Close

प्रतिभेची पोलीस चौकशी! (Short Story: Pratibhechi Police Chaukashi)

  • भा. ल. महाबळ
    प्रतिभा ही दैवी देणगी आहे. ती मला पामराला दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानले.आजकालच्या कथालेखकांची नावे मी घेत नाही. मी त्यांना लेखक न म्हणता लेखंक म्हणतो. खंक म्हणजे दरिद्री, गरीब. भक्कम कथाबीज असेल तरच कथा फुलेल, फळेल. मला जबरदस्त कथाबीज सापडले आहे.
    चिंचेच्या झाडाखालच्या जागृत पारावर, पाय पसरून बसल्या बसल्या, मोकाशींची प्रतिभा जागी झाली. आपले मित्र विठ्ठलभक्त परब व तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. पाटणकर (साठाव्या वर्षी निवृत्त. चालू वय 85) यांना कथाबीज सांगावं असं मोकाशीना वाटलं. पण धोरणीपणानं मोकाशीनी मनाला लगाम घातला. विठ्ठलभक्त परबांना फक्त तुकोबा माहीत आहेत आणि पाटणकर आहेत तत्त्वज्ञानप्रेमी! या दोघांना कथा या गुळाची चव कोठून माहीत असणार?
    मोकाशीनी झाडाखाली स्थापन केलेल्या, भल्यामोठ्या दगडावर कोरलेल्या, ‘बुद्धिमताम् वरिष्ठ:’ अशा मारुतरायांना, बसल्या जागेवरून पाठ वळवून नमस्कार केला. प्रा. पाटणकरांनी विचारलं,“नमस्कार कशासाठी? काही विशेष?”
    मोकाशी म्हणाले,“कथाबीज सुचले. प्रतिभा जागी झाली. प्रतिभा ही दैवी देणगी आहे. ती मला पामराला दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानले. गंगाधर गाडगीळ हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक, पु.भा.भावे हे पत्रकार, पण दोघेही श्रेष्ठ कथाकार होते. आजकालच्या कथालेखकांची नावे मी घेत नाही. मी त्यांना लेखक न म्हणता लेखंक म्हणतो. खंक म्हणजे दरिद्री, गरीब. भक्कम कथाबीज असेल तरच कथा फुलेल, फळेल. मला जबरदस्त कथाबीज सापडले आहे.”
    अर्थशास्त्र, पत्रकारिता या बाबी परब व पाटणकर यांनी वेळोवेळी ऐकल्या होत्या. या अगम्य शास्त्रातील मंडळी कथा लिहितात हे समजल्यामुळे त्यांनी मोकाशींना विचारलं, “बसल्या जागी, हातपाय न हलवता तुम्हाला कथा सुचली? कमाल आहे! कथाबीज सांगा. पण थोडक्यात सांगा.”
    मोकाशी म्हणाले,“कथा पोलीसखात्याशी संबंधित आहे.”

  • पाटणकरांचा पुतण्या पोलीसखात्यात इन्स्पेक्टर असल्यामुळे ते म्हणाले, “सांगा. मला कथाबीज ऐकायचं आहे.”
    विठ्ठलभक्त परब म्हणाले, “हळू आवाजात सांगा. पोलीस हा शब्द समोरच्या ठाण्यावर पोचला तर येथे पोलीस हजर होईल व ठाण्यावर घेऊन जाईल.”
    प्रा. पाटणकरांचा पुतण्या पोलीसखात्यात होता. त्यामुळे त्यांना परबांचा शेरा आवडला नाही. ते म्हणाले, “परब, काहीही बोलू नका. पोलीस चौकशी करतात, पुरावा जमवतात, मग अटक करतात.”
