२०२५ या नव्या वर्षात पदार्पण करत असताना कलाकार मंडळींनीही नवे संकल्प केले आहेत. २०२४ हे वर्ष काय देऊन गेलं. आणि नवीन वर्षात कोणते नवीन संकल्प आहेत याबद्दल कलाकारांनी भरभरून सांगितलं.
संग्राम समेळ
"माझं २०२४ हे वर्ष खूप सुंदर गेलं या वर्षात 'मुलगी पसंत आहे' या मालिकेमुळे पुन्हा लहानपण जगायला मिळालं. लहान मुलांमध्ये जो निरागसपणा असतो ते सगळं मी नव्याने जगलोय.बरेचदा मला वाटायचं की, मला अध्यात्मिक गोष्टींबद्दल माहिती कमी होती. मध्यंतरी मी काही पॉडकास्ट ऐकले, पुस्तकं वाचू लागलो आणि मग स्वतःला जाणवलं. अध्यात्माकडेही माझा कल आहे. अभिनेता म्हणून काम करत असताना कुटुंबाला वेळ देता येत नाही. याबद्दल माझे आई बाबा, बायको यांना Thank You बोलावसं वाटत आहे. त्यांनी मला समजून घेतलं नसत तर मला काम करणं अवघड गेलं असतं. Sorry मी स्वतःलाच म्हणेन कारण धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे कमी लक्ष देतो. २०२५ मध्ये स्वतःला खुश ठेवण्याचा माझा संकल्प आहे."
वैष्णवी कल्याणकर
"२०२४ या वर्षात माझ्या आयुष्यात खूप मॅजिकल गोष्ट घडली म्हणजे माझं लग्न झालं.मी स्वःताला खूप नशीबवान समजते की, किरण माझ्या आयुष्यात आला आणि त्याच्यामुळे मला नवीन कुटुंब मिळालं. २०२५ मध्ये मला AI कोर्स करण्याची खूप इच्छा आहे. त्याचबरोबर क्लासिकल डान्स मला शिकायचं आहे. 'तिकळी' या मालिकेबरोबरच मला आणखी वेगवेगळ्या भूमिका साकारायला आवडतील."
अस्मिता देशमुख
"लहानपणापासून मी योगा करत आहे पण २०२४ मध्ये मी योगा करू शकले नाही. या गोष्टीचं वाईट वाटत आहे पण २०२५ मध्ये मला योगा, Diet पुन्हा सुरु करायचं आहे. मी मानसशास्त्रज्ञ आहे. अभिनयक्षेत्रात आल्यामुळे मी प्रॅक्टिस करू शकले नाही. यापुढे मला मानसशास्त्रज्ञ मध्ये आणखी शिक्षण घेऊन पदवी घ्यायला आवडेल. 'तुझी माझी जमली जोडी' या मालिकेत खूप सोज्वळ भूमिका मी साकारत आहे. प्रेक्षक सईला भरभरून प्रेम देत आहेत या गोष्टीचाही तितकाच आनंद आहे."
सुरेखा कुडची
"२०२५ हे वर्ष खूप खास आहे कारण गेली १५ वर्ष मी कामानिमित्त मुंबईमध्ये शूटिंग केलं आहे. पण बऱ्याच वर्षांनी 'जुळली गाठ गं' या मालिकेमुळे कोल्हापूरमध्ये शूटिंग करण्याचा योग्य आला आहे. नवी मालिका, नवी भूमिका हे सगळंच जुळून आलं आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळावं हीच माझी इच्छा आहे.सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी."
पियुष रानडे
"२०२४ या वर्षाने मला खूप काही दिलं आहे.'आदिशक्ती' या मालिकेमुळे बरंच काही शिकायला मिळालं.अभिनयक्षेत्रात काम करत असताना आपल्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळणं खूप गरजेचं असतं. बरेचदा कुटुंबाला वेळ देता येत नाही पण सुरुची आणि माझ्या आई बाबांनी मला सांभाळून घेतलं. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचे मला आभार मानावेसे वाटतात. २०२५ मध्ये मागील वर्षात जी संकल्प अपूर्ण राहून गेली ती सगळी संकल्प मी पूर्ण करेन."