Close

निराशा (Short Story: Nirasha)

छोट्या म्हणजे फक्त बारा वर्षाच्या प्रियांकाने काढलेली सुंदर रांगोळी पाहून नेत्रा चकीत झाली. प्रियांकाने ही रांगोळी शेजारच्या मावशींच्या दारात काढली होती. ही प्रियांका म्हणजे मावशीकडे काम करणार्‍या मालनची मुलगी. खरं तर ही मालन किंवा तिची मुलगी प्रियांका जरुरीपेक्षा जरा जास्त मग्रूरच होत्या. कधी नेत्राची कामवाली नाही आली, तर नेत्राने कितीही विनवणी केली, जरा जादा पैसे देऊ केले तरी काम करीत नसत. असा बराच अनुभव घेतल्यावर खरं म्हणजे त्या नेत्राच्या मनातून उतरल्या होत्या. कधी मावशींकडे दिसल्या तर केवळ उपचार म्हणूनच हसत होती.
नेत्राला त्या मालनची नेहमी एक गंमत वाटे, की पदरात चार मुली असून त्यात नवरा नाही व गाठीशी खूप पैसा होता असेही नाही, तरीही मग्रुरी किती होती वागण्यात. नेत्राला आठवले की मागे एकदा तिच्या पुतणीचा एक जुना फ्रॉक तिच्या घरी विसरला होता म्हणून तिने जाऊबाईंना फोनवरून विचारले- ‘वहिनी फ्रॉकचे काय करू?’ त्यावर त्या म्हणाल्या की देऊन टाक एखाद्या गरिबाला. तेव्हा तिला मालनच्या मुलीची आठवण आली. दुसर्‍या दिवशी तिने मालनला विचारले, “काय ग मालन हा चांगला फ्रॉक घेऊन जाशील का? बघ तुझ्या कोणत्या मुलीला होतो ते.” त्यावर म्हणते कशी, “माझ्या पोरी काही दुसर्‍याचा फ्रॉक घालणार नाहीत पण तुमच्या घरात पडून राहणार असेल तर देईन जावेच्या मुलीला. त्यांना चालतं दुसर्‍यांनी दिलेलं.” मग तिने तो फ्रॉक मालनकडे दिला व कानाला खडा लावला की इथून पुढे मालनला काही द्यायचे नाही.
पण मूळचा सरळस्वभाव असलेली नेत्रा हा अनुभव विसरली आणि प्रियांकाने काढलेली रांगोळी पाहून खुश झाली. दुसर्‍या दिवशी प्रियांका दिसल्यावर हाक मारून तिचे कौतुक केले. नंतर मावशींजवळ तिच्या अंगी असणार्‍या कलेचे कौतुक केेले. त्यावर मावशी म्हणाल्या, “अहो काय सांगू, ही मालन आता तेवढी मगू्रर राहिली नाही. आता सारखी म्हणत असते - ताई, वाढती महागाई त्यातून चारही पोरीच. काय नको त्यांना? किती कमवले तरी पुरं पडत नाही. त्यातून नवर्‍याने घेतलेले कर्ज अजून फेडते आहे व या प्रियांकाची तर जास्त काळजी वाटते. दिसायला चांगली आहे. हातात कला आहे, पण उपयोग काय? शाळेत तर पुढच्या वर्षी ठेवणार नाही, कारण नगरपालिकेची शाळा असली तरी बाकी गोष्टी लागतात ना! त्यापेक्षा कुणाला हवी असेल तर दिवसभरासाठी त्यांच्याकडे ठेवायची तयारी आहे. तेवढाच तिचा खर्च तर सुटेल.” असं मावशींनी सांगताच नेत्राच्या मनात विचार पक्का झाला. अर्थातच मावशींना त्यावेळी काहीही बोलली नाही. फक्त रात्रीच्या जेवणापर्यंत धीर धरायला हवा होता.
