नानीची नव्वदी उलटली. नानी सोप्यात बाजेला खिळून होती. आपल्या किलकिल्या पण जीवनेच्छेनं चमकणार्या डोळ्यांनी ती भरल्या घराकडे पाहात असायची.
नानी चांगली पिकल्या वर्षांची होती. अंगावरच्या सुरकुत्यात तिचं वय दिसत होतं. उरलेल्या विरळ पांढर्या केसांच्या सुपारी एवढ्या बुचड्यात तिचं आजवरचं फारशा महत्त्वाच्या घटना नसलेलं आयुष्य बांधलं गेलं होतं. तिच्या मंद तेवणार्या डोळ्यात मात्र भलं मोठं वात्सल्याचं अंगण उभं होतं. त्या अंगणात तिचं गोकुळ नांदत होतं. नानीचा पलंग एका कोपर्यात होता. पण नानीचं लक्ष मात्र घराच्या कानाकोपर्यात नाही तर बाहेरच्या अंगणात ही असायचं.
“मधु, आता देवेनचं लग्न लावून दे बाबा. मग मी सुखानं डोळे मिटेन.” आजकाल तिचं हे नेहमीचं टुमणं मधुच्या अन् सुनेच्या मागे लागलं होतं.
नानीला सुखानं मरायला देवेनचं लग्न पुरेसं होतं.
नानी नेहमीच समाधानात होती. घरातल्या सध्याच्या सर्वच पिढ्यांनी तिला वृद्धच पाहिलं होतं. कारण घरातल्या लहान मुलांची ती पणजी होती. कर्त्या पिढीची आजी होती.
ती आजी असेपर्यंत स्वयंपाकात लुडबुड करायची. सणासुदीला सरसावून उठायची.
मग ती पणजी झाली.
पणजी झाल्या झाल्या नातवाला मांडीवर घेऊन बसायची. दोन तीन नातवंडं झाली. हळूहळू नातवंडं सावरलीही जायची नाही.
पण जिवापाड जपत ती नातवंडांना थोडावेळ तरी उचलून घ्यायची. गुटी उगाळायची, रामरक्षा म्हणायची.
हळूहळू तिची स्वयंपाक घरातली लुडबुड थांबली. तिचा सगळा वेळ पलंगावरच बसल्या बसल्या जाऊ लागला. पण तिला त्याचं दुःख नव्हतं. तिची दृष्टी पतवंडांबरोबर रांगत असायची, दोरीवरच्या उड्या मारत असायची, पोरींच्या वेणीफणीवरून, आखुड लांब कपड्यांवरून, घड्याळाच्या काट्यावर फिरत असायची. घर मोठं होतं. चार भावंडं एकत्र राहात होती. सुना होत्या. त्यांच्याकडे तर नानीचं लक्ष विशेष असायचं. नानीला सदोदित घरातल्या नवोदित वंशाचे वेध लागले असायचे. सगळ्या सुनांचे दिवस ती मोजत असायची. मग कधीतरी “सुशे… इकडे ये..”
“काय नानी?”
“अगं पौर्णिमा उलटून तीन दिवस झालेत, तू काही ‘बाहेरची’ झाली नाहीस.”
ही सुशी पहिलटकरीण असली तर कावरीबावरी व्हायची, लाजायची. पण दुसर्या तिसर्या वेळेची असली तर “अगबाई… नानी, बरं तुम्ही लक्षात ठेवलं! मी तर घराच्या धांदलीत पौर्णिमेचं विसरूनही गेले होते. काय करावं बाई आता?’
“अगं करायचंय काय? देवानं दिलंय ओटीत ते घ्यायचं.”
“नानी आता तिसरं…”
“काय गं बाई तुम्ही पोरी! आम्हाला पाच पाच मुलं व्हायची. अगं मातीच्या जातीच्या आपण. ती किती अन् कोणकोणती बीजं पेरून घेते आणि उगवून देते. तू तर तिसर्याच्या वेळीच…”
समोरची सून विचारातच असायची. “काळजी करू नको. मी आहे ना..”
नानी दिलासा द्यायची.
घर मोठं होतं. घरात पन्नास माणसं होती. राबता होता, दुभतं घरचं होतं. घरात तरुण सुना होत्या. घर गर्भारही असायचं आणि बाळंतही असायचं.
आणि या नवजात घराला जोजवणारी दोरी नानीच्या हाती असायची.
नानी गर्भार स्त्रीचं पोट पाहून मुलगा होणार की मुलगी हे सांगायची. आणि ते बरोबरही ठरायचं.
नानीनं सत्तरी ओलांडली होती. तेव्हा तिला पैलतीराची आठवण डाचत असायची.
तिची नात वयात आली तसं नानीनं सुरू केलं.
“मधु, जान्हवीला एकदाचं उजवून टाक. तिचं लग्न झालं की मी डोळे मिटेन.”
जान्हवी नव्या पिढीची.
