Close

नाळ (Short Story: Naal)

  • सुधीर सेवेकर
    पूर्वीचं देवखेड, मूळचं देवखेड पृथ्वीच्या नकाशावरून काही दशकांपूर्वीच नाहीसं झालं होतं. आता अस्तित्वात आहे ते नवं देवखेड. शासनानं पुनर्वसन केलेलं.

  • गाव आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. खरं तर पूर्वीसारखं आता या जगात राहिलंय तरी काय? ना माणसं, ना ते स्नेहसंबंध, ना ती घरं, ना त्या वास्तू! काहीच पूर्वीसारखं राहिलेलं नाही. ऐहिक-भौतिक संदर्भात तर मोठाच बदल झालाय. ना पोषाख तसे राहिले ना केशभूषा. एवढंच कशाला भाषा तरी आता ती कुठं राहिलीय? मानसिक-भावनिक संदर्भातही तो पूर्वीचा जिव्हाळा, कळकळ कुठं राहिलीय?
    किती सहजपणे आपले बाबा देवखेड हा गाव, त्याचा निसर्गरम्य परिसर, शेजारच्या गावी भरणारी ‘माउली’ची यात्रा, त्या यात्रेत देवपूजेचा असणारा मान, पंचक्रोशीत असणारा दबदबा, ती सुपीक शेती, माणसं, गाईगुरं हे सगळंसगळं सोडून देवखेडला कायमचा रामराम करून या महानगरात आले, ते कायमचेच! गाडी चालवताना सुहासच्या मनात असे कितीतरी विचार सतत चालू होते. नवं देवखेड आता जवळ येऊ लागलं होतं.
    नवं देवखेड?
    होय, नवीन देवखेड. पूर्वीचं देवखेड, मूळचं देवखेड पृथ्वीच्या नकाशावरून काही दशकांपूर्वीच नाहीसं
    झालं होतं. आता अस्तित्वात आहे ते नवं देवखेड. शासनानं पुनर्वसन केलेलं. पाण्याची उंच टाकी,
    शाळा, नवीन कौलारू घरं, शौचालयं, दवाखाना, सडका अशा सगळ्या प्राथमिक सेवासुविधा शासनानं देऊन उभं केलेलं हे पुनर्वसित देवखेड. पाण्याची ती उंच टाकी लांबूनही आता दिसते आणि नवीन देवखेड जवळ येत असल्याचं कळतं. याच पाण्याच्या टाकीतून आता नळ कनेक्शन्स घरोघरी दिलेत. गाव आता नळाचं पाणी पितं!
    पूर्वीसारखे गोदामाईच्या घाटावरून पाणी भरून आणण्याचे दिवस केव्हाच संपलेत. गोदामाईच्या आठवणीनं सुहासचं मन गलबललं. त्याच्या बालपणीच्या कितीतरी रम्य आठवणी गोदामाईशी निगडीत आहेत. याच गोदामाईच्या पाण्यात तो असंख्य वेळा डुंबलाय. याच पाण्यात तो पोहायला शिकला. तो केवळ पाच वर्षांचा होता तेव्हाच त्याच्या बाबांनीच त्याला पोहायला शिकवलं होतं. ते पट्टीचे पोहणारे होते. उन्हाळ्यात गोदामाईचं पाणी काहीसं कमी होई. मग त्या वाळवंटात खरबूज-टरबुजाच्या वाड्या लावल्या जात. खरबूज-टरबुजाचे वेल, त्याची शेती, याला ‘वाडी’ म्हणतात. त्याच्या राखणदारीसाठी नेमलेला दाम्या भिल्ल त्याला आठवला. आडदांड पैलवान गडी. तो वाडीवरच त्याच्या बायकापोरांसह राही. उन्हाळ्यात वाडीत आमची टरबुजं पिकत. बैलगाड्या भरभरून दाम्या भिल्ल त्या तालुक्याच्या गावी विकायला नेई. दाम्या भिल्लानं सुहासच्या कुटुंबाची पिढ्यान्पिढ्या सेवा केलेली. त्याचं नाव दामोदर होतं की, दामाजी होतं की असंच काही होतं ते सुहासला आठवत नाही. आठवतं ते एवढंच की सुहासच्या आजोबांनी वाड्याच्या ओट्यावरून “दाम्याऽऽऽ…” अशी खणखणीत आवाजात त्याला हाळी दिली की, क्षणात असेल तिथून दाम्या विद्युत वेगानं येऊन ‘जी’ म्हणत आजोबांसमोर उभा राहत असे. आजोबांचा दाम्यावर फार जीव होता, त्यानं शाळेत जावं, शिकावं यासाठी आजोबांनी खूप प्रयत्न केले. पण हा पठ्ठ्या शाळेत कधीच रमला नाही.आजोबांच्या धाकानं दोनतीन वर्षं शाळेत गेला खरा, पण तसा अडाणीच राहिला.
