कशी झाली तुझी आणि माझी मैत्री? तू इतकी सुंदर..तुझा बांधा इतका आकर्षक. आणि तू हळव्या मनाची. कवी मनाची. सतत काव्यात गुंतलेली. बहिणाबाई शिकवताना बहिणाबाई होणारी, संसाराचे चटके जणू तुझ्या हातांना फोड आणत आहेत.. आणि मीरा शिकवताना कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडणारी.
ता रीख आहे आज एक जानेवारी दोन हजार पंधरा. नव्या वर्षाचा हा पहिला दिवस. दिवस तर तसाच उगवला आहे जसा रोज उगवतो. काही नवीन नाही त्यात. रात्रभर जागून मद्यपान करून तरुणाई झोपलेली. अंमल ओसरलेला नाही. बाहेर बघितलं तर समजेल.. रस्ते शांत आहेत. दुपार होत आली तरी हा नवा दिवस शिळा वाटतो आहे. उगीचच एक दोन गाड्या गरज नसताना हॉर्न वाजवत जात आहेत. तेवढीच जाग. आणि तू? तू कशी शांत झोपली आहेस. मला जागं ठेवून. किती जागी राहू अशी मी? वाट बघत रहाण्याचा मला नेहमी कंटाळा येतो.. कंटाळा नाही, रागच येतो, हे तुला माहित आहे आणि तरीही तू असं वागावंस? खूप झालं, आता तुझी झोप मोडायलाच हवी.
प्रयत्न करूनही उठत नाही आहेस. ह्याला म्हणतात झोपेचं सोंग घेणे. अर्थ सांग बघू ह्याचा…मोठी शिक्षिका आहेस ना… तीही मराठी भाषेची… प्रोफेसर. सांग ना… माणूस जागा असतो पण आपण झोपलो आहोत असं भासवतो. मग अशा माणसाला नाहीच उठवता येत. कारण तो जागाच असतो. आणि जो जागा असतो त्याला उठवणार कसं? झोपेचं सोंग घेणे. बरोबर ना? तुझ्या संगतीत राहून निदान इतकं तरी मला यायलाच हवं. सख्खी मैत्रीण ना तू माझी…
खरं तर मी ही अशी .. ड्राय. आणि तू म्हणजे खळाळतं पाणी. कायम उफाळून येणारं. कसं काय तुला हे
जमतं ? किती दोन टोकाच्या आपण. मी रूक्ष आणि
तू .. अरुक्ष असा शब्द आहे का गं? नसेल तर तो आत्ता मी निर्माण केला आहे असं समज. माझे विषय म्हणजे गणित, अर्थशास्त्र… जराही भावनांना स्थान नाही. रोख ठोक. एक आणि एक म्हणजे दोनच.. बस..
आणि तू? तू म्हणणार, असतील होत दोनच.. पण कधी कधी एकच एक धरून बसू नये. मी अशीच आहे.. म्हणूनच कदाचित दोन आणि दोन मिळून चार झाले नाहीत. दोनाचे चार हात होणं जमलंच नाही.
आई खूप चिडायची. ती माझा राग करायची. ती दिसायला इतकी सुंदर होती .. आणि मी ही अशी.. अगदीच सामान्य. मी तिचं रूप घेऊन जन्माला आले नाही.. हा माझा दोष.. हे तिने अगदी तिच्या मनाशी पक्कं केलं होतं. गंमत असते.. नवरा दिसायला कसाही असला तरी चालतं .. कारण पुरुषाचा पराक्रम बघायचा असतो, रूप नाही. आणि मग अशा अरूप असलेल्या माणसाशी लग्न केल्यावर होणारी अपत्य सुंदरच निपजतील हे कशावरून? पण त्या काळातल्या स्त्रियांना तितकं ज्ञान नसावं. मी माझ्या वडिलांसारखी दिसते, ह्याचा माझ्या आईला कोण राग! आणि अशा अरूप माणसाबरोबर शय्या सोबत करताना तिला कधी त्याचं रूप आठवलं नाही.. हे गंमतच.
एकंदरीत काय तर मी अरूप हे मी अगदी लहान असल्यापासून माझ्या मनावर.. आत्म्यावरच म्हण ना… बिम्बवलं गेलं. म्हणून मग लग्नच करायचं नाही आणि खूप शिकायचं हे मी लहानपणीच नक्की केलं.