उजवून टाक एकदाचं काय नानी. मी असं कोणाशीही लग्न नाही करणार. आणि मला आधी करिअर सुरू करायचंय. मग लग्न बिग्न.
“जान्हवी, लग्नानंतर गृहिणीपद ही तुमचं काय ते करीअर की काय तेच असतं. तुझी आई तुझ्यासाठी जे काही करते त्याचं काही महत्त्व आहे की नाही.”
नानी अशावेळी सुनांची बाजू घ्यायची. पण सुना मात्र जान्हवीकडून असायच्या.
“नानी, शिकू दे तिला. आमचं काम नुसतं चूल नि मूल. एवढं झालं. पण आमच्या मुलींचं नको आमच्या सारखं व्हायला.”
“तुमचं काय वाईट झालं गं?”
“या मुलींचं आयुष्य पाहिलं नं की आपण काय काय हरवलं ते कळतं नानी. जीव खंतावतो. आपण चांगली गृहिणी आहोत हे फक्त समाधानासाठी म्हणायचं. बाकी शंभर रुपये मनासारखे खर्च करण्याची सोय नाही.”
“सुनबाई, दर पिढीला काही ना काही अधिकाराचं मिळतंच असतं. आमच्यापेक्षा एक पाऊल तुम्ही पुढे. पण शेवटी बाईपण लग्नानंतरच येतं. साजिरे गोजिरे होऊन. म्हणून म्हणते जान्हवीचं लग्न ठरवा की मी डोळे मिटेन.”
जान्हवीचं लग्न झालं तिच्या मर्जीनं.
सुना नानीची अधिकच काळजी घेऊ लागल्या.
नानी खरंच डोळे तर मिटणार नाही?
सकाळी नानीसाठी चहा घेऊन जाताना त्यांचा जीव दडपून गेलेला असायचा. नानीला कुठे काही झालं तर नसेल! त्या दबकतच त्यांना उठवायच्या.
नानी प्रसन्न हसत उठायची!
“छान ऊन आलंय अंगणात. रांगणार्या बाळासारखं. बाहेरच घेते चहा.” नानी हसत म्हणायच्या. सुनेचा जीव भांड्यात पडायचा.
नानी समोरून देवेन जायचा तशी नानी निरखून पाहायची. पोर रूबाबदार दिसत होता. चांगल्या मिशा राखल्या होत्या. सतत लगबगीत असायचा. त्याच्या मागे त्याची आई चहा घेऊन, पोहे घेऊन धावत असायची.
“कुस्मे, पोरामागे धावायला आता काय तू तरणीताठी बाई आहेस? पन्नाशीला तर आलीच असशील.”
समोर मधु असला की चिडवायचा.
“बघ तूच नानी, पोरामागे कशी धावपळ करते आणि मी काही मागितलं की पाच मिनिटं थांबा… गुडघे दुखतात, टाच दुखते, म्हणते.”
“बरोबर आहे बाबा तिचं. तिच्या आयुष्यात तू बाहेरून आलेला. पण तिचा मुलगा तिच्या गर्भातून तिच्या आयुष्यात आलाय. तेवढा तर फरक असतोच.”
“असं नाही हो नानी. देवेन लहान आहे. तरुण वयात कामापुढे खाण्याचं, वेळेवर खाण्याचं भान राहात नाही. ‘हे’ आता मोठे झाले.
स्वतःला कसं जपायचं ते या वयात कळतं. शरीरच सांगायला लागतं हे कर, हे नको करू.”
“तुला बोल नाही लावत सूनबाई. अगं तुझ्या वयात मी ही होते ना कधी, ह्यांच्या पेक्षा मुलांकडेच….” बोलता बोलता नानी गप्प व्हायची. ‘ह्यांची’ आठवण तिला अस्वस्थ करायची.
“हे हवे होते आज. भरलं घर, नातवंडं पाहून त्यांना केवढा आनंद झाला असता. पण जायची घाई केली. पण पुढच्या जन्माची व्यवस्था केली.“
“ती कशी?”
“अरे. पुढे गेलेत. जन्म घेतला असेल एव्हाना. मोठे होतील. तोवर मीही पुढच्या जन्मात पोहचेन. अरे नवरा बायकोपेक्षा मोठा हवा ना! म्हणून आधी गेले असावे. म्हणून म्हणते आता देवेनचं लग्न लाव. मग मी आपली डोळे मिटेन. कोठेतरी जन्म घेईन. ‘यांची’ बायको होईन.”
नानीचं बोलणं ऐकून सर्वांना हसू आलं. तिची श्रद्धा पाहून हळवेही झाले.
“आम्ही जुनी माणसं. कधी एकमेकांशी बोलायचो नाही. पण न बोलता सगळं समजायचं. नवर्याच्या पानात जेवायची पद्धत होती पूर्वी. मला उसळ फार आवडायची. ‘हे’ मुद्दाम जास्त उसळ घ्यायचे. उरवायचे.” नानी.
