Close

उजास (Short Story: Ujaas)

शत्रू समोर असो वा लपलेला; साधारण कल्पना असते व लढणेही सोपे असते. पण रोजच्या जीवनात सहजपणे भेटणारा माणूस खतरनाक आतंकवादी असल्यास कोणालाही सहज कळून येत नाही. कोण जाणे कोणत्या क्षणी काय घडणार

आज जवानांची तुकडी उधमपुर होऊन निघाली. उद्यापासून डल लेक, लाल चौकला सुरक्षेसाठी तैनात व्हायचे होते. कश्मीर पोस्टिंगचे कळाल्यावर घरी सगळेच हादरले होते. भयंकर भीतीने गारठून गेले होते. प्रभात राव, नर्मदाबाई तर गर्भगळीत झाले. पण दुसर्‍याच क्षणी स्वतःला सावरलं. सैन्यात भरती होताना या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतातच; किंबहुना त्याची मानसिक तयारी होऊन जाते. म्हणून आतापर्यंत प्रत्येक वेळी तेजसला प्रोत्साहन देत आले.
‘तू एकटा नाहीस. बरोबर तुझे साथी आहेत. आमच्या शुभेच्छा व प्रेम आहे. तेच तुझे सुरक्षाकवच व ते नेहमी असणार.’
तेजस बीएसएफ मध्ये होता. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत, हवामानात त्याने आपली ड्युटी चोख बजावली होती व
त्याच्या आई-वडिलांनाही याचा खूप अभिमान होता, पण आत्ताची गोष्टच वेगळी होती. शत्रू समोर असो वा लपलेला; साधारण कल्पना असते व लढणेही सोपे असते. पण रोजच्या जीवनात सहजपणे भेटणारा माणूस खतरनाक आतंकवादी असल्यास कोणालाही सहज कळून येत नाही. कोण जाणे कोणत्या क्षणी काय घडणार!
रस्त्यावर दुतर्फा चिनारची वनराई पाहताना मनात विचार चक्र सुरु झाले. इतका सुंदर प्रदेश, आकाश स्वच्छ, प्रसन्न करणारी हवा, कळपात दूरदूर धावणारी मेंढरं, फुलांचे ताटवे, फिरण मधले स्त्री-पुरुष, गालावर लाली व इतस्ततः पसरलेले फुलांचे गालिचे किती सुंदर, मनोहर! याचा विध्वंस करताना काहीच कसे वाटत नाही? सुंदरतेला नष्ट करणं इतकं सोपं असतं का? मने इतकी कट्टर का केली जातात जिथे माणुसकी व विधात्याने निर्माण केलेल्या सृष्टीला काडीमात्र मोल नसावे? असो, विरोधाभास जगाच्या अनेक नियमांपैकी एक आहे.
दुसर्‍या दिवसापासून ड्युटी सुरू झाली. लाल चौकात दुकाने उघडी होती. हवेतच एक प्रकारची दहशत जाणवत होती आणि ही भावना इथल्या जीवनाचा भाग बनली होती. डोळे व कान सतर्क करणारी व तुटून पडायची तयारी. तेजस व त्याचे सहकारी सुरक्षा सैनिक तैनात झाले. दिवस सुखरूप पार पडला तर देवाचे आभार मानत झोपी जायचे; पण रात्रही सावधच. सकाळी उजाडले की देवाचे आभार मानायचे.
हळूहळू रुळता रुळता दोन आठवडे ही उलटले.
आज सुट्टीचा दिवस; तरी सावधगिरी बाळगूनच दैनंदिन कामे करत राहायची. रस्त्याने जात असतांना आपल्या बुटाची लेस लूज झालेली दिसली. नीट करण्यासाठी तेजस खाली वाकला. लेस ठीक करताना त्याला एक खुबानी पडलेली दिसली. आधी एक, नंतर दोन.
नंतर आणखी काही पडलेल्या अरे! त्याने पुढे नजर टाकली. दोन- तीन महिला गप्पा मारत चालल्या होत्या. एकीच्या हातात बांबूची टोकरी, दोन-तीन पुडके. एक पुडा उघडा व तिरपा झालेला. त्यातून पडणारी खुबानी. तेजसच्या सगळं लक्षात आलं. हातात गोळा करून तो धावतच पुढे गेला. अतिशय नम्रपणे आपली ओंजळ त्यांच्यापुढे धरली. ती मुलगी स्कार्फ घातलेली, ढिल्या सलवारीवर कुडतीघातलेली शोभून दिसत होती. ती मोहतर्मा जरा भांबावली. तिच्या कपाळावर आलेली शिकन आठ्यांचे जाळे क्षणार्धात विरले. आभार मानत त्या खुबानी परत
पुडक्यात घालून व्यवस्थित ठेवल्या. क्षणभरच दोघांची नजर भेट झाली व दोघेही नंतर आपापल्या मार्गाने निघून गेले.
रोज काही काही बातम्या कानावर येत होत्या. कश्मीर पोस्टिंग सोपी नव्हती. दर पावलागणिक धोका व मृत्यू जणू वाट बघतोय. असे असले तरी पण मनोबल मात्र खच्ची झाले नव्हते. एका बाजूस, त्याचं लोभसवाणं रूप, जीवन किती सुंदर आहे हे सांगत असतं व तर दुसर्‍या बाजूस अतिरेक्यांच्या कारवाया मात्र क्रौर्र्‍याचं एक नवीन भीषण रूप दाखवत असतं.
रात्री जेवताना एक सहकारी म्हणाला, ”यारा तेजस, कितनी खूबसूरत वादी है, कितनी खूबसूरती है!”
”यार चड्ढा, यहां की खूबसूरती बचानेके लिये ही हम आये है. और किसी बातों से हमे लेना देना नही है. न्यूजपेपर्स पढते हो ना? बहोत बडी जिम्मेदारी है.”