वडिलांचं फक्त रूप नाही घेतलं मी, तर त्यांची बुद्धीमत्ता पण घेतली आणि म्हणूनच आयुष्य जगू शकले.
तू ऐकत्येस ना? कित्ती वेळा सांगून झालं आहे हे रामायण मी …नाही रामायण नको.. महाभारतही नको म्हणायला…इसापनीती म्हणू? नाही तर काय.. कुणालाही काहीही सांगायचं असेल अथवा कुणी काय सांगत असेल तर समोरचा लगेच म्हणतो, झालं का तुझं रामायण सुरू.. पुढे ऐक…
तर माझी इसापनीती ऐक पुन्हा पुन्हा.. निदान तेच तेच किती बोलतेस…असं म्हणत तरी उठशील.
तशी उद्धट होते मी. लहानपणी. गावातलं सर्वात श्रीमंत घर होतं माझं. बग्गी होती खास माझ्यासाठी. टेचात जायची बग्गीतून शाळेत.
शाळा !!!
शाळा मात्र परकीच वाटत राहिली. कुणी मैत्रिणी नाहीत मग काय परकीच वाटणार ना? मी मैत्रिणी का नाहीत ह्याचं विश्लेषण केलं होतं. अती श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी..त्या श्रीमंतीने मला मैत्री पासून दूर ठेवलं, आणि दुसरं महत्त्वाचं अथवा त्या श्रीमंतीपेक्षाही जास्त महत्त्वाचं कारण म्हणजे माझं रूप. मी नाहीच आवडायची कुणाला. हे माझं असं अपरं नाक.. गर्विष्ठ वाटावं असं.. आणि जरा मोठे डोळे..विनाकारण रागीट वाटावे असे..नाहीच मिळाली कुणी मैत्रीण. मग मित्र मिळणं, फार दूरची गोष्ट…
शाळा अभ्यास, आणि … अभ्यास. माझी हुशारी सुद्धा मैत्रीच्या आड आली वाटतं. मी खूप खूप हुशार..आणि श्रीमंत…मग का नाही करायचा मी गर्व?
पण.. तू म्हणतेस ना नेहमी.. पैसा म्हणजे आळवावरचं पाणी.. तेव्हा का नाही भेटलीस? तुझं प्रत्येक म्हणणं ऐकलं असतं मी. जसं आज ऐकते.. ऐकत आले आत्तापर्यंत.
जागी झालीस का?
आज इथेच थांबते. जरा जाऊन येते. तुला भूक लागेल आणि मलाही काहीतरी खायला हवंच आहे. तुला का भूक लागेल? हे सलाईन तुझं पोट भरतंय. मला मात्र काही तरी हवं आहे आता. जाऊन येते हं.
10 जानेवारी दोन हजार पंधरा.
मुद्दाम तारीख टाकत आहे जेव्हा केव्हा तुला पत्र लिहायला घेत आहे त्या दिवसाची. तुला जाग येईल तेव्हा हे पत्र देणार आहे तुला, वाचशील ना तेव्हा कळेल तुला की कित्ती त्रास दिलास तू मला.
तुला त्रासाची खूप सवय आहे नाही? ह्या नळ्या.. तोंडात, नाकात.. हे सलाईन.. आवडतं तुला इथे रहायला? घरी चल आता. खूप झालं. किती पैसा खर्च करणार आहेस असा? त्यापेक्षा छान फिरायला गेलो असतो… किती जग बघायचं राहून गेलं आहे.. त्या डॉक्टरच्या खिशात पैसे टाकत रहातेस आणि तो श्रीमंत होत जातो.. मस्त एक टूर बुक करते. जाऊ आपण. आणि मग आपल्या दोघींचे फोटो टाकू फेसबुकवर…एक छानशी ट्रीप.
ट्रीप?
नको. नकोच. कुणाबरोबर जाणं नको. दोघीच जाऊ. कुणाबरोबर गेलं की कोण काय म्हणेल हे काही सांगता येत नाही. निखळ मैत्री लोकांना समजू शकत नाही.
मैत्री!!!
