“तुला कोण ओळखतं, माझ्यामुळे तुला सगळे ओळखतात. तुझी काय ओळख आहे?” नवऱ्याने भांडणात असे शब्द वापरल्यानंतर तृप्ती अक्कलवार हिने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आणि आज ती यशस्वी बिझनेसवुमन आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने २००७ मध्ये तृप्ती अक्कलवारशी प्रेमविवाह केला. पण मध्यंतरी तृप्तीने सोशल मीडियावरून नवऱ्याचं आडनाव हटवल्यामुळे ते घटस्फोट घेत आहेत की काय अशा चर्चांना उधाण आलं. यामागचं कारण तृप्तीने एका मुलाखतीत सांगितलं.

मुलाखतीत तृप्ती म्हणाली, ‘सिद्धार्थ याला सिनेमांमध्ये चांगले रोल मिळू लागले. तो पूर्णपणे सेट झाला. त्यामुळे मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आई झाल्यानंतर २०१३ मध्ये मी नोकरी सोडली. कारण प्रत्येक बाईला चूल, मूल, घर हे काही सुटलंले नाहीये… त्यामुळे मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आणि सिद्धार्थला मॅनेज करायला सुरुवात केली. त्याच्या सर्व तारखा, शुटिंग, नाटकांचे दिवस सर्व काही मी मॅनेज करत होती…’
त्या एका प्रसंगाबद्दल तृप्ती अक्कलवारने सांगितलं, ‘२०२० कोविडचा काळ होता. तेव्हा आमची भांडणं झाली. नवरा – बायकोमध्ये लहान – मोठे वाद होत राहतात. पण तेव्हा सिद्धू मला म्हणाला, “तुला कोण ओळखतं, माझ्यामुळे तुला सगळे ओळखतात. तुझी काय ओळख आहे? ती गोष्ट माझ्या मनाला फार लागली.”
‘तेव्हा मला कळलं माझं आयुष्य माझे स्वप्न काय. एक आई म्हणून मी करतच होते. पण ते मला काही केल्या करावं लागणार होतं. दोन मुलींना मी जन्म दिला आहे, तर त्यांची जबाबदारी देखील माझ्यावर आहे. पण जेव्हा माझ्या ओळखीचा प्रश्न आला तेव्हा मला असं वाटलं काय करु?’

‘असं झाल्यानंतर मी जॉब करण्याचा प्रयत्न केला. पण आई झाल्यानंतर जॉब करणं कठीण होतं. १९-२० वर्षांची असताना माझं स्वप्न होतं. माझी बिझनेसवुमन व्हायची इच्छा होती. ती इच्छा मग त्या क्षणाला जागृत झाली. पण पैसा हवा होता आणि मला नवऱ्याकडून पैसे घ्यायचे नव्हते. व्यवसायात ५० लाख रुपये गुंतवावे लागणार होते. तेव्हा मी सिद्धूला सांगितंल देखील नाही. त्याच्याकडून एक पैसा देखील घेतला नाही.’
‘तेव्हा मी कुटुंबियांकडून, मित्रांकडून ७-८ टक्क्यांनी पैसे घेतले. आज आमचं ९० टक्के लोन फिटलं आहे. गेल्या चार वर्षांपासून येणाऱ्या पैशातून खूप काही केलं. अशाप्रकारे मी नवी सुरुवात केली आणि सिद्धूला सांगितलं आता तू तुझ्या गोष्टी मॅनेज कर. त्यानंतर मी ठरवलं नाव जे लावयचं आहे ना ते फक्त तृप्ती अक्कलवार लावायचं… कारण ती आपली ओळख आहे. सिद्धार्थ जाधवची बायको आहे हे मी खोडू शकत नाही. पण सिद्धार्थच्या त्या शब्दांनंतर मला वाटलं मला माझ्या स्वतःच्या ओळखीची गरज आहे.’ अशा प्रकारे तृप्ती अक्कलवार हिने स्वतःची ओळख निर्माण केली.
तृप्ती अक्कलवर हिच्या व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर, “स्वैरा एंटरप्राइजेस’ च्या नावाने तृप्तीने स्वतःचा ब्रँड सुरु केला. या ब्रँड अंतर्गत तृप्ती हिने साड्या, बनारसी ओढण्या वगैरे विकण्यास सुरुवात केली. सलोन देखील सुरु केलं. त्यानंतर आलिबाग येथे एक बंगला विकत घेतला आणि स्विमिंगपूल तयार केलं. त्याचं नाव तृप्ती कॉटेज असं आहे. २०२५ पासून हे तृप्ती कॉटेज लोकांसाठी खुलं झालं आहे.