सर्दी-खोकला पळवा
थंडी बाधते त्याचे सार्वत्रिक लक्षण दिसून येते, ते म्हणजे सर्दी आणि खोकला. नाक वाहू लागते, शिंका येतात आणि (विशेषतः) कोरड्या खोकल्याची ढास लागते. यावर सोपा उपाय म्हणजे सकाळी उठल्यावर गरम पाणी पिणे. अन् दिवसभरात वेळ मिळेल तशी गरम पाण्याची वाफ घेणे. यामुळे चोंदलेले नाक मोकळे होते. श्वासनलिका व घसा मोकळा होतो. सी व्हिटॅमिनयुक्त अन्नपदार्थ घ्यावेत. त्याच्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते. संत्री, पपई, अननस, आवळा यात हे व्हिटॅमिन आढळते. त्यांचे सेवन करावे. शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने सी व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्याव्यात. गाजर, कोहळा, रताळी यांचेही सेवन करावे. कांदा वेगळ्या प्रकारे उपयुक्त ठरतो. भाजी-आमटीत त्याचा वापर करावा.
भूक मारू नका
ह्या दिवसात भूक जास्त लागते. वजन वाढण्याच्या भीतीने भूक मारू नये. आपल्या मेंदूत अशी रचना असते की अन्न पोटात जाताच शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे ही उष्णता थंड झाली किंवा अंगातील ऊब कमी झाली की, ते मेंदूला भुकेचा संदेश पाठविते. अन् आपल्याला खावेसे वाटते. अगदीच कॅलरीबाबत जागरूक असाल तर कमी चरबीवाले पदार्थ खावेत. फळे खावीत, पोळी-भाजी खावी किंवा सूप प्यावे. झेपतील आणि पचतील इतपत स्निग्ध पदार्थ खायला हरकत नाही.
पाणी, गरम पेये प्या
थंडीमुळे तहान लागत नाही. अन् पाणी पिण्याची इच्छा होत नाही. पण असे करू नये. कोणत्याही ऋतूमध्ये आपली त्वचा आणि शरीर आर्द्र असणे गरजेचे आहे. त्यामुळे तहान लागली असो वा नसो, पाणी पित राहावे. त्याचबरोबर चहा-कॉफी ही गरम पेये देखील प्यावीत. म्हणजे गरम पाणी आपोआप पोटात जाईल. शरीरात पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहिले तर अंगातील पोषणद्रव्ये त्यात मिसळण्यात मदत होते. थंड पेये पिऊ नयेत. ती एरव्हीदेखील शरीरास मारक ठरतात.
मूड टिकवा
हाडांच्या मजबुतीसाठी व कॅल्शियमच्या शोषणासाठी डी व्हिटॅमिनची फार आवश्यकता असते. पण ह्या व्हिटॅमिनचा संबंध आपल्या मूडशी असतो, हे नव्यानेच लक्षात आले आहे. मेंदूतील एका द्रावासाठी डी व्हिटॅमिन आवश्यक आहे, असे एका नव्या संशोधनातून आढळले आहे. हे व्हिटॅमिन आपल्याला जास्त करून सूर्यप्रकाशातून मिळते. थंडीच्या दिवसात सूर्यप्रकाश मंदावला असतो. काही शहरात तर ढगाळ वातावरण असते. तर काही ठिकाणी धुके आणि धुरकटपणामुळे सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असते. त्यामुळे शरीराला डी व्हिटॅमिन पुरेसे मिळत नाही. तेव्हा हे ज्या पदार्थांपासून मिळते, ते ह्या दिवसात जास्त प्रमाणात सेवन करावेत. दही, पनीर, मासे तसेच अंड्यातील बलक हे पदार्थ या संदर्भात उपयुक्त ठरतील.
