून ठेवले आहेत. तसा मनोनिग्रह आपल्याला साधता आला पाहिजे. ती मूर्ती पाहिल्यापासून हा विचार सतत माझ्या मनात रुंजी घालत होता. त्या हॉटेल मॅनेजरचे पेन उचलण्याचा मोह मी महत्प्रयासाने टाळला, पण ते नेहमीच साध्य होईल असे नाही. मला वाटतं त्यासाठी आपण एखाद्या मनोविकार तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. तुला काय वाटतं?”
“अगदी बरोबर! आजच आपण डॉक्टरांची अपॉइंमेंट घेऊया. मी खरंच खूप भाग्यवान आहे. योगायोगाने मला समजून घेऊ शकणारा जोडीदार आयुष्यात भेटला.” सुजयचा हात हातात घेत मनस्विनी उद्गारली.

Share this article