Close

नात्यातील गोडवा टिकविण्यासाठी… (To Maintain The Sweetness In The Relationship…)

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत नाती दुरावत चालली आहेत, पूर्वीची आपुलकी माणसा-माणसात दिसून येत नाही. अशी तक्रार आपण करतो. पण ते नाजूक बंध जपण्यासाठी काय करायला हवं हे मात्र आपण जाणून घेत नाही किंवा त्याचा अवलंबही करत नाही. काही लहानसहान गोष्टी नाजूक नाती जपण्यासाठी…


दुसर्‍याच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याची इच्छा, उत्सुकता अगदी प्रत्येकाला असते. पण त्याचे रूपांतर आपण कोणत्या स्वरूपात करतो? खोचक नि बोचर्‍या प्रश्‍नांत की नातेवाईकांची साथ देण्यात, हे जास्त महत्त्वाचे आहे.
नवी पिढी नवीन विचारांनी वागते. त्यांना आपल्या खाजगी, व्यक्तिगत गोष्टींत इतरांनी लक्ष घातलेले आवडत नाही. खोचक प्रश्‍नांनी काही संवेदनशील मने दुखावली जातात तर काहींच्या मनात चीड, राग निर्माण होते. यामुळे काही वेळा अपमानास सामोरे जावे लागते. त्यामुळे नात्याची सीमा लक्षात घ्यायला हवी.
लहानांना प्रश्‍न विचारणे हा आमचा हक्क असल्याचे मोठ्यांना वाटते. पण कोणते नि कसे प्रश्‍न विचारायचे याची जाणीव देखील मोठ्यांना हवी. नात्यातील मर्यादा त्यांनी पाळली तर लहानांकडून मान तर मिळेलच. त्याचबरोबर नाती देखील सांभाळली जातील.
नाजूक बंध तुटण्यास अशा छोट्या छोट्या गोष्टी कारणीभूत ठरतात. मग त्यातून दुरावा निर्माण होतो नि आपलेपणा नाहीसा होतो. तेव्हा शक्य असल्यास हे टाळूया.

मुलीच्या लग्नाचा विषय
घरात लग्नायोग्य (हे वय पण नातेवाईक ठरवणार) मुलगी झाली की तिच्या लग्नाच्या चर्चा सर्व नातेवाईकांत रंगतात. मग मुलीच्या पालकांकडे तो विषय सारखा काढला जातो तर कधी मुलीच्या मागे तगादा लावला जातो. यात नातेवाईकांना वाटणार्‍या काळजीचं प्रमाण किती? हा खरं तर विचार करण्याचा विषय.
खरं तर मुलींच्या आई-वडीलांना तिच्या लग्नाची काळजी असतेच. ते फक्त जाहीरपणे बोलत नाहीत इतकंच. कधी काही समस्या असतात. तर कधी मुलींना शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायंच असतं. करियर घडवायचं असतं. मनासारखा जोडीदार मिळेपर्यंत वाट पाहण्यात काही वेळ खर्च होतो. असे एक ना अनेक मुद्दे असतात.
ह्या सर्व काळात मुलीला तिच्या कुटुंबियांना साथ द्यायची सोडून आपण बोचर्‍या चौकशा करत सुटतो. ते कुठेतरी मनाला लागतं, खटकतं नि नात्यात दुरावा यायला सुरुवात होते.

गोड बातमी कधी?
लग्नाला एक वर्ष होताच अगदी सगळ्यांचाच प्रश्‍न असतो तो म्हणजे गोड बातमी कधी?
ह्यात काहींचा हेतू गंमतीचा असला तरी काहींना चघळण्यासाठी विनाकारण एक विषय हवा असतो.
आपल्याला मूल हवे की नको? हवे असल्यास कधी? आपण आता पालकत्व स्विकारू शकतो का? अशा अनेक गोष्टींचा विचार तरुण पिढी करत आहे. काळानुसार जमाना बदला आहे. विचारसरणी बदलली आहे. तसेच मुलं होणं हा एखाद्या दांपत्याचा अतिशय खाजगी विषय आहे. त्यावर भाष्य करण्याचा अधिकार आपला नाही, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवं.
काही वेळेस मूल हवं आहे पण ते होण्यास अडचणी येत असतील तर आधीच ते दांपत्य चिंतेत, काळजीत असेल. अशावेळी आपले खोचक प्रश्‍न त्यांचे मनोधैर्य, मनोबल याला धक्का पोहचवतील.