कशी झाली तुझी आणि माझी मैत्री? तू इतकी सुंदर..तुझा बांधा इतका आकर्षक. आणि तू हळव्या मनाची. कवी मनाची. सतत काव्यात गुंतलेली. बहिणाबाई शिकवताना बहिणाबाई होणारी, संसाराचे चटके जणू तुझ्या हातांना फोड आणत आहेत.. आणि मीरा शिकवताना कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडणारी. आणि तुझ्या कविता. कुणावरही प्रेम न करता प्रेमाचं आणि विरहाचं काव्य कसं काय करू शकतेस? अनुभव हवा, आणि प्रमाणही हवं. संख्या दिसायला हवी तर गुणाकार होणार ना? पण तुझ्याकडे आकडेच नाहीत. तरीही तू भावनांना गुणत गेलीस आणि कधीच वजा झालीच नाहीस….
कॉलेजचा पहिला दिवस.. तुझा आणि माझाही.
नव्या शिक्षकांना ही पोरं किती जेरीस आणतात…
तू जरा भांबावलेली आणि मी ताठ. तुझ्या क्लास मधे आरडाओरडा चालू होता आणि मला माझ्या क्लास मधे त्याचा त्रास होत होता. मी तडक तुझ्या क्लासरूमच्या दारात उभी आणि तू सर्वांना काहीतरी सांगण्याच्या प्रयत्नात… माझा एकच आवाज आणि सगळे गप्प. तुझा तो पहिला पिरीयड होता. भाषा ह्या विषयाला तसंही कुणी जास्त महत्त्व देत नाही. तेव्हाही आणि आजही. खरं तर भाषा सर्वात जास्त कठीण विषय. कारण तो स्कोरिंग नाही. गणिताचं तसं नाही. आणि तरीही गणिताची भिती प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते. म्हणून माझा वर्ग शांत आणि जे काही मी सांगेन ते निमूट ऐकून घेणारा..
“ऐकत्येस ना?” निमूट ऐकून घेत आहेस. इलाजच नाही तुझ्याकडे…ऐक तर..
माझे आभार मानले होतेस तू… मुलांना, वर्गाला काबूत नाही ठेवता आलं तर तुझी नोकरी जायची भिती….
“कुठे रहाता तुम्ही?”
“चेम्बुरला. लेडीज हॉस्टेल आहे एक .तिथे..”
“तुम्ही?”
“जागा शोधते आहे. मला हॉस्टेलमधे नाही रहायचं. घर हवं आहे एक. शोधात आहे. मिळेल.”
“मग आत्ता कुठे रहाता?”
“हॉटेलमधे. माझं घर आहे लांब. गावात. इथे मी एकटीच आले आहे. आई वडील गावी असतात. मुद्दाम इथे नोकरी घेतली. घर सोडून आले आहे. परत न जाण्यासाठी. तुम्ही?”
“मला आई वडील नाहीत. लहानपणीच गेले. एका नातेवाईकांनी शिक्षण आणि आधार दिला. आता नोकरी मिळाली म्हणून…त्यांनी नाही सांगितलं जायला..पण मलाच प्रशस्त वाटेना…आले निघून. इथे अर्ज दिला होता आणि निवडही झाली.”
“ठीक. भेटू उद्या…”
मी तुझा निरोप घेतला आणि आले निघून. पण तू रेंगाळत राहिलीस माझ्यात. प्रथमच असं कुणा व्यक्तीबद्दल मला काही तरी वाटलं होतं.
सतरा फेब्रुवारी दोन हजार पंधरा.
घर आलं. छान वाटलं ना घरी येऊन? मग? हे आपलं घर. तुझं आणि माझं.
ह्या घराने कित्ती काय काय दिलं नाही आपल्याला! आता तू म्हणशील नेहमी प्रमाणे की माझ्यामुळे हे शक्य झालं. म्हण. खरं आहे ते. माझ्याचमुळे हे घर घेता येणं शक्य झालं. काय ते तुझं हॉस्टेल. हॉरिबल. कशी रहात होतीस तिथे देव जाणे.
देव जाणे.. माझ्या तोंडून देवाचं नाव ऐकून दचकलीस की काय? येतं हल्ली त्याचं नाव ओठात. अर्थात मनात असल्याशिवाय ओठात येणं शक्य नाही. निदान त्याच्या नावाच्या उच्चाराचा तरी फायदा होतो का हे बघायचं आहे. तू जागी व्हावीस हेच एकमेव कारण. सवय झाली आहे तुझी. तुझ्या असण्याची. तुझ्या सर्व गोष्टींची. काही केल्या ही सवय मोडता येणं शक्य होत नाहीये. तू जाणार आहेस हे मला माहित आहे. आता फक्त वाट बघत रहायचं की कधी? मी तुला आधीही म्हटलं आहे की मला वाट बघायला आवडत नाही. जर जायचं ठरवलं आहेसच तर मग जा ना पटकन.. उगीचच मी वाट बघत बसू? कधी जातेस? अशी..
