उशीरा का होईना, आपण कुणाच्यातरी उपयोगी पडू शकतो ह्या भावनेने मुकुंदराव सुखावले. त्यांनी ताबडतोब हा ई-मेल्स पाठवण्याचा प्रस्ताव स्विकारला. थोड्याच दिवसाच मुकुंदराव वृद्धाश्रमात सर्वांना हवेहवेसे वाटू लागले.
एकदम मोठ्याने आवाज आला आणि मुकुंदरावांची झोप चाळवली. त्या आवाजातल्या कृत्रिमपणाने त्यांच्या कपाळावर नकळत एक आठी उमटली. दहाबारा जणांनी सकाळी सकाळी जमायचं,
कसे बसे हातपाय हलवायचे आणि चेहर्यावर निर्विकार भाव ठेऊन मोठ्या मोठ्याने हसण्याचे आवाज काढायचे हे त्यांना कधीच पटणार नव्हतं.
चालायचंच! ह्या वृद्धाश्रमात त्यांना येऊन फक्त आठवडाच झाला होता. थोड्या वेळाने ते चहासाठी खोलीबाहेर पडले. हसण्याचे आवाज येतच होते. ‘सुमी असती तर दुसर्याच दिवशी हास्य क्लबची मेंबर झाली असती.’ त्यांच्या मनात आले.
या आश्रमातील डायनिंग रूम मोठी प्रशस्त आणि हवेशीर होती. दोन बाजूंनी पूर्ण उघडी. आजुबाजूला शेवंती, सदाफुलीची रोपं, कोवळ्या लुसलुशीत गवतामध्ये छोट्या कमानींवर सायली, चमेली, मधुमालतीच्या वेली सोडलेल्या होत्या. माणसाचं मन प्रसन्न राहण्यासाठी जे करता येईल ते सगळं केलेलं होतं. पण बाहेरच्या दृश्यावरून नजर आत फिरली की गलितगात्र शरीर, उदासवाणे चेहरे आणि मन कुरतडणारी एकटेपणाची जाणीव सर्वस्व व्यापून राही.
मुकुंदरावांचा चहा पिऊन झाला. ते उठणार इतक्यात पाच सहा माणसांचा घोळका आत आला. त्यातल्या कर्वेशी मुकुंदरावांची ओळख झाली होती.
‘अहो, थांबा हो नाडकर्णी, एक महत्त्वाची मिटींग आहे.’ कर्वे मुकुंदरावांच्या टेबलजवळ येत म्हणाले, ‘कसली मिटींग?’
‘अहो, पुढच्या आठवड्यात महिला दिन आहे ना? या वर्षी आपण सगळ्या जेन्टस् मेंबर्सनी मिळून आपल्या आश्रमातल्या लेडीजसाठी काही तरी खास कार्यक्रम करायचं ठरतंय.’
कर्वे म्हणाले.
पांढरी हाफ पँट, चट्टेरी पट्टेरी टि-शर्ट, सडपातळ अंगयष्टी आणि नेहमी प्रसन्न असणार्या ह्या माणसाबद्दल मुकुंदरावांना प्रथमदर्शनीच कुतुहल निर्माण झालं होतं. ‘महिला दिन’ वगैरे गोष्टी त्यांच्या दृष्टीने अगदीच फालतू होत्या. पण समोरच्या उत्साहमूर्तीला टाळणं कठीण होतं. थोड्याशा अनिच्छेनेच मुकुंदराव त्या घोळक्यात जाऊन बसले.
‘नाना, करमणुकीचा कार्यक्रम म्हणताय तुम्ही, पण पाटील सोडले तर गाणारे पुरुष आर्टीस्ट आहेत कुठे?’
‘गोखले अजून महिनाभर मुलीकडे राहणार आहेत. तबला कोण वाजवणार?’
‘मग त्यापेक्षा आपण लेडीजसाठी स्पर्धा घेऊ.’
‘काय बोलताय तुम्ही? अर्ध्या बायकांचे गुडघे कामातून गेलेत. कुणाची दृष्टी धड नाही, तर कुणाला कंपवात. स्पर्धा घेणार तरी कसली?’
