टी सीरीज कंपनीचे को-ओनर कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमारचे चार महिन्यांपूर्वी निधन झाले. आता कृष्ण कुमारची पत्नी तान्याने लेकीच्या निधनाचं कारण सांगितलं आहे. आपल्या मुलीचा मृत्यू कॅन्सरने नाही तर इतर गोष्टींमुळे झाल्याचं तिनं म्हटलं आहे.
अभिनेता, निर्माता आणि टी सीरीजचे सहमालक कृष्ण कुमार यांची मुलगी तिशाचा चार महिन्यांपूर्वी वयाच्या २० व्या वर्षी निधन झाले. आता पत्नी तान्या यांनी मुलीच्या निधनाचं खरं कारण सांगितलं आहे. तान्या यांनी इंस्टाग्रामवर खूप मोठी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी तिशाच्या मृत्यूचं कारण कॅन्सर नसून चुकीची मेडिकल ट्रिटमेंट कारणीभूत असल्याचं सांगितलं आहे.
तान्या यांनी आपल्या मुलीबाबत एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सगळ्याच गोष्टी अतिशय बारकाईने लिहिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये तान्या यांनी सुरुवातीला लिहिलं, “काही दिवसांपासून मला सतत अनेक व्यक्ती नेमकं काय झालं? कसं झालं? असे काही प्रश्न विचारत आहेत. त्यांना मी आज सर्व माहिती देणार आहे. हे सत्य एखादी व्यक्ती किती नीट समजून घेते यावर अवलंबून आहे. एखादा निष्पाप जीव चुकीच्या गोष्टींमुळे अडकतो आणि अचानक समजतं की, आता फार उशीर झाला आहे. पण, शेवटी देवाच्या दारात प्रत्येकाला समान न्याय असतो आणि त्याच्यापासून कोणीही वाचू शकत नाही”
पोस्टमध्ये तान्या यांनी पुढे लिहिलं, “सत्य हे आहे की, माझ्या मुलीला सुरुवातीला ‘कर्करोग’ झाला नव्हता. ती १५ वर्षांची असताना तिला एक लस देण्यात आली होती. त्यामुळे कर्करोगासारख्या अन्य रोगांवर मात करण्याची रोगप्रतिकारक क्षमता तिच्यात निर्माण झाली होती. मात्र, उपचारावेळी चुकीचे निदान करण्यात आले. त्यावेळी आम्हाला हे काहीच माहीत नव्हते.”
आम्ही मेडीकलच्या या जाळ्यात अडकलो आणि आम्हाला ते आधी समजले नाही. जरी ती कठीण काळातून जात असली तरीही पण तिशा कधीच घाबरली नाही आणि डिप्रेशनमध्ये गेली नाही. ती सर्वात निर्भीड, धाडशी आणि शांत मुलगी होती. तान्या यांनी सांगितले की, त्यांची मुलगी या सगळ्या प्रकरणातून जागरुकता निर्माण करु इच्छित होती. तिला सर्वांना सांगायचं होतं की, कधीच कोणत्याही वैद्यकीय निदानाला घाबरू नका. बायोमेडिसिनच्या मदतीने केमो साइड इफेक्ट्स यांवरही मात करता येते, हे तिला सर्वांना दाखवून द्यायचे होते.”
तान्या यांनी आपल्या पोस्टमध्ये अन्य पालकांनासुद्धा एक सल्ला दिला आहे. त्यात त्यांनी लिहिलं, “लिम्फ नोड्स हे शरीराचे रक्षण करतात. काही वेळा भावनिक आघात किंवा पूर्वीचा आजार पूर्ण बरा न झाल्यानं त्यांना सूज येते. त्यावर बोन मॅरो टेस्ट किंवा बायोप्सी करण्यापूर्वी अन्य ठिकाणी त्यासंबंधी चौकशी करून सल्ला घ्या.” तान्या यांची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनीही त्यावर कमेंट्स करत अशा डॉक्टरांवर कारवाई केली पाहिजे, असं म्हटलं आहे.