उतारवयात दुसरे (Second Marriage In Old Age) लग्न हा विषय समाजात चर्चेचा ठरतो. या विषयाच्या विविध पैलूंविषयी उतारवयात दुसरे लग्न केलेल्या अनुभवी मंडळींशी केलेल्या बातचितीवर आधारित हा मजकूर.
जमाना बदलला आणि समाज प्रगतीशील विचारांचा झाला असे आपण म्हणतो खरे, पण तरीही उतारवयातील दुसरे लग्न हा विषय आजही समाजात चर्चेचा ठरतो. हेटाळणीचाही ठरतो. याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे माझ्या एका मित्रानं केलेलं उतारवयातील दुसरं लग्न. हा मित्र सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजातून चांगल्या पगाराची नोकरी करून निवृत्त झाला. निवृत्तीच्या काही वर्षे अगोदर त्याची बायको आजारपणात गेली. मग त्या मित्रानं कालांतरानं दुसरं लग्न केलं. तेव्हा तो साठ वर्षांचा झालेला होता. लग्न कुणाशी केलं? तर त्याची बायको ज्या हॉस्पिटलात होती आणि तिची सेवा करणारी जी प्रौढ नर्स होती, त्या नर्सशी. कारण बायकोच्या आजारपणाच्या काळात आमच्या या मित्राची त्या नर्सशी ओळख झालेली होती. जात-धर्म वेगळा होता. त्यामुळे या मित्रानं ही गोष्ट म्हणजे लग्न, रजिस्टर पद्धतीनं गुपचुप केलं. मला तो अनेक आठवडे भेटला नाही. फोनही उचलत नव्हता. शेवटी एकदा भेटला आणि चक्क रडू लागला. मी कारण विचारलं तर म्हणाला, ङ्गमी दुसरं लग्न केलं. त्यामुळे माझे सगळे नातेवाईक, माझ्या सख्ख्या बहिणी मला खूप बोलल्या. त्यांनी माझी खूप निर्भत्सना केली, अन्य मित्रांनीही दुषणे दिली. तूही माझी निर्भत्सना करशील म्हणून मी तुला टाळत होतो. भेटत नव्हतो, फोनही घेत नव्हतो."
मी त्याचे सांत्वन केले. म्हटले ”तू काही बेकायदेशीर कृत्य केलेले नाहीस, कुठलाही गुन्हा केलेला नाहीस, मग तुला तोंड लपविण्याचे काही कारणच नाही.“ माझ्या बोलण्याने त्याला धीर आला. त्याने फोन करून त्याच्या नव्या पत्नीलाही बोलावून घेतले आणि आम्हा सर्वांची यावर सविस्तर चर्चा झाली. त्यावरून कितीतरी मुद्दे समोर आले…
एकटेपणा खायला उठतो
आमचा मित्र म्हणाला, ”हे लग्न मी शारीरिक गरजेपोटी, वा सेक्ससाठी केलेले नाही. पण एकटेपणा खायला उठतो. त्यावर मित्रमंडळी, क्लब, सामाजिक कार्य वा अन्य विरंगुळ्याची साधने हा स्थायी उपाय असू शकत नाही. आणि म्हणून मी लग्न करण्याचा निर्णय घेतला.“
त्याची नवी पत्नीही मनमोकळेपणाने बोलली. ती म्हणाली, ”मी नर्सिंग प्रोफेशनमध्ये आहे. मानवी आजार, व्याधी, दुःखे, उपचार यातही माझे आजवरचे आयुष्य गेले. त्यामुळे मला माणसं खरोखरच खूप चांगली कळतात. मला या माणसाचा सज्जनपणा आवडला. प्रांजळपणा आवडला आणि म्हणून भाषा, जातधर्म यात फरक असूनही मी लग्नाला तयार झाले. आणि मलाही ’कंप्यानियनशिप’ची गरज होतीच. आर्थिक गरज नव्हती. कारण मी स्वतः मिळवती आहे. आर्थिक स्थैर्य असले तरी भावनिक गरज असतेच की. माझे सुदैव असे की, यांना पहिल्या बायकोपासून मूलबाळ झालेले नाही. त्यामुळे त्यांना विचारण्याचा प्रश्न नव्हता. माझे सर्वसाधारण रंगरूप आणि नर्सिंग प्रोफेशन यामुळे माझे लग्न जमत नव्हते. ते लांबले, वय वाढले. पण हे सर भेटले. त्यांचे व्यक्तिमत्त्व, मॅच्युरिटी मला भावली. म्हणून मीच पुढाकार घेतला आणि हिम्मत करून त्यांना एके दिवशी लग्नाचा प्रस्ताव दिला. आज आम्ही दोघेही विलक्षण खुष आहोत. आनंदी आहोत.“
