Close

निवडुंग (Short Story: Nivdung)

बाबा नेहमी म्हणायचे… लता, आता तू एम.बी.ए. होशील. तुला संधी मिळाल्यावर, श्यामलच्या नोकरीचं बघ. शहरात कुणी नाही तिचं. साधी, सरळ आहे बिचारी. तुझ्यासारखी. कसं होणार तुमच्यासारख्यांचं कोणास ठाऊक? घरात साधेपणा ठीक आहे, पण घराच्या बाहेर? शिवाय तुलाही शहरात यायचं होतं ना!


मिठबांव-मालवण मुख्य रस्ता सोडून उजवीकडे, बांधावरून गाडी कोंडवाडीला आली. तीन घरे सोडून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला कोणीतरी दिसलं. लताने गाडी थांबविण्यास सांगितलं. ती उतरून त्या व्यक्तीकडे गेली आणि जराशी संभ्रमात पडली. जिला नेण्यासाठी आपण आलो आहोत तीच ती व्यक्ती, असा भास झाला तिला.
“श्यामल तारकरांचं घर कोणतं?” लताने विचारलं.
“या दाखवते”, असं म्हणून ती घराच्या दिशेने चालू लागली. ड्रायव्हरला तिथेच थांबायला सांगून लता तिच्या मागून चालू लागली. जुन्या घरासमोर येऊन ती थांबली आणि तिने लताला आत येण्याचा आग्रह केला.
“तुझंच नाव तर श्यामल नाही ना?”
“होय. मीच श्यामल. आपण लता दीदी! सरांची मुलगी.
सर कसे आहेत? बरे आहेत ना? बिझी असतील ते!
आणि मॅडम?”
“अगं, किती प्रश्‍न विचारशील?”
“घे. पाणी घे. घर जुनं असलं, तरी भांडं बघा स्वच्छ आहे. आतून अधिक स्वच्छ. सर म्हणायचे, भांडं स्वच्छ तर हवंच, पण आतून ते अधिक स्वच्छ हवं! घे, पाणी घे!”
“श्यामल, नको असं बोलूस. त्या वेळी नाही वाटलं असं. पण आता… काळजाला घरं पडतात!”
“त्या वेळी म्हणजे?”
“तू आली होतीस आमच्याकडे तेव्हा.”
“दीदी, झालेत त्याला आता चार-पाच महिने. असं मनात नाही ठेवायचं! विसरून जायचं. त्या वेळी तुम्हाला योग्य वाटलं ते केलंत. आपण
कोण ठरवणार योग्य काय आणि अयोग्य काय ते. नंतर काळच ठरवतो ते!… असं
सर म्हणायचे.”
“सरांची फार आठवण येते?”
“फार?… अणुरेणूत भरून राहिलेत ते. कसे आहेत ते?”
“ठीक आहेत.”
“ऐकून फार बरं वाटलं. थांबा हं!” असं म्हणून तिने शेजारच्या मुलाकडे आईवडिलांसाठी
निरोप दिला.
“दीदी, जेवण साधंच असेल आजचं. पण उद्या पुरणपोळ्या करेन तुझ्यासाठी. भरपूर खाऊन जा. थांब दोन दिवस.”
“श्यामल आपण फोनवर बोललो, ते अजून लक्षात आहे तुझ्या? मला पुरणपोळ्या आवडतात ते…”
“हो! का? यात काय विशेष?”
“काय विशेष? अगं, आमच्या घरी आलीस, घरात घेतलं नाही आम्ही तुला. तरी ते घडलंच नाही, असं वागतेस तू!” असं म्हणून लताने डोळे पुसले.
“हे बघ श्यामल, आज तेवढा वेळ नाही मला. चल.
तुला मुंबईला न्यायला आले आहे. शिक्षणानंतर लगेच मोठ्या हुद्यावरची नोकरी मिळाली मला. तिथं तुझ्यासाठी एक जागा निश्‍चित करून आलेय. सर्टिफिकेट्स घे. एक-दोन ड्रेस घे. तुझे आईवडील आल्यावर निघू आपण. जेवणाचं नंतर कधीतरी बघू.”