    “पाटणकर, मी अनुभवाशिवाय बोलत नाही. मी लोकलच्या प्रवासात तुकोबांचा अभंग म्हणत होतो. तिकीट चेकर आमच्या बाकाजवळ आला. म्हणून त्याला अभंग ऐकू आला. त्यानं मला तिकीट विचारलं. मी ते दाखवलं. चेकरनं तिकीट उलटसुलट तपासलं. त्याला काय संशय आला कोण जाणे! पुढच्याच स्टेशनवर तिकीटचेकर व एक पोलीस हजर. पोलीस माझ्याकडे सोन्याच्या चोरीबाबत चौकशी करू लागले. मला सोन्याच्या चोरीबाबत काहीतरी माहिती आहे ही बातमी तिकीट चेकरने पोलीसदादांना पुरवली होती. पुरावा? मी तुकोबांचा अभंग म्हणत होतो. त्या अभंगातील ओळ हा पुरावा.”
    “अभंग काय होता?”मोकाशीनी विचारलं.
    “चोरटे सुने मारिले टाळे । केऊ करी न संडी चाळे ही पहिली ओळ होती. चेकर साउथ इंडियन होता. त्यानं चोरटे सुने हे दोन शब्द ऐकले. त्याला वाटलं मी चोरलेल्या सोन्याविषयी बोलतो आहे.” परबांनी सांगितलं.
    “पुढं काय झालं?”
    “मोकाशी, पोलीस सातारा भागातील होते. त्यांना मी पूर्ण अभंग म्हणून दाखवला. अभंगाची शेवटची ओळ, ‘तुका म्हणे वर्म बळीवंत गाढे। नेदी तया पुढे मागे सरो’ अशी आहे. ती ऐकल्यावर पोलीस म्हणाले,‘हा तुकोबांचा अभंग आहे. तुकोबांचा अभंग म्हणणारे काका चोरीचं सोनं कशाला बाळगतील?”
    पोलिसाप्रमाणे मोकाशीचंही समाधान झालं. ते म्हणाले, “ठीक आहे. मी हळू आवाजात सांगतो. पोलीस यायला नकोत. माझ्या कथेत मला वाचवायला ‘तुका म्हणे’ असे शब्दही नाहीत.”
    पण पाटणकरांना मोकाशींच्या कथाबीजापेक्षा अभंगातील पहिल्या ओळीबद्दल उत्सुकता होती. ते परबांना म्हणाले, “पूर्ण अभंग येतोय तुम्हाला? पहिल्या ओळीचा अर्थ काय?”
    परब पाच पिढ्यांचे वारकरी आहेत. परबांच्या घरात नातवंडं व पतवंडं अंगाईगीतांऐवजी तुकोबांचे अभंग ऐकतच झोपी जात व पहाटे जागी होत. तेव्हाही त्यांच्या कानावर तुकोबांचे अभंग पडायचे. परब म्हणाले, “पाटणकर, प्रथम पूर्ण अभंग म्हणतो. नंतर अर्थ सांगतो.”
    प्रतिभेच्या कुशीतील कथाबाळाची काळजी असल्यामुळं मोकाशी म्हणाले, “परब, पहिल्या ओळीचा अर्थच सांगा. तुम्ही पूर्ण अर्थ सांगाल, अभंग सहज म्हणाल. पण मी तेवढ्यात कथाबीजच विसरून जाईल. कथा भंग पावेल. माझी कथा म्हणजे तुकोबांचा तीनशे वर्षं टिकलेला अभंग नाही.”
    विठ्ठलभक्त परब म्हणाले, “मोकाशी, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी पहिल्या दोन ओळींचा अर्थ सांगतो. पाटणकर, चोरटे सुने म्हणजे चोरी करण्याची सवय असलेल्या श्‍वानाने म्हणजे कुत्र्याने. अशा कुत्र्याच्या टाळ्यावर म्हणजे डोक्यावर मार दिला तर ते कुत्रं कुई कुई म्हणजे केऊ असं ओरडेल पण चोरी करणे सोडणार नाही, म्हणजे न संडी. म्हणून तुकोबा म्हणतात,‘तुका म्हणे कर्म बळिवंत गाढे। नेदी तया पुढे मागे सरो’ शेवटी तुमचं प्रारब्ध जसे आहे तसे तुम्ही वागता॥”
    परब ‘तुका म्हणे’ म्हणाले व नंतर सवयीनुसार ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणाले. मनातून ‘परब, परब’ असं ओरडत, मोकाशीनी प्रारंभ केला, “कथा सांगतो. तीन आजोबा असतात. हे तीन आजोबा म्हणजे आपण तिघे नाही. कथेतील आजोबांची नातवंडे पाचसहा वर्षांची आहेत. आपली नातवंडे पंचविशीत आहेत. गोष्टीतील तीन आजोबा साठीच्या आसपासचे आहेत. आपण पंचाऐंशीच्या पलीकडचे आहोत.”