”आमच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीत भिन्नता आहे. देवधर्म, कुलाचार, संस्कृती, भाषा यात भिन्नत्व आहे. पण त्याने काही फरक पडत नाही आणि मुख्य म्हणजे सरांच्या अत्यंत बिकट कालखंडात म्हणजे त्यांच्या पहिल्या पत्नीच्या आजारपणात उपचारात सर्वात जास्त मदत आणि सेवा मी केलेली आहे, त्यांचे नातेवाईक वा अन्य कुणी नाही, हेही सरांना नक्कीच कुठेतरी जाणवले असणार. त्यामुळे त्यांनी माझा प्रस्ताव स्विकारण्यात जास्त वेळ लावला नाही किंवा मला झुलवत ठेवले नाही. आम्हा दोघांच्या वयात आठदहा वर्षांचा फरक आहे. पण तोही काही इश्यू नाही. आम्ही खरोखरच खूप आनंदात आहोत. आपण अत्यंत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असे आम्हा दोघांनाही मनापासून वाटते.“
”सर त्यांच्या पहिल्या पत्नीस फार लौकर विसरले अशी त्यांच्यावर आप्तेष्ट मंडळी टीका करतात. पण त्याला काही अर्थ नाही, कारण शेवटी माणसाला नेहमी विचार करायचा असतो तो त्याच्या वर्तमानाचा आणि भविष्याचा. भूतकाळात त्याने का म्हणून स्वतःला अडकवून ठेवावे?“
संपत्तीचा विवाद
उतारवयातील दुसर्या लग्नाबाबत चर्चा, टीका होण्याचे मुख्य कारण असते संपत्ती, मालमत्ता, जायजाद किंवा इस्टेट. वडिलांनी नवीन लग्न केले, तर मालमत्तेमध्ये ती नवीन आई भागीदार होते, म्हणून पोटची मुलंच विरोध करतात. भावाने पुनर्विवाह केला तर नवीन स्त्री वडिलोपार्जित मालमत्तेत भागीदार बनते, म्हणून भावंडांचा, बहिणीचा विरोध सुरू होतो.
माझा दुसरा एक मित्र हायकोर्ट वकील होता. एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ताही होता. वडिलोपार्जित जमीनजुमला त्या कुटुंबात होता, शिवाय त्याने स्वतःही भरपूर संपत्ती कमविलेली होती. त्याचा मुलगाही प्रख्यात वकील आहे. तर आमचा हा मित्र अनपेक्षितपणे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या पासष्टीत वारला. बायको जेमतेम साठीत. पण आर्थिक सुबत्ता आणि चांगले राहणीमान, यामुळे पुष्कळ तंदुरुस्त आणि सुंदर. तिने त्या वकील मित्राचा एक जवळचा सहकारी, त्याच्याशी लग्न करण्याचे ठरविले. इस्टेट- प्रॉपर्टीचा मुद्दा समोर आला. सुदैवाने आमचा वकील मित्र याने एक सविस्तर विल म्हणजे मृत्यूपत्र अगोदरच कायदेशीर करून ठेवले होते. त्यानुसार सगळी वडिलोपार्जित मालमत्ता- ज्यात प्रामुख्याने गावाकडील शेतजमीन, वाडा इत्यादी होते. ते सगळे त्याने त्याच्या एकुलत्या एक मुलाच्या आणि मुलीच्या नावे समसमान करून दिलेले होते. आणि स्वतःच्या कमाईतून शहरात बांधलेला बंगला, गाडी व इन्शुरन्स तसेच अन्य आर्थिक गुंतवणूकीची नॉमिनी म्हणून आपल्या बायकोचे नाव लावलेले होते. त्यामुळे ती संपत्ती तिला मिळाली. तिने पुनर्विवाह केलेल्या त्या माणसाला मिळाली. तोही सुदैवाने विलक्षण समंजस सज्जन होता. त्यामुळे कुठलेही ताणतणाव, संघर्ष, इत्यादी न होता आज सगळेजण सुखाने नांदत आहेत.
वकील मित्राच्या त्या बायकोनेही तेच सांगितले की, मुलाशी, सुनेशी, नातवंडांशी माझे कुठलेच वैर नाही. शत्रुत्त्व नाही. बेबनाव नाही. पण कितीही झाले तरी नवर्याच्या आकस्मिक निधनानंतर मला माझे हक्काचे माणूस कुणी उरले नव्हते. म्हणून मी पुनर्विवाहाचा निर्णय घेतला. तोही अशा वकीलासोबत ज्याला मी पूर्वीपासून ओळखत होते. आमच्या या रिलेशनशिपमध्ये सेक्स हा मुद्दा उभयपक्षी फार महत्त्वाचा नाही. माझ्या नव्या जोडीदाराची पत्नी काही वर्षांपूर्वीच निर्वतलेली. पण त्याचा मुलगा, सून जे परदेशामधेच स्थायिक झालेत, त्यांनी मला स्विकारलेले आहे. माझ्या पोटच्या मुलाला आरंभी हे मान्य नव्हते. उतारवयात कशाला हवंय लग्न आणि त्यामुळे निर्माण होणारी गुंतागुंत, असे त्याचे मत होते, पण नंतर ते बदलले. आज आम्ही सर्वजण विलक्षण सुखात आहोत. आनंदी आहोत. मला दोन्ही कुटुंबात अत्यंत मानसन्मानाने वागविले जाते.
