तणाव हा आजच्या धावपळीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण ताण ओढवून घेतो. त्यात सध्या कोरोनासारख्या विषाणूंच्या साथीने भर घातली आहे. रोजगार व बेकारी यांसारख्या प्रश्नांनी माणसाचं जिणं दुष्कर केलं आहे. घाई, गडबड, गोंधळ, वेग, ताणतणाव यांच्या धावपळीत काळजी, निराशा व उद्वेग यांनी वेढलेल्या माणसाला अनेक आजारांची देणगी मिळालेली आहे. या सगळ्याच्या मुळाशी असलेला ताण दूर करण्यासाठी सुलभ जानुशिरासन, अधोमुख स्वस्तिकासन, सुप्त बद्धकोनासन, सुप्त सर्वांगासन ही चार योगासनं करून पाहा. ही आसनं नियमित केल्याने तुम्ही सहजपणे तणावातून मुक्त व्हाल.
तणाव दूर करून मन शांत ठेवण्यासाठी करावयाचे 10 सोपे उपाय
1. रात्री झोपण्यापूर्वी दुसर्या दिवसाचे प्लानिंग करून ठेवा. असे केल्याने दुसर्या दिवशी आपल्याला कोणत्या वेळी काय काम करायचं आहे याबाबत आपण तयारीत असू. कामाचं योग्य नियोजन केल्यास काही प्रमाणात आपण आपला तणाव काही अंशी कमी करू शकू.
2. रात्री लवकर झोपून आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा, म्हणजे आपल्याला योग्य प्रमाणात झोप मिळेल. तसेच सकाळी लवकर उठून व्यायामासाठीही सहज वेळ देता येईल.
3. आपलं कोणतंही काम वेळेत पूर्ण करा. शेवटच्या क्षणापर्यंत ते करायचं ठेवू नका. काम जितक्या लवकर कराल, तितकेच लवकर ताणही कमी होईल.
4. आपली काम करण्याची जितकी क्षमता असेल तितकेच काम हाती घ्या. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेणार्या व्यक्ती सतत तणावात असतात, तेव्हा कामाबरोबर आपल्या आरोग्याकडेही लक्ष असू द्या.
5. रोज सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं हसा आणि आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे, असा विचार मनात आणा.
6. रोज सकाळी काही वेळ योग, ध्यान आणि व्यायामासाठी नक्की काढा. असं केल्याने स्टॅमिना वाढेल आणि कामात एकाग्रता साधता येईल. तणाव दूर करून मन शांत करण्यासाठी योगासनं करा. नियमितपणे योगासनं केल्याने तणावमुक्त होऊन आपण कोणतंही काम सहजतेने करू शकाल.
7. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष असू द्या. सकस आहार घ्या. त्यामुळे आपण नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहाल.
8. आपले छंद जोपासा. आपल्या आवडीचं काम करताना आपण नेहमी आनंदी आणि तणावापासून दूर राहतो.
9. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन असणार्या व्यक्तींच्या सहवासात राहा आणि नकारात्मक विचाराच्या व्यक्तींपासून दूर राहा.
10. नेहमी चांगले कपडे परिधान करा आणि व्यवस्थित टकाटक राहा. असं केल्याने आत्मविश्वास वाढेल आणि त्याच विश्वासानं जे काही काम कराल, त्यात नक्कीच यशस्वी व्हाल. आणि सुखी राहाल.