Close

ओ साथी चल (Short Story: Oh Sathi Chal)

  • सुधीर सेवेकर
    देविकाच्या नजरेतली भाषा मला समजत नव्हती असे नाही. चांगली समजत होती. पण स्पष्ट शब्दात बोलण्याची तिची हिम्मत होत नसावी आणि म्हणून ती काही बोलत नव्हती. अत्यंत हसर्‍या बोलक्या स्वभावाची देविका त्या प्रसंगानंतर जणू मुकीच झाली होती. त्या घटनेला आता वर्ष होतंय. पण या वर्षभरात खेळकर देविकाचे हास्य लोपले. बोलणे संपले.
    आता या क्षणी आम्ही दोघं तिच्या बंगल्याच्या गच्चीवर उभे आहोत. मंद गार वारा सुटलाय. क्षितिजावर तांबुस करडा रंग पसरत चाललाय. गच्चीवरून दूरपर्यंत पसरलेली वनश्री डोळ्यांना सुखावतेय. प्रसन्न वातावरण आहे. पण देविका आणि मी आम्ही दोघेही निमुटपणे उभे आहोत. उगीचच इकडेतिकडे पाहात आहोत, जणू कोण आधी बोलणार याची वाट पाहतो आहोत! शेवटी मीच पुढाकार घेतला.
    “मंद वारं काय छान सुटलंय नाही!”
    “हं!” देविकाचा एका अक्षराचा यंत्रवत प्रतिसाद. माझ्याकडे न बघताच दिलेला.
    “अशा वातावरणात तू पूर्वी किती उत्साहानं गाणं म्हणायचीस.”
    मी तिला खुलविण्यासाठी भूतकाळात नेण्याचा प्रयत्न करतोय.
    “कोणतं गाणं? तिने निर्विकार स्वरात केलेला प्रश्न.”
    “अगं, कोणतं गाणं म्हणून काय विचारतेस? ते गाणं हवा के साथ-साथ, घटा के संग संग, ओ साथी चल…”
    मी तिला गाण्याची पहिली ओळ गाऊन दाखविली. ती खुलेल या अपेक्षेनं.
    “हां, ते गाणं!, तो सिनेमा तुला तर आवडायचा नाही. उलट त्यावरून तू माझी आणि प्रीतमची टिंगल करायचास!”
    देविका पहिल्यांदाच दोनतीन वाक्यं बोलली. ते गाणं, तो सिनेमा आणि तो भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर उभा राहिलाय. तिचा गंभीर चेहराही काहीसा खुललाय हे मला जाणवलं. त्यानं खूप बरंही वाटलं.
    “बरोबर आठवलं तुला. मला असल्या उडत्या चालीची गाणी आणि कमर्शियल बाजारू सिनेमे आवडायचे नाहीत. पण हे गाणं आणि हा सिनेमा मात्र मला आवडायचा.”
    “का?” देविकाने काहीसे आश्चर्य दाखवत मला प्रश्न केला.
    “का काय? ते गाणं आवडु लागलं कारण ते तू फार आनंदानं उत्साहानं म्हणायचीस. आणि तुम्ही दोघांनी दोनतीनदा मला जबदस्तीनं ओढून तो सिनेमा पाहायला सोबत नेलं होतं म्हणून, तो सिनेमाही आवडला.” मी खुलासा केला.
