कडूबाच्या अंगणात एकच गलका झाला. त्यानं बाहेर येऊन पाहिलं. सरपंचासोबत गावातली काही माणसं होती. पाटलांच्या हातात त्यांची गंगा शांतपणे झोपली होती.
या वर्षीही मेघराजा रुसला. पाऊस पडलाच नाही.धरती माता रुसली. तिची तहान भागली नाही. जमिनीला भेगा पडल्या. माणसांना, जनावरांना प्यायला पाणी नाही. एक हंडा भरून आणण्यासाठी भर उन्हात लांबवर पायपीट करावी लागते. पाटलाच्या विहिरीत उतरून तांब्याने पाणी काढायचे. एक हंडा भरायला अर्धा तास लागतो.
कडूबा दोन एकर शेतीचा मालक. कोरडवाहू जमीन, वरच्या पाण्याच्या भरवशावर. पाऊस चांगला पडला, तर पीक जोमानं वाढेल, नाहीतर जमिनीच्या कुशीतच करपून जाईल. यंदाचं हे पाचवं वर्षं. पाऊस मनाजोगता पडलाच नाही. जमिनीची तहान भागलीच नाही. वीस हजाराचं कर्ज काढून बियाणं आणलं, पेरलं, खत घातलं. पण पावसाअभावी ते जमिनीच्या कुशीतच करपून गेलं. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही… कसं जगावं गरिबानं?
कडूबाच्या घरात खाणारी पाच तोंडं… त्याची लक्ष्मी अन् तीन मुली…
मोठी राधा, तिच्या पाठीवरची गंगा अन् सर्वांत लहानगी गोदा. राधा
बारा वर्षांची होती. आपल्या बाबाची गरिबी तिला समजत होती. “बाबा,
मी पाणी आणाया जातेय”, असे म्हणून दहा वर्षांची गंगा हातात छोटी कळशी घेऊन, पायात फाटकी चप्पल घालून चालू लागली.
“गंगा, बाई ऊन फार तापलंय, एकली जाऊ नगंस. संग मायला घेऊन जा.”
बाबाचं बोलणं तिनं ऐकलं नाही. ती पळत निघून गेली. बाहेर सूर्य आग ओकत होता.
“लक्ष्मी! ए लक्ष्मी, बघ गंगा एकलीच गेली पाण्याला. जा तिच्या मागनं लवकर!” कडूबाच्या आवाजात लेकीबद्दल चिंता होती.
“व्हय जी! एवढी भाकर शेकली
की जाते!” असं म्हणून तिनं चुलीत लाकूड घातलं.
एवढ्यात कडूबाच्या अंगणात एकच गलका झाला. त्यानं बाहेर येऊन पाहिलं. सरपंचासोबत गावातली काही माणसं होती. पाटलांच्या हातात त्यांची गंगा शांतपणे झोपली होती.
“पाटील, पाटील काय झालं?” आता लक्ष्मीही बाहेर आली.
कडूबाने गंगाला आपल्या दोन्ही हातांवर घेतलं.
“कडूबा! धीरानं घे रे बाबा. हिंमत ठेव. ही गंगा गेलती विहिरीवर पाणी आणायला. तिला चक्कर आली अन्
ती विहिरीत पडली.”
आपल्या लेकीला निष्प्राण पाहून दोघांनी रडून जिवाचा आकांत मांडला. या पाण्याने एक बळी घेतला होता… निष्पाप बळी!
गंगाला जाऊन सहा महिने झाले.
मृग नक्षत्र उलटून गेलं, तरी पावसाचा पत्ता नव्हता. मेघराजा कुठं दडून बसला होता, कोण जाणे!
या वर्षी राधाचं लगीन करणं जरुरीचं होतं. एक मुलगा त्यानं पाहून ठेवला होता. कडूबा त्याच्या घरी गेला.
“कडूबा, तुझी राधा मला प्रकाशसाठी पसंत आहे. पण, पाच हजार हुंडा पाहिजे. जमलं तर बघ.”
“रामजी भाऊ! म्या पडलो गरीब.
हुंडा कुठून देऊ? माझी राधा सुंदर, गुणी हाये. पदरात घ्या भाऊ!”
