पूर्वी निव्वळ श्रीमंत लोकांची मक्तेदारी असणारा विमान प्रवास आता मध्यमवर्गीयांना पण आपलासा झालेला आहे. त्यामुळे श्रीमंतांबरोबरच मध्यमवर्गीय लोक विमानाने प्रवास करू लागले आहेत. परिणामी देश-विदेशातील विमाने कायमच हाऊसफुल असल्याचे आढळून येते. देश-विदेशात विमानाने प्रवास करणार्यांमध्ये सर्व वयोगटातील प्रवासी आढळून येतात. वरकरणी हा प्रवास आरामदायक वाटत असला, तरी अनेक तास एकाच जागेवर बसून राहणे कष्टप्रद असते. कित्येकांचे हात-पाय आखडतात. तर सुस्ती, आळस आल्याने हालचाली मंदावतात. शरीरातील रक्तदाबावर परिणाम होतो. अन् एक प्रकारचा वेदनादायक थकवा आल्याचा अनुभव येतो.
या सर्व आरोग्य बिघाडांवर मात करण्यासाठी शरीराचा फिटनेस राखणे गरजेचे ठरते. तेव्हा विमानात बसल्या बसल्या फिटनेस कसा राखता येईल, याबाबत टिप्स. त्यासाठी बसल्या जागी व्यायाम करणे गरजेचे आहे. या व्यायामांनी सुस्ती, आळस निघून जाईल. शरीराचे आखडलेले स्नायू मोकळे होतील. अन् रक्तसंचार सुरळीत होईल.
प्रवासाआधीची खबरदारी
हे व्यायाम विमान हवेत असताना करण्याजोगे आहेत. पण विमान प्रवास सुरू करण्याआधी काय खबरदारी घेता येईल, तिकडेही लक्ष द्या!
- प्रवासाला निघताना तंग, शरीराला घट्ट बसणारे कपडे घालू नका. तर सैलसर, नैसर्गिक धाग्यांचे कपडे घाला.
- हीच गोष्ट शूज् किंवा सॅन्डलबाबत लक्षात ठेवा. पायांना आरामदायी वाटतील अशी पादत्राणे घाला. घट्ट बसतील अशी पादत्राणे शक्यतो टाळा. कारण विमानात, एकाच जागी अनेक तास बसण्याची वेळ येत असल्याने पाय, घोटे सुजतात. घट्ट पादत्राणे असल्यास असह्य वेदना होऊ शकतात.
- विमानात एअर कंडिशनिंग फुल असल्याने छान गारवा असतो. त्यामुळे पाणी पिण्याची काय गरज, असे सर्वसाधारणपणे प्रत्येकालाच वाटते. पण पोटात पाणी कमी गेल्यास डिहायड्रेशन होऊन चक्कर येणे, मळमळणे तसेच रक्तदाब कमी होणे, या समस्या उद्भवतात. तेव्हा विमान प्रवासात भरपूर पाणी पिणे हिताचे आहे. काही विमान सेवा लिंबू सरबत किंवा थंड पेये देतात. तीही प्या. बर्याच जणांना वाटते की, शरीरात जास्त पाणी गेले तर सु-सु जास्त वेळा होईल. पण तसे झाले तरी हरकत नाही. कारण जागेवरून उठत टॉयलेटपर्यंत जावे लागल्याने आपोआपच शरीराला व्यायाम होईल अन् फिटनेस राहील. तेव्हा या कारणास्तव पाणी पिण्याचे टाळू नका. पाणी भरपूर प्या.
- बर्याच आंतरराष्ट्रीय विमान सेवेत उंची मद्ये पुरविली जातात. चांगल्या वाईन्स, बिअर दिली जातात. ती जास्त करून मोफत असतात. त्यामुळे ती जास्त प्रमाणात घेण्याकडे बर्याच लोकांचा कल असतो. पण हे टाळावे. मद्ये माफक प्रमाणात घ्यावीत. कारण जास्त तास एकाच जागी बसून राहावे लागत असल्याने ती पोटात गच्च बसतात. शिवाय डोक्यात झिंग येते. रक्तदाब वाढतो. यामुळे हालचाली मंदावतात. अन् तब्येत बिघडू शकते. तेव्हा मद्यपान माफक प्रमाणात करणे हिताचे.