    देविकास बोलतं करण्यासाठी तिच्या आवडीच्या गाण्याचा आणि सिनेमाचा विषय मी मुद्दामच सुरू केला होता आणि माझा तो प्रयत्न यशस्वीही झाला होता. देविका बोलू लागली होती. प्रामाणिकपणे सांगायचं तर ते गाणं देविका म्हणत होती. म्हणून ते मला आवडु लागलेलं होतं. आणि देविका मला आग्रह करीत होती म्हणूनच मी दोनतीनदा तोच सिनेमा पुनःपुन्हा पाहिला होता. आणखीन प्रामाणिकपणे सांगायचं तर ते गाणं, तो सिनेमा याहीपेक्षा मला देविका आवडत होती. तिचा सहवास आवडत होता हे त्यामागचं खरं कारण होतं. देविकानेही ते मनोमन ओळखलही असावं. पण तसं तिनं स्पष्ट शब्दात कधी सांगितलं नाही आणि मुख्य म्हणजे मीही तेव्हा गप्पच राहिलो. त्याला काही कारणंही होती. देविका श्रीमंत घरची होती. आणि आम्हा दोघांचा आणखीन एक जिवलग मित्र होता. प्रीतम. स्मार्ट आणि महत्त्वाकांक्षी. आमच्या त्रिकुटाला आमच्या माघारी लोक आणि परिचित ’एक हसिना दो दिवाने’ म्हणून चिडवितात हेही मी ऐकलं होतं.

  • “सिनेमा पाहून आल्यावर तू आम्हा दोघांवर काय जाम भडकायचास! आठवतं?” देविकाच्या प्रश्नानं मी भानावर आलो.
    “आपल्या सारख्या उच्चशिक्षितांनी बाजारू चित्रपटांच्या नादी लागू नये वगैरे वगैरे म्हणायचास. श्रीमंतांमधील, उच्चशिक्षितांमधील सामाजिक जाणीव बोथट होत चाललीय आणि म्हणून देशात विषमता वाढलीय असंही तुझं तत्त्वज्ञान तू ठासून आम्हाला सांगायचास. सत्यजीत रे, मृणाल सेन, श्याम बेनेगल यांच्या सिनेमांबद्दल सांगायचास. सिनेमा हा तुझाही आवडता विषय होताच. पण ते सिनेमे म्हणजे त्या काळी आर्ट फिल्म्स, ऑफबीट फिल्म्स म्हणून ओळखल्या जात. नंतर त्यांना पॅरालल सिनेमा असं संबोधलं जाऊ लागलं. मग शब्द आला ’मिनिंगफुल सिनेमा’ वगैरे वगैरे. तुझ्यामुळेच आम्हाला कळायचं!”
    देविका आता छान बोलू लागलीय. त्याच पूर्वीच्या उत्साहानं, हे पाहून मला मनोमन खूप आनंद झाला, असं बोलताना पूर्वी तिच्या डोळ्यात जी चमक यायची आणि चेहर्‍यावरही एक प्रकारचं तेज यायचं, ते मधल्या अनेक महिन्यांच्या गॅपनंतर पुन्हा परतून येतंय हेही मला जाणवलं.
    “तुला आठवतं, एकदा तू माझं आणि प्रीतमचं ’बायसिकल थिव्हज’ या सिनेमावर एक लंबंचौडं बौद्धिक घेतलं होतंस! त्या तुलनेत भारतीय दिग्दर्शक, त्यांची कामगिरी किती सुमार आहे, गल्लाभरू प्रवृत्तीची आहे हेही सांगितलंस आणि तेव्हा नव्यानंच आलेल्या श्याम बेनेगल नामक दिग्दर्शकाची प्रशंसा केलीस!”
    देविका हे सगळं इतक्या तन्मयतेनं सांगत होती की ती चर्चा जणू कालच घडलीय असं वाटावं. वास्तविक ते सगळे घडून पस्तीसचाळीस वर्षे होत आलीत. मध्यंतरीच्या काळात जगात, देशात आणि आमच्या जीवनातही पुष्कळ उलथापालथी झाल्या. जातपात एक नसतानाही देविकानं गडगंज संपत्तीवाल्या प्रीतमशी लग्न केलं. मी माझ्या ध्येयवादी स्वभावानुसार एका सेवाभावी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून आदिवासींमध्ये काम करण्यासाठी परप्रांतात निघून गेलो. आरंभीची काही वर्षे अधूनमधून देविका आणि प्रीतम त्यांची गाडी घेऊन जंगलातल्या आमच्या आदिवासी पाड्यावर मला भेटायला यायची. एकदोन दिवस सोबत राहायचीही. मी किती अडीअडचणीत अत्यंत साधसुधं जीवन जगतोय याबद्दल माझं कौतुकही ते दोघं करीत. माझी राखलेली दाढी पाहून एकदा हसतहसत देविका मला म्हणाली सुद्धा, तू आता श्याम बेनेगलसारखाच दिसू लागलायस!