मुकुंदराव तटस्थपणे सगळं संभाषण ऐकत होते. त्यांना सुमतीची, आपल्या बायकोची आठवण झाली. चार महिन्यांपूर्वी ती गेली आणि त्यांचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. लहानसहान गोष्टींत तिच्यावर अवलंबून राहण्याची त्यांची सवय. ती असेपर्यंत मात्र तिला बरं वाटावं असं काहीच त्यांच्या हातून घडलं नाही. ती गेली ती पण झोपेतच. त्यांच्या बाजूला , त्यांच्याच बेडवर. पण शेवटच्या क्षणी देखील आपण तिच्यासाठी काही करू शकलो नाही याची बोच त्यांच्या मनात कायमची राहिली होती.
सुमती कधीतरी म्हणे. ‘एक कप चहा तरी करा की कधीतरी. मला पिऊ दे जरा तुमच्या हातचा.’
पण नाही. शेअर ब्रोकींगची फर्म सांभाळता सांभाळता सगळं आयुष्य सरलं. उरला फक्त रुक्षपणा. कसला छंद लावून घेतला नाही की कधी मित्र जोडले नाहीत. काम, काम आणि
काम बस्स!
एकदम कसल्या तरी उर्मीने ते उठले आणि म्हणाले, ‘आपण महिला दिनाच्या दिवशी सर्वांसाठी चहा-नाश्ता वगैरे करू.’
‘फर्स्टक्लास आयडिया!’
कर्वे म्हणाले.
‘त्या दिवशी स्वैपाकाच्या मावशींनासुद्धा थोडा आराम देता येईल’- नाना.
‘बरोबर! पण आत्ता इथे चर्चा नको. थोडा सस्पेन्स राहू दे.’
इतक्यात सखाराम चहा घेऊन आला. ‘पाटीलकाका, चहा तयार आहे. तुम्ही नेताय का मंदाला पाठवू?’
‘नको नको. मीच नेतो. दे इकडे,’ पाटील म्हणाले. आणि चहाचा ट्रे घेऊन बायकांच्या खोल्यांकडे निघून गेले.
‘चला. दुपारी भेटू तेव्हा पुढचा बेत ठरवू.’ समोरचा पेपर उचलत कर्वे उठले. नाना तिथंच बसून राहिले.
मुकुंदराव देखील कर्व्यांबरोबर निघाले. त्यांच्या दोघांच्याही खोल्या एकाच मजल्यावर होत्या. जिन्यावर त्यांनी कर्व्यांना विचारले.
‘ते पाटील चहा घेऊन कुठे गेले?’
‘अहो त्यांची मिसेस पण इथेच असते. तिला अल्झायमर झालाय. त्यांना कधी ओळखते, कधी ओळखत नाही. पण ते रोज सकाळ संध्याकाळी तिला भेटायला जातात.’
‘पण अल्झायमरच्या पेशंटला इथे घेतलं कसं?’ मुकुंदरावांचा प्रश्न.
‘हा आश्रम आता ट्रस्टच्या नावावर आहे. पण अगदी सुरुवातीला पाटलांच्या मोठ्या भावाने हा सुरू केला होता. म्हणून त्यांना इथे राहण्याची परवानगी मिळाली. नाहीतर पाटीलचं कठीणच होतं. तरी त्याने वर्षभर तिला घरीच सांभाळलं. ना मूल ना बाळ. काय करणार बिचारा!
‘हूं…… तुम्ही केव्हापासून
आहात इथे?’
‘दोन वर्ष होतील. मला दोन मुली. एक जर्मनीला असते. दुसरी हैदराबादला. मिसेस गेल्यावर दोघींकडे थोडे थोडे दिवस राहिलो. मग काही महिने एकटाच होतो. पण मुली ऐकेनात. त्यांच्या घरी जाऊन राहाणं माझ्या मनाला परवडेना. मग सरळ इथे आलो. मालाडला घर आहे माझं. सध्या भाड्याने दिलंय. पण इथे माझा वेळ जास्त चांगला जातो. मुलीही निश्चिंत. तुमचं काय? थोड्याच महिन्यांसाठी आलायंत असं ऐकलं.
‘हो. माझी सून बँकेत मॅनेजर आहे. तिची एका वर्षासाठी सोलापूरला बदली झालीये आणि मुलगा सहा महिन्यांसाठी अनेरिकेला गेलाय. मला ब्लड प्रेशर आणि वर्टिगोचा त्रास आहे, त्यामुळे एकटं राहण्याची सोय नाही. मुलगा परत आल्यावर मात्र मी जाणार. शेवटी आपलं घर ते आपलं घर!’
यावर काही न बोलता कर्वे
आपल्या खोलीत गेले. मुकुंदराव व्हरांड्यातच थांबले.
