Close

उन्हात घराबाहेर पडताय? बॅगेत हे ठेवाच! (Stepping Outside In The Sun? Keep It In The Bag!)

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना प्रत्येकाच्या बॅगेत या काही वस्तू असायलाच हव्यात. कारण त्यांच्याशिवाय घराबाहेर पडणं महागात पडू शकतं.


घराबाहेर पडण्यापूर्वी बॅगेमध्ये पैशांचं पाकीट आणि मोबाइल आहे की नाही, हे प्रत्येक जण एकदा तरी तपासून पाहतंच. आता उन्हाचा तडाखा वाढला आहे. तेव्हा घराबाहेर पडताना पैशांचं पाकीट आणि मोबाईल यासोबतच बॅगेमध्ये अजूनही काही वस्तू आहेत ना, याची खात्री करूनच घराबाहेर पडायला हवं. उन्हाच्या तडाख्यापासून आपलं संरक्षण व्हावं, दिवसभर उत्साही वाटावं, असं वाटत असेल तर या काही वस्तू आपल्यासोबत बाळगायलाच हव्यात.

पाण्याची बाटली
खरं तर कोणत्याही ऋतूमध्ये, कुठेही जाताना स्वतःसोबत एक लहानशी का असेना, पण पाण्याची बाटली बाळगायला हवी. त्यातही उन्हाळ्यात पाण्याची बाटली विसरून मुळीच चालणार नाही. कुणी म्हणेल, हल्ली सर्वत्र बाटलीबंद पाणी उपलब्ध आहे, मग बॅगेत हे ओझं का बाळगायचं? किमान उन्हाळ्यात तरी अशा विचारांना थारा देऊ नका. ट्रेनमध्ये असताना मध्येच बराच वेळ थांबावं लागलं, तर काय कराल? तेव्हा प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहा. आणि ओझंच वाटत असेल, तर अगदी ग्लासभर पाणी राहील, अशी बाटली बाळगा.

सनस्क्रीन
प्रखर सूर्यप्रकाशात त्वचेच्या रक्षणासाठी सर्वांत महत्त्वाचं असं, ते म्हणजे सनस्क्रीन. उन्हाळ्यात सनस्क्रीन न लावता घराबाहेर पडणं योग्य नाही, यावर कुणाचंही दुमत नसेल. कारण सनस्क्रीनशिवाय उन्हात बाहेर पडणं, म्हणजे त्वचेच्या एक ना अनेक समस्या ओढवून घेणं! टॅन, सनबर्न, मुरुमं अशा अनेक समस्या त्वचा प्रखर उन्हाच्या थेट संपर्कात आल्यामुळे उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी घराबाहेर पडताना त्वचेवर सनस्क्रीन आवर्जून लावा. शिवाय स्वतःसोबतही सनस्क्रीन बाळगा, म्हणजे गरज पडल्यावर ते पुन्हा लावता येईल.

बॉडी स्प्रे
उन्हाळ्यात प्रत्येकालाच कमी-जास्त प्रमाणात घाम येतो. मग या घामामुळे अंग चिकचिकीत होतं आणि शरीराला, कपड्यांना दुर्गंधी येऊ लागते. अशा वेळी बॉडी स्प्रे मदतीला धावून येऊ शकतो. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये घराबाहेर पडताना बॅगेत एखादी बॉडी स्प्रेची लहान बाटली बाळगणं उत्तम ठरतं. दिवसभरात कधीही अंग चिकचिकीत वाटलं किंवा मरगळ जाणवली की, या बॉडी स्प्रेचा वापर करा, म्हणजे लगेच ताजेतवानं वाटेल. शिवाय ऑफिसनंतर अचानक बाहेर कुठे जायचं ठरलं, तर या स्प्रेचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

कॉम्पॅक्ट पावडर
उन्हाळ्यामध्ये घराबाहेर पडताना बॅगेत असायलाच हवी अशी आणखी एक गोष्ट म्हणजे, कॉम्पॅक्ट पावडर. दिवसभरात कधीही याची गरज भासू शकते. घामामुळे मेकअप निघून जातो किंवा बिघडतो, अशा वेळी कॉम्पॅक्टच्या मदतीने तुम्ही कधीही मेकअपला सहज टचअप करू शकता. तेव्हा उन्हाळ्यातही लूक परफेक्ट ठेवायचा असेल, तर कॉम्पॅक्ट स्वतःसोबत बाळगाच.