“नाही कडूबा! हुंड्याबिगर जमणार नाही.” रामजी म्हणाला. नाराज मनाने तो घरी आला. लक्ष्मीला म्हणाला, “लक्ष्मी! माझं ऐक. राधाच्या लग्नासाठी एक एकर जमीन गहाण ठेवू. प्रकाश चांगला मुलगा हाय. शिवाय कमावणारा बी हाये बघ.
राधा सुखी व्हईल. बघ पाऊस पडंना, शेती पिकंना. दुसरा काय इलाजच न्हाय बघ.”
“म्हंजी? आपण मजूर व्हायचं? दुसर्यांच्या शेतात राबायचं? नाही. नाही. जमीन गहाण नाही ठिवायची. दुसरा पोरगा बघा. गरीब घरचा.” लक्ष्मी व्यवहार चतुर होती. तिला माहीत होतं, एकदा का सावकाराकडे जमीन गहाण ठेवली, की ती त्याच्या घशात जातेच.
बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले होते. या वर्षी तरी चांगला पाऊस पडेल. धरणीमाता तृप्त होईल. बळीराजा सुखावेल. पण आभाळात काळे ढग जमा होत… जोराचा उधाण वारा सुटे नि त्यासोबत फुफाटा…
ढग पळून जात. मागे राही फक्त
भेगा पडलेली काळी आई अन् शेतात राब-राब राबूनही उपाशी पोटी, जागीच करपून गेलेला बळीराजा!
पूर्वा आणि उत्तरा नक्षत्रही कोरडेच गेले. कुठेतरी चार-दोन थेंब पडले… आभाळ रडल्यासारखे. पण त्यानं काही तृप्त झाली नाही धरणी माता. तिची तहान भागली नाही! तृषार्त धरणीमातेच्या कुशीतच बी जळून गेली. बळीराजाचं रितं शेत… पोटं कशी भरायची?
अन् राधाचं लगीन कसं करायचं? नाना प्रश्नांनी कडूबाचा गोरापान चेहरा काळा ठिक्कर पडला. काळ्या भूमीत पडलेल्या भेगा चिंतेच्या आठ्या बनून त्याच्या कपाळभर पसरल्या होत्या.
“कडूबा! ए कडूबा! हाय का घरी?” शेजारच्या गावचा हणमंता आला होता.
“राम राम भाऊ! या या!”
“राम राम कडूबा! कसा हाईस?”
“पाऊस पाणी पडंना भाऊ! चिंतेनं जीव टांगणीला लागलाय!”
“कडूबा! आरं, राधाचं लगीन करतो की नाय यंदा?”
“भाऊ! लगीन तर करायचं हाय… पर मनाजोगता सोयरा मिळंना.
मुलगा कमवता आसंल तर बघू. जमीन पिकंना, लगीन कशाच्या भरवशावर करू?”
“तू कायबी चिंता करू नगंस.
एक सांगावा आलाय. किसन वकिलाच्या हाताखाली काम करतो. कमाई चांगली हाय. पण…” हणमंता भाऊने बोलणे अर्धवट सोडले.
“भाऊ! बोल ना! काय म्हणणं
हाय तुमचं?”
“कडूबा! किसनची बायको मागल्या साली वारली. दोन पोरं हायती. त्यांना भाकरी घालाया त्याला दुसरं लगीन करायचं हाय!”
“एवढा मोठा नवरदेव! माझ्या राधेला आत्ता चौदावं लागलंय. खूप लहान हाय ती.”
“कडूबा! हे बघ आपण गरीब लोकं. पाऊस पडंना… शेत पिकंना… खायची मारामार. त्यात लगीन कसं करणार? बघ तू. इचार करून सांग. तुला वाईट वाटलं आसल, तर मला माफ कर!”
हणमंता गेला खरा, पण कडूबा आजच्या घडीचा विचार करू लागला. यंदा पण शेत नाही पिकलं, तर कसं होणार राधाचं लगीन? दुनिया लई वंगाळ निघालीय… गावातल्या एका जवान पोरीला कुणीतरी पळवून नेलं. काय करावं? एकदा बघून तर यावं, म्हणून कर्जानं पैसं काढून तो हणमंतासोबत मुंबईला गेला. किसनचं घरदार पाहून त्यानं, राधा-किसनच्या लग्नाचा बार उडवून दिला!