तेव्हा पण किती वाट बघत राहिले मी. कधी येतेस? अशी.
हे घर घेतलं आणि तुला म्हटलं ये इथे रहायला. आपण दोघी राहू. तुझा होकार येण्यासाठी दोन महिने द्यावे लागले.. त्या होकाराला. लग्न करे पर्यंत तरी ये रहायला..! तुला लग्न करायचं होतं. तुझी तुझ्या घराची स्वप्न.. रम्य स्वप्न.. जोडीदाराबद्दलची स्वप्न… मला कधीच अशी स्वप्न पडली नाहीत. मी लग्न करेन की नाही हेच मला माहित नव्हतं. नव्हतेच करणार बहुतेक. लग्न, संसार, मुलं.. मी त्या गटातली नाहीच असं मला नेहमी आतून वाटत रहायचं. सोबत हवी…असंही कधी वाटलं नाही. माझ्या आई वडिलांनी एकमेकांना दिलेली सोबत बघत बघतच मी लहानाची मोठी झाले होते. सोबत की तडजोड? रूप की पैसा? हुशारी की डौलदार शरीर?
मी निवड केली पैसा आणि हुशारीची. तडजोड नकोच होती. मग सोबत शोधणार कशासाठी? पण तुझ्याशी कशी काय जोडले गेले?
तुला सर्व काही हवं होतं.. मग का नाही मिळालं? तो तुला आवडला होता. आणि त्यालाही तू आवडली होतीस. छान होता. माझ्या हृदयात धडधड होत राहिली. तू जाणार? हे घर सोडून? मला सोडून? त्याच्याकडे? मी अस्वस्थ. कॉलेजला जाणं बंद केलं. एक आठवडा… तू विचारत राहिलीस..
“काय होतंय गं?”
“काही नाही.”
“सांगशील तर मला समजेल ना. डोकं दुखतंय?
चेपून देऊ?”
“काही नाही सांगितलं ना एकदा. जा तू.”
“अगदी लहान मुलीसारखी आहेस.”
“मी लहान नाही.”
“कित्ती चिडलीस बघ. माझी एक कविता आहे.. ऐकणार?”
“नको.”
“का?”
“उद्या लग्न होऊन जाशील आणि मग मला कविता ऐकायची असेल तर काय इथे येणार आहेस?”
“आपण एक फोन घेऊ या. जेव्हा तुला वाटेल तेव्हा फोनवर बोलू. नक्की कविता ऐकवेन..”
“त्याच्या घरी आहे का फोन?”
“आहे ना! म्हणून तर…”
मी हसले. माझा राग, माझी अस्वस्थता सर्व काही … वितळून गेले मी. तुझ्या निर्व्याज शब्दात.. आणि वाटलं की, खरच.. मला नाही लग्न करायचं पण म्हणून तुझा आनंद मी का हिरावून घ्यावा? तुझं फुलपाखरू झालेलं.. आणि मी मात्र…
सवय वाईटच. मग ती कशाचीही असो. माणसांची सवय तर जास्तच वाईट. त्यांना धरून ठेवता येत नाही. तुला झाली होती त्याची सवय. पण धरून कुठे ठेवता आलं? का केलंस तू तेव्हा असं? नाही, सांगच आता.
त्या संध्याकाळी आलीस घरी.. पाऊस खूप पडत होता आणि छत्री असून तू ओलीचिंब… किती छान दिसत होतीस.. बाईला सुद्धा हेवा वाटावा तुझा… झिरझिरीत क्रेप साडी तुझ्या अंगाला मिठी घातलेली.. तुझ्या कंबरेतून आत जाणारे पाण्याचे ओघळ .. साडीतून स्पष्ट दिसत होते…
बाप रे! मी तुला इतकं निरखलं होत? माझ्याही नकळत? आत्ता कसं काय आठवलं?…आणि….
दोन मार्च दोन हजार पंधरा.
