चहाची पहिली फेरी व्हायची आणि पापड लाटण्याला जोर चढायचा. टोपामध्ये तेलात पोहोणार्या लाट्या, तेलची करायला बसलेल्या काक्या वा आत्या आणि बाकीच्या सहा-सातजणी पापड लाटायला लागलेल्या. हळूहळू ओल्या पापडाची चवड तयार व्हायची.
उन्हाळी कामांमध्ये चिंच, हळद, मिरची, लोणची ही सारी लिंबू टिंबू प्रकरणे तर ‘पापड’ हे एकदम दादा प्रकरण. बारा ते पंधरा किलो उडदाचे पापड घालायचे, हे एकत्र कुटुंबात सुध्दा काही खायचे काम नव्हते. आधी पंधरा किलो उडदाची डाळ आणा. ती पुसून घ्या, तिचे पीठ करून आणा- ही पहिली पायरी. दुसरी पायरी म्हणजे फोनाफोनी. आता हे फोन अशासाठी की पापड लाटण्यासाठी बरेच भिडू लागायचे. एवढ्या आठ-दहा भिडूंच्या सोयीने पापड कोणत्या दिवशी घालायचे हे ठरवले जायचे. काकी-आत्ये कंपनीमध्ये गीताकाकी, निलीमाकाकी, रमाताई आणि अशा एक-दोन काक्या आणि आत्या असायच्या. सगळ्यात पहिले फोन यांना - “अगं, पापड घालायचे आहेत. तुझी काही अडचण नाही ना?”
आत्ताच्या पिढीला हे ‘अडचण’ प्रकरण कदाचित कळणार नाही. तर ही अडचण म्हणजे मासिक पाळीचे चार दिवस. या दिवसात असणार्या बाईने पापड लाटले वा तिची सावली जरी या पापड प्रोग्रॅमवर पडली तर पापडाला बुरी येते, पापडावर अळी आणि जाळी पडते, पापड काळवंडतात वगैरे वगैरे. तर अशी फोनाफोनी झाल्यावर ज्या दिवशी कुणाची अडचण नसेल वा कमीत कमी बायकांची अडचण असेल आणि जास्त लाटणारे भिडू उपलब्ध असतील तो दिवस पापडासाठी ठरवला जायचा.
जो दिवस याकरिता ठरविला जायचा त्याच्या आदल्या दिवशी वरच्या पोटमाळ्यावरून ठेवणीतले बरेचसे पोळपाट; वेगवेगळ्या आकाराची लाटणी काढली जायची. पातळ लाटणी, जाड लाटणी, रेषारेषांचे डिझाईन असलेली लाटणी, निमुळत्या पकडीची लाटणी, आखुड पकडीची लाटणी. जगात लाटण्याचे जेवढे प्रकार होते ते जवळ जवळ सगळे आकार प्रकार माळ्यावर विराजमान होते. त्या मानाने पोळपाटाचे प्रकार कमीच. आखूड पायाचा पोळपाट वा जरा उंच पायाचा पोळपाट हे पोळपाटाच्या उंचीच्या बाबतीत. सर्व पोळपाट लाकडाचेच असायचे. आंबा, सागवान, शिसम अशा वेगवेगळ्या लाकडांचे पोळपाट पण तेलची लाटण्यासाठी पांढराशुभ्र संगमरवरी पोळपाट आणि त्यावेळी नुकताच फॅशनमध्ये आलेला हिंडालियमचा पोळपाट. हे दोनच पोळपाट वेगळे होते.