    दाम्या होता शेतावर राबणारा गडी. पण आजोबांनी त्याला कधी काही कमी पडू दिलं नाही. अन्य जमीनदार त्यांच्या गड्यांना दर पोळ्यास नवीन कापडं देत. आजोबा दाम्याला डबल कापडं देत. शिवाय, शेतीच्या मालातूनही त्याला भरघोस हिस्सा देत. आजोबांच्या काळात ‘बटाई’ पद्धतीनं शेती करणं सर्रास होतं. म्हणजे शेतमालक आणि राबणारा सालदार किंवा गडी यांच्यात उत्पन्न समसमान वाटलं जाई. आजोबांनी दाम्याला समसमान वाटा तर दिलाच. शिवाय वाडीतील टरबुज खरबुजाचं उत्पन्नही त्यालाच देत असत. घरी खाण्यापुरती अधूनमधून वाडीची टरबुजं येत. पण त्याचा खरा मालक दाम्या भिल्लच असे.
    दाम्या आता नव्या देवखेडमध्ये असेल का? माहीत नाही. गोदामाईच्या घाटावरची अनेक छोटीमोठी देवळं-रामेश्‍वर, सोमेश्‍वर, मुक्तेश्‍वर, पारदेश्‍वर अशा नावांची शिवमंदिरं तर सुहासच्या डोळ्यादेखत धरणाच्या पाण्यात गडप झाली. त्यामुळे ती मंदिरं, त्यांचं देखणं धीरगंभीर हेमाडपंथी वास्तुवैभव हे सगळं इतिहासजमा झालं होतं. हे सगळं झालं त्या धरणामुळे.
    चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या धरणाच्या संदर्भातील झालेल्या बैठका, चर्चा शाळकरी वयात सुहासनं पाहिल्या होत्या. तालुक्याहून, जिल्ह्याहून येणारी सरकारी अधिकारी मंडळी पाहिलेली होती. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, भूमापन अधिकारी आणि कितीतरी अन्य विभागांचे, खात्यांचे अधिकारी लोकांचा देवखेडमधला राबता वाढला आणि आता इथून पुढे काही मैलांवर गोदामाईवर मोठ्ठं धरण होणार आहे आणि त्या जलाशयामध्ये आपलं गाव पूर्णपणे बुडणार आहे, एवढं बालवयाच्या सुहासला पक्कं समजलं होतं.
