Close

उर्मिले त्रिवार वंदन तुला (Short Story: Urmile Trivar Vandan Tula)

सर्वात कठीण प्रसंग उभा राहिला लग्नाच्या पहिल्याच रात्री! कारण मी देवापुढे मनोमन शपथ घेतली होती की मी बह्मचर्य पाळेन! तेव्हा आता या उर्मिलेला काय सांगू?
-ज्योती आठल्ये


शांतपणे तुळशी वृंदावनाला फेर्‍या घालत असलेल्या उर्मिलेला म्हणजे आपल्या बायकोला पाहून लक्ष्मणरावांना भरून आले. चष्मा काढून डोळे पुसले व इतके वर्षे न बघितलेले तिचे ते रूप मनात साठवित राहिले. खरंच! परमेश्वराने मला दिलेली ही अमूल्य भेटच आहे. अन् मग तिच्याकडे बघता बघता त्यांना वाटले खरंच! कशी काढली असतील ही अनेक वर्षे तिने. तिच्या जागी कुणी दुसरी असती तर केवढा गोंधळ केला असता. अन् मग ते कधी भूतकाळात रममाण झाले, ते त्यांचे त्यांनाच कळले नाही.
लग्न झाल्यावर दोन वर्षांनी मी घर सोडून निघालो. आई-बाबांच्या पाया पडलो. तेव्हा शांतपणे ती तिथेच कोपर्‍यात उभी होती. आणि सेकंदभर आमची नजरानजर झाली होती, तेव्हा त्यात शांत भाव होते. डोळ्यात विखार नव्हता की रडून मी न जाण्यासाठी तिने मला अडवलं नाही. म्हणून तर आजपर्यंत मला हवे ते काम करू शकलो. अगदी सर्वोच्च पदावर पोहचलो. पण खरंच आता वाटतंय, तेव्हाच ठामपणे मी आईबाबांना लग्न करणार नाही, असं सांगायला हवे होते. पण का कुणास ठाऊक, त्यांना दुखवणे मला जमले नाही. पण नकळत हिला मात्र दुखावलंच. ‘माझ्याशी लग्न करून तिला काय मिळाले?’
विचार करत अन् खिन्न, उदास मनाने आत येऊन बसलो व आठवू लागलो की आपण या राजकारणात कसे अडकलो?
हं! बरोबर! बाबा, आजोबा अनेक देशभक्तांच्या गोष्टी सांगायचे. शिवाय भावांबरोबर मोकळ्या मैदानात खेळायला जायचो. तिथे दोन तरुण मुलगे नवीन नवीन खेळ शिकवत, व्यायाम करून घेत. हे मला खूप आवडू लागले. मी त्यात रमून आणि रूळून गेलो ते पाहून एकदा त्या दोघांनी मला त्यांच्या मुख्य गुरुंकडे नेले.
तेव्हा त्यांनी विचारले, “काय आवडतं का हे सगळे?”
“हो!” अगदी उत्साहाने मी म्हणालो. तसे ते म्हणाले, “छान! पण अभ्यास विसरायचा नाही बरं का!”
तेव्हा मी हसून नमस्कार करून त्यांना म्हटले, “नाही विसरणार! खूप शिकेन मी!”
अन् मग नंतर ते मला त्यांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात घेऊ लागले. पुढे लक्षात आलं, अरे हा तर देशासाठी काम करणार्‍या लोकांचा पक्ष आहे. आईबाबांना पण काही सिरीयस आहे असे वाटले नव्हते. त्यावेळी उलट बाबा तर म्हणाले, ‘बरंय चांगला व्यायाम होतोय.’