कधी एकदा रात्र होते असं तिला झालं होतं. दुपारपासूनच रात्रीची वाट बघत होती. नेत्रा जरा उतावळ्या स्वभावाचीच होती आणि यावरून नवर्‍याचे- म्हणजे सुदीपचे व तिचे खटके उडत असत. त्याचे म्हणणे एखाद्या गोष्टीवर पूर्ण विचार कर मगच निर्णय घे ना. म्हणजे मग वाईट वाटण्याची वेळ येत नाही. प्रत्येक वेळी वरकरणी ती ‘हो विचार करेन’ असे म्हणत असे. पण वेळ येताच हे सारे विसरून जाई. मग कधी कधी निर्णय चुके अन् मग वाईट तोंड करून बसे, मूड घालवून बसे, नाहीतर सुदीपचे डोके खात बसे. पण मूळ स्वभाव जाईना म्हणतात ना! त्यानुसार त्या रात्री डायनिंग टेबलवर ती, सुदीप व मुलं जेवायला बसली असताना, पानं वाढून तिने हळूच विषय काढला.
“मला तुम्हाला एक बेत सांगायचा आहे.”
“काऽऽय” एकजात सर्व ओरडले. “नाही. घाबरू नका. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की, हल्ली मला तसा खूप वेळ असतो. पण कुठे मंडळात जा, शॉपिंगला जा, हे मला आवडत नाही. त्या पेक्षा एखादे सत्कार्य करावे असे खूप वाटते.” थोडीशी चाचरत व मंडळींचा अंदाज घेत ती बोलली. “पण सत्कार्य म्हणजे काय? काही योजना आखलीस का आई?” दोन्ही मुलांनी एकदम विचारले
“होऽऽऽ ती शेजारी मालन येतेना मावशींकडे, तिच्या प्रियांकाला थोडी मदत करावी असं वाटतंय. तिच्या हातात कला आहे. एखाद्या क्लासला घातली तर ती एक उत्तम कलाकार होईल,” नेत्राने सांगितले. “अग ती मग्रुर आहे असं तूच तर म्हणत होतीस ना!”सुदीपने विचारले. “हो अगोदर तशी होती पण आता बरीच निवळलेय. असं मावशी सांगत होत्या. ठीक आहे. जशी तुझी मर्जी. तुला जे योग्य वाटेल ते कर. पण तुला आम्ही ओळखतो, त्यानुसार तू माणसांना लवकर कंटाळतेस. विचार कर, आमची काहीच हरकत नाही,” असे सुदीप म्हणाला. “काय रे पोरांनो बरोबर आहे ना?” त्यांनी पण माना डोेलावल्या. आपला प्रश्‍न इतका बिनविरोध सुटला हे पाहून ती आनंदली व पटापट आवरून आडवी झाली ती दुसर्‍या दिवसाची प्रतीक्षा करत.
दुसरा दिवस उजाडला. सकाळचे नऊ वाजले, तशी हिने मावशींची बेल दाबली. दार नेमके मालननेच उघडले. तिला बघताच ही म्हणाली, “मालन तुझं काम संपताच येऊन जा हं. थोडं बोलायचंय.” अन् मग मालन आली तेव्हा हिने विचारले, “काय ग मालन मावशी म्हणत होत्या तू प्रियांकाला शाळेतून काढणार आहेस म्हणे.” “हो खरं आहे ते ताई! शाळेत शिकायचे तर पैसा हवा ना,” मालन म्हणाली. “ठीक आहे. मग मी तुला एक गोष्ट सुचवू का तिला शाळेत तर ठेवच पण चित्रकलेच्या क्लासला पण घाल. मी सगळा खर्च करेन. त्या ऐवजी शनिवारी येऊन तिनं मला घर कामाला मदत करायची. चालेल का बघ.” आपला प्रस्ताव ऐकून मालन हुरळेल असे तिला वाटले. पण मालन स्पष्टपणे म्हणाली. “पण ताई! नक्की ना. हा विचार तुमचा आहे ना! तुमच्या मोठ्या लोकांचं काही सांगता येत नाही. मनात आलं की, जवळ करता, नकोसं झालं की दूर लोटता म्हणून विचारते.” तिचे हे स्पष्ट बोलणं तिला मनाला लागलं. पण तिनं तसं दाखवलं नाही.
पुढच्या महिन्यापासून चित्रकलेचा क्लास लावायचा व प्रियांकाने हिची कामे करायची असे ठरले. महिना संपायला आठवडाच बाकी होता. नंतर प्रियांका आली. तिला नेत्राने सर्व समजावून सांगितले तशी ठसक्यात म्हणाली, “काकू! कशाला सांगताय मला सर्व माहीत आहे.” “ठीक आहे. बरं झालं.” नेत्रा म्हणाली, “तसं तेच तेच सांगण्याचा मला कंटाळा येतो. उद्यापासून ये.”