”हां भाई, सही है. मगर इल्जाम लगाने वालेभी कम नही.” चड्ढा जड उच्छ्वास सोडत म्हणाला.
‘’आपला काश्मीर सुरक्षित असो यासाठीच आपण येथे आहोत” म्हणत चड्ढाने जेवण आटोपले.
खबर आली होती कि एका जुन्या शाळेत अतिरेकी लपून बसलेत. त्यांच्या शोधात जायचे आहे.
सामान्य नागरिकही वचकून होते. भारतीय सैन्याबद्दल गैरसमज पसरवले जात होते. पण त्याची शहानिशा कोण कशी करणार? नियम कठीण होते. पाळणेही जरुरी होते. नागरिकांचा विश्वास जिंकणं महत्त्वाचं असतं. त्यांना मुख्य धारेत आणणं गरजेचं असतं.
दुपारची सुस्त वेळ. पण आकाश व इथलं वातावरण कायम आनंद देणारं.
काही मुलं आपल्या खेळात रमलेली. ‘रझाक, रझाक’ हाका मारीत ’ती’ आली. त्या मुलांपैकी एकाला पकडून नेत असताना अचानक तिची नजर तेजस वर गेली. तो आपल्याच विचारात गढलेला. आधी कश्मीरी भाषेत ती काही म्हणाली, पण त्याचा गोंधळलेला चेहरा बघून नंतर उर्दूत म्हणाली, ”जनाब, यहां आप लोगों की कोई जरूरत नहीं. खामखा समय जायर कर रहे हो! वैसे उस दिनके लिए शुक्रिया. वर्ना अम्मी बहुत गुस्सा होती.”
तेजसला काही कळायच्या आत ती भावाला हाताशी धरून निघाली. जाता जाता तिचा स्कार्फ निसटला. गोरी गुलाबी त्वचा, सुरमयी डोळे, निष्पाप व भांडखोर भाव तिच्या चेहर्‍यावर होता.
”शिरीन, मैं भी अम्मीजान से तुम्हारी शिकायत करुंगा!”, पाठमोरा रझाक बहिणीला धमकावत होता.
‘ओहो, हिचं नाव शिरीन आहे तर!’ तेजसला गंमत वाटली.
त्यानंतर अधून मधून ती नजरेस पडे. डल लेकमधे तिच्या वडिलांची एक छोटी बोट होती व सगळे कुटुंब कामामध्ये व्यस्त असे. दिवस उलटत होते. तेजस कश्मीरच्या वेगवेगळ्या ठिकाणी कामाकरता जात होता, पण जेव्हा कधी त्या डल लेक जवळ जाण्याचा प्रसंग येई, शिरीनच्या बोटीकडे हमखास लक्ष जायचं. आता रोजचे येणारे जाणारे नजर ओळखीचे झाले होते. काही रागाच्या नजरा आता नरमल्या होत्या. दुश्मनही रोजचे झाले होते.
”साब, एक रझाक नामका लडका आपके लिए यह थैली छोड गया है.”
तेजसला आश्चर्य वाटलं. ती कापडाची थैली उघडली तर आत खुबानी भरलेल्या.
त्याला कळालं कोणी पाठवल्यात. मनात कुठेतरी चंद्र उगवल्या सारखा वाटला, मंदमंद प्रकाशाचा, शीतल शीतल.
संकटे व आव्हानांचाही एक कैफ असतो. तेजसलाही तो जाणवू लागला.
कशासाठी? देशासाठी.
सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर त्याच्यासमोर असायचं. भावनिक गुंतवणूक त्याला परवडणारी नव्हती व त्याची इच्छाही नव्हती. शिरीन मात्र जणू हिमालयावरून वळसे, गिरक्या घेत आलेली हवीहवीशी वाटणारी थंडगार झुळुक. तिच्या भेटीत एक अनामिक ओढ होती. हवीहवीशी वाटणारी.
आपण वहावत तर चाललो नाही ना’ असा विचार करून तेजस मनाची कवाडं बंद करून घेईल पण शिरीनला जणू कसलेही बंधन जुमानायचे नव्हते. ती डोळ्यासमोर स्कार्फ नीट बांधत मंद स्मित करीत तेजसला सांगे, ”रौशन तुम्हीं से दुनिया!”