    नंतर त्यांचं येणं बंद झालं. ती आणि प्रीतम त्यांच्या व्यापार, धंद्याच्या व्यापात गढून गेले. एकदा देविकानं तिला मुलगा झालाय आणि त्याचं नाव तिनं आणि प्रीतमनं मोठ्या हौसेनं श्याम ठेवलंय असंही कळविलं. माझ्या कामासाठी मदत म्हणून भरघोस रकमेचा त्यांचा चेक मात्र दरवर्षी न चुकता येत असे. पूर्वी त्या चेकसोबत श्रीमंतांची सामाजिक जाणीव बोथट होऊ न देणार्‍या माझ्या जीवलग सख्यास. असं स्वहस्ताक्षरातील एक चिठ्ठीही देविका एखाद्या अर्पणपत्रिकेसारखी सोबत पाठवत असे. नंतर ती चिठ्ठी बंद झाली, चेक मात्र नियमित येत राहिले. मधल्या बर्‍याच वर्षांनंतर मी कामानिमित्त मुंबईस गेलो, तेव्हा तिला भेटलो. भेटीची अपॉइंटमेंट वगैरे ठरली नव्हती. देविकाचा व्यापारधंद्याचा व्याप खूप वाढलाय. ती मिटिंग्ज, फोन्स, ईमेल्स व्हिडिओ कॉन्फरन्सेस यात खूप बिझी असते, हे मला दिसलं. प्रीतमची भेट झाली नाही, कारण तो बिझनेस टूरवर परदेशात गेलेला होता. तर तिच्या मुलाला श्यामला तिनं उच्चशिक्षणासाठी परदेशातच ठेवलंय असंही कळालं. आमची भेट झाली, पण त्यानं माझं समाधान झालं नाही. ती फारच थोडोवेळ मला देऊ शकली. आमच्या दोघांची दुनिया आता खूप वेगवेगळी झालीय हेही मला जाणवलं. अर्थात त्याबद्दल तिला किंवा कुणालाच दोष देण्याचंही काही कारण नाही. मधे पुन्हा अशीच काही वर्षे निघून गेली आणि एक दिवस तिच्या ऑफिसातून एक फोन मला आला -
    “प्रीतम साहेबांचं विमान अपघातात दुर्दैवी दुःखद निधन झालंय. तुम्हाला शक्य असेल तेव्हा एकदा भेटायला या, असा देविका मॅडमचा तुम्हाला निरोप आहे. मी मॅडमचा सेक्रेटरी बोलतोय.”
    त्या निरोपाने मी हादरलोच. तात्काळ मुंबईत आलो. देविकाची भेट घेतली. काय बोलावे, कशी सांत्वना द्यावी ते मला समजेना. बराच वेळ नुसताच तिच्यासमोर बसून राहिलो. देविका यंत्रवत ऑफिसची कागदपत्रें पाहणे, चेक व्होचर्सवर सह्या करणे, फोनवर सहकार्‍यांना सूचना देणे, मधेच लॅपटॉपवर काही काम करणे इत्यादीत गर्क होती.
    “श्याम दिसत नाही कुठे? शेवटी मीच विचारले.”
    “तो आहे, त्याच्या जागी. आज पहाटेच गेला न्युयॉर्कला परत!”
    लॅपटॉपवरची नजरही न हटविता देविका उत्तरली. तिच्या स्वरातला रुक्षपणा मला खटकला.
