नागाचं प्रथमस्थान म्हणजे वारूळ. इतर वेळी दहशत वाटणार्या वारुळाचे नागपंचमीच्या दिवशी आवर्जून पूजन केले जाते. नागपंचमीचा सण हा नागदेवतेबद्दल कृतज्ञता आदर व प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो. हळदकुंकू वहायला ताज्या लाह्या वेचायला चल ग सये वारुळाला चल ग सये वारुळाला
श्रावण महिना म्हणजे आनंदी आनंद. श्रावण म्हणजे सणांचा, उत्सवांचा, उत्साहाचा, आनंदाचा आणि चैतन्याचा महिना. अशा या पवित्र महिन्याची सुरुवात शुद्धपंचमीला म्हणजेच नागपंचमीला होते. खरं तर आपले सारे सण व उत्सव हे निसर्गाशी बांधले गेले आहेत. निसर्गातील प्रत्येक घटकाशी असलेली आपली बांधीलकी व कृतज्ञता या सणांमधून व्यक्त करण्याची प्रथा आपण पाळतो.
आपल्या संस्कृतीत प्राण्यांविषयी असलेली सहिष्णुता या सणातून व्यक्त होते. श्रावण महिन्यात निसर्ग नटलेला असल्याने व सगळे प्राणिमात्र आनंदी असल्याने संपूर्णपणे शाकाहारी राहण्याची परंपरा आहे. याप्रकारे हिंसा न करण्याचा उद्देश यातून सार्थ होतो. तसेच केवळ खाण्यापिण्यासाठीच नव्हे तर भीतीपोटी देखील आपण हिंसा करू नये आणि आपल्यापेक्षाही जे कमकुवत आहेत अशांप्रति प्रेमाची भावना आपल्या मनात यावी, म्हणून ह्या महिन्याची सुरुवात नागाच्या पूजेने केली जाते. निसर्गातील प्राणीमात्रांविषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणारे अनेक सण श्रावणमासात आपल्याला साजरे करता येतात. श्रावणातील
प्रत्येक दिवशी गाईला नैवेद्य, बैलपोळा आणि नागपंचमी हे सण याच उद्देशाचे प्रतीक म्हणून साजरे केले जातात.
नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.
यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्र नेसून नागदेवतेची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद आणि चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लाची चित्रे काढतात किंवा गहू, तांदूळ यांच्या पिठाच्या मूर्ती बनवल्या जातात. त्याला दूध, लाह्या, आघाडा, दूर्वा वाहून पूजा करतात. नागदेवतेची पूजा करून त्याला दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात. आपल्या भावाला चिरंतन आयुष्य लाभो आणि तो प्रत्येक दुःख-संकटातून तारला जावो, यासाठी हा उपवास केला जातो.
नागपंचमीची प्रथा
नागपंचमीबाबत वेदकालापासून अनेक कथा प्रचलित आहेत. त्यांपैकी एक कथा म्हणजे सत्येश्वरीदेवीची. सत्येश्वरी नावाची एक देवी होती. तिचा भाऊ सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. भावाच्या मृत्यूचा शोक अनावर झाल्याने तिने अन्न ग्रहण केले नाही. पुढे सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला आणि तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. म्हणूनच या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. याचप्रमाणे कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले आणि त्यांनी यमुना नदीस जीवनदान दिले अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते.
वेदकाळापासून चालत आलेल्या या सणाद्वारे नाग या प्राण्याबद्दल आदर आणि पूज्य भावना समाजात रुजवली जाते.
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेती. आपला देश हा कृषिप्रधान आहे. उंदीर-घुशीसारखे प्राणी, पिकांची नासधूस करतात. परंतु
हेच सापाचं मुख्य अन्न असल्याने त्यांचा नाश करून साप आपल्याला मदतच करतो. सापाचे हे आल्यावर उपकारच मानले पाहिजेत. याकरिताच सर्पाला क्षेत्रपाल देखील म्हणतात. म्हणूनच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. जमिनीखालील कोणत्याही प्राण्याला अशा प्रकारे जीवनदान देण्याचा हा एक प्रकारचा संकेत मानला जात असावा.
नाग, साप अशा सरपटणार्या प्राण्यांचे प्रति
नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. या सणाला विशेषतः उकडलेले वा कच्चे पदार्थ खाण्याची प्रथा आहे. म्हणून गव्हाची खीर, कडबू, दिंडं, मुटके, वड्या असे उकडलेले, वाफवलेले पदार्थ तयार केले जातात.
नागपंचमीचा सण स्त्रियांसाठी ओढ लावणारा असतो. या दिवशी माहेरपणाचा खास हक्क प्रत्येक स्त्रीला लाभतो. शहरी भागात हा सण तेवढा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात नसला, तरीही ग्रामीण भागात अजूनही नागपंचमीच्या सणाची ओेढ प्रत्येक स्त्रीला असते. आपल्या मराठी चित्रपटांतही नागपंचमीच्या सणाला अशा पद्धतीने अधोरेखित केले आहे. यात ग. दि. माडगूळकरांच्या पुढील ओळी बरंच काही सांगून जातात.
फांद्यांवरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे।
पंचमिचा सण आला डोळे माझे ओले॥
नागपंचमीच्या निमित्ताने माहेरी जाण्याची आणि तेथे सख्यांबरोबर झिम्मा, फुगडी खेळण्याची स्त्रियांची हौस पूर्ण होते. पण जिला माहेरी जाता येत नाही, तिचे डोळे आपसूक ओले होतात. असा हा स्त्रीचे भावविश्व दर्शविणारा सण. या दिवशी झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे, मेंदी लावणे अशा मनाला रुचणार्या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. असा हा केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर स्त्रीच्या भावविश्वाशीही जोडलेला सण आहे.
श्रावणातील हे सणवार धार्मिकतेबरोबरच आनंदी जगण्याचाही संदेश देतात. असं निर्मळ व सात्विक जगणं आपल्याला परिपूर्ण जगण्यास उभारी देतं.