तेजसला स्पष्ट दिसत होतं कि ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. ते सर्वसामान्य नव्हतंच. तेजस कडून काही दुजोरा नसताना सुद्धा शिरीन जणू डोळ्याने भरभरून प्रेम करत होती. कुठेही उथळपणा नव्हता. जबरदस्ती नव्हती, एकतर्फी प्रेमाचे दुःख नव्हते. पण जिथे मन आपोआप उमलते, बहरते.. असं नातं दोघांमधे निर्माण झालं होतं. तेजस आपल्या मर्यादा जाणून होता. इथल्या लोकांची मानसिकताही. आपण ज्या क्षेत्रात काम करतोय् त्याचे नियमही शिरिन व तेजस एकमेकांच्या कुठेही आसपास असले तरी दोघांना एकमेकांचे
अस्तित्व न बघताही जाणवायचे. शिरीन स्वतःला झोकून द्यायला तयार होती, पण तेजसला ते नको होतं. आपापल्या ठिकाणी असूनच ही दैवी अनुभूती अनुभवणं क्रमप्राप्त होतं.
15 ऑगस्ट चा महत्वपूर्ण दिवस. कडेकोट बंदोबस्त होता. तेजसही सुरक्षाकवचचा भाग होता. तो गर्दीला न्याहाळत उभा असतांना सिविलियन पण जमा झालेले होते. इतक्यात त्याच्या कानावर आवाज पडला, ”ये लीजिए, जरूर खाइयेगा” कमनीय बोटाने हलकेच तिने स्कार्फ नीट केला. तिचं एक सलज्ज स्मित सुखावून गेलं. ‘खाइयेगा’ म्हणणं तर ठीक आहे पण असं काही खाणं योग्य नव्हे. त्याने तो पुडा शर्टच्या आत लपवला. आपल्या बॅरॅकवर पोचल्यावर ‘खुबानी का मीठा’ हा प्रसिद्ध गोड पदार्थ आधी एका कुत्र्याला खाऊ घातला. त्याला काहीही झालं नाही. मग तेजसने तो आपल्या जिभेवर ठेवला. सुंदर चव होती.
सप्टेंबर महिना संपता संपता तेजसला बदलीची ऑर्डर मिळाली. लवकरच
त्याला आसाम गाठायचे होते. तेजस हादरला. हे काय अचानक! जेमतेम दीड वर्ष तर झालंय. इतक्यात? इतकं गोड स्वप्न पडलं होतं! आज अचानक खाड्कन जाग आली जणू. रझाक ‘साब, साब’ म्हणत धावतच आला. ‘’आपाने कुछ भेजा था. खा
लीजियेगा. आपको कुछ नही होगा.”
”खाया मैंने. बहुत अच्छा था!” तेजस मिश्कीलपणे म्हणाला.
आता पतझडच्या मौसमची सुरुवात झाली होती. वातावरण बदलत होते. भाच्यांकरता क्रिकेट बॅट घेण्याकरता तेजस खरेदीला निघाला. जात असताना त्याला वाटलं मागे मागे कोणी तरी येत आहे. त्याने बघायचे टाळले, पण शंका खरी होती. दुकानात पोचल्यावर बॅट निवडत असताना तोच मधुर आवाज कानी पडला,
”जा रहे हो क्या? तबादला होने परही लोग एैसी खरीददारी करते हैं” शिरीनने तो दुसरी बॅट हाताळत असताना हळूच विचारले.
”तू माझ्या मागावर आहेस का? गुप्तहेर?” तेजस ने हसत विचारले.
” पता तो चलही जाता है, जनाब! मैं तो कयामत तक आपके साथसाथही रहूंगी ‘’ खोडकरपणे शिरीन उत्तरली.
”होय. दिवाळी करता खरेदी चालली माझ्या घरच्यांसाठी.”
मैंने ठीकही सोचा था. जा रहे हो?” व्याकूळ होणार्‍या शिरीनची आर्तता तेजसच्या हृदयात खोलवर उतरली. पण तटस्थपणे तो उत्तरला,” ”अरे दिवाली आ रही है ना! यहां होता तो शायद कुछ दिये डल लेक में बहा देता.” तेजसने हलकेफुलके उत्तर दिले.
आता काही नजरा त्यांच्याकडे वळल्या क्षणी शिरीन झटदिशी बाहेर निघून गेली.