    या संदर्भातील सगळ्या बैठका, चर्चा, कारवाया सुहासच्या आजोबांच्या वाड्यावरच होत. कारण आजोबाच गावाचे सरपंच होते. देवखेड गावात ग्रुप ग्रामपंचायत होती. म्हणजे मुख्य गाव देवखेड आणि त्यापासून हाकेच्या अंतरावर असलेली देवठाणा, देवफाटा, नागडोह अशा नावांची छोटी छोटी काही गावं मिळून देवखेड ग्रुप ग्रामपंचायत होती. दीर्घकाळ सुहासचे आजोबाच देवखेडचे सरपंच होते. कारण तेच त्या परिसरातील मातब्बर व शिकलेले गृहस्थ होते. समाजात त्यांना मान होता. दरवेळी त्यांनाच बिनविरोध सरपंच पद मिळत असे. आज खेड्यापाड्यातून खोलवर पाझरलेलं जातीयतेचं, गटातटाचं, भेदाभेदीचं विष तेव्हा पसरलेलं नव्हतं.
    आजोबांनीही आपल्या चोख कारभारानं देवखेड ग्रुप ग्रामपंचायतीचा नावलौकिक जिल्ह्यात वाढविला होता. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोबर गॅस संयंत्र, अंगणवाडी, डेअरी, पोल्ट्री, शेतीअवजारं, रस्ते, स्वच्छता अशा प्रत्येक संदर्भातील सरकारी योजना स्वार्थनिरपेक्षपणे गावात राबविल्या होत्या. देवखेड म्हणजे एक हसतंखेळतं प्रगतिशील, निरोगी गोकूळ म्हणून सर्वत्र वाखाणलं जात होतं. आजोबांचा स्वभाव, प्रगतिशील दृष्टिकोन, सहकारी वृत्ती आणि वाढती लोकप्रियता यामुळे त्यांनी आता जिल्ह्याच्या राजकारणात उतरावं, किमान आमदारकीची निवडणूक लढवावी असा अनेकांचा त्यांना आग्रह होता. पण निवडणुका हे आपले काम नाही. लोकसेवा हे आपलं काम आहे. त्यासाठी आमदारच व्हायला पाहिजे असं अजिबात नाही, अशी त्यांची शेवटपर्यंत धारणा होती. त्यामुळे ते कधीच निवडणुकीच्या राजकारणात पडले नाहीत. तसले नेते म्हणून मिरवण्यात त्यांना काडीचाही रस नव्हता.
    हा, देवखेड गाव, त्याचा विकास त्याला सुंदर स्वच्छ करणं यात मात्र त्यांना रस होता. देवखेड त्यांचा जीव की प्राण होता. त्यांच्या खापरपणजोबांना पेशव्यांनी देवखेडची वतनदारी दिली होती. पेशव्यांच्या मराठेशाहीची सीमा गोदामाई ही नदी होती. त्या नदीकाठच्या मंदिरांची काळजी घेणं, रक्षण करणं आणि नदी पलीकडे असलेल्या निजामी राजवटीपासून देवखेडचं रक्षण करणं, अशा सर्व जबाबदार्‍या देऊन खुद्द पेशव्यांनी त्यांना देवखेडला पाठवलं होतं. तेव्हापासूनच्या सुहासच्या अगोदरच्या अनेक पिढ्यांनी पेशवे सरकारांनी दिलेल्या वतनदारीचा निष्ठेने सांभाळ केला. त्या वतनाला ऊर्जितावस्था आणून दिली.
    धरणामुळे आता देवखेड आणि आसपासचा कित्येक मैलांचा परिसर, त्यातील गावं, शेतं, आमराया, देवळं, वाडे, वस्त्या सगळं पाण्याखाली जाणार होतं. शासकीय यंत्रणा शेतकर्‍यांना त्यांच्या जमीनजुमल्याचा मोबदला देऊन घरं गाव सोडायला भाग पाडत होते. काही अंतरावर उंचावरच्या एका टेकाडावर नवीन देवखेड वसविलं जाण्याचा शासनाचा निर्णयही झाला होता. आणि इथंच आजोबा आणि सुहासच्या वडिलांमध्ये वादाची ठिणगी पडली.