“सरांनी सांगितलं तसं? मी तुमच्याकडून आल्यावर?”
“नाही. आधीच. नेहमी म्हणायचेत. लता, आता तू एम.बी.ए. होशील. तुला संधी मिळाल्यावर, श्यामलच्या नोकरीचं बघ. शहरात कुणी नाही तिचं. साधी, सरळ आहे बिचारी. तुझ्यासारखी. कसं होणार तुमच्यासारख्यांचं कोणास ठाऊक? घरात साधेपणा ठीक आहे, पण घराच्या बाहेर? शिवाय तुला शहरात तर यायचं आहे.”
“दीदी, यायचं होतं. तेव्हा… आता नाही. आणि तसंच ठरवून मी आले होते तुमच्याकडे. इकडचे सगळे पाश तोडून. आईवडील, भाऊ-बहीण… गाव… सर्व. उसने पैसे घेऊन… विश्‍वास एवढा होता की, परतीच्या पैशांची आवश्यकताही वाटली नव्हती. ऐन वेळेस एका नोकरी करणार्‍या मैत्रिणीने परतीचे पैसे पर्समध्ये कोंबले होते… परत कधी येशील, तेव्हा दे म्हणाली होती. मी परत गावी येणार नाही, असं तिलाही वाटत होतं. ठरवलं होतं, तुमच्याकडेच राहायचं. सांगाल ते काम करायचं… सरांसाठी आयुष्य वेचायचं… अर्पण करायचं सर्व आयुष्य त्यांना. समर्पित आयुष्य जगायचं. झालेली चूक सुधारायची. जगाला काहीही म्हणू दे… माझ्या नशिबात नव्हतं ते… नाही झाली भेट सरांची… कंपाऊंडच्या बाहेर पडेपर्यंत रेंगाळतच चालले होते मी. वाटत होतं, सर बाहेरून कुठून तरी येतील. भेट होईल. ते सांगतील तसं करायचं. पण नाही झालं तसं… मैत्रिणीने दिलेल्या पैशांमुळे मी निदान गावी तरी परतू शकले. दीदी, माझं आयुष्य तिथेच संपलं. आयुष्याची उमेद संपली. दीड-दोन महिन्यांनी मानसिकदृष्ट्या सावरल्यावर बाबांना सांगून एका मुलाशी लग्न ठरवलं मी. मी ग्रॅज्युएट… नोकरी नाही… घरची गरिबी… मागे दोन भावंडं. हा मुलगा एस.एस.सी. फेल… नोकरी नाही. आमच्यासारखंच जुनं घर. आधार हवा म्हणून लग्न करतेय मी. लोकांच्या नजरा टाळता येतील. नाही तरी घरातून पळून गेलेल्या मुलीशी कोण करणार लग्न?… आता हे गाव सोडून कुठेच जायचं नाही मला. सर म्हणायचे, मुलींना दोनदा संधी असते. एक स्वकर्तृत्वावर किंवा लग्न. स्वकर्तृत्वावर मला काहीच करता आलं नाही… आणि लग्न?” तिने हवेत हात उडवले.
“दीदी, याच कारणासाठी तू आली असशील तर…
मी नाही येणार. दीदी, सरांना सांगू नकोस आपलं
हे बोलणं. सर म्हणायचे, काही बोलणी जेवढ्या लोकांत झाली असतील, तेवढ्या लोकांतच राहिली पाहिजेत. वाईट वाटेल त्यांना… फार वाईट वाटेल.”
“तुला नक्की मुंबईला यायचं नाही?”
“नाही दीदी. मुळीच नाही!”
“निघते तर मी.”
“हो. थांब हं जरा… हे घे. पावशेर उकडे तांदूळ आहेत. सरांसाठी.”
“पावशेर?…”
“हो. घरात तेवढेच देता येण्याजोगे आहेत. दीदी,
सरांना सांभाळ!”