“का? तू जेवताना घ्यायची नाही.”
“नाही रे. सासूबाई पानात वाढायच्या तेवढं खायचं असा नियम होता पूर्वी. हातानं आपलं पान वाढून घ्यायची काय बिशाद? पण तुझ्या आजोबांनी निभवलं.”
नानी अल्पसंतुष्ट होती.
पण तिचं ते वाक्य सर्वांनी उचलून धरलं.
“ते आधी गेले. पुनः माझा नवरा व्हायला.” मुलांना चिडवायला विषय झाला.
“नानी, आजोबा काय करत असतील आता?” मुलं विचारायची.
“गणिताच्या गुरुजींच्या छड्या खात असतील. गणितात कच्चे होते ना!” आजी मासलेवाईक उत्तर द्यायची.
सगळ्यांना हसायला विषय पुरायचा.
“जान्हवीला अजून दिवस गेले नाहीत सूनबाई.” नानी सुनेला विचारायची.
“जातील हो नानी. आजकाल मुलींना लवकर मूलं नको असतं.”
नानी उसासा सोडायची.
“देवाचं देणं नाकारू नाही बाई. लवकर दिवस जाऊ दे म्हणावं. एकदा पतवंडं पाहिलं की…”
“…सुखाने डोळे मिटशील, आजोबांना भेटशील, लग्न करशील…”
“हो बाबा…”
“नानी, आजोबा आता आठवी नववीत असतील.”
“असू दे. वयात अंतर असतंच की. त्यांच्या माझ्या वयात पंधरा वर्षांचं अंतर होतं. पुनः तेवढंच राहील.” नानी समजूत घालत म्हणायची.
नानीचं म्हातारपण वाढत होतं. पण तिचं संसारात रमणं कमी होत नव्हतं. सासुरवासात अपुर्या राहिलेल्या इच्छा ती पूर्ण करत होती. कधी धिरडं खा. कधी पंचामृत करायला लाव, कधी तोंड कडू पडलं म्हणून वाटीभर तरी पुरण घाल असं काही चालायचं. जुन्या सुना आवडीनं तर नवीन सुना नाकं मुरडत का होईना नानीची इच्छा पूर्ण करत.
नानीची नव्वदी उलटली. नानी सोप्यात बाजेला खिळून होती. आपल्या किलकिल्या पण जीवनेच्छेनं चमकणार्या डोळ्यांनी ती भरल्या घराकडे पाहात असायची. नानीच्या मुलांनी साठी उलटली होती.
नानी अंगणातल्या पिंपळाकडे पाहात असायची. उंच वाढलेला पिंपळ बघून समाधानानं हसायची.
“अरे, एवढीशी चार पानं उगवून आली. मी लहान! उपटणार होते तर सासूबाई म्हणाल्या पिंपळ उपटू नाही. तो देववृक्ष. भाग्यानं आपल्या घरात उगवला.
तेव्हा पासून रोज पिंपळाची पूजा करायचे, हळदी कुंकू चढवायचे. मग दर पौर्णिमा, अमावस्येला भाताचा नैवेद्य लावायचे. मुंजाचं झाड म्हणून. पाहता पाहता झाड वाढलं. वाढू द्या त्याला, तोडू नका. घरातल्या अनेक पिढ्या पाहणारं दीर्घायुष्यी झाड आहे ते. त्याचे आशीर्वाद असू द्या.”
नानी पिंपळापेक्षा काय कमी होती? पिंपळा इतकंच नानीला जपलं जात होतं.
“मधु, अरे जान्हवीच्या मुलाची मुंज करावी लागेल.”
“आई, मुंज जान्हवीच्या सासरी होईल.”
“विचारून बघ. इथे करतील तर मी मुंज पाहू शकेन. पुण्याला या वयात मी कशी जाणार?”
“बघू या विचारून. पण ते लोकं ऐकतील असं नाही वाटत.”
“मधु, सांग त्यांना नानीला मुंज पाहायची आहे. एकदा मुंज पाहिली की सुखाने डोळे मिटेन… आणि…”
“नानी, आजोबा आता पंचविशीचे असतील. तु कसली त्यांची बायको होतेस!” मधु.
“खरंय मधु तुझं. पण अखेरी अखेरीस नवरा बायकोवर मुलीसारखं प्रेम करू लागतो. सगळे हट्ट पुरवतो. त्यांची मुलगी म्हणून मी जन्मेन. पण साथ सोडणार नाही. कुणा मेलीला त्यांची बायको व्हायचं तिला हो म्हणावं.” नानी शेवटचं वाक्य फणकार्यानं म्हणाली.
मधुला हसू लोटलं.
“नानी, अगं आजोबांची बायको म्हणजे तुझी आई असेल ना!” मधू
“अगं बाई, खरंच की!” नानी विचारात पडली.
समोरचा पिंपळ नानीच्या त्या अवस्थेवर पान फडफडवून हसत होता.
-रेखा बैजल