Close

भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल कालवश (Shyam Benegal Legendary Filmmaker Passed Away At The Age Of 90)

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते श्याम बेनेगल यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. सायंकाळी ६.३८ वाजता त्यांनी वोक्हार्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

आज मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची मुलगी पिया बेनेगल म्हणाली, 'ते दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते.' दोन वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्यावर डायलिसिसवर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी नीरा बेनेगल आणि मुलगी पिया बेनेगल असा परिवार आहे.

श्याम बेनेगल यांना बॉलीवूडमधील आर्ट सिनेमाचे जनक देखील मानले जाते. श्याम यांनी २४ चित्रपट, ४५ माहितीपट (डॉक्युमेंट्री) आणि १५ ॲड फिल्म बनवल्या आहेत. झुबैदा, द मेकिंग ऑफ द महात्मा, नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हीरो, मंडी, आरोहन, वेलकम टू सज्जनपूर यांसारखे डझनभर उत्तम चित्रपट त्यांनी केले आहेत. सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याचा विक्रम श्याम बेनेगल यांच्या नावावर आहे. त्यांना ८ चित्रपटांसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना १९७६ मध्ये पद्मश्री आणि १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय २००५ मध्ये बेनेगल यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कारही देण्यात आला होता

श्याम सुंदर बेनेगल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी हैदराबादमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ते प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते गुरु दत्त यांचे चुलत भाऊ आहेत. श्याम यांच्या वडिलांना स्टिल फोटोग्राफीची आवड होती. श्याम हेही अनेकदा लहान मुलांचे फोटो काढत असत. ते बारा वर्षांचे असताना त्यांनी त्यांचे फोटोग्राफर वडील श्रीधर बी यांच्यासोबत काम केले. अर्थशास्त्रात M.A केल्यानंतर ते फोटोग्राफी करू लागले. 'अंकुर' हा पहिला चित्रपट बनवण्यापूर्वी त्यांनी ॲड एजन्सीसाठी अनेक ॲड फिल्म्स बनवल्या होत्या. चित्रपट आणि जाहिराती बनवण्यापूर्वी श्याम कॉपी रायटर म्हणून काम करायचे.

श्याम बेनेगल यांनी १९७४  मध्ये पहिला अंकुर हा चित्रपट बनवला. या चित्रपटात त्यांनी आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. तर 'मुजीब - द मेकिंग ऑफ अ नेशन' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. जवाहरलाल नेहरू आणि सत्यजित रे यांच्यावर डॉक्युमेंट्री बनवण्याबरोबरच त्यांनी दूरदर्शनसाठी 'यात्रा', 'कथा सागर' आणि 'भारत एक खोज' या मालिकांचे दिग्दर्शनही केले.

श्याम बेनेगल यांनी नुकताच आपला ९० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्या अनेक चित्रपटात आघाडीचे कलाकार म्हणून काम केलेल्या शबाना आझमी आणि नसरूद्दीन शाह हे देखील उपस्थित होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील कलाकारांसोबतच त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. सर्व सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

श्याम बेनेगल यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

Share this article