आजच्या युगात महिलांनी सर्वच क्षेत्रे पादाक्रांत करून आपण पुरुषांपेक्षा कमी नाही हे सिद्ध केले आहे. तरी समाजातील काही जणी चूल - मूल यांच्या बेडीत अडकल्या आहेत. त्यांच्यात कर्तृत्व आहे, महत्वाकांक्षा आहे, पण संधी मिळत नाही. संसारात अडकल्याने आपली प्रगती खुंटली आहे असे वाटणाऱ्या महिलांच्या मनाला व कर्तृत्वाला उभारी देण्याचे काम लोढा उन्नती ही संस्था करत आहे. त्यांच्या कार्याची माहिती या दोन गृहिणीच्या उदाहरणावरून मिळते. नवरात्री निमित्त स्त्री शक्तीचा सन्मान करण्याची आपली रीत आहे. त्या निमित्ताने या दोन गृहिणींचा हा कर्तृत्व प्रवास…
स्मिता नायर :
चाळीशी उलटलेली ही गृहिणी बी. कॉम झाली आणि कॉल सेंटर मध्ये नोकरी करत होती. पण लग्न आणि मूल झाल्यावर नोकरी सोडली. ८ वर्ष आईची भूमिका निभावल्यावर पुन्हा काम करता येईल की नाही हा आत्मविश्वास गमावून बसली होती. मग कुणाच्या ओळखीने लोढा उन्नती मध्ये नाव घातलं. अन बेरोजगार महिलांना संकर्मणावस्थेत नेणाऱ्या कार्यक्रमात भाग घेतला. प्रशिक्षण घेतलं आणि उन्नतीचे उद्योगी भागीदार टेक महिंद्रमध्ये काम सुरु झालं. आता आपल्या मुलाचा सांभाळ करत ती घरूनच काम करते. कस्टमर सर्विस एकझेंकुटीव्ह म्हणून काम करते. तिचा आत्मविश्वास परत मिळाला, शिवाय कुटुंबाला आर्थिक हातभार लागतो आहे.
सायली महेश गावंड :-
अलिबाग जवळील मांडवा गावची ही २७ वर्षांची गृहिणी १२ वी पास आहे. शिक्षण सोडून आईसोबत फुलांच्या दुकानात काम करायची. लग्न आणि मूल झालं. पत्नी -आई म्हणून जबाबदारी नीट सांभाळत होती, पण काम करण्याची इच्छा होती, घरखर्चाला हातभार लावण्याची आकांक्षा होती. ती लोढा उन्नतीने पूर्ण केली. स्युडेन या महिलेने चालविलेल्या उद्योगात तिने प्रशिक्षण घेतलं. हाताने विणून तयार वस्तू तयार करण्याचे काम मिळालं. या सुलभ कोर्सने तिच्या कर्तृत्वाला दिशा मिळाली. ग्रामीण भागात रोजगाराची संधी असते त्यावर मात करून, सायली आपल्या कौशल्याने विणकाम करणारी उत्तम कारागीर झाली आहे. घर सांभाळून स्थिर उत्पन्न मिळवते आहे.