    “मी माझ्या बायकोमुलासह देवखेड सोडून जाण्याचं ठरवलंय!” एके संध्याकाळी वडील धीर एकवटून आजोबांना म्हणाले. आजोबांनी चमकून पाहिलं. ते नागेश्‍वराच्या देवळात संध्याकाळची पूजा करून वाड्यावर परतले होते. नागेश्‍वर हे आमच्या घराण्याचं कुलदैवत. देवखेडच्या नागेश्‍वरावर पंचक्रोशीतल्याच नव्हे, तर दूरदूरच्या ठिकाणच्या भक्तांची श्रद्धा. देवखेडमध्ये नागेश्‍वराचं मंदिर, बाकी शिवमंदिरांपेक्षा आगळंवेगळं होतं. देवळात महादेवाची पिंड, नंदी, कासव हे काही नव्हतं. गोदामाईच्या काठावर अनेक शिवमंदिरं होती. नागेश्‍वराचं मात्र हे बहुधा एकमेव मंदिर होतं. तीनसाडेतीन फूट उंचीच्या एका काळ्याकभिन्न पाषाणावर फणा काढून उभा राहिलेल्या नागेश्‍वराची अत्यंत कोरीव मूर्ती म्हणजे हा नागेश्‍वर देव. त्याची आमच्या घराण्यावर जोपर्यंत कृपादृष्टी आहे, तोपर्यंत आमच्या घराण्याचा विकास होत जाईल अशी आमच्या घराण्यात पिढ्यान्पिढ्या चालत आलेली श्रद्धा होती. या मूर्तीच्या समोर पद्मासन घालून आमचे पूर्वज तासन्तास जप करीत असत. अगदी आजोबासुद्धा रात्रीच्या वेळी या छोट्याशा देवळातल्या मूर्तीसमोर पद्मासन घालून ताठ बसलेले सुहासनही अनेकदा पाहिलेलं. रात्रीच्या गडद अंधारात नंदादीपाच्या ज्योतीनं नागेशच्या फण्यावरील डोळे लुकलुकताहेत असं स्पष्ट दिसे. बालपणी सुहासला नागेश्‍वराच्या या जपाची भीतीही वाटे. पण “घाबरायचं काही कारण नाही. नागेश आपलं कुलदैवत आहे. आपल्या अनेक पिढ्यांनी त्याची मनोभावे पूजा केलेली आहे. त्याचे लुकलुकणारे डोळे म्हणजे त्याची आपल्या घराण्यावर असलेली कृपादृष्टीच आहे.” आजोबांचे शब्द सुहासला आठवले.
    हे खरंही असावं. कारण आसपासच्या खेड्यातून, शेतातून, रानावनातून खर्‍याखुर्‍या नागानं दंश केल्याच्या अनेक घटना तेव्हा घडत. परंतु रात्री बेरात्री रानावनात, शेतात वावरूनही आमच्या घराण्यातल्या मात्र एकालाही कधी सर्पदंश झाल्याची घटना आजवर कधी घडलेली नव्हती. पंचक्रोशीत कुठेही नागसाप निघाला तर आजोबा ताबडतोब तिथं जात आणि अत्यंत सहजतेनं त्या नागसापाला पकडत. सुहासनेही त्याच्या बालपणी अशा घटना पाहिल्या होत्या.
    वडिलांच्या वाक्यावर आजोबांनी कुठलीही प्रतिक्रिया तात्काळ दिली नाही. काही क्षण विलक्षण शांततेत पण तणावात गेले. मग वडीलच पुढे बोलू लागले.
    “नाहीतरी देवखेड आता पाण्याखाली जाणार आहे. अनेक जण गाव सोडून जाताहेत. मीही शहरात जाण्याचं ठरवलंय. मला तिकडे चांगली नोकरीही मिळालीय. सुहास आत्ताशी कुठे शाळेत जातोय. त्यामुळे आत्ताच शिफ्ट होणं योग्य ठरेल, म्हणून मी हा निर्णय घेतलाय.” वडिलांनी त्यांची बाजू मांडली.
    आजोबा शांतपणे ऐकत होते.