तुला भेटायला तुझे विद्यार्थी येऊन गेले आज. कोणत्या बॅचला होते.. म्हणाले खरं..पण आत्ता आठवत नाही आहे. आणि त्यांना ओळखणार तरी कसं? कुणाला टक्कल पडलेलं, तर कुणाचं पोट सुटलेलं.. कुणाला चष्मा… आणि दाढी मिशा तर… पण आले, बसले, काही जुन्या आठवणी… जरा हळवेही झाले.. बरं वाटलं. लक्षात ठेवून आली मुलं. आता त्यांना जीवन, आयुष्य.. ह्याचा अर्थ कळायला लागला आहे बहुतेक.. एक अपराधी भाव जाणवत होता त्यांच्या हालचालीत…
अपराध त्यांनी केलाच होता. आणि त्यांनीच असं नाही, अनेकांनी..अनेकांनी…
आणि तो ही तुझाच गुन्हेगार होता. त्याला तू अतिशय कडक शिक्षा करायला हवी होतीस. तोडूनच टाकायला हवं होतंस. तू तोडायला हवं होतंस. त्याने तोडण्या आधी. पण तू…!!
किती हळुवार घेतलंस सर्व…घरी आलीस तर भिजलेली..सर्दी होणारच होती तुला..
“पावसाने गंमत केली माझी.”
“आणि त्याने?”
“त्याने सुद्धा गंमत केली माझी. घाबरला बघ तो. समाजाला, आई वडिलांना… माझ्याशी लग्न झालं तर त्याच्या बहिणीशी कोण लग्न करणार? खूप मोठा प्रश्न होता त्याच्यापुढे.”
“असं? मोठा प्रश्न? का म्हणून? तुझ्या सारखी बायको मिळण्याची लायकी नाही त्याची.”
“असं नको म्हणूस. तो चांगला आहे.
कारण काय दिलं त्याने नकाराचं?”
“जाऊ दे. कारण काहीही का असेना.. नकार नक्की आहे. मग कशाला उगीचच..”
“कॉलेजमध्ये रोज दिसणार आहे तुला तो. तेव्हा काय करशील?”
“तो नोकरी सोडतो आहे.”
“काय?”
“होय. त्याला मला रोज बघायचं नाही. त्रास होईल असं म्हणाला.”
“पण..नाही. मला आता कारण कळायलाच हवं.
…”
“बोल. मोकळी हो. माझ्याशी नाही बोलणार तर कुणाशी? गेले तीन वर्ष आपण एकत्र रहात आहोत. आपली सुखं दुःख इतकी एकमेकींच्या परिचयाची झालेली आहेत की… सांग. लपवू नकोस काहीच.”
“आपली मैत्री.”
“आपली मैत्री.. हे कारण आहे? हात्तिच्या.. आधी का नाही सांगितलं? आत्ता जा त्याच्याकडे. त्याला सांग… नाही राहिली मैत्री.”
“सोपं आहे इतकं? तुला असेल, मला नाही.”
“वेडाबाई. मैत्री संपली असं म्हणून कधी संपत नाही. रोज आपण भेटूच ना..”
“तुला नाही समजत आहे. आपल्याला कॉलेज मधले सगळे..लेस्बियन समजतात..”
“काय?”
“स्टुडंट्स तशी चर्चा करतात. आपण एकत्र जातो, येतो, रहातो. तू आजारी असलीस तर मी जात नाही कॉलेजला आणि मला काही होत असेल तर तुझी सुट्टी.. आपण साड्या सारख्याच नेसतो. दोघींचा चॉइस सारखा..आणि ..दोघी ..”
“शी:”
“हे जग असंच आहे. आपण कितीही निर्मळ असलो तरी.. आणि तरूण मुलांच्या मनात काय चाललेलं असतं.. आपण जाणतो. आपली ही अशी मैत्री.. त्याला झेपत नाही आहे. तो तरी काय करणार? सर्वसामान्य जगातून आलेला तो. आणि सर्वसामान्य जगात रहाणारा. क्षमा केलं आहे मी त्याला. ना राग आहे, ना खंत.”
“तू जा इथून. नाही रहायचं इथे तू ह्यापुढे.”
“खरंच?”
“काय करू मी तुझं? का म्हणून ही बदनामी
सहन करायची?”
“ही नवी पिढी आहे. नव्या युगातली. पण त्यांच्या विचारांना घाबरून आपण आपली मैत्री तोडायची? नाही. हे शक्य नाही.”
“लग्न करायचं आहे ना तुला?”