श्यामलच्या डोळ्यांत अश्रू होते.
लता उठली. श्यामलकडे परत एकदा निरखून पाहिलं आणि मिठी मारली तिला. तिच्या बाबतीत वडिलांनी सांगितलेला एकेक शब्द खरा होता. अडुसष्ट वर्षांच्या वडिलांची माणसं ओळखण्याची, त्यांच्या अंतरंगात शिरून त्यांना ओळखण्याची कला लताला चांगलीच माहीत होती.
लता निघाली. थोडी पुढे गेल्यावर ‘दीदी… दीदी’ करत श्यामल धावतच लताकडे आली. म्हणाली, “दीदी, तुझं पाकीट विसरलीस तू तिथे.” लताने निघताना मुद्दाम पैशाचं
पाकीट तिथेच ठेवलं होतं. काही न बोलता तिने ते घेतलं. खळकन दोन कढत अश्रू श्यामलच्या हातावर पडले. श्यामल आणि वडिलांच्या फोनवरून लतानेच तर हंगामा केला होता. लता गाडीत बसली नि निघून गेली. हात हलवून टाऽऽटा करण्याचं भानही श्यामलला राहिलं नाही.
चाळीस वर्षांनंतर परत एकदा लता मुंबईवरून त्याच मिठबांव कोंडवाडीला चालली होती. शक्य झालं तर श्यामलला आपल्याबरोबर कायमचं मुंबईला घेऊन जाण्यासाठी. पूर्वीच्या मानाने कोंडवाडीतली घरंही अद्ययावत दिसत होती. कार श्यामल तारकरांच्या घरासमोर उभी राहिल्याबरोबर, ‘दीदी, आले… आले! ’ असं म्हणत श्यामल बाहेर आली. कारकडे आपुलकीने बघत राहिली. म्हातारी… हाडकुळी… केस पिंजारलेली. दरवाजा उघडून लता कारच्या बाहेर आली. श्यामलकडे बघून तिचे डोळे पाणावले. श्यामलला गहिवरून आलं… काही न बोलताच दोघं घरात आली. चाळीस वर्षांनंतर घर आता अधिक छोटं झालं होतं… मोडकळीस आलं होतं. घरात सामान काहीच नव्हतं. लाकडांचा मात्र ढीग दिसत होता. कोणीतरी बोलायला पाहिजे होतं,
म्हणून मग लतानेच विचारलं, “श्यामल तू आतूनच कसं ओळखलंस की मी आले आहे म्हणून?”
“वाडीत काही जण स्वतःची कार घेऊन येतात, तर काही जण भाड्याची. आमच्या दारात एकच कार येणं शक्य होती. ती… तुझी. पण वाटायचं एवढ्या वर्षांनंतर… तू विसरली असशील. निदान आठवण राहावी असं काहीच घडलं नाही. घे. पाणी घे.” श्यामलने पाणी दिलं.


“भांडं स्वच्छ आहे, आतून तर अधिकच स्वच्छ आहे.” लता म्हणाली.
“खरं आहे. सरांचीच वाक्यं आठवतात. बाकी काहीच आठवत नाही बघ. चाळीस वर्षांपूर्वी परीक्षक म्हणून आले होते ते मिठबांव हायस्कूलला. ते मुंबईला परत जाताना एस.टी. स्टॅण्डवर भेट झाली. बोलण्याच्या ओघात स्थानिक पेपरात आजच्या कार्यक्रमाची बातमी आल्यास कात्रण पाठव म्हणाले होते. आपल्या ओळखीचे कोणीही इथे नाही, असं म्हणून त्यांनी आपला फोन नंबरही दिला होता. आठ-दहा मिनिटांचंच बोलणं आणि नंतर फोनवरचं बोलणं. आयुष्यात भरून राहिलेत ते. सगळं आठवतं, प्रत्यक्ष समोर घडतंय असं दिसतं. अरे, बोलत काय राहिलेय. आज निवांत जेवण करू. पुरणपोळ्या करू. मी शिकवते तुला!” असं म्हटल्याबरोबर लताच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. श्यामलही मग गप्प राहिली… विचार करत जरा वेळाने स्वतःशीच उपहासाने हसली ती.
