ऑफिसमध्ये बैठं काम करणार्या दोन तृतीयांश कर्मचार्यांना कमी-अधिक प्रमाणात शारीरिक दुखणी त्रस्त करत असतात. ऑफिसमध्ये एकाच जागी अधिक काळ बसून राहणं, हे या दुखण्यामागचं एक मुख्य कारण आहे. हे टाळण्यासाठी, व्यायामासाठी वेगळा वेळ काढण्यापेक्षा तुमच्या ऑफिसमधील दिनक्रमामध्येच काही गोष्टींचा समावेश करा. म्हणजे, व्यायाम तर होईलच, शिवाय दिवसभर अॅक्टिव्ह राहिल्यामुळे, तुम्हाला उत्साहही जाणवेल.
रविवारी रात्री झोपण्यापूर्वी आपण पुढच्या संपूर्ण आठवड्याचं प्लानिंग करतो… जरा लवकरच उठायचं, व्यायाम करायचा, शांतपणे बसून भरपेट नाश्ता करायचा आणि दिवसभरासाठी परिपूर्ण पौष्टिक डबा, फळं, मधल्या वेळेत भूक लागली तर खाऊचा डबा, असं सर्व काही घेऊन ऑफिसला जायचं.
सोमवार उजाडतो; पण होतं काय की, रविवारी सर्व आवरून झोपायला उशीर होतो. मग सकाळी एकतर गजर वाजलेला कळत नाही किंवा आपण झोपेतच तो कधी स्नूझ करतो लक्षात येत नाही. व्यायाम, नाश्ता, निवांतपणा सर्व काही बोंबलतं. आवरायला उशीर होतो आणि कसंबसं धापा टाकत, मिळेल तो ड्रेस अंगावर चढवून, पटकन होणारा एखादा पदार्थ डब्यात कोंबून आपण ऑफिससाठी रवाना होतो. नव्या आठवड्याच्या नव्या सुरुवातीचा उत्साह कुठच्या कुठे विरून जातो. यामुळे होतं काय की, व्यायाम नाही, योग्य आहार नाही आणि त्यात धावपळ, त्यामुळे प्रचंड शारीरिक व मानसिक दगदग होते. त्यात बरेच जण ऑफिसमध्ये बैठं काम करतात. तासन्तास एकाच जागी, एकाच मुद्रेत बसून राहतात. परिणामी, शरीर-मनाला विविध दुखणी ग्रासू लागतात.
एका सर्वेक्षणानुसार असं लक्षात आलं आहे की, ऑफिसमध्ये बैठं काम करणार्या दोन तृतीयांश कर्मचार्यांना कमी-अधिक प्रमाणात शारीरिक दुखणी त्रस्त करत असतात. ऑफिसमध्ये एकाच जागी अधिक काळ बसून राहणं, हे या दुखण्यामागचं एक मुख्य कारण आहे. ऑफिसमधील व्यग्र दिनक्रम आणि घरात होणारी दगदग यामुळे होणार्या या दुखण्यांकडे बरेचदा दुर्लक्षच केलं जातं किंवा घरातील एखादं मलम, बाम, गरम पाण्याच्या पिशवीचा शेक, कधी अगदीच जास्त दुखू लागलं तर एखादी पेनकिलर, असा स्वतःच उपचार केला जातो. बरेचदा जोपर्यंत दुखणं सहन होण्याच्या पलीकडे जात नाही, तोपर्यंत तज्ज्ञांचा
सल्ला घेण्याचीही तसदी घेतली जात नाही. मग या दुखण्याचा परिणाम कामावर होऊ लागतो. कामाच्या ठिकाणी निरुत्साही वाटू लागतं, दुखण्यांमुळे कामात लक्ष लागत नाही, परिणामी चिडचिड होते. आणि चिडचिड वाढली की, पुन्हा शारीरिक समस्याही वाढू लागतात.
खरं तर नियमित योग किंवा व्यायाम केल्यास या सर्व समस्या दूर होऊ शकतात; परंतु घर आणि ऑफिसच्या व्यग्र दिनक्रमात व्यायामासाठी वेळ काढणं, अनेकांना अशक्य वाटतं. मात्र तुम्ही दिवसभर बैठं काम करत असाल, तर या व्यायामाला मुळीच बगल देऊन चालणार नाही. मग काय करता येईल?… तर व्यायामासाठी वेगळा वेळ काढण्यापेक्षा तुमच्या ऑफिसमधील दिनक्रमामध्येच काही गोष्टींचा समावेश करता येईल. यामुळे व्यायाम तर होईलच, शिवाय दिवसभर अॅक्टिव्ह राहिल्यामुळे, तुम्हाला उत्साहही जाणवेल.