दुसर्‍या दिवसापासून प्रियांका यायला लागली. घर तसं ओळखीचं असल्यामुळे संकोच वाटण्याचा काहीच प्रश्‍नच नव्हता. तिने आणलेली पुस्तकं, तिचा अभ्यास, वह्या वगैरे नेत्राला दाखविले. मग नेत्राने उत्साहाने तिला शिकवायला सुरुवात केली. सायंकाळी चित्रकलेच्या मॅडमकडे घेऊन गेली. मॅडमशी ओळख होतीच. त्यामुळे हिला घ्या, एवढेच नेत्राने सांगितले. तशी मॅडम म्हणाल्या, “मला तुमचे खूप कौतुक वाटते हं नेत्राताई. याला म्हणतात समाजकार्याची आवड. परत डंका नाही.” “तसं काही नाही हो!” नेत्रा संकोचून म्हणाली, “मला एवढंच वाटतं की, तळागाळातील कलाकारसुध्दा संधी मिळाली तर प्रगती करू शकतो. ह्या प्रियांकाचे ड्रॉईंग चांगले आहे म्हणून मला वाटले की, हिला संधी द्यावी. बरं येऊ मी आता. जर काही साहित्य लागले तर हिच्या बरोबर लिहून द्या म्हणजे मी ते तिला घेऊन देईन.” “अधूनमधून येत जा!” असं मॅडम म्हणाल्या.
मग नेत्रा सांगेल ते थोडं काम करून शाळा, अभ्यास, क्लास यात प्रियांका यश मिळवू लागली. बघता बघता एसएससी झाली चांगल्या मार्काने. मग नेत्रानेच तिला समजावून सांगितले की एसएससी नंतर या कला क्षेत्रात शिकण्यासाठी बर्‍याच संधी असतात. तोपर्यंत नेत्राच्या मदतीने प्रियांकाने हे यश मिळवले आहे ही बातमी सर्व सोसायटीभर झाली होती. एक दिवस नेत्रा मावशींकडे बसली होती व मालन तेथेच काम करीत होती. तेवढ्यात सानेकाकू तेथे आल्या व मालनला पाहून म्हणाल्या. “नशिबवान आहेस तू अन् प्रियांका. नेत्राताईंनी प्रियांकाला मार्गदर्शन केले नसते तर हे दिवस तुला दिसले नसते.” हो खरं आहे तुमचं, असं म्हणण्याऐवजी स्वभावानुसार मालन ताडकन् म्हणाली, “सगळे नेत्राताईंचं काय कौतुक करताय? परवा शहाभाभी, सुमन ऑन्टी पण असंच म्हणत होत्या. प्रियांका पण हुशार होती म्हणून हे घडलं ना! ते कुणी नाही म्हणत ते. शिवाय या नेत्राताईंना असल्या गोष्टींची हौस म्हणून मला विचारले. मी नव्हते गेले त्यांना विचारायला त्यांच्याकडे. शिवाय फुकटात नाहीत करत त्या. थोडंसं का होईना माझी मुलगी काम करते त्यांच्या घरात, हे तुम्ही विसरता वाटतं.” तिचा हा भडिमार ऐकून सानेकाकू तर अवाक झाल्या व तिला म्हणाल्या. “मालन अग, काय बोलतेस हे तू.” त्यावर नेत्राच म्हणाली जाऊ दे काकू. तिने आभार मानावेत म्हणून मी हे केले नाही. नंतद थोडा वेळ गप्पा मारून ती घरी आली व नंतर विचार करत बसली की मालन असं कसं बोलू शकते. रात्री बोलताना तिने सुदीपला व मुलांना ही गोष्ट सांगितली. तर त्यावर तो म्हणाला, अग हे अपेक्षितचे होते. माणसाला न मागता मदत दिली तर माजच येतो. विशेष काही नाही. मालनसारखी खूप माणसे या जगात असतात. तू फारसं मनावर घेऊ नकोस. मग तो विषय तेथेच संपला. दिवस भरभर जात होते. नेहमीचे रुटीन चालू होते. प्रियांकाचे चित्रकलेचे शिक्षण उत्तम गुणासहीत पुरे झाले. पुढे एका चांगल्या शाळेत तिला नोकरी लागली. फावल्या वेळेत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळवत होती. या सर्व धावपळीत प्रियांकाने नेत्राच्या परवानगीने तिचे काम सोडले. तिचा व्यवस्थित जम बसला होता. ती खूप खूष होती. पुढे मालनशी पण जास्त संबंध न राहिल्याने प्रियांकाची बातमी कधीमधी कळत होती.