“काय झालं श्यामल? हसलीस का?”
“दीदी, जेवण आणि पुरणपोळ्यांचं म्हणाले मी. कित्येक वर्षांत मी जेवलेच नाही गं. मी कसल्या पुरणपोळ्या वाढणार तुला! बर्‍याच वर्षांपासून वाटतं… वाटतं जेवावं एकदा पोटभर. आईवडील गेल्यानंतर वाडीत लग्नाचं आमंत्रण असलं की जायचे मी लग्नाला. जेवायची मी तिथे. पण नंतर तेही बंद केलं मी. लोक टोमणे मारायचे. धाकटी बहीण पळून गेली. परत आली नाही. त्या मानाने ही बरी. ही सत्तरीच्या म्हातार्‍याकडे पळून गेली होती. निदान परत तरी आली. बोलणं जिव्हारी लागायचं. जेवण नकोसं वाटायचं. मग जाणं बंद केलं आणि आता कधीतरी पोटभर जेवावसं वाटतं, तर कोणी बोलवतच नाही मला… आयुष्याला कलाटणी मिळायला एखादा क्षण पुरेसा असतो म्हणायचे सर… फोनवर. दीदी, खरं होतं त्यांचं म्हणणं. माझ्या आयुष्यात सरांच्या रूपाने आलेला क्षण माझ्या भाग्यात नाही बदलता आला मला. कदाचित… कदाचित ऐन वेळेला मीच दगा दिला सरांना, असं आता या वयात वाटतंय. सुरुवातीला आठ-पंधरा दिवसांनी फोन असायचा आमचा. मग माझेच फोन वाढले. मी केलेला फोन बंद करून ते स्वतः फोन करायचे. मला फोनचे पैसे भरावे लागू नयेत म्हणून. मग मी
काळ-वेळ न बघता फोन करायला लागले. बोलण्यासाठी विषय तर काहीच नव्हते. पण मीच आग्रह धरायची, काहीतरी बोला म्हणून. त्यांच्याशी बोलायची आस वाढायला लागली. प्रेमी युगुल बोलतात, तशी आग्रह करायची मी. बोला… काहीतरी बोला म्हणायची… विषय नसताना. कोणत्या तरी क्षणी सरांच्या ते लक्षात आलं असावं. वाहवत जाणार्‍या या तरुण मुलीला थांबवणं आवश्यक वाटलं असेल त्यांना. एका मुलीचं आयुष्य फुकट जाऊ नये, असं वाटलं त्यांना. त्याच क्षणी त्यांनी काहीतरी निश्‍चित विचार केला. दीदी, तुझ्या वाढदिवसानंतर लगेचच पंधरा दिवसांनी माझा वाढदिवस असतो. तू आणि मॅडमनी शुभेच्छा दिल्यानंतर सरांनी दिलेल्या शुभेच्छा… मन हरखून गेलं माझं. म्हणाले, जगातील सगळ्या चांगल्या गोष्टी मिळोत तुला. माझ्या आयुष्यात येणार्‍या चांगल्या गोष्टीही मिळोत तुला. एवढ्या मोठ्या व्यक्तीकडून वाढदिवसाची ही अशी भेट! अपेक्षा नव्हती अशी. फार आनंदात होते मी. आणि तेव्हाच बोलण्यातला फरक जाणवला मला. मी मात्र तशीच होते. त्या क्षणी सरांनी पापी मागितली. मी सिरीअस झाले. आजवरच्या संस्कारांनी वाढलेली मी… मी काहीच बोलले नाही. दुसर्‍या दिवशी फोन करून सांगितले, सर आजपर्यंत मी तुम्हाला फार उच्च… फार वेगळे समजत होते… पण सर, तुम्ही तर सामान्यच निघालात… अति-सामान्य. मनातून उतरलात तुम्ही, सर. दीदी, तिथेच माझ्या भाग्याला दूर लोटलं मी. त्यानंतर