    “इथे काय कमी आहे?” आजोबांचा प्रश्‍न.

    • “कमी काही नाही. पण एवढं शिकून वडिलोपार्जित शेती सांभाळण्यात मला रस नाही. शिवाय सुहासचं काय? त्याचं शिक्षण, भवितव्य याचा विचार
      करायला नको?”
      “बरं! पण मग नागेश्‍वराच्या कुळाचाराचं काय?” आजोबांनी शांतपणे विचारलं.
      “अहो पण, आता नागेश्‍वर राहणारच कुठाय? सगळा गाव पाण्याखाली जातोय. देवळं पाण्याखाली जाताहेत. त्यात नागेश्‍वरही पाण्याखाली जाईल. आपल्या हातात काही आहे का?” आजोबांना उत्तर देत वडिलांनी त्यांनाच प्रतिप्रश्‍न केला.
      त्यावर मात्र आजोबांचा चेहरा लालेलाल झालाच
      व त्यांच्या तीव्र स्वरातलं उत्तर सुहासला आजही स्पष्टपणे आठवलं.
      “काहीही झालं तरी मी नागेश्‍वराला पाण्याखाली जाऊ देणार नाही! मी देवखेड सोडणार नाही. नव्या देवखेडमध्ये मी पुन्हा माझा वाडा उभा करेन. नागेश्‍वरालाही नव्या देवखेडमध्ये घेऊन येईन आणि या कुडीत प्राण असेपर्यंत पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार नागेश्‍वराची सेवा करीत इथेच राहीन!” आजोबांनी स्पष्ट शब्दात त्यांचा निर्धार बोलून दाखवला. त्यात एवढा ठामपणा होता की, त्यावर वडील काहीच बोलू शकले नाहीत. अन्यथा “तुमचंही आता वय झालंय, तुम्हीही जमीनजुमला, वाड्याचे जे सरकारी पैसे मिळणार आहेत ते घेऊन शहरात माझ्यासोबत यावं!” असं त्यांना म्हणायचं असावं.
      तसं ते म्हणालेही, पण त्यादिवशी नव्हे. नंतर जेव्हा देवखेडचा निरोप घेऊन वडील, आई, सुहास आम्ही सगळे निघालो, तेव्हा ते म्हणाले. त्यावर आजोबांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही सगळे शहरात राहायला आलो ते कायमचेच.
      सुहासच्या मनःपटलावर एखादा सिनेमा दिसावा तशा या आठवणींनी सलग फेर धरला होता. नवं देवखेड जवळ येत होतं. गोदामाईवर झालेल्या धरणाचा परिणाम परिसरातील शेतीवर, पीक पद्धतीवरही झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. सुहासच्या लहानपणी या संपूर्ण पंचक्रोशीत खरिपात प्रामुख्यानं बाजरीचं पीक घेतलं जायचं. कारण बाजरीला पाऊसपाणी कमी लागतं. शिवाय तीन महिन्यात पीक हाती येतं तेव्हा बाजरीमध्ये हायब्रीड अर्थात संकरित बियाणं नुकतंच बाजारात आलं होतं. त्यात एक बुटक्या उंचीचा बाजरी वाण देवखेड परिसरात खूप लोकप्रिय झाला होता. आजोबांनी मात्र तो वाण आपल्या शेतीत कधीच लावला नाही. त्यांचा संकरित बियाणांना विरोध होता, असं अजिबात नव्हतं. परंतु अन्नधान्याची शेती फक्त माणसांकरता करू नये. पाळीव प्राण्यांना दुधार पशूंसाठी मुबलक कडबा-चारा आपोआप मिळे. आजोबांचे असे अनेक विचार, निष्ठा मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण होत्या.
      वडिलांचे आणि आजोबांचे अनेक मतभेदाचे कारण आजोबांची असणारी काही ठाम मतं हेही होते. ती केवळ मतं नव्हती, त्या त्यांच्या जीवननिष्ठाही होत्या.