- साधारणपणे दर दोन तासांनी जागेवरून उठून पाय मोकळे करावेत. पॅसेजमध्ये एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत काही फेर्या माराव्यात. वॉशरूममध्ये जाऊन तुंबलेली सु-सु मोकळी करावी.
- इच्छित स्थळी उतरल्यानंतर आपले सामान घेण्यासाठी लगेज बेल्टपर्यंत तसेच बाहेर पडण्यासाठी जास्तीत जास्त चालावे म्हणजे पाय मोकळे होतील. मुरडून आलेले अंग सरळ होईल. काही जण इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करतात, ते शक्यतो टाळावे. वृद्ध प्रवाशांनी त्याचा वापर करावा. त्यांनीही शक्य होत असेल तर चालावे.
या सगळ्यांवर कडी करणारे, बसल्या जागी काही व्यायाम अवश्य करावे. प्रवासात फिटनेस राखणारे व्यायाम असे आहेत -
विमानात करण्याजोगे व्यायाम
1) एक पाय वर उचला. गुडघा मुडपा. आणि त्या पायाच्या मांडीचे स्नायू आकुंचित करा. थोड्या वेळाने दुसरा पाय वर उचला अन् वरीलप्रमाणे क्रिया करा. प्रत्येक पायाची क्रिया 20 ते 30 वेळा करा.
2) पुढे जरासे झुका. डाव्या गुडघ्याला हातांची मिठी घाला. म्हणजे हाताचे पंजे एकमेकात अडकवून गुडघ्यास पकडा. अन् ही मिठी छातीपर्यंत न्या. 15 सेकंदपर्यंत या स्थितीत राहा. मग डावा गुडघा हळूहळू खाली आणा. आता हीच क्रिया उजवा गुडघा धरून करा. प्रत्येक पायाची क्रिया किमान 10 वेळा तरी करा.
3) दोन्ही पाय अलगद वर उचला. जमिनीपासून थोडेसेच. एका पायाच्या पंजाने क्लॉकवाईज वर्तुळ काढा, तर दुसर्या पायाचा पंजा अँन्टी-क्लॉकवाईज फिरवा. प्रत्येक दिशेला पंजे किमान 15 वेळा तरी फिरवा.
4) हाताचे पंजे मांडीवर किंवा सीटवर ठेवा. खांदे पुढे-मागे हलवा. तसेच खाली आणि वर वर्तुळाकार फिरवा. या सर्व क्रिया हळूवार करा. खांद्याला - हाताला झटके न देता करा. प्रत्येक क्रिया 5 वेळा करा.
5) दोन्ही पाय जमिनीवर असू द्यात. पोट आत खेचा. अन् हळूहळू पुढे वाकत हात ताणून खाली पायापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. पायाच्या पंजाला किंवा जमिनीला हात पोहचले तर फारच उत्तम. अन्यथा तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त खाली वाका. या स्थितीत 15 सेकंदपर्यंत राहा. नंतर हळूहळू हात वर आणत बसलेल्या स्थितीत या.
6) दोन्ही पाय जमिनीवर ठेवा. दोन्ही पाय वर उचला. जास्तीत जास्त वर येतील तेवढे पाहा. नंतर पाय जमिनीवर ठेवा आणि दोन्ही टाचा वर उचला. जास्तीत जास्त वर उचला. या दोन्ही क्रिया झेपतील तेवढ्या वेळ करा.
7) दोन्ही खांदे शिथील करा. मान उजव्या खांद्याकडे हळूहळू न्या. शक्यतो उजवा कान खांद्यावर टेकवण्याचा प्रयत्न करा. 5 सेकंद या स्थितीत राहा. नंतर मान डाव्या खांद्यावर टेकवा. याही स्थितीत 5 सेकंद राहा. या दोन्ही क्रिया 5 वेळा करा.
आपला विमान प्रवास जास्त तासांचा असेल तर हे सर्व व्यायाम तास-दोन तासांच्या अंतराने करा व आपला फिटनेस राखा. विशेषतः अमेरिका प्रवास 16-18 तासांचा असतो तर लंडन 10 तासांचा. ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडचे प्रवास अमेरिकेहून अधिक तासांचे असतात. अशा वेळी आखडलेले स्नायू मोकळे होण्यासाठी, रक्तसंचार सुरळीत राहण्यासाठी, पाय-कंबर-मान यामध्ये होणार्या वेदना टाळण्यासाठी हे व्यायाम उपयुक्त ठरतील. तुम्हाला थकवा, आळस, सुस्ती येणार नाही.