खालच्या बागेत सखाराम नवी रोपं लावत होता. सुमतीला झाडाचं फार वेड होतं. ती गेल्यावर मात्र बागेची सगळी रयाच गेली. त्यांच्या मुलाला, सुनेला वेळ नव्हता आणि त्यांना स्वतःला बागकामाची आवड नव्हती. शेवटी सगळ्या कुंड्या आजुबाजूच्या शेजार्यांना देऊन टाकल्या.
‘सखाराम, कसलं ‘रोपटं
लावतोयस रे?’ नकळत त्यांच्या तोंडून प्रश्न बाहेर पडला.
‘सोनचाफ्याचं.’
‘थांब, मी पण आलो.’ मुकुंदराव लगेचच खाली उतरले.
नव्याने रुजवलेल्या रोपाच्या मुळाशी त्यांनी हलकेच थोडी माती सारली. बाजूला ठेवलेली झारी उचलून त्याला थोडं पाणी घातलं, मुळाजवळ थोडं थोपटल्यासारखं केलं.
सुमती जवळच उभी राहून हे सगळं कौतुकाने न्याहाळतेय असा त्यांना भास झाला.
‘तू किती वाजता झाडांना पाणी घालतोस?’
‘सकाळी आठला आणि संध्याकाळी पाच वाजता.’ सखाराम म्हणाला.
‘मी पण उद्यापासून येईन. नको, आज संध्याकाळीच येतो. आपण दोघे मिळून पाणी घालू.’
दुसर्या दिवशी मुकुंदरावांनी मुलाला-सुनेला आश्रमाविषयी अनेक गोष्टी ई-मेलद्वारे कळवल्या. सुरुवातीला खूप कंटाळलेले बाबा आता हळूहळू रमतायत हे पाहून त्यांनाही बरं वाटलं आणि शेवटी सहाच महिन्यांचा प्रश्न होता.
एक दिवस मुकुंदराव पाटीलांबरोबर त्यांच्या बायकोला भेटून आले. आजारपणामुळे असेल कदाचित, पण खूप वयस्क दिसत होती. ओळखल्याची कुठलीच खूण तिच्या चेहर्यावर नव्हती. चहाची बशी तोंडाला लावल्यावरसुद्धा तिला तो धड पिता येत नव्हता.
मुकुंदराव न राहवून पाटीलांना म्हणाले, ‘तुमची खरंच कमाल आहे. कर्वे सांगत होते तुम्ही ह्यांची किती सेवा करता ते. पण त्या तुम्हाला ओळखत असतील का?’
‘त्याने मला काही फरक पडत नाही. मी तिला ओळखतो ना, मग झालं तर! जोडीदाराचा खरा अर्थ म्हातारपणीच कळतो नाडकर्णी.’
पाटीलांच्या उत्तराने मुकुंदराव अंतर्मुख झाले. सगळ्या आयुष्याचा पट भरभर उलगडू लागला. तरुण वयात जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी घरच्या विरोधामुळे संसार करू शकले नाहीत. सुमती रंगरूपाने सामान्य आणि बुद्धीने तर अतिसामान्य. त्यांच्या मनातली जोडीदारीण अशी कधीच नव्हती. मनमेळ कधी जुळला नाही आणि सूरही जुळले नाहीत. सहवासाने काय निर्जीव वस्तूंचादेखील लळा लागतो. तिच्या जाण्यामुळे ते एकटे पडले खरे पण ते लोकांच्या नजरेतून. मनातून ते कायम एकटेच होते. आता मात्र त्यांच्या मनात आलं, ‘मी माझ्या जोडीदाराला कधीच समजून घेतलं नाही. जगाच्या आर्थिक घडोमोडींचं विश्लेषण करण्यात मला रस. तर कांदे-बटाटे महाग झाले, या पलिकडे सुमीची समज जात नसे. इथे आल्यावर कळतंय की आयुष्यात आनंदाच्या अनेक छटा असतात. त्यांचा अनुभव घ्यायला मी मात्र कमी पडलो. सुमी, तिच्या मैत्रिणी, मासिकं,बागकाम, व्यायाम आणि स्वयंपाकघर यात छान रमली. आयुष्य भरभरून जगली.’