    प्रा. पाटणकर ओरडले, “मोकाशी, तुमची कथा तीन आजोबा व त्यांची तीन नातवंडे यांच्यापुढे सरकायलाच तयार नाही.”
    मोकाशी शांतपणे म्हणाले, “मी पुढं जातो. मी सविस्तर खुलासा केला. कारण तीन आजोबांची गोष्ट म्हटल्यावर मला वाटलं की, तुम्ही दोघं, ’आमच्यावर गोष्ट लिहायची नाही’ असं काहीतरी ओरडाल! हा, हे तीन आजोबा रोज दुपारी बाराच्या सुमारास, शाळा सुटल्यावर, नातवंडाना घरी घेऊन जायला यायचे. एके दिवशी, तीनही आजोबा शाळा सुटायला थोडा वेळ आहे, म्हणून तिघात दोन कप या फॉर्म्युलाप्रमाणे, शाळेसमोरच्या प्रशांत हॉटेलला शिरले.”
    परब म्हणाले, “या तपशिलात थोडा फरक कराल का? तुमच्या कथेतील आजोबा आपण तिघे नाही. हे वयातील फरकामुळे तसं स्पष्ट झालंच आहे. पण आपण तिघे अधूनमधून प्रशांत हॉटेलात जातो. हॉटेलचं नाव बदला व वेगळं काही ठेवा. तिघात दोन कप चहा हे लिहायची काय गरज आहे? नुसतं चहा घेण्यासाठीएवढंच लिहा. उगाच तीनही आजोबा कंजूष आहेत असा वाचकांचा ग्रह होईल.”

  • प्रा. पाटणकर म्हणाले, “परब, आपण आळीपाळीने चहाचे पैसे देतो. पण मोकाशींची पाळी आली की ते कुरकुरायचे, उसासे टाकायचे. त्यांनीच हा कंजुष फॉर्म्युला काढला आहे. पण वाचकांचा ग्रह होणार की तिघेही आजोबा कंजुष आहेत. तिघात दोन कप हे वगळा.”
    मोकाशी म्हणाले, “ही वाक्ये, हे शब्द माझ्या कथेतील सौंदर्यस्थळं आहेत. लेखकाला कथा सुचते. हे सुचणं परमेश्‍वरी देणं आहे. पण कथेतील तपशील लेखक त्याच्या जगण्यातून उचलतो. कल्पना व वास्तव यांचं अद्भूत मिश्रण म्हणजे कथा. पण मी मैत्रीला महत्त्व देतो. मी हॉटेलचं नाव रुची करतो. चहाचा फॉर्म्युला काढून टाकतो. पुढं ऐका. प्रत्येकी एक कप चहा घेऊन तिघे आजोबा बाहेर पडले. शाळा आधीच सुटली होती. सर्व छोटुकल्यांना घेऊन त्यांचे त्यांचे पालक निघून गेले होते. ज्यांचे पालक शाळेपाशी आले नव्हते ती नातवंडे शाळेच्या गेटवर वाट पाहत उभी होती. पण वाट पाहणारी नातवंडे दोनच होती, तीन नव्हती. दोन आजोबांनी आपली नातवंडे ताब्यात घेतली. पण तिसर्‍या आजोबांचं काय? ते कासावीस झाले. त्यांचा नातू गेला कुठं?”
    कथा ऐकणारे परब व्याकूळ झाले. ते म्हणाले, “विठ्ठला, तूच या नातवाचं रक्षण कर. ‘तू माउलीहून मवाळ, चंद्राहुनि शीतळ। पाणियाहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा!’ तू या तिसर्‍या नातवाला वाचव.”