“होतं. नक्कीच करायचं होतं. पण तो सर्वत्र असणार आहे. वेगवेगळ्या रुपात. नाही. मला नाही करायचं लग्न. आणि जर कुणी वेगळा तो भेटला तर करेनही. जो मला माझ्या मैत्री सकट मान्य करेल. जो ह्या निर्मळ मैत्रीला कोणतेही मापदंड लावणार नाही. तरच.”
“तू ठाम होतीस. आणि मी अस्वस्थ. असं काय केलं होतं मी तुझ्यासाठी? मैत्रीसाठी पूर्ण आयुष्यभर कुमारी राहिलीस?”
प्रत्येक नव्या वर्षाची सुरुवात आणि नव्या विद्यार्थ्यांचा आपल्या बद्दलचा समज. चर्चा. मी तुला म्हटलं होतं, “मी दुसर्या कॉलेजमध्ये नोकरी बघते. आता फारच होत चाललं आहे.”
“हे तू म्हणतेस? माझ्यापेक्षा जास्त ठाम, ताठ असणारी.. पक्क्या विचारांची, सडेतोड..तू घाबरलीस?”
“घाबरले? नाही. पण शेवटी बाईमाणूस आहे मी. केव्हा तरी खचायला होतंच.”
“म्हणूनच आपण एकमेकींसाठी आहोत. मी खचते तेव्हा तू ताठ असतेस.. तू खाचलीस.. तर आज मी ताठ आहे. आपल्याला जर आपण निश्चित माहित आहोत… तर .. समाजाला घाबरायचं असतं तर केव्हाच बाहेर पडले असते. समाजाची .. तुझ्या भाषेत सांगू तर गोची होत आहे. त्या समाजाला आपण हव्या आहोत.. आणि त्याला जशा हव्या आहोत तशा मिळत नाही आहोत. किती जण प्रयत्न करतात.. अगदी नवीन आलेले विद्यार्थी सुद्धा.. हल्ली एक फॅशन झाली आहे. टिचरच्या प्रेमात पडायचं. त्यांच्या नजरेत दिसते.. अभिप्सा…प्रतिसाद मिळत नाही आणि मग त्याचं रुपांतर बदनामी करण्यात होतं. पळून नाही जायचं. आणि का पळायचं? आपण आपलं आयुष्य कसं जगायचं ह्याची निवड केली आहे. आणि ती विचारपूर्वक केलेली आहे..बस!”
“तुझ्या ठाम विचारांनी मला ताळ्यावर आणलं होतं. दोन अधिक दोन चारच..”
पंचवीस मार्च दोन हजार पंधरा.
खूप सुरकुत्या पडल्या आहेत तुझ्या हातांवर. गळ्यावर. तुझी जरा लांब मान आता लहान दिसते आहे. उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. आणि हो.. आज तुझं पेन्शन आलं आहे. काय करू त्या पैशांचं? कुणाला देऊ? सांगून ठेव. काही लिहून तरी ठेवलं आहेस का? शोधायला हवं. बघते तुझं कपाट उघडून. चावी???
आज पर्यंत आपण दोघींनी एक गोष्ट मात्र कटाक्षाने पाळली. दोघींनी कधी एकमेकींच्या कपाटाला हात लावला नाही. खाजगी आयुष्य दोघींना नाही.. पण तरीही. एक नियम. असा नियम जो, नियम न करताच पाळला गेला. पण आता इलाज नाही. उघडते कपाट… बघ.
किती धावणार? आणि धावलात तरी पोहोचता कुठे? मुक्कामाचं ठिकाण निवडताना जर चूक झाली असेल तर धावणंच चुकलं. मग पोचणार कसे?
ही तुझी डायरी.. हाती लागली आहे. वाचू का? तू उत्तर देण्याच्या पलीकडे गेलेली. वाचते. तू हो म्हणाली आहेस, असं समजून.
निवड केली ते ठिकाण चुकीचं आहे, हेच तर समजत नाही. मग त्या ठिकाणी वास्तव्य केलं तर समाधान मिळणार का? पैलतीर दिसणार का? नाहीच. मग न्याय आणि अन्याय ह्यालाही काहीही अर्थ नाही. कोण कुणावर अन्याय करतंय? आणि न्याय तरी कुणाकडे मागायचा? सर्वच एक खेळ. एक न संपणारा. स्वतःत तो खेळ संपवण्याची ताकद असेल तरच संपणार. मग धावणं थांबेल. स्थिरता मिळेल.