आपल्याच विचारात चालताना त्यांची पाऊलं सहजच लायब्ररीकडे वळली. तिथले सुपरवायझर निमकर समोरच्या वर्तमानपत्रावर हिरव्या, मार्करने खुणा करत होते. ‘काय चाललंय निमकर?’ मुकुंदरावांनी विचारलं. ‘आपल्याकडे रोज 11 वाजता पेपरातल्या निवडक बातम्या वाचून दाखवण्याचा कार्यक्रम असतो. आपल्याकडे अनेकांना नीटसं दिसत नाही पण जगात काय चाललंय यात इंटरेस्ट आहे. कधी कर्वे तर कधी मी हे काम करतो.’
‘मी इथे असेपर्यंत हे काम
करू शकतो.’
‘जरूर, आम्हाला अशा माणसांची नेहमीच गरज असते. मी तुम्हाला विचारणारच होतो. तुम्ही कॉम्प्युटरवर नेहमी दिसता. अहो, आपल्याकडे कितीतरी जणांकडे मुलांचा ई-मेल आहेत पण कॉम्प्युटर वापरता येणारे फार थोडे. बघा, तुम्हाला त्यांना काही मदत करता आली तर.’
उशीरा का होईना, आपण कुणाच्या तरी उपयोगी पडू शकतो ह्या भावनेने मुकुंदराव सुखावले. त्यांनी ताबडतोब हा ई-मेल्स पाठवण्याचा प्रस्ताव स्विकारला. थोड्याच दिवसाच मुकुंदराव वृद्धाश्रमात सर्वांना हवेहवेसे वाटू लागले.
महिला दिनाच्या दिवशी तर वातावरण एकदम बदलून गेलं. पाटील आणि कर्व्यांनी किचनचा ताबा घेतला होता. बटाटेवडे आणि गोड शिरा असा फक्कड बेत ठरला होता. त्यांच्या हाताखाली काम करायला अनेक जण पुढे आले. व्हिलचेअरवर बसून लसूण सोलून देणारे कारखानीस सर्वांच्या कौतुकाचा विषय होते. आश्रमातल्या सगळ्या महिलांना गुलाबाची फुलं देण्यात आली.
वयाने अडूसष्ठ म्हणजे त्यातल्या त्यात तरुण असणार्या मुकुंदरावांकडे बिछान्यातून उठू न शकणार्या महिलांना चहा नाश्ता नेऊन देण्याचे काम आले. ते त्यांनी मोठ्या उत्साहात पार पाडले.
दुपारी कुठल्यातरी संस्थेतर्फे तरुण मुलांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला. त्यातली वडील आणि मुलीच्या नात्याची एक कविता त्यांना फार आवडली. त्यांनी ती स्वतःच्या डायरीत लिहून घेतली आणि रात्री सुनेला मेल केली. मुलालाही एक लांबलचक
ई-मेल पाठवला.
दुसर्या दिवशी जेवणं चालली असताना ऑफिसमधला शिपाई मुकुंदरावांना बोलवायला आला.
‘साहेब, तुमच्या मुलाचा
फोन आलाय.’
‘अरे वा! नाडकर्णी, नशीबवान आहेस बाबा,’ कुणीतरी म्हणालं.
मुकुंदरावांना मात्र हा फोन अपेक्षित होता. ‘बाबा, अहो काय लिहीलंय तुम्ही? कायमचे तिथेच राहायचं म्हणताय?’ मुलाने एकदम मु्द्यालाच हात घातला.
‘अरे हो. मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. माझा वेळ इथे खूप छान जातोय. गेल्या दिड महिन्यात एकदासुद्धा बी. पी. वाढलं नाही आणि तू परत आलास की अधून मधून घरी फेरी मारीनच मी.’
‘अहो पण बाबा….’
बराच वेळ फोनवरून दोघंही आपापली बाजू मांडत होते. पण
अखेर मुकुंदरावांचं म्हणणं त्याला
पटलं. रात्री जेवणं झाल्यावर रोजच्यासारखे ते कर्व्यांबरोबर बागेत फेरी मारायला आले.
एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या आश्रमाच्या वर्धापन दिनासाठी काय काय कार्यक्रम करायचे याची जोरदार चर्चा सुरू झाली.
वाटेतल्या सोनचाफ्याच्या रोपट्याकडे मुकुंदरावांची पावलं थबकली. हळू वाकून त्यांनी नव्यानेच फुटलेल्या कोवळ्या पालवीवरून हलकेच हात फिरवला आणि नव्या उमेदीत ते पुढे निघाले.