Close

नववधूचं सौंदर्य खुलवण्यासाठी… (To Reveal The Beauty Of The Bride…)

लग्नाची तयारी आपण किमान तीन-चार महिने आधीपासून सुरू करतो ना, मग आरोग्य आणि सौंदर्याबाबतची दक्षता घ्यायलाही तेव्हापासूनच सुरुवात करायला नको का? इतर सर्व कामांसोबतच या गोष्टींसाठीही वेळ काढायलाच हवा. त्यासाठी या काही टिप्सचा नक्कीच फायदा होईल.
लग्न! प्रत्येकाच्या आयुष्यातला स्वप्नवत क्षण. दोन जीवांनाच नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र बांधणारा मंगलमय उत्सव! प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील या मंगलमय दिवसाची स्वप्नं रंगवलेली असतात. मात्र या स्वप्नांना वास्तवात आणण्याचा दिवस जसजसा जवळ येतो, तसतसा घरातला गोंधळ अधिकाधिक वाढत जातो. खरेदी, केळवणं, आमंत्रणं… या सर्वांतून निवांतपणा मिळालाच, तर सौंदर्याची आठवण होते. खरं तर लग्नसोहळ्याच्या दिवशी प्रत्येकाची नजर केवळ वधू-वर यांवरच खिळणार असते. त्यामुळे सर्वांपेक्षा वेगळं आणि नजरेत भरणारं सौंदर्य वधू-वराला हवं असतं. अशा वेळी मग ब्युटीशियन्सना हवे तेवढे पैसे देऊन बुक केलं जातं आणि त्यांच्यावरच आपल्या सौंदर्याची सारी जबाबदारी सोपवली जाते. पण प्रश्‍न असा की, पायाच चांगला नसेल, तर एक-दीड तासात ब्युटीशियन तरी काय जादू करणार? आणि समजा त्याने ही जादू केलीच, तर ती किती काळ टिकणार? शेवटी मेकअप हा तात्पुरताच असतो. त्याला मर्यादा असतात. एक उदाहरण देतो, सुनयनाचं. दिसायला तशी चांगली; पण लग्नामध्ये काय गोंधळ झाला कुणास ठाऊक. तिचा मेकअप इतका वाईट झाला की, तिला कळेनाच काय करावं. तेच राहुलचं. ऐन लग्नाच्या दिवशी पोटदुखीने आजारी पडला होता. सुरुवातीला कुणाच्याही लक्षात येत नव्हतं, त्याला नक्की काय होतंय ते. नंतर माझं लक्ष त्याच्या घट्ट कपड्यांकडे गेलं. कपड्याचे जरा सैल केले आणि अर्ध्या तासात त्याला बरं वाटलं.
हल्ली तरुण-तरुणी पैसा-घर-करिअर असं सर्व काही मॅनेज करत लग्नाला उभे राहतात. त्यामुळे त्यांच्या स्वतःवर बर्‍याच जबाबदार्‍या, ताणतणाव असतात. या जबाबदार्‍या पूर्ण करेपर्यंत, ताणतणाव जरा हलके होईपर्यंत लग्नाचा दिवस उजाडतो. आणि मग जो दिवस परफेक्ट होण्यासाठी हा सर्व आटापिटा केलेला असतो, त्या दिवशी हा ताण वधू-वराच्या चेहर्‍यावर, देहबोलीत दिसू लागतो. लग्नाची तयारी आपण किमान तीन-चार महिने आधीपासून सुरू करतो ना, मग आरोग्य आणि सौंदर्याबाबतची दक्षताही तेव्हापासूनच घ्यायला सुरुवात करायला नको का? त्याकडे आपण का दुर्लक्ष करतो? इतर सर्व कामांसोबतच या गोष्टींसाठीही वेळ काढायलाच हवा. त्यासाठी या काही टिप्सचा नक्कीच फायदा होईल.
आरोग्य जपा!
नियमित आहारामध्ये पालक, मिश्र डाळी, कडधान्य यांच्या सूप, तसंच सॅलेडचा समावेश करा. आठवड्यातून किमान 3 वेळा सूप आणि 6-7 वेळा सॅलेडचा आहारात समावेश असू द्या.
दिवसभरात 8 ग्लास पाणी, 1 ग्लास फळांचा किंवा भाज्यांचा रस आणि 2 ग्लास ताक प्या.
आवळा, मेथी, पालक, पनीर, सोयाबीन, पपई, कलिंगड यांचा आहारातील वापर वाढवा.
यामुळे त्वचेला नैसर्गिक तेज येतं.
बाहेरचं, तेलकट आणि रेडिमेट पदार्थ वर्ज्य करा. तेलकट, तिखट, आंबट पदार्थांमुळे त्वचेवर मुरुमं येतात.
केळवणासारखे सोहळे लग्नसमारंभाच्या किमान 10 दिवस आधीच थांबवा.
महत्त्वाचं
लग्नसमारंभामुळे आयुष्यात होणार्‍या बदलांना सकारात्मकरित्या सामोरे जा. गरज भासल्यास काऊन्सिलरची मदत घ्या.
सकाळचं कोवळं ऊन अंगावर घ्या. त्यात व्हिटामिन डी3 भरपूर प्रमाणात असतं. सकारात्मक विचारांसाठी मेंदूला इतर जीवनसत्त्वांसोबतच व्हिटामिन डी3चीही गरज असते.
ब्लिचिंग, व्हॅक्सिंग, क्लिनिंग हे लग्नाच्या 15 दिवस आधी करून घ्या. ऐन वेळी कोणताही नवीन मेकअप करू नका. लग्न समारंभात अति घट्ट पोशाख घालू नका. नटनट्यांचं अनुकरण करून डाएट करू नका.
तरुणींनी सकाळी न्याहारीपूर्वी फळांचा रस प्या, तर तरुणांनी रात्री झोपण्यापूर्वी फळांचा रस प्या.
मुख्य लग्न समारंभाआधी नाश्ता करा. अधिक प्रमाणात द्रव पदार्थांचं सेवन करू नका. पोट रिकामं असेल, तर मेकअपही फिका वाटतो, हे लक्षात ठेवा. कोणत्याही प्रकारची क्रॅश डाएट किंवा क्रॅश ब्युटी ट्रीटमेंट करू नका.
सौंदर्याबाबत दक्षता घेण्यासाठी वधू-वर खालील प्रकारे नैसर्गिक घटकांपासून (त्वचा प्रकारानुसार)
फेस स्क्रब, फेस ब्लीच व फेस मास्क आणि केसांसाठी तेल, पॅक व ब्लीचचा वापर करून होम ब्युटी ट्रीटमेंटचा लाभ घेऊ शकतील.