असुयेची भावना
उतारवयात दुसरे लग्न केलेल्या या विषयात एक वैशिष्ट्यपूर्ण केस आहे ती माझ्या एका मैत्रिणीची. ती पत्रकारिता, कवितालेखन इत्यादीत तिच्या विद्यार्थीदशेत खूप प्रसिद्ध होती. साहित्यक्षेत्रातील पुरस्कारही तिला मिळालेले. रंगरुपाने सर्वसामान्य, पण स्वभावाने अत्यंत उमदे आणि हसरे, खेळकर असे तिचे व्यक्तिमत्त्व. तिच्या बिनधास्त स्वभावापायी त्या काळी तिच्या कॅरेक्टरविषयीही शहरात उणेदुणे बोलले जायचे. ती राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्यात अधिकारी म्हणून निवडली गेली आणि तिच्या चारित्र्याबद्दलच्या कंड्या पिकविणार्यांचे दात घशात घातले गेले. लवकरच तिने कविता करणार्या तिच्या समवयस्क आणि बँकेत नोकरी करणार्या तरुणाशी लग्न केले. आमच्या या मैत्रिणीची कामगिरी, कार्यकर्तृत्त्व यामुळे तिची तिच्या खात्यात प्रगती होत गेली, तिला प्रमोशन्स मिळत गेले. ती वरिष्ठ पदावरून निवृत्तही झाली. पण तिचा नवरा - जो त्याकाळी एक बर्यापैकी कवि होता, तो मात्र त्याच्या करिअरमध्ये फारशी प्रगती करू शकला नाही. त्यामुळे तो त्याच्या बायकोबाबत असुयेच्या भावनेतून आयुष्यभर फार वाईट वागला. तिला खूप त्रास देऊ लागला, तो काळाच्या ओघात आणि त्याच्यातील न्यूनगंडामुळे व्यसनांच्या आहारी गेला, अन् शेवटी त्याच व्यसनांमुळे काळाच्या पडद्याआड गेला. तो श्रीमंत घरातला होता. त्याची भरपूर प्रॉपर्टीही होती. त्या सर्वांवर कायदेशीररित्या आमच्या मैत्रिणीचाच हक्क होता. पण तिने त्या प्रॉपर्टीचा अजिबात मोह धरला नाही. नवर्याच्या निधनानंतर तिने शांतपणे खेड्यात शाळा शिक्षकी करणार्या, कविता लिहिणार्या तिच्या एका परिचितासोबत पुनर्विवाह केला. आज ते दोघे सुखी आहेत.
उतारवयात अशाप्रकारे पुनर्विवाह केलेली अनेक उदाहरणे मला माहीत आहेत. माझ्या जवळची आहेत. त्या सर्वांचा निचोड किंवा सारांश म्हणून पुढील मुद्दे सुत्ररुपाने मांडतो.
उतारवयातील पुनर्विवाह हा गुन्हा नाही. तेव्हा त्याची गिल्ट म्हणजे अपराधी भावना अजिबात बाळगू नका. त्यामुळे कष्टी होऊ नका.
या संदर्भात नेहमी भविष्याचा विचार आपल्या मनाशी असू द्या. जे व्हायचे ते घडून गेले. पण भविष्य कसे आनंददायी करता येईल हा विचार नेहमी मनाशी असू द्या.
कायदेशीर बाबींबाबतही दक्ष राहा. त्याचा अभ्यास करा म्हणजे पुढे चालून कायदेशीर अडीअडचणी वा प्रश्नांना सामोरे जायला नको.
उतारवयातील पुनर्विवाहाबाबत सर्व संबंधितांना म्हणजे खास करून तुमची मुले (जी पुरेशी मोठी व स्वतंत्र झालेली असतात) आप्तेष्ट यांना विश्वासात घेऊन या विषयाची चर्चा करा. त्यांना समजावून सांगा.
जीवनातील प्रत्येक निर्णय कसोटीचे प्रसंग या संदर्भात त्याचे चांगले व वाईट असे दोन्ही परिणाम होऊ शकतात, याची जाणीव ठेवा. प्रत्येक निर्णयाची जबाबदारी, त्या निर्णयाचे होणारे बरेवाईट परिणाम हे सगळे सोसण्याची भावनिक-व्यावहारिक तयारी ठेवा.
तुमचे मन, अंतरात्मा, इनर व्हॉईस काय सांगतो आहे, ते अवश्य ऐका. त्याला दुर्लक्षु नका. अंदर की आवाज खरोखरच खूप महत्त्वाची असते.
मानवी जीवन एकदाच मिळत असते. आपल्या पौराणिक मान्यतेनुसार त्र्याऐंशी लक्ष त्र्याण्णवहजार नऊशेनव्याण्णव योनीतील प्रवासानंतर मानवी जन्म मिळत असतो. तेव्हा त्या जन्माचे सार्थक करणे, स्वतः आनंदी जगणे, इतरांनाही आनंदी करणे हेच त्याचे अंतिम उद्दिष्ट आहे, हे विसरू नका.