फॅमिली इन्कम संबंधित चौकशी
प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी असते. आपल्या परिस्थितीनुसार प्रत्येकजण वागत असतो. अशावेळी तुमचं भागतं का इतक्या पगारात? कसं चालवता हो तुम्ही?
तर कधी तुमचं बुवा चांगलं आहे, तीन तीन लोक कमवतात तुमच्या घरात.
असे प्रश्‍न विचारणं, चौकशा करणं तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटतं का?
आपण जेव्हा असे वागतो तेव्हा नकळत मुलं आपलं अनुकरण करतात. मग तेही आपल्या एखाद्या गरीब किंवा तुलनेने आर्थिक परिस्थिती कमी असणार्‍या मित्रासमोर/भावासमोर मोठेपणा मिरवतात. त्यांना दुय्यम वागणूक देतात.
नाती पैशाने नाही तर प्रेमाने मजबूत होतात. अशा चौकशा करण्यापेक्षा एखाद्या प्रती दाखवलेला प्रेमपूर्वक भाव, नाते जपण्यास मदत करतो.


मुलाच्या नोकरीविषयी कुतुहल
शिक्षण पूर्ण झालं की नोकरी कधी? असा प्रश्‍न असतोच. मिळाली का नोकरी? काय चाललंय मग सध्या? आमच्या बंटीला तर लगेच मिळाली होती नोकरी.. असं नि तसं… असे प्रसंग आपल्यासोबतही घडले असतील.
मूलतः त्यांना काळजी असते की नाही माहिती नाही. पण त्यांना आपल्या मुलांशी तुलना व स्पर्धा नक्कीच करायची असते. त्यासाठी हा सगळा खटाटोप चालू असतो.
कदाचित सहज विचारलेला एखादा प्रश्‍न समोरच्याला दुखावू शकतो. त्यामुळे नात्यात अशा चौकशा करणे टाळलेलेच बरे.

खाजगी गोष्टींबाबत विचारणा
खाजगी गोष्टींबद्दल खोदून खोदून विचारायची सवय अतिशय चुकीची नि वाईट आहे.
काही माणसे जवळची असतात म्हणून त्यांना त्यांच्या खाजगी, रोमॅन्टिक आयुष्यातील गोष्टी विचारणे चुकीचे आहे. असे केल्याने मौल्यवान नात्यातील गोडवा हरवून बसाल. तसेच अशा चौकशांनी तुमची इमेज डागाळेल.
त्यामुळे प्रत्येकाची मोकळीक प्रत्येकाला द्या. अन् नात्यातील आनंद जपा.


नवीन सुनेबद्दलच्या कानगोष्टी
नवीन सून घरात येताच गॉसिंपिंगला ऊत येतो. तिच्या माहेरच्या चौकशा, तिचे वागणे, बोलणे अगदी सगळ्याबद्दल प्रश्‍न, चौकशी केली जाते. सासूच्या मनातील सुनेबद्दलचे तरल भाव कधी गोड नि खोचक, तर कधी स्पष्ट बोलून दूषित केले जातात.
खरं तर घरोघरी मातीच्या चुली… अशीच परिस्थिती असते. तरी विनाकरण चर्चा करण्यासाठी विषय मिळावा म्हणून काहीतरी बोलायचे.
आपण आपल्या पायाखाली बघून चालावे. आपले घर सावरण्याचा, जपण्याचा प्रयत्न करावा. इतरांच्या घरात नाक खुपसण्याची सवय वाईट नि हानिकारक. तर मग नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी जरा जपूनच बोला.


संपत्तीच्या वाटणीविषयी बोलणे
कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत जसा रस असतो तसा प्रॉपर्टीचा विषय सगळे चवीने चघळतात. कोणाची किती संपत्ती आहे, त्याचे विभाजन कसे होणार ह्या उत्सुकतेची पूर्तता करण्यासाठी वेडवाकडे प्रश्‍न केले जातात.
संपत्तीविषयीच्या गोष्टी अत्यंत खाजगी व महत्त्वपूर्ण असतात. त्यामुळे ह्या विषयी कोणालाही विचारणे टाळावे. जर एखाद्याला सांगावेसे वाटले तर ती व्यक्ती स्वतःहून एखादी गोष्ट तुमच्याशी शेअर करेल. असे झाल्यास त्या व्यक्तीच्या विश्‍वासाला जागणे तुमचे कर्तव्य ठरते.


जुन्या गोष्टी उगाळणे
माणसाच्या बोलण्यातून तो कसा आहे हे समजते. बोलण्याच्या ओघात, कळत-नकळत आपण कधी कधी अशा गोष्टी बोलून जातो ज्या विसरणे, सोडून देणे सगळ्यांच्या हिताचे असते. त्यामुळे जुन्या गोष्टी उगाळत बसण्यात काहीच फायदा नाही. उलट त्या गोष्टींचा पुनरूच्चार एखाद्याच्या दुःखाचे, रागाचे कारण ठरू शकेल.
काही लोक कुतुहूलापोटी तर काही स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी व त्यातून दुसर्‍याला कमीपणा दाखवण्यासाठी असे प्रश्‍न विचारतात. पण आपण कोणाला बदलू शकत नाही, मग अशा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवं. एक सुंदर वाक्य, ‘दोज हू ट्राय टू ब्रींग यू डाऊन आर ऑलरेडी बिलो यू…’ हे वाक्य तुम्हाला बरंच बळ देईल खंबीर व्हायला.

Share this article