काय होतं तुझ्या मनात? का नाही कधी बोललीस.. कोणता खेळ? कुठलं ठिकाण? तुला इथे रहायला आवडत नव्हतं?
कधी कुणाला घड्याळ देऊ नये गिफ्ट म्हणून. लहानपणी ऐकलं होतं. मोठेपणी एक गोष्ट वाचनात आली. दुकानात घड्याळ असतं विक्रीसाठी. अनेक असतात. प्रत्येक घड्याळ्याचे काटे..तास काटा दहावर आणि मिनिट काटा दोनावर असतो. त्याचा अर्थ असा की ते दहा आणि दोनावर असलेले काटे म्हणजे पक्ष्याचे पंख.. उडणारे.. वेळ असा उडून जातो. असा उडून जाणारा वेळ गिफ्ट म्हणून दिला तर ते नातं त्या घड्याळ्याच्या काट्यांच्या पंखाप्रमाणे उडून जातं. … हे जर आधी माहित असतं तर त्याने गिफ्ट म्हणून दिलेलं घड्याळ मी घेतलं नसतं. घड्याळ आहे ह्या डबीत. हे त्याने दिलेलं आहे ना? अजून जपून ठेवलं आहेस? त्याचं लग्न होऊन तो संसारी होऊन किती काळ लोटला असेल. मला वाटलं होतं की तू विसरलीस त्याला..
स्वतःतलं न्यूनत्व दडपून टाकण्यासाठी फार मोठा आवाज करायला लागतो. स्वतःची चूक मान्यं करण्याची क्षमता नसणारी ही माणसं इतरांवर आरोप करत रहातात.
स्वतःवर चिडता येत नाही म्हणून तो राग इतरांवर काढायचा. अशा भित्र्या माणसांना त्यांची चीड व्यक्त करण्यासाठी कायम कुणीतरी लागतं. ही माणसं एकटी जगू शकत नाहीत. आतून भित्रे ससे असतात म्हणून बाहेर डरकाळी फोडतात. हे ससे गोजिरवाणे नसतात, ह्याचंच वाईट वाटतं. मला अशा भित्र्या सशांची खूप दया येते.. खूप..
कोण हे भित्रे ससे? मला कसं समजणार? बोल बाई तू.. इतकी कोडी घालून जाऊ नकोस.
माणसाने सर्व उपभोगून घ्यावं. म्हणजे मन गुंतून रहात नाही. काही अपेक्षा मनातच राहल्या की तगमग होत रहाते. तू त्याला अपवाद नाहीस. लग्न करणार नाही.. करायचंच नाही असं अखंड म्हणत आलीस. पण मन? आणि मनापेक्षा शरीर? शरीर काय करणार? त्याचे व्यवहार चुकते करायला हवे होतेस तू..
तू लेस्बियन नाहीस. हे तुलाही माहित आहे आणि मलाही. आपण दोघी खूप बदनाम झालो. ते चटके आपण दोघींनी सहन केले. मी त्या शरीराच्या व्यवहारातून त्याने नकार दिला त्याच क्षणी बाहेर पडले होते. तू मात्र अडकलेली होतीस. का नाही सोडवलंस स्वतःला? कसला हट्ट?
कॉलेजची ट्रीप… महाबळेश्वर… मुलं अगदी मजेत.. हास्य विनोद.. गप्पा.. भेंड्या.. खेळ.. शेकोटी पेटवलेली…आणि मुलांचे नाच.. थिरकते पाय..
शेवटी रात्र चढत गेलेली.. आपण आपल्या खोलीत आलो. दमलो होतो खूप. केव्हा डोळा लागला.. नाही समजलं… आणि दचकून जाग आली..गरम श्वास मानेजवळ.. कोण? पण मग तुझ्या परफ्युमचा सुगंध आला…
तू? मी डोळे गच्च मिटले.
जराही हलले नाही. तुझा श्वास अजून जवळ येऊ लागला.. मला जास्त भिडू लागला. काय होतंय? तू अशी? मी थोडीशी मान वळवली…तुझे ओठ खूप जवळ आलेले जाणवले…आणि मी आता उठणार.. आणि तू तुझा गरम श्वास दूर जात असल्याचं जाणवलं.. मी सुस्कारा सोडला…
पहाट उगवली ती अतिशय रम्य होती.. तुझा चेहरा शांत.. रूक्ष.. नेहमी असतो तसा..
एक एप्रिल दोन हजार पंधरा.
