रक्ताचा कर्करोग किंवा थॅलेसेमिया हा जीवघेणा आजार जास्त करून लहान मुलांमध्ये आढळतो. त्याचा उपचार खर्चिक असल्याने गरीबांना परवडेनासे असते. या मुलांना बरे करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या जस्मीन मजिठिया या सामाजिक कार्यकर्तीचा सत्कार, काल झालेल्या वर्ल्ड मॅरो डोनर डे च्या निमित्ताने करण्यात आला. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हा दिवस दरवर्षी पाळला जातो. त्या निमित्ताने डीकेएमएस – बीएमएसटी फाऊंडेशन इंडियाने कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या समारंभात जस्मीन ताईंसह तीन उत्साही मॅरो डोनर्स यांचा सत्कार करण्यात आला.
जस्मीनताई या सध्या ८५ वर्षांच्या असून, गेल्या ३० वर्षांपासून थॅलेसेमिया व ब्लड कॅन्सर तत्सम आजारांनी ग्रस्त असलेल्या मुलांसाठी चाईल्ड हेल्थ फाऊंडेशन या संस्थेच्या मदतीने धडपडतात. प्रत्येक रुग्ण मुलगा जगला पाहिजे, ही त्यांची तळमळ असून अशा मुलांच्या त्या ‘गॉडमदर’ आहेत, अशी त्यांची ओळख करुन देण्यात आली.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2023/09/blood.jpg)
“दर पाच मिनिटाला भारतात रक्ताचा कर्करोग झालेला किंवा थॅलेसेमिया व अप्लास्टिक ॲनेमिया असलेला रुग्ण आढळतो. यापैकी अनेक रुग्णांना जगण्यासाठी ब्लड स्टेम सेल प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. रुग्णांच्या मूळ पेशी प्रत्यारोपणासाठी एचएलए जुळणारा दाता (डोनर) हवा असतो. तो कुटुंबात मिळतोच असे नाही,” अशी आव्हाने उपचार करताना येत असल्याचे कोकिलाबेन हॉस्पिटलमधील पीडियाटिक हेमॅटोलॉजी, ऑन्कोलॉजी व स्टेम सेल प्रत्यारोपणाचे सल्लागार डॉ. शंतनू सेन यांनी सांगितले. मात्र यासाठी काही दाते पुढाकार घेतात. अशा समर्थ, प्रांजल व शशांक या तीन दात्यांचा इथे सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या रक्तातील मूळ पेशी दान केल्या व ते जीवनदाते झाले.
आतापर्यंत डीकेएमएस – बीएमएसटी च्या महाराष्ट्रातील डोनर स्टेम सेल रजिस्ट्रीमध्ये १३ हजारहून अधिक व्यक्तींनी नोंद केली आहे. शक्य तेवढ्या रुग्णांना नवसंजीवनी मिळावी यासाठी अधिकाधिक नोंदणी करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
“आजच्या दिवसाचे खरे हिरो हे दाते आहेत,” असे सांगून कोकिलाबेन हॉस्पिटलचे सीईओ डॉ. संतोष शेट्टी यांनी “आम्ही २५० हून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. यात अनेक वंचित रुग्णांचा समावेश आहे. त्यांच्यावर कमी खर्चात उपचार करण्यात आले आहेत,” अशी माहिती दिली.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2023/09/90d4d5d1-2420-4497-b070-a7bceb569398-800x491.jpg)
“जीव वाचविणाऱ्या प्रत्योरोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी मॅचिंग दाता मिळणे ही मोठी समस्या आहे. त्यासाठी पात्र व्यक्तींनी ऑनलाईन रजिस्टर करून ही तफावत भरून काढावी,” असे आवाहन डीकेएमएस – बीएमएसटी फाऊंडेशनचे सीईओ पॅट्रिक पॉल यांनी केले.
प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे महासंचालक रजनीश सेठ यांनी या प्रसंगी स्वतःच्या मुलाचा अनुभव सांगितला. व त्याला वेळीच दाता मिळाल्याचा प्रसंग कथन केला. अतिशय कोवळया वयात बाधा झालेल्या व डॉ. सेन यांच्या देखरेखीखाली मूलपेशींचे प्रत्यारोपण करून बरे झालेल्या भविश, ऋतिका, पूर्णिका, अपिया या चार लहान मुलींचा इथे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.