राधा, किसनसमोर त्याची मुलगीच दिसे. लहान जिवावर संसाराचा भार पडला. सकाळी लवकर उठून राधा सर्व कामं करी. तिची दोन्हीही मुलं तिला जीव लावीत. ‘आई! आई!’ म्हणत सतत तिच्या मागेच असत. तिचीही त्या दोघांवर अपार माया होती.
मोठा हरी या वर्षी दहावीत होता. तो अभ्यासात लई हुशार होता. लहानगा पांडू पाचवीत शिकत होता. दोघांच्याही नाश्त्याची, डब्याची जबाबदारी राधा उत्तम पार पाडीत होती.
आपली आई शाळा शिकली नाही, याचं हरीला फार वाईट वाटत असे.
“आई! तू फार हुशार आहेस. पण शाळा का नाही शिकलीस? आज तू मास्तरीण झाली असती ना?”
“हरी! बाबांच्या घरी फार गरिबी… पाऊस पडत नाही… शेत पिकत नाही. दोन वेळच्या खायचीही मारामार असताना मी शाळेचं तोंड कशी पाहणार?” बाबांची गरिबी आठवून राधेच्या डोळ्यांत पाणी आलं.
“पण मला शिकायची भारी हौस होती. शेजारच्या कमलीच्या पुस्तकातली चित्रं मी पाहत असे. डोंगरातून धावणारी नदी, त्यावरून उडणारे पक्षी मला
खूप आवडत.”
“आई, तुझी शिकायची हौस मी
पुरी करतो ना! शाळेतून घरी आल्यावर रोज एक तास तुला मी शिकवणार. आई, आज शिक्षणाला फार महत्त्व आहे!”
“हो ना! सावित्री माई, थोर इंदिराजी, सरोजिनी नायडू या खूप शिकलेल्या होत्या. मी लहानपणी आईला म्हणायचे… आई, ‘दे ना मला कलमाची शिदोरी, साक्षरतेचा झेंडा लावीन भारत भूवरी!’ पण…”
“अगं आई! तुला तर खूपच माहिती आहे. चल आत्तापासूनच तुझा अभ्यास सुरू! आजचा पहिला धडा घे… तू फार लवकर शिकशील.”
“अरे हरी! माझं काय हे शिकण्याचं वय हाय?”
“आई, अगं मनुष्य हा आजन्म विद्यार्थी असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.”
हरी रोज शाळेतून घरी आल्यावर राधाला शिकवू लागला. पण राधा नेहमी हरीजवळ असते, तो तिला शिकवतो, हे किसनला आवडलं
नाही. दोघंही तरुण होते. काही विपरीत घडलं तर?…
हरी दहावीत प्रथम क्रमांकाने
पास झाला. त्याची आई राधा
आता वर्तमानपत्रही वाचत असे.
हरीने अकरावीसाठी प्रवेश घेतला
अन् किसनने त्याला वसतिगृहात पाठवून दिले. राधाला हरीची खूप काळजी वाटे.
“अहो, तिथे हरीची काळजी कोण घेणार?”
“खूप मुलं असतात तिथं. शिवाय बाहेरच्या जगाचीही ओळख त्याला व्हायला हवी ना!”
राधा खूप रडली. तिला त्याची खूप आठवण यायची.
कालचक्र धावतच होते. सहा महिने लोटले. एके दिवशी हरीच्या वसतिगृहातून एक शिपाई किसनला बोलवायला आला. हरी खूप आजारी होता. त्याच्या शरीरात रक्ताची कमतरता होती.
किसन म्हणाला, “डॉक्टर साहेब, मला साखरेचा आजार आहे. माझं रक्त हरीला चालणार नाही. तुम्ही रक्तपेढीतून रक्त मागवा. पैशांची
चिंता करू नका.”
“किसन! रक्त मिळालंय. ये इकडे.”
हरीला रक्त चढविण्यात येत होतं. ते राधाचं रक्त होतं. माय-लेकाचं हे नातं पाहून किसनच्या डोळ्यांत आनंदाश्रूंनी गर्दी केली होती. त्याने पवित्र राधावर शंका घेतली होती… आणि त्याच्या मनातली ही शंका पश्चात्तापाच्या अश्रुधारांनी धुऊन निघाली होती.