पापडाचे पीठ आई तराजू घेऊन पीठ, मीठ, पापडखार, लाल तिखट आदी मसाले व्यवस्थित तोलायची. लाल पापड करायचे असतील तर लाल मिरची पूड, सफेद पापड करायचे असतील तर पांढर्या मिरचीची पूड, हिरव्या मिरचीचे पापड करायचे असल्यास हिरवी मिरची गरम पाण्यात टाकून, ती कडक उन्हात सुकवून त्याची पूड पिठात वापरायची. असे वेगवेगळ्या चवीचे पापड बनायचे. मिरचीच्या प्रकाराप्रमाणे दोन तीन वेगवेगळ्या टोपात पीठ काढायचे. त्यात प्रमाणानुसार मसाले घालायचे आणि सर्वात मुख्य म्हणजे हिंग. खमंग स्वादिष्ट इराणी हिंगाच्या पाण्यात ही पिठे घट्ट मळायची. त्यानंतर ही घट्ट पिठे उखळीत कुटून कुटून सैल करायची. नंतर सैल करायचीच होती तर प्रथम पिठे घट्ट मळायचीच कशाला? हा प्रश्न मला गेले चाळीस वर्षे पडलेला आहे. नंतर ही पिठे टोपात घालून ती बुडतील इतके तेल त्यावर ओतायचे आणि घट्ट झाकण लावून ठेवायचे. आता युध्दाची
तयारी पूर्ण झाली. दुसर्या दिवशी समरांगण पापड!
नऊच्या सुमारास एक एक युध्द गडी यायला सुरुवात व्हायची आणि युध्दाला तोंड फुटायचे. सर्वात प्रथम माईआजी यायच्या. आल्या आल्या ‘गोऽऽऽ’ म्हणून आवाज द्यायच्या.
आता हा कोकणी ‘गोऽऽऽ’ म्हणजे ‘अगं’ किंवा ‘अरे’. हा ज्या प्रकारे म्हटला गेला असेल आणि ज्या वेळेला म्हटला गेला असेल त्या वरून त्याचा अर्थ लावण्याची कला कोकणी माणसाला जन्मजात अवगत असते.
तर हा त्यांचा आल्या आल्या म्हटलेला पहिला ‘गोऽऽऽ’, म्हणजे, ‘पीठ कुठे?’ आणि माजघरात टोप पुढ्यात ओढून त्या कामाला सुरुवात करायच्या. एक पाय लांब पसरलेला, एक पाय शरीराजवळ दुमडलेला आणि समोर टोप, टोपातील पीठ हातात घेऊन, त्या पिठाला ओढून लांब तार काढणे, त्याला तेलाचा हात लावणे, त्याचा पिळा करणे हे त्यांचे ठरलेले काम सुरू करायच्या. तोपर्यंत प्रेमाक्का त्यांच्या जोडीला येऊन बसलेल्या असायच्या. त्यांचीही बसायची पोज तीच. एक पाय लांब आणि एक पाय दुमडलेला. त्या लांब पसरलेल्या पायाच्या अंगठ्याला पुड्याचा दोरा बांधायच्या आणि पिठाच्या लांब तारेचे धाग्याने छोटे छोटे तुकडे करायचे. हे तुकडे सुकू नयेत म्हणून परत तेलात भिजत ठेवायचे. या तुकड्यांना पापडाची ‘लाटी’ म्हणतात. पहिल्या पाच लाट्या देवासमोर ठेवल्या जायच्या.
त्यानंतर तिथे हजर असलेले सगळेजण किंबहुना सगळ्याजणी एक-दोन लाट्या खायच्या. चव चांगली झालेली असो वा वाईट, तिखट असो वा खारट. आता यात बदल होणे नाही. जे जसे आहे ते तसे उत्तम. पुढच्या कामाला लागा. पुढचे काम तेलची लाटणे. तेलची हा प्रकार असा की, तेलातली लाटी घेऊन ती संगमरवरी वा हिंडालियमच्या पोळपाटावर तेलावरच लाटायची. ही साधारण पुरीच्या आकाराची करायची. या प्रकारात लाटण्यास जोर जरी लागत नसला तरी कौशल्य लागायचं. संमगरवर आणि तेल सगळंच निसरडं प्रकरण. लाटीच्या एका बाजूला लाटण्याचा जोर जास्त पडला तर दुसर्या बाजूने लाटी सटकन निसटायची. दुसर्या बाजूने जोर द्यावा तर लाटी टुणकन उडी मारून लाटणारीच्या ओच्यात येऊन पडायची. आमच्या सारखी पोरंटोरं वैतागून लाटीच्या मधोमध आडवे लाटणे धप्पकन मारायचो तर लाटी मध्यभागी पातळ व्हायची आणि लाटीच्या दोन्ही बाजूने लाटीच्या पिठाचे लगदे वर यायचे. लाटीची पुरीच्या ऐवजी होडी बनायची. बनविणार्याच्या पोटात ही होडी जायची. एव्हाना दहा वाजलेले असायचे.
