मराठी मनोरंजन विश्वात अनेक बायोपीक भेटीला आले. डॉ. काशीनाथ घाणेकर, वसंतराव देशपांडे, लोकमान्य टिळक, साने गुरुजी, शाहीर साबळे, महात्मा फुले अशा अनेक व्यक्तिमत्वांची कहाणी मोठ्या पडद्यावर बघायला मिळाली. आता 'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमाचा टिझर भेटीला आलाय.
या टिझरमध्ये सुधीर फडके यांचा बालपणापासून ते स्वरगंधर्व होण्यापर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो. शेवटी रेडिओवर गीतरामायणाची झलक दिसून येते. सुधीर फडके त्यांच्या सुमधूर गायनाने गीतरामायण गाताना दिसतात. बाबूजी गाणं गाताना गीतकार ग.दि. माडगूळकर यांचे डोळे पाणावतात. काहीच सेकंदाचा हा टिझर खुप सुंदर झालेला दिसतोय.
प्रसिद्ध दिग्दर्शक योगेश देशपांडे हे बाबूजींच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यात प्रसिद्ध अभिनेता सुनील बर्वे हे सुधीर फडके यांची भूमिका साकारत आहेत.
सुधीर फडके यांना स्वरगंधर्व म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांनी सुरुवातीला कोल्हापूरमधील वामनराव पाध्ये यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. त्यांचे जन्मनाव राम फडके असे होते. त्यानंतर त्यांनी नाव बदलून सुधीर असे ठेवले. मराठी संगीत विश्वामध्ये त्यांना बाबूजी या नावानं ओळखले गेले. १९४१ मध्ये त्यांनी एचएमव्हीसोबत करिअरला सुरुवात केली.
१९४६ मध्ये बाबूजींनी प्रभात फिल्म कंपनीच्या गोकूळ चित्रपटापासून संगीत दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या जीवनकाळात १११ चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. त्यात काही हिंदी चित्रपटांचा देखील समावेश आहे. प्रसिद्ध गीतकार ग.दि.माडगुळकर यांच्यासोबत ओळख झाल्यानंतर त्यांनी गीतरामायण कार्यक्रमाची बांधणी करुन तो कार्यक्रम महाराष्ट्रात सादर केला. त्याला प्रेक्षकांचा, श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भारताबरोबरच परदेशातही त्याचे विविध कार्यक्रम पार पडले. हा सिनेमा लवकरच लोकांच्या भेटीला येणार आहे.
'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, आदिश वैद्य हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.