सामान्य त्वचेसाठी…
फेस स्क्रब
साहित्य : 1 मोठं मोसंबं, 2 चमचे लोणी, 1 चमचा गुलाबपाणी, 2 चमचे कच्चं दूध, 1 चमचा शेंगदाणे.
कृती : शेंगदाणे भाजून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात लोणी, गुलाबपाणी आणि दूध एकत्र करून हे मिश्रण तासभर झाकून ठेवा. मोसंबी स्वच्छ करून त्याचा गर स्वच्छ हातांनी व्यवस्थित कुसकरा आणि शेंगदाण्यांच्या मिश्रणामध्ये घाला. मिश्रण एकजीव करा. चेहरा स्वच्छ धुऊन कोरडा करा. त्यावर हा स्क्रब लावून हलक्या हाताने मसाज करा. मान, गळा आणि पाठीवरही स्क्रबर लावून मसाज करा. नंतर चेहरा, गळा, मान व पाठीवर वाफ घ्या. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. असं आठवड्यातून एकदा करा. चेहर्‍यावर साचलेली घाण, मृत त्वचा निघून जाते आणि चेहरा स्वच्छ व नितळ होतो.
होम ब्लीच
साहित्य : 1 मोठं संत्रं, 2 चमचे मलई, 1 चमचा गुलाबपाणी, अर्धा चमचा गव्हाचं पीठ, 1 वाटी बर्फ.
कृती : संत्रं सोलून, त्याचा केवळ गर वेगळा करून घ्या. या गराचा रस काढा. एका मोठ्या वाटीत बर्फ घालून त्यावर एक लहान व खोलगट वाटी ठेवा. या वाटीमध्ये गुलाबपाणी घाला. त्यात गव्हाचं पीठ मिसळा. नंतर त्यात मलई एकत्र करा. आता अर्धा चमचा संत्र्याचा रस घालून व्यवस्थित एकत्र करा. मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर त्यात अजून 1 चमचा संत्र्याचा रस घाला. असं तीन वेळा करा. होम ब्लीच तयार.
चेहरा स्वच्छ धुऊन कोरडा करा. पापण्या, भुवया आणि डोळे सोडून चेहरा, गळा, मान आणि पाठीवर हे मिश्रण समसमान प्रमाणात लावा. अर्ध्या तासाने किंवा मिश्रण सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन वेळा हे ब्लीच त्वचेवर लावा. त्वचेचा रंग नक्कीच उजळेल. या ब्लीचचा वापर लग्नाच्या किमान दोन महिने आधीपासून सुरू करा.
पुदिना फेस मास्क
साहित्य : 2 वाटी पुदिन्याची ताजी पानं, अर्धा वाटी घट्ट ताक, 1 वाटी मुलतानी माती, 1 चमचा गव्हाचं पीठ.
कृती : ताकामध्ये गव्हाचं पीठ एकत्र करून अर्ध्या तासाकरिता बाजूला ठेवून द्या. पुदिन्याची पानं बारीक वाटून घ्या. त्यात मुलतानी माती घालून व्यवस्थित एकजीव करा. आता त्यात ताकाचं
मिश्रण घालून घट्टसर लेप तयार करा. हा लेप 10 मिनिटांकरिता उबदार ठिकाणी ठेवून द्या.
स्क्रबने चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्यावर हा मास्क लावा. मास्क नैसर्गिक रितीने सुकला की, चेहरा पाण्याने
स्वच्छ करा.