    प्रा. पाटणकर व्यवहारवादी होते. ते परबांना म्हणाले, “नातू इथं या इहलोकात हरवला आहे, देवलोकात नाही. देवलोकातील तुमचा विठ्ठल इहलोकात काय करणार?”
    परब उत्तरले, “विठ्ठल स्वतः काहीही करणार नाही. तो कर्ता नाही, तो करविता आहे. शाळेजवलच पोलीस ठाणं आहे. तिथं जा. तक्रार नोंदवा. विठ्ठल सर्वत्र आहे. तो पोलिसातही आहे. तुम्ही पस्तीस वर्षं तत्त्वज्ञान हा विषय विद्यार्थ्यांना शिकवलात. खरं बोलायचं तर तुमच्या माध्यमातून विठ्ठलच बोलत होता. ’गुरुः देवः’ याचमुळे म्हणतात.
    परबांचं तर्कशुद्ध विधान प्रा. पाटणकरांना त्यांच्या उल्लेखामुळं पटलं. ते म्हणाले, “परब, तुमचं म्हणणं योग्य आहे. दर महिन्याला पगार घेताना मला थोडं अपराधी वाटायचं. कारण वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी दोनशे दिवसच शिकवण्याचे असायचे. पण मी पगार घेत नव्हतो, माझ्यातील विठ्ठलच पगार घेववत होता, हे समजल्यामुळे माझा अपराधीपणा पूर्णपणे नाहीसा झाला.”
    परब विठ्ठल विठ्ठल म्हणाले. विठ्ठलाचं श्रेय परब स्वतःकडे ठेवून घेणार नव्हते. परबांनी कळवळून विचारलं, “मोकाशी, तुमच्या तिसर्‍या आजोबांना शेवटी नातू भेटला का? कोणाच्या तरी मदतीनं नातू व आजोबा एकत्र यायला हवेत.”
    मोकाशी म्हणाले, “परब, मलाही माझ्या कथेचा शेवट सुखाचाच करायचा आहे. पण कसा? इथंच तर माझी कथा अडली आहे. कथा लिहिणं हे सोपं काम नाही. कथेतील समस्येची सुसंगत उकल व्हायला हवी. त्यासाठी मी हे कथाबीज मनात घोळवणार. प्रतिभा पुन्हा जागृत होईल. कोडं सुटलं, कथेचा सुखान्त शेवट सापडला की मी तो तुम्हाला सांगेन.”
    परब म्हणाले, “प्रतिभा जागृत करण्याचा उपाय मला माहीत आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणत रहा. नामस्मरणानं सर्व काही मिळेल.”
    प्रा. पाटणकर म्हणाले, “मोकाशी, मला कोडं सुटलं आहे. सुखनिवास सोसायटीतील घोलप आजोबा व त्यांचा नातू यांची शाळेच्या गेटपाशी चुकामूक झाली होती. पंधरा दिवसापूर्वीची ही घटना आहे. घोलप आजोबा जाम घाबरले. ते धावत घरी आले. त्यांची सून म्हणाली,’असं कसं होईल? चला आपण शाळेपाशी जाऊ. रोहन तिथंच असेल. तो शाळा सोडून कोठेही जाणार नाही.’ घोलप आजोबा सुनेसह तिकडे गेले. शाळेपासून थोड्याच अंतरावर थोडी गर्दी होती. सून आजोबांना घेऊन त्या गर्दीकडे गेली. त्या गर्दीतून आवाज आला, ’आई, आजोबा इकडे या. नागाचा मस्त खेळ चालला आहे. गारुडी पुंगी वाजवतो आणि नाग डोलतो.’तो आवाज रोहनचाच होता. पठ्ठ्या शाळेच्या दप्तरावर बैठक ठोकून खेळ पाहत होता. घोलप आजोबांचा जीव भांड्यात पडला.
    मोकाशी म्हणाले, “हे मलाही माहीत आहे. माझी कथा मी या प्रसंगावरच बेतली आहे.”
