प्रख्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे मोठ्या चित्रपटाच्या तयारीत आहेत. रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या लव्ह अँड वॉरचे ते दिग्दर्शन करणार असून सोशल मीडिया सेन्सेशन असलेला ओरी हाही या चित्रपटातून डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे.
पुढील वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांची कामं सुरू होणार आहेत, तर काही चित्रपट पुढल्या वर्षी रिलीजसाठी तय्यार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे विख्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी या ‘लव्ह अँड वॉर’ (Love And War) हा चित्रपट. रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट खूप चर्चेत असून त्या तिघांनाही एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं असून लवकरच त्याची रिलीज डेटही समोर येईल. याच दरम्यान या चित्रपटासंदर्भात दोन महत्वाच्या अपडेट्सही समोर आल्या आहेत.
त्यातील पहिली म्हणजे आलिया, रणबीर आणि विकी कौशल यांच्या या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचाही कॅमिओ असणार आहे. हा रोमँटिक पीरियड वॉर चित्रपट संजय लीला भन्साळी मोठ्या स्तरावर बनवत असून २०२६ मध्ये तो रिलीज होण्याची शक्यता आहे. नुकतीच आई झालेल्या दीपिकाचाही या चित्रपटात एक छोटासा रोल असेल असे वृत्त आहे. आणि दुसरी महत्वाची बातमी म्हणजे सोशल मीडियावर यत्र तत्र सर्वत्र अर्थात सगळ्या मोठ्या पार्ट्यांमध्ये, सेलिब्रिटींसोबत खास पोझ देणारा ओरहान अवात्रामणि अर्थात ओरी हा देखील या चित्रपटात काम करत असून त्याद्वारे तो बॉलिवूडमध्ये डेब्यूही करणार आहे.
नुकतेच या चित्रपटाबाबत अनेक मोठे अपडेट्स समोर आले आहेत. त्यानुसार विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये दीपिका पदुकोणचा कॅमिओ दिसणार आहे. पण सध्या तरी तिच्या भूमिकेबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. आणि सोशल मीडिया सेन्सेशन असणारा ओरी हा या चित्रपटात होमोसेक्सुअल व्यक्तीची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. रिपोर्ट्सनुसार, आलिया या चित्रपटात एक डान्सर म्हणून दिसणार असून विकी कौशल आणि रणबीर हे सैन्यातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.
खरंतर दीपिका पादुकोण आणि ओरीच्या भूमिकेबद्दल मेकर्सनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी ते दोघं या चित्रपटात दिसले तर त्यांच्या चाहत्यांसाठी याहून आनंदाची दुसरी बाब नसेल. संजय लीला भन्साळी आणि दीपिका पदुकोण यांनी यापूर्वीही अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. ‘गोलियों की रासलीला रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’, त्यांचे हे तिन्ही चित्रपट अतिशय हिट ठरले होते, बॉक्स ऑफीसवरही या चित्रपटांनी चांगला गल्ला कमावला होता. तर रणबीर कपूर हा सांवरिया नंतर पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करणार आहे. गंगूबाई चित्रपटाच्या यशानंतर आलियादेखील संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. विकी कौशल मात्र त्यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करणार आहे.