स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. रमासारखीच हुबेहुब दिसणारी माही सध्या मालिकेत दिसत असल्यामुळे कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. लवकरच मालिकेतून आणखी एक नवं पात्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साईनाथ शेवलकर असं या पात्राचं नाव असून सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ खिरीड साईनाथ हे पात्र साकारणार आहे. साईनाथ हे पात्र अतिशय वेगळं आहे.
मुळचा चंद्रपुरचा असणार साईनाथ पर्यटकांना गाड्या पुरवण्याचं काम करतो. पर्यटकांना ताडोबाच्या जंगलात घेऊन जातो. वैदर्भीय भाषा बोलतो. तसा शांत स्वभावाचा आहे. कोणाच्या अध्यात मध्यात नसतो. पण कोणी त्याला चुकीचं वाटेल असं बोललं तर अचानक भडकतो. मरणासन्न अवस्थेत जेव्हा साईनाथला रमा दिसते तेव्हा तो देवदुतासारखा धावून येतो आणि तिचा जीव वाचवतो. साईनाथच्या एण्ट्रीने मालिकेतली रंगत द्विगुणीत होणार आहे.
या पात्राविषयी सांगताना सिद्धार्थ म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. मुलगी झाली हो मालिकेनंतर जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रवाह परिवारात सामील होण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. या मालिकेच्या निमिताने वैदर्भीय भाषा शिकण्याची संधी मिळाली. ही नवी भाषा आत्मसात करताना माझा कस लागतोय मात्र सेटवर सर्वांच्या मदतीने मी या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. मालिकेची टीम खूप छान आहे. सेटवर खूप छान पद्धतीने सर्वांनीच मला आपलसं करुन घेतलं आहे. तेव्हा नक्की पहा मुरांबा दुपारी १.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’