    परब म्हणाले, “मोकाशी, तुमची कथा पूर्ण वेगळी आहे, तुमच्या कथेत तीन आजोबा आहेत.”
    मोकाशी समजावून सांगू लागले, “परब, कथालेखक अवतीभोवती पाहतो. एखादा प्रसंग त्याच्या मनाला भिडतो. त्यातून तो कथा फुलवतो. एका आजोबांचे तो तीन आजोबा करतो. तीनच का? चार का नाहीत? तर आपण तीन आजोबा आहोत म्हणून. आपण तीन आजोबा चहा घेण्यासाठी प्रशंात हॉटेलात जातो, हे वास्तव आहे. ते मी कथेत वापरलं. तीन नातवांपैकी दोन नातू शाळेच्या गेटजवळ होते, एकच नव्हता असं मी दाखवलं. त्यामुळे एका आजोबांचं दुःखं तर गडद झालंच, वरती वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. हा एक नातू कुठं गेला? गुंडांनी पळवला का? गुंडांनी का पळवावा? आजोबांना धडा शिकवण्यासाठी का मुलाच्या बापाला धाक दाखवण्याकरता? पण गुंडांचं व आजोबांचं वाकडं का असावं? आजोबा म्हटलं की त्यांना रात्री गाढ झोप येत नाही. ते रात्री थोडा वेळ खिडकीपाशी येऊन बसतात. नेमक्या त्याच मध्यरात्री आजोबांना समोरच्या बँकेचं दार उघडणारे चार चोर दिसतात. चोरांचा चेहरा नीट दिसावा म्हणून आजोबा बॅटरीचा प्रकाश चोरांवर टाकतात. प्रकाशामुळं एका चोराच्या लक्षात येतं की समोरच्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्याच्या खिडकीतून कोणीतरी चोरी पाहत आहे.”
    परब घाईघाईनं म्हणाले, “मी रात्री उठतो. खिडकीजवळ बसतोही. पण मी का म्हणून टॉर्च वापरीन? मी आकाशातील चंद्र पाहतो, चांदण्या पाहतो. माझा विठ्ठल तेथे राहतो.”
    पाटणकर म्हणाले, “रात्री खिडकीजवळ बसून टॉर्चचा प्रकाश पाडणं हे फार कृत्रिम वाटतं. मुळात वीज गेली, दिवे गेले की आपल्याला टॉर्च हवा असतो. पण तो कधीही सापडत नाही. चुकून सापडलाच तर तो पेटत नाही. कारण त्यात सेल नसतात किंवा सेल फार जुने झाले असल्याने निकामी झाले असतात.”
    मोकाशी संतापले. त्यांच्या कथेचा शेवट दोनही मित्रांनी नाकारला होता. दोनही मित्रांनी त्यांच्या कथेचा गळा आवळून खून केला होता!
    परब म्हणाले, “बँक दरोडा- गुंड - नातवाचं अपहरण हे सर्व टाळा. तीनही नातू नागाचा खेळ बघायला गेले असं सांगा. एकच नातू नाही असं लिहून चिंता वाढवू नका.”
    “तेच तर कथाकाराचं कसब आहे.”
    “ठीक आहे. आपण तिघेजण प्रशांत हॉटेलात जातो व दोन चहा तिघात घेतो. हा कंजुष फॉर्म्युला तुमचा आहे. माझा व परबांचा नाही. हे कथेत स्पष्ट करा. मग तिघात दोन चहा असं लिहा.”प्रा. पाटणकरांनी सुचवलं.
    “चला. म्हणजे तीनही नातू नागाचा खेळ पाहत होते असं लिहा, तिघात दोन कप असं लिहू नका. म्हणजे तुम्ही कंजूष आहात हे कोणालाही कळणार नाही. कथा आनंदात, सुखात संपवा.” परबानी कथा संपवली आणि आनंदात ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणायला आरंभ केला.