    “आणि तुझ्या सासरचे लोक?”
    “तेही गेले आपापल्या शहरांना परत. आमच्या व्यापारी समाजात दुखवट्यात किंवा सुतकात फारवेळ कुणी घालवत नाही. ज्याला, त्याला त्यांचे त्यांचे व्यापारधंदे असतात.. तिकडे दुर्लक्ष करणं परवडत नाही. ‘उठवणा’ झाला की तीन दिवसात जो तो आपापल्या कामात पुन्हा गढतो.”
    देविकानं माझ्याकडे न पाहताच उत्तर दिलं. आपण आता हिचा निरोप घ्यावा का? परत निघावं का? माझ्या मनात प्रश्न उठत होते.
    “देविका, मी निघू? तुला वाटेल तेव्हा तू मला बोलवायला संकोच करू नकोस. हिंमतीनं राहा. जे घडायचं ते घडून गेलंय.”
    या माझ्या बोलण्यावर देविकानं मान वळवून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, “परतायची घाई नसेल तर राहा इथे. गेस्टरूममध्ये सगळी व्यवस्था आहे. संध्याकाळी काम संपल्यावर बोलू निवांत.”
    देविकाचा आग्रह मला मोडवेना. पूर्वीपण ती सिनेमाला सोबत येण्याचा असाच आग्रह करीत असे. अनेकदा तर अक्षरशः ओढत नेत असे मला. आता वयपरत्त्वे प्रत्यक्ष ओढून तिने मला नेले नाही, पण तिच्या स्वरातला आग्रह, आर्जव मात्र तोच आहे असं मला वाटलं. मी थांबलो आणि आता तिच्या बंगल्याच्या प्रशस्त गच्चीवर संध्याकाळच्या गार हवेत आम्ही दोघं उभे होतो.

  • “तुला एक सांगू,” माझ्या डोळ्यात थेट बघत देविका सांगू लागली.
    “तू आम्हाला पूर्वी जागतिक सिनेमा, ग्रेट डायरेक्टर्स वगैरेबद्दल जे भरभरून सांगायचास ना, त्यातलं फारच थोडं मला समजायचं. पण तरी मी मन लावून ते सगळं ऐकायचे. का? माहितीय? कारण ते सगळं तू सांगायचास म्हणून. कारण तू मला आवडायचास.”
    देविकानं आज प्रथमच स्पष्ट शब्दात मला सांगितलं. काही क्षण आम्ही दोघं एकमेकांकडे पाहात राहिलो. निःशब्दपणे.
    “मला ते कळत का नव्हतं देविका? कळत होतं. तेव्हाही कळत होतं. आज इथे आल्यानंतर, तुला भेटल्यानंतरही कळतं आहे. पण आपण दोघंही त्याबद्दल शब्दानं कधी एकमेकांना तेव्हा काही सांगितलं नाही.”
    ते आपलं चुकलं की काय, याची चिकित्सा करण्याची ही वेळ नाही. त्याला आता काही अर्थही नाही. पण आजचा हा क्षण आपण वाया घालवायचा नाही, कच खायची नाही हे मी माझ्या मनाशी ठरविलेच होते. तू बोलली नसतीस, तरी मी न भिता तुला हेच सांगणार होतो.
    मी माझे मन मोकळं केलं. माझं बोलणं ऐकून देविकाचे डोळे पाणावलेच. तिला हुंदका फुटणार हे मला जाणवलं. मी तिला जवळ घेतलं. तिनंही मोठ्या समाधानानं, विश्वासानं माझ्या खांद्यावर तिचं डोकं टेकवलं आणि तिला थोपटल्यासारखं केलं. आकाशात दोन पक्षी उडत उडत आपल्या घरट्याकडे परतत होते आणि इतर कुठेतरी वाजणार्‍या गाण्याचे शब्द मंद स्वरात कानावर पडत होते… ओ साथी चल ीीी

Share this article