केळ्याचा फेस मास्क
साहित्य : 1 पिकलेलं केळं, अर्धा चमचा ग्लिसरीन, अर्धा चमचा दुधाचा मसाला, 2 चमचे गरम दूध.
कृती : केळं किसून घ्या. ग्लिसरीन आणि दुधाचा मसाला एकत्र करून केळ्याच्या गरात घाला. त्यात गरम दूध घालून चांगलं फेटून घ्या. स्क्रबने चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्यावर हा मास्क लावा. अर्ध्या तासाने चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. सामान्य किंवा तेलकट त्वचा
पपई फेस मास्क
साहित्य : 1 वाटी पिकलेल्या पपईचा गर, 4 चमचे चंदन पूड, 2 चमचे रक्तचंदन पूड, 4 चमचे गुलाबपाणी.
कृती : पपईच्या गरामध्ये चंदन आणि गुलाबपाणी एकत्र करा. त्यात रक्तचंदन घालून एकजीव मिश्रण तयार करा. बारीक ब्रशने हा मास्क स्वच्छ चेहर्‍यावर लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
सफरचंद-द्राक्ष मास्क
साहित्य : 1 लाल सफरचंद, अर्धा वाटी द्राक्षं, 2 चमचे मुलतानी माती, अर्धा वाटी चमचा गुलाबपाणी.
कृती : द्राक्षांची सालं काढून टाका आणि उर्वरित गर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. सफरचंद सालासकट किसून घ्या. त्यात मुलतानी माती, गुलाबपाणी आणि द्राक्षाची पेस्ट घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. हा मास्क स्वच्छ चेहर्‍यावर लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