गरम मसाले खा
कडाक्याची थंडी ज्या क्षेत्रात पडते तेथील काही व्यसनी लोकांना वाटते की, सिगारेट, हुक्का किंवा दारू प्यायल्याने शरीरात उष्णता येते अन् थंडी मरते. पण ही चुकीची कल्पना आहे. धूम्रपान हे आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे त्याच्या वाटेला जाऊच नये. दारूतील अल्कोहोलमुळे त्वचेस लागून असलेल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. त्यामुळे त्यातून रक्तप्रवाह वाढतो नि उष्णता वाहू लागते. अंगात थोडीशी गरमी वाढल्यासारखी वाटली तरी त्यामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव काही गरम होत नाहीत. ते झाले तरच शरीरात मोठी ऊब निर्माण होऊ शकते. तेव्हा व्यसनांच्या आहारी जाण्यापेक्षा गरम मसाले अधिक प्रमाणात घेतले तर ह्या अवयवांमधील उष्णता वाढून थंडी सहन करण्याची शक्ती अंगात येईल. मोहरी, काळी मिरी, हिंग, मेथी दाणे, ओवा, बडीशेप ह्यांचा वापर अन्न शिजविताना जास्त प्रमाण करावा. म्हणजे गुण येईल. हळदीचा वापर देखील करावा. तुळशीची पाने, आले, तीळ यांचाही वापर जरूर करावा. ह्या पदार्थांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करणारे घटक असतात. सर्दी, खोकला आणि ताप यांना दूर ठेवण्याची क्षमता त्यांच्यात असते. चहा, भाज्या आणि आमटीत आले किसून किंवा बारीक तुकडे करून टाकावेत. बडीशेप आणि तीळ यांचा वापर लाडू तयार करताना करावा, मुखशुद्धीच्या पदार्थात करावा किंवा सॅलडवर टाकायला देखील हरकत नाही. लसुणाचा वापर अधिकाधिक करावा. सर्दी, ताप यांच्यावर लसूण गुणकारी ठरतो. तसेच शरीर उष्ण राखतो. ह्या दिवसात डिंकाचे, मेथीचे व अळीवाचे लाडू अवश्य खावेत. त्याने शरीरात उष्णता राहते. शिवाय ते पौष्टिक असतात.
त्वचेची निगा राखा.
कडक थंडीच्या ठिकाणी त्वचा कोरडी, पांढरी पडते. ओठ, गाल फाटतात. चेहर्यावर, हातापायांना भेगा पडतात. त्यावर आपण विविध क्रीम, लोशन, व्हॅसलीन लावतो. पण आपल्या आहारात देखील थोडाफार फरक करायला हवा. त्वचेचे बाहेरील आवरण ओलसर राहण्यासाठी जास्त फॅटस् असलेल्या पदार्थांचे सेवन करा. ओमेगा 3 फॅटी अॅसिडस् भरपूर प्रमाणात असलेले मासे, दूध, चीज, लोणी, ंडी खावीत. अति थंड प्रदेशातील लोक चीज जास्त प्रमाणात खातात, त्याचं हेच कारण आहे. त्वचेला ई व्हिटॅमिनची आवश्यकता असते. त्याची कमी झाल्यास त्वचेचा पोत आणि दर्जा खालावतो. तेव्हा ई व्हिटॅमिनयुक्त बदाम खावेत, कोहळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया देखील खाव्यात त्याच्याने त्वचेची निगा राखली जाईल. बाहेरील क्रीम बरोबरच शरीराच्या आतून पोषण मिळेल.
व्यायाम चुकवू नका
थंडीच्या दिवसात अंथरुणातून बाहेर पडावेसे वाटत नाही. पांघरूण, दुलई, रजई, ब्लॅन्केट अगदी तोंडावर लपेटून झोपून राहावेसे वाटते. आवश्यक तेवढी झोप काढावी. पण झोपेच्या मोहापायी व्यायामास बुट्टी मारू नये. व्यायाम नियमितपणे करावा. या दिवसात व्यायाम केल्यास अंगाला लागतो. व्यायामाने रक्ताभिसरण सुधारते आणि ऊर्जा निर्माण होऊन रोग प्रतिकारक शक्ती वाढते. परिणामी सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार दूर राहतात.