      धरणामुळे पंचक्रोशीतल्या शेतीसाठी आता भरपूर पाणी उपलब्ध झालं होतं. सगळेजण त्यामुळे ज्वारीबाजरी सोडून उसाकडे वळले आणि काही वर्षातच एकेकाळचा सामान्य आर्थिक परिस्थितीतला हा कोरडवाहू शेतकरी वर्ग ऊसामुळे, साखर कारखान्यांमुळे आर्थिकदृष्ट्या सधन झाला, समर्थ झाला. आजोबांनी मात्र ऊस बागायती कधीच केली नाही. इतर पिकांपेक्षा उसाला कितीतरी पट अधिक पाणी लागतं. अख्खा कालवाच ऊस पिऊन टाकतो. पाण्याची ही अशी उधळमाधळ मी आयुष्यात कधीही करणार नाही, या निष्ठेतून आजोबांनी कधीच ऊसबागायती केली नाही. त्यांच्या या भूमिकेमुळेही आजोबांशी वडिलांचा जोरदार खटका उडाला होता. कधी नाही ते आजोबा त्यावेळी संतापले होते, हेही सुहासला आठवले.
      अशा अनेक कारणांमुळे वडिलांनी देवखेडला, रामराम केला तो कायमचाच. त्यामुळे सुहासचे सगळे शिक्षण शहरातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले. वर्षातून एकदा म्हणजे महाशिवरात्रीच्या यात्रेला वडील लहानग्या सुहासला घेऊन देवखेडला अवश्य येत. कारण आजोबांनी धरणाच्या पाण्यात बुडणार्‍या अनेक देवळातल्या मूर्ती, पिंडी नव्या पुनर्वसित गावात आणल्या. त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना केली तशीच नागेश्‍वराची आकृती कोरलेली आणि आमच्या घराण्याची कुलदेवता असलेली ती दगडी वजनदार शिळाही नवीन गावात आणली. पाण्याखाली गेलेल्या जमिनीचे जे पैसे आले, त्याचा विनियोग त्यांनी नागेश्‍वराचे देऊळ बांधण्यात, इतर देवळांची उभारणी करण्यात आणि स्वतःला राहण्यासाठी छोटेसे घर बांधण्यात खर्च केले. थोडीशी शेतीही घेतली. त्यावरच त्यांची आणि त्यांना निष्ठेने साथ देणार्‍या दाम्या भिल्लाची गुजराण चालत असे. वडिलांनी त्यांना शहरात येण्याचा अनेकदा आग्रह केला.
      “माझ्या पूर्वजांनी देवखेडच्या नागेश्‍वराची आयुष्यभर सेवा केली. मीही तेच करणार. पेशवे सरकारांनी आपल्याला दिलेली ही जबाबदारी आहे. ती निष्ठेने पार पाडत आपल्या अनेक पिढ्या, पूर्वज याच मातीत सामावले गेले. मीही अखेरपर्यंत नागेश्‍वराची, देवखेडची सेवा करणार!” आजोबांचे दर वेळचे हे उत्तर ठरलेले असे. त्यांच्या या निग्रहामुळे वडिलांनी किमान शिवरात्रीच्या यात्रेत येऊन नागेश्‍वरास अभिषेक करायची शिस्त स्वतःला घालून दिली. देवळाच्या विस्तारासाठी, बांधकामासाठी भरीव मदतही केली. पण कायमच देवखेडमध्ये मात्र त्यांनी वास्तव्य केले नाही.