    मोकाशी ओरडले, “माझ्या कथाबीजाची अशी पुळचट, अळणी, सुमार विल्हेवाट मी लावणार नाही. घोलप आजोबांना त्यांचा नातू नागाचा खेळ पाहताना सापडला असेल, पण माझ्या कथेत तसे घडणार नाही. मुळात माझे आजोबा मी डीएसपी म्हणजे डिस्ट्रिक्ट पोलीस सुपरिटेंडंट दाखवणार. आडनाव घोलप दाखवणार नाही, जाधव करणार.”
    “मोकाशी, जाधव हे नाव वापरू नका. कारण जाधव या नावाचे पोलीस सुपरिटेंडंट आहेत.” पाटणकरांनी सूचना केली.
    मोकाशी कडाडले, “लेखकाच्या स्वातंत्र्यावर बंधन? त्याच्या प्रतिभेवर बंधन? डीसपी जाधवांच्या नातवाचं अपहरण झालं असंच मी दाखवणार! उद्या तुम्ही भोसले, मालुसरे ही नावे वापरू नका असं म्हणाल. शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे यांच्या विषयी अवघ्या महाराष्ट्राला आदर आहे. म्हणून कथेत मी ही नावे वापरायची नाहीत की काय? माझ्या कथेत मी रावण हे नाव नायकाला व राम हे नाव खलनायकाला देऊन वाचकांची गंमतदार फसवणूक करू शकेन. वरती राम हा खलनायक रावणाच्या मंदोदरी या पत्नीला फुस लावतो, असं मी दाखवेन.”
    परब म्हणाले, “मोकाशी, तुम्ही प्रतिभावंत आहात. हे मी मान्य करतो. पण प्रभू रामचंद्राच्या नावाचा असा दुरुपयोग केलात तर तुमचा मेंदू काम करण्याचं थांबवेल, तुम्ही कथाच काय, साधी क का कि की’ ही बाराखडीही लिहू शकणार नाही. ‘भले तर देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।’ असं तुकोबा म्हणतात. त्यांचा विठोबा बागेत कोणाला तरी धक्का देऊन तुम्हाला पाडेल व तुमचा मेंदू निकामी करेल.”
    मोकाशीनी खणखणीत आवाजात माघार घेतली, “परब, सॉरी. मी नायकाचं नाव रामच ठेवेन. वरती रावण हे नाव वापरणारच नाही. मात्र डीएसपी जाधवांच्या नातवाचं अपहरण झालेलं आहे व ते मी कायम ठेवणार. सूर्योदय होवो, न होवो, मी कोंबड्याचा गळा आवळून त्याचं आरवणं थांबवणार नाही.”

  • मोकाशींचा दणदणीत आवाज, टीचभर रुंदीचा व किरकोळ रहदारीचा रस्ता ओलांडून थेट पोलीस ठाण्यात शिरला. दक्ष फौजदार शितोळे दहापट दक्ष झाले. त्यांनी मोबाईल फोनवरचं गाणं बंद केलं. ते म्हणाले, “राणे, समोरच्या पारावरून मी आता आपल्या जाधवसाहेबांच्या नातवाचं अपहरण झालं, कोण कोणाची तरी मुंडी मुरगळणार ही भाषा ऐकली. आपल्या आडवाटेवरच्या, मामुली ठाण्यावर परमेश्‍वरी कृपाच झाली आहे. आपण त्या नातवाचा शोध लावायचा व आपल्या पोलीस चौकीला नावलौकिक मिळवून द्यायचा. राणे, जा आणि पारावरच्या सर्वांना चौकीत घेऊन या.”
    हवालदार गेले व तिन्ही आजोबांना एक शब्दही बोलू न देता चौकीवर घेऊन आले. मोकाशीना बोलायचं होतं. हवालदार म्हणाले, “जे काही बोलायचं ते चौकीवर बोला. आमच्या शितोळेसाहेबांना तुमचं बोलणंच ऐकायचं आहे.”
    चौकीवर मंडळी पोचली. तीन अतिवृद्ध आजोबांना पाहून फौजदार शितोळे निराश झाले. या तीन आजोबांना माहिती असेल? काय नेम? प्रयत्न करून पाहू. शितोळे म्हणाले, “तुमच्या बरोबर मी बोलणार आहे. पण प्रथम, डीएसपी जाधवसाहेबांच्या नातवाला पळवलं आहे. हे तुम्हाला कोणाकडून कळलं? कोणी, कसं व का पळवलं? आता नातू कोठे आहे? हे सर्व मला लिहून हवं आहे.”