पुढे बी.ए. झालो. नोकरी मिळाली. त्यामुळे वधूपित्यांच्या उड्या पडू लागल्या. खरं तर मला लग्नच करायचे नव्हते. गुरूजींसारखे ब्रह्मचारी राहायचे होते. देशसेवेला वाहून घ्यायचे होते. पण आईने अन्नसत्याग्रह पुकारल्यामुळे मी लग्नाला राजी झालो.
अन् या देशपांड्यांच्या उमाशी
माझे लग्न झाले. माझे नाव लक्ष्मण. म्हणून साहजिकच तिचे नाव उर्मिला ठेवले गेले.
पण सर्वात कठीण प्रसंग उभा राहिला लग्नाच्या पहिल्याच रात्री! कारण मी देवापुढे मनोमन शपथ घेतली होती की मी बह्मचर्य पाळेन! तेव्हा आता या उर्मिलेला काय सांगू? पण सांगणे तर भागच होते. असले नसलेले सर्व धैर्य गोळा करून मी तिला सांगितले, ‘आपण नावापुरते नवरा बायको! माझ्याकडून तू कसलीच अपेक्षा बाळगू नकोस.’
अन् मग कसं काय माहीत नाही. पण मला काय वाटतंय, मी काय करणार आहे. हे सगळे तिला सांगून टाकले. हेे ऐकून ती रडारड करेल किंवा चिडचिड करेल असे वाटले! पण तिने फक्त विचारले, ‘मग का केलंत लग्न?’
‘केवळ आईवडिलांकरिता!’
‘ठीक आहे,’ असं म्हणून ती झोपली. अन् मग आमचे सांसारिक आयुष्य चालू झाले. मी माझ्या कामात व्यस्त झालो नि तिच्या प्रापंचिक कामात! दोघांमध्ये साधे संवादसुद्धा होत नव्हते. ती काही मागत नव्हती. जणू माझ्यासमोर मुकीच झाली होती.
एका सकाळी उठलो. काय वाटलं कुणास ठाऊक? बॅग भरली आणि आईबाबांसमोर जाऊन उभा राहिलो व म्हणालो, ‘आशीर्वाद द्या! इथून पुढे पक्षाच्या कार्याला वाहून घ्यायचे ठरविले आहे. तेव्हा आता इथे रमू शकत नाही.’
हे ऐकून आईबाबा कितीतरी वेळ आश्चर्याने माझ्याकडे बघत बसले होते. असे मी काही करेन असं त्यांना वाटलंच नव्हतं आणि तो धक्का त्यांच्या चेहेर्‍यावर दिसत होता. पण नंतर आईने विचारले, ‘अरे पण उर्मिलेचे काय?’
तेव्हा प्रथमच ठाशीव स्वरात म्हणालो, ‘ती जबाबदारी आता तुमची! तुमच्याच आग्रहाखातर मी लग्न केले. ती मॅट्रिक पास आहे, करेल शिक्षिकेची नोकरी! आता मला कशातही अडकवू नका.’ पुढे बराच वेळ आईबाबा माझी समजूत घालत होते आणि उर्मिला कोपर्‍यात उभी होती. एक चकार शब्द न बोलता! उलट आईच तिला म्हणाली, ‘अग बघतेस काय? अडव ना त्याला!’
ते ऐकून मला वाटलं होतं- ती आता रडेल. नका जाऊ, वगैरे म्हणेल. काहीतरी भावनिक साद घालेल. पण तिने मलाच उलट आश्चर्यात पाडले. शांतपणे आईकडे बघून म्हणाली, ‘त्यांच्या इच्छेआड मी येणार नाही. त्यांना काय करावेसे वाटते ते करू देत. इथून पुढे मीच तुम्हाला सांभाळेन. माझी कुठलीच तक्रार नाही.’
हे ऐकून मी निश्चिंत मनाने बाहेर पडलो.