      आजोबांची चिकाटी, वडिलांनी वेळोवेळी केलेले सहकार्य यामुळे नागेश्‍वराचे नवीन देवखेडमधील नवीन देऊळही पंचक्रोशीत मशहूर झाले. हा नागेश्‍वर ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही, त्यांनी मनोभावे नवस केल्यास त्यांना पावतो अशीही या देवस्थानाची कानोकानी ख्याती वाढत गेली. अर्थात असल्या गोष्टींवर वडिलांचा वा आजोबांचा विश्‍वास नव्हता. त्यांच्या वतीने त्यांनी कधीही तसा प्रचार प्रसार केला नाही. पण कशी कोण जाणे, परंतु मूल देणारा देव अशी नागेश्‍वराची ख्याती वाढत गेली. त्यामुळे महाशिवरात्रीची यात्राही आता खूप मोठी भरू लागली आहे.
      आजोबांनी, वडिलांनी भक्तगणांसाठी शौचालये, स्नानगृहे, निवासासाठी हॉल इत्यादी मूलभूत सेवासुविधा स्वतःची पदरमोड करून उभ्या केल्या. अनेक वर्षे सुहासही महाशिवरात्रीच्या यात्रेचे वेळी आवर्जून देवखेडला येत असे. परंतु पुढे उच्च शिक्षण आणि नंतर परदेशी कंपनीतील नोकरी यामुळे तो बरीच वर्षे परदेशीच राहिला. काळाच्या ओघात वृद्धापकाळामुळे आजोबांनी नागेश्‍वराच्या चरणीच आपला देह ठेवला. देवखेडच्या ग्रामस्थांनी त्यांची समाधी बांधली. वडीलही नंतर देवाघरी गेले.
      “श्री नागेश्‍वर देवखेड आपले सहर्ष स्वागत करीत आहे!” एका उंच सुंदर कमानीवर ठळक अक्षरातील मजकुराने सुहासचे लक्ष वेधून घेतले. देवखेड गावच्या प्रवेशद्वारी ग्रामस्थांनी ही शोभिवंत कमान कधी उभारली हे सुहासलाही माहिती नव्हते. मधली अनेक वर्षे तो देवखेडला येऊ शकला नव्हता, त्यामुळे त्या काळातल्या कुठल्याच घडामोडी त्याला माहीत नव्हत्या.
      कमानीतून त्याची गाडी थेट नागेश्‍वर देवस्थानासमोरच्या मैदानात आली. देवस्थानाच्या एका बाजूला हार, फळे, नारळ, प्रसाद इत्यादी साहित्याची काही दुकानं उभी होती. देवस्थानाच्या मागच्या बाजूस भक्त निवास, बाजूला एक मोठा हॉल, जिथे भजनपूजन, कीर्तन प्रवचनं होत. तोही नव्यानेच उभा राहिल्याचे सुहासच्या लक्षात आलेे. सुहास गाडीतून बाहेर पडेतो, साधारण त्याच्याच वयाचा एक काळासावळा आडदांड माणूस अदबीनं पुढे आला. सुहासनं निरखून पाहिलं, “अरे, हा तर दाम्या भिल्ल! ” दोघांनी एकमेकांना ओळखलं. एकमेकांची निःसंकोचपणे गळाभेट घेतली.
      आजोबांनी बांधलेल्या छोट्याशा घरात आता दाम्याचा परिवार राहत होता. दाम्याने अदबीने सुहासची बॅग उचलून त्याला घरात नेले. स्नान करून सुहासने पहिले काम केले, ते म्हणजे नागेश्‍वराचे दर्शन. नंदादीपाच्या प्रकाशात काळ्या चकचकीत कातळावर कोरलेली नागाची फणा काढलेली उभ्या अवस्थेतील नागमोडी आकृती, विलक्षण गुढरम्य भासत होती. सुहासने नागेश्‍वराच्या फण्यावरील डोळ्यांच्या टिंबांकडे पाहिले. ते डोळे आपल्याकडे पाहून मंद स्मितहास्य करीत आहेत, जणू मूकपणे म्हणत आहेत, “आलास, ये. तुझे स्वागत आहे.”