माईआजीचा ‘गोऽऽऽ’ , हा इशारा स्वयंपाकघरातल्या बाईला असायचा. यावर तिचे प्रत्त्युत्तर, “होऽऽऽ!”
तिने तोवर चहाचे आदण ठेवलेले असायचे. पाच-दहा मिनिटात चहाची पहिली फेरी व्हायची आणि पापड लाटण्याला जोर चढायचा. टोपामध्ये तेलात पोहोणार्या लाट्या, तेलची करायला बसलेल्या काक्या वा आत्या आणि बाकीच्या सहा-सातजणी पापड लाटायला लागलेल्या. हळूहळू ओल्या पापडाची चवड तयार व्हायची.
माईआजींचा पुन्हा एकदा, ‘गोऽऽऽ’ आता हा बच्चे कंपनीसाठी. याचा अर्थ असायची की, ‘चला पापड वर घेऊन’. बच्चे मंडळी ओले पापड वर घेऊन जायची आणि गच्चीत उन्हात पापड वाळत घालायची. गच्चीत जुने पलंगपोस, चादरी ताणून पसरलेले असायचे. त्यावर चारी बाजुने दगड वा तत्सम जड वस्तू चादर उडू नये म्हणून ठेवलेली असायची. ही तयारी करणं अर्थात काकी लोकांचं काम आणि त्यांनी ते सकाळीच केलेलं असायचं. चादरीवर एकेक पापड पसरायचा आणि कावळ्याने चोच लावू नये वा वार्याने पापड उडू नयेत म्हणून राखणीला बसायचे, ते पुन्हा माई आजीचा ‘गोऽऽऽ’ ऐकू येईपर्यंत.
एक वर्षीचा प्रसंग आठवतोय. माईआजींचा ‘गोऽऽऽ’ ऐकू आला आणि मी पापड घेण्यासाठी गच्चीवरून खाली आले. मी सातवी-आठवीत होते. नेहमीप्रमाणे पापड लाटण्याला वेग आला होता. दुपारी एकच्या दरम्यान तर खासच जोर चढला होता. त्यातून गप्पांचे विषयांतर होत गाडी नवर्यांच्या तक्रारीवर आली होती. हा विषयच असा दणकेबाज होता. जी, ती आपल्या नवर्याच्या खोडी सांगत तक्रारी करत ‘हूँऽऽऽ’ म्हणून जोर लावत होती. पापड एकदम दणक्यात लाटले जात होते. प्रत्येकजण तावातावाने तक्रार करत होती. प्रत्येकीलाच चेव चढला होता. “‘हे’ ना खोटंच बोलतात”, कुणीतरी बोलली. तशी गप्पांची गाडी नवर्याच्या खोटारडेपणावर घसरली. “होय,” गीताकाकी विधानाला दुजोरा दिल्याप्रमाणे ठसक्यात बोलली.
“यांनी मला साडी देतो म्हणून सांगितलं आणि दिलीच नाही”, तिची शरदकाकांबद्दलची तक्रार.
आता आमची आजी या संभाषणात टपकली.
“केव्हा सांगितलं शरदने
तुला?” आजी.
“झाला असेल, महिना-दीड महिना”, गीताकाकीचा सूर अजूनही दुखावलेलाच होता.
“तसं नव्हे, केव्हा म्हणजे देवळात जाताना सांगितलं, संध्याकाळी फिरायला जाताना सांगितलं, सकाळी चहाच्या वेळी सांगितलं? कधी सांगितलं?”, आजीचा काळवेळ सुसंगत प्रश्न.
“अहो, आम्ही त्यांच्या मित्राच्या घरी पार्टीला गेलो होतो. त्याच्या बायकोने कांचीवरम सिल्क नेसली होती. रात्री घरी आल्यावर मी यांना कांचीवरम साडी घेऊन या म्हणाले, तर त्यावेळी त्यांनी ‘होऽऽऽ देतो’ म्हणून सांगितलं. नंतर विसरलेच.” गीताकाकी.