सगळ्या गोष्टी भराभर घडत गेल्या. मेसमध्ये निरोप समारंभ झाला. य दीड-दोन वर्षांत कश्मीर तेजसच्या अस्तित्वाचा भाग झाला होता. वरतून निर्विकार असणार्र्‍याा तेजसच्या मनात नंदनवन फुलवले होते, पण आता जावं तर लागणारच. तसेही एकत्र येऊन संसार करणे अशक्य होते. किंबहुना म्हणूनच शिरीन अशरीरी वाटत होती. तिच्यासमोर खूप भिंती उभ्या होत्या. पार करणं शक्य नव्हते. सगळे सोडून देणेच योग्य.
आता आसामला आल्यानंतर आठवडा भरातच दिवाळी आली.
तेजसला बॉसने बोलावलं. त्याच्या नजरेचा भेद घेत म्हणाले,”तेजस, काश्मीर तुझ्याबरोबर आहे की मागे सोडून आलास?”
”नो सर, काश्मीर आहे तिथेच आहे. मीच निघून आलो.”
”जे केलंस ते बरंच झालं.” तेजसच्या मनात वादळ चाललं होतं.
”हॅलो हॅलो हॅलो” फोनवरून एका परिचित व्यक्तीचा आवाज आला. चड्ढा बोलत होता.
”यारा तेजस, मी गेलो होतो संध्याकाळी बाहेर. परतताना उशिरा रात्री मी ‘ति’ला बोटीजवळ बघितलं. डल लेक मध्ये तिने दिवे सोडले होते पाण्यात. ऐकतोस ना?” तेजस सुखात चिंब भिजला. छातीवर हात ठेवून सगळं सगळं दफन करत असताना त्याच्या अंतरात शिरीन ने सोडलेल्या दिव्यांचा प्रकाश भरून राहिला.

  • प्रिया कुलकर्णी

Share this article