पक्ष कार्यालयात आलो. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार तळागाळातील लोकांच्या प्रश्नापासून कामाला सुरुवात केली. आणि जाणवलं आपण निवडलेली बाजू काटेरी आहे. पण ते काटे सहन केले तरच पुढचे काम होईल. त्यामुळे तनमनाने काम करू लागलो. अन हळूहळू पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास बसू लागला.
त्यामुळेच एकेक शिडी चढत मुख्यमंत्री झालो. राज्याचा विकास करून दाखविला. अर्थात हे सारे एका रात्रीत जादूची कांडी फिरवली अन् झाले असं नव्हतं. अपार मेहनत घेतली. ‘कुटुंबाला तर जवळजवळ विसरूनच गेलो होतो. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात एकटाच नोकरांबरोबर राहात होतो. पण ना कधी घरची आठवण आली ना कधी उर्मिलेची! जनतेची काळजी करत होतो पण सख्ख्या माणसांचा विचारही मनात येत नव्हता.
फक्त कानावर येत राहिले की घरच्यांचे उत्तम चाललंय. उर्मिला मुख्याध्यापिका झाली होती. पण ना तिने कधी मुख्यमंत्र्यांची बायको म्हणून बिरूद मिरविले ना घरच्या कुणी माझ्या पदाचा लाभ उठविला.
आता हळूहळू माझे पक्षात वजन वाढू लागले. एकंदर सगळेच माझ्या कामावर खूश झाले. मी एक सक्षम मुख्यमंत्री आहे याचा चोहो बाजूने बोलबाला झाला. अन् मग हळूहळू देशात येणार्‍या सार्वजनिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले. मला व पक्ष नेतृत्वाला जाणवू लागले की लोक सध्याच्या सरकारला कंटाळले आहेत, त्यांना यंत्रणेत बदल हवा आहे. ही संधी माझ्या पक्षाने उचलली व सर्वोच्च पदाच्या शर्यतीत पक्षाने मला उतरविले. पक्षाला देशभर पूर्ण बहुमत मिळून मी देशाचा नेता झालो. पण सार्‍या भगिनींनी हाच मुद्दा उचलून धरला की निवडणुकीच्या वेळी जो फॉर्म भरावा लागतो त्याच्यात इतक्या वर्षांनी तुम्ही लग्न केलेत व बायकोचे नाव लिहिलेत. परंतु आधी का कधी तिची दखल घेतली नाहीत. माता-भगिनींच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करता, त्यांना न्याय, हक्क मिळवून देईन अशी भाषणे करता, मग
स्वतःच्याच बायकोला विसरलात. तिच्यावर अन्याय केलात. का तिने कधीच तुमचा निषेध नोंदवला नाही. म्हणून त्याचा गैरफायदा घेतलात.
या सगळ्या विचारांनी लक्ष्मणरावांना घेरले अन् ते एकदम वास्तवात आले खरे.
पण मनात मात्र एक अपराधीपणाची भावना निर्माण झाली. ते स्वतःशीच म्हणाले, ‘सीतामाईचे दुःख जगाला दिसले तरी, पण उर्मिलेचे काय, त्या लक्ष्मणाने तिच्यावर अन्यायच केला. जसा माझ्या कडून माझ्या पत्नीवर झाला तसा. त्या लक्ष्मणाला राम, रामाज्ञा प्रिय होती. म्हणून ती उर्मिला एकटी पडली. अन् मला जनता, तिचे
हित एवढेच कळले. अन् ही उर्मिला कळली नाही.
खरंच! उर्मिले मी तुझा ऋणी आहे, तू होतीस. न बोलून माझ्यासाठी भात व तांदळाचे पदार्थ गेले कित्येक वर्षे सोडलेस माझ्यासाठी. अन् मी काय केले? तुझ्याजवळ येऊन चार शब्द बोलू शकलो नाही. आणि शकतही नाही. कारण तू मौनव्रत घेतलेस! आता कधीतरी होणार्‍या भेटीत तू फक्त हसतेस!’
म्हणत परत ते उठून बाहेर आले. उर्मिला दिसते का ते बघायला. एवढ्यात कुठून तरी कानावर सूर आले- उर्मिले! त्रिवार वंदन तुला. अन् मग डोळे मिटून शांतपणे ते तिथेच उभे राहिले.

Share this article