मागील काही दिवसांपासून शाहरुख खान त्याचा मन्नत बंगला सोडणार असल्याचे ऐकत होतो. त्यानुसार नुकतेच शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब - पत्नी गौरी खान, मुले सुहाना, आर्यन आणि अबराम आता मुंबईतील एका पॉश भागात असलेल्या पाली हिल येथे नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. कारण त्यांचा प्रतिष्ठित बंगला 'मन्नत' मध्ये मोठ्या प्रमाणात नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे.

पाली हिल येथील 'पूजा कासा' नावाच्या इमारतीत शाहरुखने दोन डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले आहेत. ही इमारत निर्माता वासू भगनानी, त्यांचा मुलगा जॅकी भगनानी, मुलगी दीपशिखा देशमुख आणि पत्नी पूजा भगनानी यांच्या मालकीची आहे. वासूनेही या इमारतीचे नाव त्यांच्या पत्नीच्या नावावर ठेवले आहे.
रिपोर्ट्सनुसार, शाहरुख या चार मजली डुप्लेक्स अपार्टमेंटसाठी दरवर्षी सुमारे २.९ कोटी रुपये भाडे देणार आहे, म्हणजेच महिन्याला २४ लाख रुपये. एकूण कार्पेट एरिया १०,५०० चौरस फूट आहे, जो त्यांचं जुनं घर मन्नतच्या (२७,००० चौरस फूट) निम्माही नाही.
मन्नतच्या तुलनेत ही जागा लहान असली तरी आत इतकी जागा आहे की शाहरुखचे कर्मचारी आणि सुरक्षा पथक तिथे आरामात राहू शकतात. अर्थात शाहरुखच्या टीमसाठी पुरेशी जागा आहे.

ही इमारत भगनानी कुटुंबियांची असल्याने जॅकी भगनानी, त्याची पत्नी आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंग, वासू भगनानी आणि पूजा भगनानी हे शाहरुखचे नवीन शेजारी असतील. शाहरुखच्या या नवीन घरासमोर एकेकाळी दिलीप कुमार साहेबांचा बंगला असायचा. पण पुनर्विकासामुळे तो बंगला आता आलिशान अपार्टमेंटमध्ये रूपांतरित झाला आहे. संजय दत्तचा बंगला आणि कपूर कुटुंबाचे प्रतिष्ठित घर देखील या संपूर्ण परिसरात आहे.