      सुहास कितीतरी वेळ भारल्यागत त्या मूर्तीकडे, तिच्या डोळ्यांकडे पाहत होता. ते डोळे नागेश्‍वराचे
      नसून आपल्या आजोबांचे आहेत. त्यांच्या वडिलांचे आहेत. खापरपणजोबांचे आहेत. आपल्या सर्व पूर्वजांचे आहेत, असे त्याला वाटू लागले. सगळ्या पूर्वजांनी नागेश्‍वराची सेवा केली, त्यांचं अस्तित्त्व, त्यांचा गंध
      या देवखेड गावच्या पंचक्रोशीत दरवळतोय. या हवेत त्यांचे श्‍वास आहेत. इथल्या मातीत त्यांच्या नश्‍वर देहाची राख मिसळलेली आहे. या मातीतून उगवणार्‍या प्रत्येक पिकातून, रोपातून झाडीझाडोर्‍यातून आपले पूर्वज पुनःपुन्हा जन्म घेताहेत आणि या भूमीची इथल्या माणसांची, देवालयांची सेवा करताहेत. कोण म्हणतं, ते आज या जगात नाहीत म्हणून? त्यांचा पार्थिव देह या जगात नाही हे खरं. पण इथल्या कणाकणातून तेच सामावलेले आहेत. तेच नागेश्‍वराच्या लुकलुकणार्‍या डोळ्यांतून आपल्याकडे पाहताहेत. आपल्या येण्यानं त्यांना झालेला आनंद त्या डोळ्यांमधून स्पष्ट दिसतोय. ते सगळे मिळून आपल्याला जणू आवाहन करताहेत की, ये वत्सा ये. इथेच तुझे सर्वस्व आहे. इथेच
      तुझा मोक्ष आहे. इथेच तुझी मुक्ती आहे. तुझी नाळ
      याच भूमीत पुरलेली आहे. तेव्हा या भूमीशी तू
      पुन्हा एकदा स्वतःला जोडून घे. त्यातच जीवनाची कृतार्थता आहे. ये!
      नागेश्‍वराच्या शिळेसमोर देहभान विसरून बसलेल्या सुहासच्या मनात असे कितीतरी विचार एखाद्या वावटळीसारखे घोंघावत होते. त्यात किती
      वेळ गेला हे त्याचं त्यालाच कळलं नाही.
      तो भानावर आला ते दामा भिल्लाच्या हाकेनं. दाम्या भिल्लानं त्याला हलवून जागं केलं. सुहास भारावल्यागत गाभार्‍यातून बाहेर आला. शहरातलं, परदेशातलं वास्तव्य आता बस्स झालं. पैसाही खूप कमावलाय आणि आता आणखी तो कमवायचा तरी कुणासाठी? विकी त्याचा मुलगा, त्याला नुकतीच अमेरिकन सिटीझनशीप मिळालीय. तो, त्याची बायको तिकडेच राहणार. ते आता तिकडचेच झालेत. सुहासच्या पत्नीचं
      काही महिन्याआधीच निधन झालेलं. आता
      या अफाट जगात आपलं कुणीही नाही, या जाणिवेनं सुहास विलक्षण व्याकूळ झाला होता. ती व्याकुळता,
      ती एकाकीपणाची जाणीव सुहासच्या देवखेडमध्ये येण्यानं आता थांबलीय, हे त्याला जाणवलं. आपण एकटे नाही. आपला नागेश्‍वर आपल्या सोबत आहे. आपले सारे पूर्वज देवखेडच्या वनराईच्या रूपाने आपल्या सोबत आहेत. इथून पुढे उरलेले आयुष्य आपण देवखेडच्या, नागेश्‍वराच्या सेवेत काढायचं हा सुहासचा निर्धार आता पक्का झाला होता. त्याच्या मनातली मघा उठलेली नाना विचारांची ती वावटळ आता शांत झाली होती. सुहासला त्यामुळे विलक्षण प्रसन्न वाटू लागलं.

Share this article