अचानक एक दिवशी सकाही बेल वाजली व नेत्राने दार उघडले तर मालन व दोन अनोळखी बायका समोर उभ्या. शेजारच्या मावशीपण सहा महिन्यासाठी अमेरिकेला गेलेल्या. म्हणून तिला विचारले का ग काय काम आहे. तर ती ओरडली, काम काय असणार. चांगलं वाटोळं केलंत माझा आयुष्यांच. काही न समजून नेत्रा म्हणाली. का काय केलं मी? मालन म्हणाली. हे मात्र बरं हं! आधी आमच्यासारख्याचं वाटोळं करायचं अन मग वर विचारायचं काय झालं. ही चिठ्ठी वाचा म्हणजे सर्व कळेल. तिने ती चिठ्ठी ओढूनच घेतली व वाचू लागली.
प्रिय आईस,
स.न.
मी आमच्या शाळेतील एक क्लार्क श्री. सदुभाऊ शितोळे यांच्याबरोबर लग्न करीत आहे. त्यांना पहिली बायको व मूल असल्यामुळे तसेच तो आपल्या जातीतील नसल्यामुळे मला माहित आहे की, तुझा या लग्नाला विरोध असेल. म्हणून पळून जाऊन मी हे लग्न करीत आहे. आमचे दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. तू माझा शोध घेऊ नकोस अगर पोलिसात जाऊ नकोस कारण मी सज्ञान आहे व तोपर्यंत आमचे लग्न झाले असेल.
कळावे.
राग नसावा ही विनंती.
तुझी मुलगी
प्रियांका
चिठ्ठी वाचून नेत्रा हबकलीच. पण तिला कळेना यात तिचा काय दोष ते. म्हणून ती मालनला म्हणाली. यात माझा काय दोष. मी थोडंच तिला सांगितलं की पळून जा म्हणून. शिवाय हल्ली ती थोडीच माझ्याकडे कामाला येत होती. त्याबरोबरच त्या बायका म्हणाल्या. बाई तुम्ही जरी नाही सांगितलंत पळून जा म्हणून. तरी पण तिला शिकवून शहाणी करून ठेवलंत. चार पैसे मिळू लागले तशी आमच्या घरातलं काही आवडेना तिला. तुम्हा लोकांसारखी होऊ पाहात होती. नात्यातले कित्येकजण हुंडा देऊन हिच्याशी लग्न करायला तयार होते. त्या पैशातून हिचं घर सावरलं असतं ना.
तिला ते कोणीच नको होते कारण काय तर ते दारू पितात. स्वच्छ नसतात. ती जर शिकली नसती तर तिने आमच्या पैकी एकाशी लग्न केले असते. आता पळून जाऊन लग्न केल्याने आमची नाचक्की झाली व वरत हिच्या बाकी तीन मुलींच्या लग्नाचा प्रश्‍न आला.
हे ऐकून नेत्राला काय बोलावे हेच सुचेना. ती तशीच संभ्रमावस्थेत उभी राहिली. नंतर मालन फटकन म्हणाली, आता तरी दुसर्‍या कुणाला शिकवायला ठेऊ नका. नाहीतर तिच्या आईवडिलांचे शिव्या शाप खाल. एवढं बोलून ती धाडकन दार लावून निघून गेली.
ती गेल्यावर नेत्राला जो कढ आला की ती आत बेडवर जाऊन ओक्साबोक्शी रडू लागली. खेराखरच प्रियांकाचे वाईट व्हावे म्हणून का मी तिला शिकविले. यात माझी काय चूक. पुढे असं काही होईल हे काय मला स्वप्न पडलं होतं. हे म्हणतात तेच खरं. काही माणसं जात्याच माजोरी असतात. त्यात गरीब श्रीमंत असा भेद नसतो. पण या मालननी मात्र असे वागून मला निराश केले. आता या पुढे ह्यांचं ऐकायचं. कुणालाही न मागता मदत करायची नाही, असे मनाशी ठरवत उशीमध्ये डोकं खुपसून बसली व ही गोष्ट सुदिपला व मुलांना कशी सांगायची हे मनाशी ठरवू लागली.

ज्योती आठल्ये

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/