त्यांनी मला कधीच फोन केला नाही किंवा मी केलेला फोन कधी घेतला नाही. आता वाटतं, का केलं मी असं? एवढ्या लांबून, पाच-सहाशे किलोमीटरवरून… वडिलांपेक्षा वयस्कर सर, पापी मागताहेत, दिली असती… तर काय बिघडलं असतं? तसं बोलून मी काय मिळवलं? हे… हे आयुष्य. मी हो म्हटलं असतं… दिली असती फोनवर पापी तर याच्यापेक्षा निश्‍चित काही चांगलं घडलं असतं. सर, पापीच काय, म्हणाल तर जीवसुद्धा देईन, म्हटलं असतं तर आजच्यापेक्षा काय वाईट झालं असतं माझं? विचारांती, माझी चूक कळल्यावर मी तुमच्या घरी आले होते. घरदार सोडून… घरात नाही घेतलंत मला… मागत असतानाही पाणीही नाही दिलंत…” असं म्हणून ती रडायला लागली.
थोडी शांत झाल्यावर ती म्हणाली, “माझं आयुष्य माळरानावर उगवलेल्या निवडुंगासारखं झालं दीदी!
त्या निवडुंगाचं ना कुणाला कौतुक… ना त्याच्या फुलाकडे कुणाचं लक्ष… निवडुंग उगवला काय… नष्ट झाला काय… कुणाला त्यांचं काय हो! तसंच माझं आयुष्य दीदी… निवडुंगासारखं!… लग्नानंतर पाच-सहा महिन्यांनी नवरा काविळीने वारला. नवरा गेल्याचं दुःख नव्हतंच मला. सारखं सरच आठवायचे. त्यांचाच विचार सतत मनात यायचा. त्यांच्याच त्या अति विचाराने दोनदा आत्महत्येचाही प्रयत्न केला मी. काहीतरी उणं वाटायचं. काही नाही कळायचं… पण आता कळतंय, काय ते. दीदी, तू इतक्या वर्षांनंतर कशाला आलीस माहीत नाही. सरांबद्दल काहीच बोलली नाहीस…”
“श्यामल, आमच्याकडे तू येऊन गेल्याचं कळल्यानंतर बर्‍याच वेळेस ते अस्वस्थ व्हायचे. शेवटच्या दिवसांत बाबा मला म्हणायचे, श्यामलचा शोध घे. बघ काही करता आलं तर तिच्यासाठी. सतत तुझाच ध्यास… तुझाच विचार.
ते गेले. त्यांच्या वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी…”
“आणि मला ते आज कळतंय.” श्यामलची नजर शून्यात गेली… डोळ्यांत अश्रू गोळा झाले. थोड्या वेळाने निश्‍चित विचार करून ती म्हणाली, “दीदी, निघ तू… मी आज दुखवट्यात आहे… निघ… मला आता काहीच बोलायचं नाही.” ती बाहेर आली. कारचा दरवाजा उघडला. म्हणाली, “दीदी, निघ तू… आता… आता मी सुखाने मरेन…
नको… काही बोलू नकोस! लताच्या डोळ्यांत अश्रू आले.”
“नाही श्यामल. खरं तर यापूर्वीच यायला हवं होतं मला. पण सवडच झाली नाही. श्यामल, बाबांचं… तुझ्या
सरांचं शेवटचं म्हणणं मानणार नाहीस तू? त्यांचं म्हणणं… म्हणूनच तुला मी न्यायला आलेय… माझ्याबरोबर… मुंबईला. तुझ्या सरांची शेवटची इच्छा… श्यामल.” श्यामल पुन्हा शून्यात गेली. लताने तिला गाडीत बसवलं. गाडी मुंबईच्या दिशेने धावू लागली.

  • राम कोयंडे

Share this article