तुझं क्रियाकर्म मीच केलं. अजून कोण करणार होतं? सुटलीस. मनाने तर कधीच सुटली होतीस.. शरीर पण सुटलं. अनेक हाल भोगून.
आता तुला काही सांगायचं आहे.. ते राहूनच गेलं. तू वेळच दिला नाहीस.
मला नव्हतं माहित की तू जागी होतीस तेव्हा. हो, आले होते मी तुझ्या जवळ. शरीरधर्म…
तेव्हाच का आले? रम्य रात्र होती, सुखद वातावरण होतं. समोर तारुण्य सळसळत होतं. त्या मुलामुलींचं वागणं, हसणं, कुणाचं लाजणं.. मी रूक्ष हा शिक्का माझ्यावर कधीचाच बसलेला. पण त्या रूक्ष त्वचेखाली एक मन होतं, जे कुणाला दिसलं नाही. कुणी बघण्याचा प्रयत्न केला नाही. अथवा, मी कुणाला तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही..
लेस्बियनचा उच्चार मलाही अस्वस्थ करत होताच की. अपमान होता तो माझा.. तुझा नाही झाला तेवढा कारण तुला काही काळासाठी का होईना तो भेटला होता. त्याच्या अल्पावधीच्या प्रेमाने तू लेस्बियन नाहीस हे सिध्द केलं होतं.
आणि ती रात्र..
एक वय असतं. पाळी जायचं. त्या वयात सर्व शरीर मनाशी प्रतारणा करतं. कुणी तरी हवं असतं. अगदी जवळ. स्पर्श करता येईल असं. ते शरीराचं आणि मनाचं स्थित्यंतर नाही ग शांत होऊ देत आतून. काही तरी मागत रहातं. असं काही तरी जे मिळालेलं नाही. जे अपूर्णत्व सिध्द करतं. मला पूर्ण करावसं वाटलं.
तू होतीस समोर. अजूनही तितकीच आकर्षक दिसणारी, असणारी. मनाने आणि शरीराने तारतम्यची साथ सोडली होती त्याक्षणी. काय हवं होतं मला?
ओठांचा स्पर्श कसा असतो.. हे अनुभवायचं होतं. एकदाच. त्यात लालसा नव्हती, फक्त एक अनुभव हवा होता. एकदाच. आसुसलेल्या ओठांना शांत करण्यासाठी. तो एकच क्षण.. पूर्ण आयुष्यातला तो एकमेव क्षण.. हवा होता. आतून तुटून गेल्या सारखं वाटत होतं. निछावर करावं.. असं
काही तरी..
लेस्बियन मी ही नाही.. तेव्हाही नव्हते..
पण…कसं सांगू तुला..ऐकणार आहेस का?
समजून घेणार आहेस का?
त्या एका क्षणामुळे आयुष्यभराची निर्मळ, निर्व्याज्य संगत.. पूर्ण आयुष्यच हरवून बसले आहे का मी?
सांग बाई… नाही चैन पडत आहे आता..
तेरा जून दोन हजार पंधरा..
आले आहे आपल्या रिकाम्या घरी. सर्व घर फिरून बघितलं. सर्व काही जागच्याजागी.. तसंच आहे. धूळ आहे साठलेली..
काय? कुठून आले?
हॉस्पिटलमधून … हार्टअॅटॅक.. बरी आहे आता.
तुझ्या डायरीत तू लिहिलं होतंस त्याप्रमाणे तुझं पेन्शन दर महिना हॉस्पिटलला दान देत आहे. आणि तुझी डायरी जपून ठेवली आहे, ती मात्र नाही चढवली तुझ्याबरोबर तुझ्या सरणावर…
कालच त्यातल्या दोन ओळी वाचल्या आणि वाटलं खरंच का नाही बोलले तुझ्याशी आधीच?
ऐकणार त्या दोन ओळी? ऐक
अगर दिल खोल देते अपना यारोंके साथ
तो आज खोलना न पडता अवजारोंके साथ…
का लाज वाटली मला माझी त्या रात्रीसाठी? की मी भ्यायले तुला? तू मला सोडून जाशील म्हणून? तू म्हणशील.. हेच ओळखलंस का मला?
नाही गं… बत्तीस वर्षात मी तुला पूर्ण ओळखलं होतं…पण मी मलाच नाही ओळखू शकले…
हो ना?
-स्वाती चांदोरकर