    परब म्हणाले, “आम्हा तिघात लिहिणारे म्हणाल तर एकटे मोकाशी आहेत. ते पाहता पाहता कथा लिहून देतील. तुम्ही त्यांना कागद व बॉलपेन द्या.”
    “मला कथा नको आहे. घडलेली हकिगत हवी.” शितोळे खेकसले.
    परबांना समजलं. ते मोकाशींना म्हणाले, “त्यांना कबुलीजबाब पाहिजे. पोलीस चौकीत कथेला कबुलीजबाब म्हणतात.”
    मोकाशी सांगू लागले, “डीएसपी जाधव व त्यांचा नातू यांची चुकामूक झाली येथपर्यंत मी आलो आहे. त्यापुढं मला जायचं आहे. मी तिथंच अडकलो आहे. तुम्ही पोलीस खात्यातील आहात. तुम्ही अशा वेळी काय करता?”
    शितोळे थंडगार झाले. त्यांच्याकडून माहिती मिळवावी म्हणून या तिघांना मी चौकीवर आणलं आणि हे गृहस्थ मलाच पुढं काय झालं हे विचारतात.
    “मोकाशी, मी सांगत होतो की तुम्ही कथेत डीएसपी जाधव यांचं नाव घालू नका.” पाटणकर पुटपुटले.
    फौजदार शितोळे म्हणाले, “तुम्ही तिघं थांबा. मी वरच्या ऑफिसात चौकशी करतो. माझी खात्री पटेपर्यंत तुम्ही येथून हलायचं नाही.”
    मोकाशी तिरसटले, “तुमची खात्री पटायला दोन तास लागतील. आम्ही इथं दोन तास थांबायचं का?”
    हवालदार राणे म्हणाले, “ थोडं दमानं घ्या. एवढा वेळ लागणार नाही.”
    परब निवांतपणे विठ्ठल विठ्ठल जपू लागले. विठोबाचं नामस्मरण करण्यात ते दोनच काय पण चार तास आनंदात घालवू शकतात.
    प्रा. पाटणकरंना या कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग सुचला. ते म्हणाले, “साहेब, मी माझ्या पुतण्याशी बोलू का? तो तुमच्याच खात्यातील आहे. किंवा तुम्हीच बोला. हा घ्या त्यांचा नंबर. तो पोलीस इन्स्पेक्टर आहे.”
    शितोळे इन्स्पेक्टर पाटणकरांना ओळखत होते. त्यांनी तत्परतेनं फोन केला, “साहेब, मी तीन आजोबांना चौकीवर थांबवून घेतलं आहे. त्यापैकी एक सांगतात की ते तुमचे काका आहेत. म्हणून फोन केला.”
    “बरं केलंत. माझे काका व त्यांचे दोन मित्र परब व मोकाशी एकत्र असणार. या वयात आणि वरती करोना हा रोग फैलावला असताना तिघांनी घराबाहेर पडताच कामा नये. रस्त्यात कोणी पडलं होतं काय? शितोळे थँक यू. त्यांना थांबवून घेतलंत हे छान केलंत. त्यांना चहा द्या व घरी पोचवा. बरोबर कोणीतरी द्या.” इन्स्पेक्टर पाटणकरांनी सूचना दिल्या.
    फौजदार साहेबांनी तिघांना त्यांची नावं विचारली. नावं जमली.
    शितोळे ओरडले, “राणे, तीन चहा मागवा. या आजोबांच्याकरता. नंतर या तिघांना त्यांच्या घरी सोडून या.”
    कथेचा शेवट मोकाशींना अद्याप मिळालेला नाही. पण शेवट तसा गोडच झाला. तिघात दोन चहा पिणार्‍या आजोबांना प्रत्येकी एक पूर्ण चहा मिळाला.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/