जिन्यांचा वापर करा
लिफ्टचा वापर न करता, जिन्यांचा वापर करणं, हा लहानसा बदल तुम्हाला बरीच मदत करू शकतो. असं दररोज केल्यास, जास्तीच्या कॅलरीज बर्न करायला मदत होईलच, सोबत हृदय अधिक प्रमाणात पम्प होऊन रक्ताभिसरण सुधारेल. उंच इमारतीत वरच्या मजल्यावर तुमचं ऑफिस असेल, तरी हा पर्याय निवडा. सर्व मजले जिन्याने चढून जाणं शक्य नसेल, तर काही मजल्यांपर्यंत लिफ्टने जा आणि त्यानंतर जिने चढून ऑफिसपर्यंत जा.
स्ट्रेचिंग करा
कामातून शक्य होईल तेव्हा थोड्या वेळाची विश्रांती घ्या. मग त्यासाठी पाणी पिणं, चहा-कॉफी घेणं, रेस्ट रूममध्ये जाणं, असं कोणतंही निमित्त चालू शकेल. सहकार्यांना इंटरकॉमवरून कॉल करण्यापेक्षा, त्यांच्या टेबलापर्यंत चालत जा आणि त्यांना निरोप द्या. कुणाशीही मोठी चर्चा करायची असेल, तर ती चर्चा बसून किंवा एका ठिकाणी उभं राहून करण्यापेक्षा, चालता-चालता करा. असा काही मिनिटांचा ब्रेक तुमच्या शरीरातील ऊर्जेची पातळी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. आपल्या मोबाईलवर दर 30 मिनिटांनी वाजेल, असा गजर लावून ठेवा. आलार्म वाजला की, स्ट्रेचिंगसाठी एक ब्रेक घ्या. या वेळेत उठून उभे राहा, चाला, पाणी पिऊन या किंवा रेस्ट रूममध्ये जाऊन या. काहीही करा; पण खुर्चीमधून उठा.
लंच ब्रेकमध्ये चाला
बरेचदा सकाळपासून लंच ब्रेकपर्यंतचा ऑफिसमधील वेळ कामात कसा जातो, ते कळत नाही. पण एकदा का लंच ब्रेक सरला, जेवणं झाली की, वेळ जाता जात नाही. यावर हुकमी उपाय म्हणजे, लंच ब्रेकमध्ये जेवणं झाली की, किमान 20 मिनिटं चाला. यामुळे तुम्हाला उत्साह जाणवेल आणि मरगळही निघून जाईल. शक्य असल्यास सूर्यप्रकाशात चाला.

ब्रेक घेणं शक्य नसेल तेव्हा…
कधी कधी असं होतं की, टेबलावर कामाचा ढीग लागलेला असतो आणि त्यातून वेळ काढणंच शक्य होत नाही. अशा वेळी टेबलाजवळच काही सोपे व्यायाम करा. खुर्चीवर बसल्या जागी हात-पाय लांब करून ताणता येतील. मानेला स्ट्रेच देता येईल. खुर्चीतून उठून ताठ उभं राहून, पुन्हा खुर्चीमध्ये ताठ बसणं, असं चार-पाच वेळा करता येईल. शिवाय ताठ उभं राहून टाचा उंचावून पुढच्या पावलांवर उभं राहणं, असं 10-15 वेळा करता येईल. जमेल ते स्ट्रेचिंग करा. यामुळे शरीर जरा मोकळंही होईल आणि तरतरीही जाणवेल.
खरं तर दिवसभर उत्साह टिकून राहण्यासाठी पहाटे थोडा वेळ का होईना; पण व्यायाम करायलाच हवा. पहाटे योग केलं, तर उत्तमच. पण योग किंवा जिमला जाणं शक्य नसेल, तर किमान अर्ध्या तासाचा चालण्याचा व्यायाम करता येईल. व्यायामाला आपल्या दिनक्रमाचा भाग बनवायचा असेल, तर नित्यनेमाने तो करा. त्यासाठी व्यायाम करण्याची इच्छा असणारा एखादा ग्रुप तयार करता येईल. ऑफिसच्या वेळेत अशा प्रकारे क्रियाशील राहण्यासाठी, यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे, यावर विश्वास असणार्या एखाद्या व्यक्तीसोबत हात मिळवणी करा आणि एकमेकांना काही ठरावीक वेळाने त्याची आठवण करून देत राहा.
ऑफिसमधील काम महत्त्वाचंच आहे आणि म्हणूनच ते अचूक होण्यासाठी तुम्ही स्वतः आरोग्यदायी, फिट, ताजेतवाने आणि उत्साही राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ऑफिसमध्ये असताना असे लहानसहान ब्रेक घेणं, स्ट्रेचिंग करणं हे महत्त्वाचंच आहे. त्यासाठी आवर्जून वेळ काढा.