वेट वाइप्स
घामेजलेल्या या दिवसांमध्ये वेट वाइप्स किंवा वेट टिश्यूंना पर्यायच नाही. कडक उन्हामुळे आलेला घाम, चेहर्‍यावर बसलेली धूळ यांपासून ते अतिरिक्त मेकअप टिपून घेण्यापर्यंत वेट टिश्यू आपल्याला अतिशय उपयुक्त ठरू शकतो. चेहरा, गळा, मान किंवा हातांवर वेट टिश्यू फिरवला की, त्वचा स्वच्छ तर होतेच, शिवाय लगेच ताजेतवानंही वाटतं.

लिप बाम
हिवाळ्याइतकीच उन्हाळ्यातही अनेकांना ओठ फुटण्याची समस्या सतावत असते. त्यामुळे ओठ फुटले, त्यांना भेगा पडल्या की होणार्‍या असह्य वेदना आणि त्रास टाळायचा असेल, तर लिप बामकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ओठांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठीही लिप बाम अत्यावश्यक आहे. त्यामुळे स्वतःसोबत नेहमी एखादं लिप बाम ठेवा.
स्कार्फ
स्कार्फ म्हणजे, कोणालाही सहज वापरता येईल, अशी उत्तम फॅशन अ‍ॅक्सेसरी. ही फॅशन अ‍ॅक्सेसरी गळ्याभोवती
गुंडाळण्यासोबतच उन्हाळ्यामध्ये केस बांधणं, डोकं झाकणं अशा इतरही अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरते. प्रवासात हा स्कार्फ उन्हापासूनही तुमचं उत्तम प्रकारे रक्षण करू शकतो. मात्र स्कार्फ निवडताना तो कॉटनचा, सुती कापडाचा असेल आणि पांढर्‍या किंवा इतर सूर्यप्रकाश परावर्तित करणार्‍या रंगांमध्ये असेल याची काळजी घ्या.

सनग्लासेस
उन्हाळ्यात डोळ्यांचं प्रखर उन्हापासून रक्षण करण्यासाठी घराबाहेर पडल्यावर सनग्लासेस वापरायलाच हवेत. सनग्लासेस प्रखर सूर्यकिरणांपासून डोळ्यांचं हमखास संरक्षण करतात. शिवाय डोळ्यांना योग्य संरक्षण देणार्‍या आणि फॅशनेबलही असणार्‍या सनग्लासेसचा वापर करून तुम्हीही स्टायलिश दिसू शकता. तेव्हा असे सनग्लासेस हँडबॅगमध्ये आहेत, याची खात्री करूनच घराबाहेर पडा.

रबर बँड
उन्हाळ्यामध्ये मानेवर रुळणारे केस बरेचदा त्रासदायक ठरतात. अशा केसांमुळे अधिकच उकाडा जाणवू लागतो. अशा वेळी रबर बँड तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरू शकतं. पटकन केसांचा पोनी किंवा अंबाडा बांधला की, काम झालं. त्यात लहान रंगीत रबर बँडचा वापर केला, तर फॅशनही केल्यासारखी होईल.हे सर्व लक्षात घेऊन, उन्हात घराबाहेर पडण्यापूर्वी या सर्व गोष्टी आपल्या बॅगेत आहेत याची अवश्य खात्री करून घ्या. म्हणजे उन्हाळ्यातली आऊटिंगही आल्हाददायक असेल.

Share this article