“रात्री सांगितलं ना शरूने, साडी देतो म्हणून?” आजी
“हो”, गीताकाकी.
“तो विसरला, आता तू पण विसर.” आजी. सगळ्याजणी आश्चर्याने आजीकडे बघू लागल्या.
“पतीने पलंगावर दिलेली वचने खरी नसतात”, आजी.
आणि जो काही हशा पिकला. पुढची पंधरा मिनिटे सगळ्याजणी खो खो हसत होत्या.
त्या वर्षीच्या पापडाची चव काही औरच होती. खमंग, खुसखुशीत आणि झणझणीत.
एक वाजत आलेत. सगळ्याजणी जेवायला उठल्या. आजचे जेवण खास असायचे. अर्धवट सुकलेले पापड त्या दिवशी तेलात तळायचे. संपूर्ण वर्षभरात एकच दिवस ही चंगळ असायची. काय न्यारी चव असायची त्या ओल्या पापडांची, खुमासदार, मस्त.
माईआजींचा त्या दिवसातला शेवटचा, ‘गोऽऽऽ’ यायचा आणि चहाच्या फेरीबरोबर संध्याकाळी साडेचार-पाचपर्यंत हे पापडयुध्द आटोपलेलं असायचं.
एके वर्षी पापडांची सुरुवात झाली खरी, पण काही कारणाने पहिल्या दिवशी पापड लाटून संपले नाहीत. दोन-तीन किलो पिठाचा गोळा शिल्लक राहिला. दुसर्या दिवशी नेमके काय झाले ते आठवत नाही. पण आईच्या माहेरी, माझ्या मामीची आई वारली. त्यामुळे आईला तातडीने निघावे लागले. कुणी काकी आजारी पडली, आत्येची पुढच्या आठवड्यात येणारी अडचण याच महिन्यात आली. असे काहीबाही होऊन पापड लाटायला कुणीच भिडू नाहीत, अशी परिस्थिती झाली. घरात आजी, हुकुमाचा एक्का माईआज्जी आणि मधली काकू, जिचे दिवस भरले होते. आजीने निर्णय घेतला, उरलेले पीठ घरातल्या नोकरांना वाटून देऊ.
काकू म्हणाली, “आज मी ठीक आहे. काही होणार नाही. होतील तितके पापड लाटूया.”
आजीने दुपारचा स्वयंपाक तयार केला आणि या तिघीजणी पापड लाटायला बसल्या.
एखाद किलोचे पापड झाले असतील नसतील, काकूने विचित्र हालचाली करत, ‘खू.. खू.. खू.. खू..’ केलं. परत ‘हू..हू..हू..हू..’ करून हसतेय. कुणी गुदगुल्या केल्यासारखं ‘हि.. हि..’ करत अंगाला विचित्र आळोखे पिळोखे देतेय. असं तीनदा चारदा झाल्यावर आजीने विचारलं, “काय गं, पोटात दुखतंय का?”
“नाही हो, तसं काही वाटत नाही.”
हिचे आळोखे पिळोखे, खि खि खु खु चालूच. आजीचं पालुपद चालू. “अग काय होतंय?” दहा-पंधरा मिनिटाने आजीने लाटणे खाली ठेवले आणि म्हणाली, “माई, बाकीचं पीठ नोकरमाणसांत वाटून टाका. त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडी पडू दे.” आणि काकीकडे मोर्चा वळवून म्हणाली, “ताबडतोब डाक्टराकडे चल.”
आमचं घर गावाच्या बरंच बाहेर होतं. नेमके त्यावेळी बाबा-काका कामानिमित्त गाडी घेऊन परगावी गेलेले. त्यामुळे घरात गाडी नाही. आजीने कुठून कुणाची रिक्शा बोलावली देव जाणे आणि काकूला घेऊन हॉस्पिटलात गेली. तासाभरात मोहनचा जन्म झाला.
पापडाचं पीठ नोकरमाणसांच्या लेकरांच्या तोंडी पडलं. पापड लेकुरवाळे झाले.