कोरड्या त्वचेसाठी

अ‍ॅव्होकॅडो मास्क
साहित्य : 1 काकडी, 1 अ‍ॅव्होकॅडो फळ, 1 अंडं.
कृती : काकडी तासून, त्यातील बिया काढून टाका. काकडी, अ‍ॅव्होकॅडोचा गर आणि अंडं एकत्र मिक्सरमधून
फिरवून घ्या. मिश्रण व्यवस्थित बारीक झालं की, 10 मिनिटांकरिता बाजूला ठेवून द्या. नंतर चेहरा स्वच्छ करून त्यावर हा मास्क लावा. 10 मिनिटांनंतर किंवा मास्क सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
अ‍ॅलोव्हेरा मास्क
साहित्य : 2 व्हिटामिन इ कॅप्सुल्स, अर्धा वाटी कोरफडीचा गर, 2 चमचे गुलाबपाणी.
कृती : कोरफडीच्या गरामध्ये कॅप्सुलच्या आतील मिश्रण आणि गुलाबपाणी मिसळा आणि मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. हा मास्क स्वच्छ चेहर्‍यावर समसमान प्रमाणात लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा.
केसांसाठी तेल
साहित्य : 1 लीटर खोबरेल तेल, 1 वाटी कापूर, 100 मिलिलीटर आवळ्याची पूड, 2 चमचे लिंबाचा रस.
कृती : खोबरेल तेल गरम करून त्यात कापूर घालून वितळू द्या. कापूर वितळला की, आच बंद करा आणि आवळा पूड घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या. जेव्हा कधी केसांना तेल लावायचं असेल, तेव्हा आवश्यक असेल तेवढं तेल गरम करून त्यात 2 चमचे लिंबूरस मिसळा. कापसाच्या बोळ्याने किंवा ब्रशने हे तेल केसांच्या मुळाशी लावून मुरवा. केसांच्या मुळाशी हलक्या हाताने थोडा मसाज करून, नंतर केसांना वाफ द्या. आठवड्यातून दोन-तीन वेळा हे केस तेलांना लावा. या तेलाच्या नियमित वापरामुळे केसांची वाढ चांगली होते, कोंडा निघून जातो आणि स्मरणशक्तीही वाढते.
हेअर पॅक
साहित्य : अर्धा वाटी आवळा पूड, अर्धा वाटी वाळा पूड, अर्धा वाटी रिठा पूड, 1 वाटी शिकाकाई, 4 चमचे कोहळा पूड, 10 चमचे ब्राह्मी पूड, अर्धा किलो दही, अर्धा वाटी पुदिन्याची पेस्ट, अर्धा वाटी गुलाबपाणी.
कृती : सर्व कोरड्या पूड एकत्र करा आणि बारीक चाळणीने एकत्र चाळून घ्या. दही फेटून घ्या. त्यात पुदिन्याची पेस्ट एकत्र करा. आता त्यात कोरड्या पावडरींचं मिश्रण थोडं थोडं करून घाला आणि मिश्रणाच्या गुठळ्या होऊ न देता, जाडसर मिश्रण तयार करा. त्यात वरून गुलाबपाणी घाला. आता एका मातीच्या जाड भांड्यामध्ये हे मिश्रण दोन तासांकरिता मुरण्यासाठी ठेवून द्या.
हा पॅक तेल नसलेल्या स्वच्छ धुतलेल्या केसांच्या मुळाशी लावा. तीन तासांकरिता केसांवर तसाच सुकू द्या. नंतर केस कोमट पाण्याने धुवा. केस धुतल्यानंतर लगेच केसांच्या मुळाशी गरम तेलाने मसाज करा.
हा हेअर पॅक केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. या पॅकचा दोन महिने नियमितपणे वापर केल्यास तुम्हाला नक्कीच लक्षणीय फरक जाणवेल. केस दुभंगणं, गळणं अशा केसांच्या समस्या दूर करण्यासोबतच तो केसांची योग्य वाढ होण्यासही मदत करतो. तसंच स्मरणशक्तीही वाढवतो.
टीप : या हेअर पॅकचा वापर केल्यानंतर पुढील दोन दिवस केसांना शाम्पू लावू नका. तसंच केसांच्या मुळाशी कोमट तेलाने मसाज करत राहा.
हेअर ब्लीच
साहित्य : 1 किलो मेंदी पावडर, 100 ग्रॅम काथा पावडर, 500 ग्रॅम शिकेकाई पावडर, 100 ग्रॅम लिंबू पावडर, 2 चमचे चहा पावडर, 2 चमचे कॉफी पावडर, अर्धा वाटी गुलाबपाणी, पाव वाटी लिंबूरस.
कृती : मेंदी पावडर, काथा पावडर आणि शिकाकाई पावडर एकत्र चाळून घ्या. चहा आणि कॉफी अर्धा लीटर पाण्यात उकळवून घ्या. हे पाणी वस्त्रगाळ करून घ्या. लिंबू रस, गुलाबपाणी आणि लिंबू पावडर एकत्र करून घ्या.
एक लोखंडी कढई चांगली तापवून घ्या. नंतर आच बंद करून त्यात मेंदी पावडरचं मिश्रण, लिंबू पावडरचं मिश्रण आणि चहा-कॉफीचं पाणी एकत्र करून सतत ढवळत राहा. हे मिश्रण रात्रभर तसंच झाकून ठेवा. शाम्पूने स्वच्छ केलेल्या केसांवर हे मिश्रण ब्रशने लावा. ते केसांच्या मुळाशी जाणार नाही, याची दक्षता घ्या. यामुळे केसांना काळपट-तपकिरी रंग येतो.
  • स्वप्नील वाडेकर
    सौंदर्यतज्ज्ञ व स्पा थेरपिस्ट

Share this article