Close

मुक्ती (Short Story: Mukti)

  • सुहासिनी पांडे

    वसुधाच्या बाबांनी यथाशक्ति खर्च करून वसुधाचे लग्न करून दिले. वसुधा तर अगदी खुशीत होती. एवढा मोठा बंगला आणि ते वैभव बघून स्वतःचाच तिला हेवा वाटत होता. पण वसुधा धास्तावलेलीच होती… इथे काहीतरी गडबड आहे असे तिला वाटत होते. एवढ्या मोठ्या घरात माणसांची मात्र कमतरता होती.

आपले लग्नाचे वय उलटून चालले आहे, हे इतर कुणी बोलून दाखवले नाही तरी वसुधाला ते चांगलेच जाणवत होते. तिच्यासाठी स्थळे आणायला वारंवार विवाह मंडळाचे उंबरठे झिजवणारी वसुधाची आई… मिळालेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी करणारे वडील, पाहायला येणारे लोक अन् ते यायच्या वेळी घरातील हॉल नीटनेटका लावणारा वसुधाचा धाकटा भाऊ विवेक… सगळ्यांनाच जणू काही हे काम कंटाळवाणे झाले होते. अजून किती दिवस तेच ते करायचे? अजून किती दिवस अनोळखी लोकांकडे अपेक्षेने पाहत रहायचे? असे तिच्या मनात वारंवार यायचे.
सुरुवातीला खूप अपेक्षा होत्या. पण आता जसा मिळेल तसा, वसुधापेक्षा कमी शिकलेला… मामुली पगार मिळवणारा का असेना पण पसंती सांगणारा एक तरी मिळू दे; असे वसुधाचे वडील ती घरात नसताना म्हणायचे. पण चुकून एक दोनदा वसुधा समोरही बोलून गेले होते, पण मध्येच विवेकने सावरून घेतले होते. “म्हणजे तसं नाही ग ताई… बाबांना असं म्हणायचं होतं की नुसता होकार यायला हवा. मग तसल्या कमी शिकलेल्या… मामुली कमावणार्‍या मुलाला आपणच नकार कळवला असता…”
हे आणि असेच बोलणे घरात चालायचे… वसुधाची 10 ते 5 शाळा असल्यामुळे तेवढा वेळ ती बाहेरच असायची. वय वाढतच होते आणि आईच्या डोळ्याचे पाणी मात्र खंडत नव्हते.
आणि अचानक सरदेशपांडेंकडून होकार आला. सकाळीच त्यांचा फोन आला… “आम्हाला मुलगी पसंत आहे… पुढील बोलणी करण्यासाठी आम्ही येत आहोत.” वसुधाला तर हे ऐकून धक्काच बसला. दोन-तीन दिवसांपूर्वी सरदेशपांडे त्यांच्या 2-3 मित्रांसोबत आले होते. नागपूरच्या बँकेत असणारा गोरापान… रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेला हा माणूस आपल्याला कसला पसंत करतोय, असे वाटून तिने तो विचारच मनातून काढून टाकला होता. आणि आज त्यांचाच होकार आला होता.
त्याच दिवशी संध्याकाळी बैठक बसली आणि लग्न ठरले… सरदेशपांडे घरचे चांगले श्रीमंत होते. शेतीवाडी भरपूर होती. राहायला स्वतःची जागा आणि बँकेतली नोकरी… घरात फक्त त्यांची म्हातारी आई होती. बाकी जवळचे असे नातेवाईक कोणी नव्हते. आई मात्र गेल्या 5-6 वर्षांपासून अर्धांगवायूने आजारी होती. एवढी एक गोष्ट सोडली तर नाव ठेवण्यासारखे या स्थळात काहीच नव्हते. त्यांना फक्त घर व्यवस्थितपणे सांभाळणारी मुलगी हवी होती. आपल्यासारख्या सुमार मुलीला त्यांनी कसे काय पसंत केले? याचे मात्र वसुधाला आश्‍चर्य वाटत होते… पण आता काहीही शंका मनात आणायच्या नाहीत, असे आईने तिला बजावले होते.
वसुधाच्या बाबांनी यथाशक्ति खर्च करून वसुधाचे लग्न करून दिले. वसुधा तर अगदी खुशीत होती. एवढा मोठा बंगला आणि तिथले वैभव बघून स्वतःचाच तिला हेवा वाटत होता. पण वसुधा धास्तावलेलीच होती… इथे काहीतरी गडबड आहे असे तिला राहून राहून वाटत होते. एवढ्या मोठ्या घरात माणसांची मात्र कमतरता होती. तिची सासू अंथरुणावर पडून होती… आणि सरदेशपांडे मात्र लग्नानंतर काही दिवसातच कामटी गावाला निघून गेले होते. नागपूरपासून जवळच कामटी गावाला त्यांची पोस्टींग होती. त्यामुळे ते निघून गेले. वसुधा मात्र बावरून गेली. दोन-तीन दिवसांनी सरदेशपांडे परत आले. आज तरी ते आपल्याशी काही बोलतील या आशेवर वसुधाने दिवसभर वाट पाहिली आणि रात्री त्यांनी तिला आपल्या खोलीत बोलावले. वसुधाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिने दुधाचा ग्लास भरला व सुंदरशी साडी नेसून, डोक्यात गजरा माळून त्याच्या खोलीत गेली. ते खिडकीशी सिगरेट ओढत उभे होते. ती आत आल्यावर त्यांनी तिला खुर्चीवर बसायला सांगितले आणि ते म्हणाले. “वसुधा, मी केवळ आईच्या आग्रहाखातर तुझ्याशी लग्न केले आहे…”
“काय?” ते शब्द ऐकताच वसुधाच्या पायाखालील जमीन सरकली. “हो… दुसर्‍या एका मुलीवर माझे प्रेम आहे. पण ती इतर जातीची असल्यामुळे आईला मान्य नाही. तरीही आम्ही दोघं दोन वर्षांपासून एकत्र राहतो. मला दोन मुलेही आहेत.” आपल्या कानात कुणीतरी शिशाचा रस ओतत आहे असे तिला वाटले.
“कशाला मला फसवलेत? कशाला माझ्याशी लग्न केलेत?”


“अग तुझ्यावर मी भाळलो असे वाटले की काय तुला? तू स्वतःला कधी आरशात पाहिलेस का? आता तू माझी पत्नी आहेस. त्यामुळे हे घर व माझ्या आईला तुला सांभाळावे लागेल… तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही.”
“हं म्हणे कमतरता भासणार नाही. अहो तुम्हीच माझे नाही तर काय करायचे मला ते वैभव?” वसुधाचे डोळे पाण्याने भरून आले. आपल्या नशिबाला दोष देत तिने स्वतःला कसेबसे सावरले.
“मी सुंदर नाही हे मला मान्य आहे पण स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही माझा का बळी घेतलात?” वसुधाला रडू आवरेना. आपल्या आईवडिलांना काय वाटेल, या कल्पनेनेच तिचा घसा दाटून आला आणि तिला तसेेच सोडून सरदेशपांडे निघून गेले. बघता बघता दिवस लोटले. वसुधाचे डोळे रडून रडून सुजून आले होते. दिवस जात होते. आता माहेरी जाऊन तरी काय करायचे?
असा विचार करून तिने आईवडिलांना काहीच कळवले नाही. लग्नापूर्वी वसुधा एम.ए.बी.एड. झालेली होती. तिने परत नोकरी करायचे ठरवले. थोड्याशा प्रयत्नाने तिला नोकरी मिळाली. पहाटे लवकर उठायचे. घरातले आवरून स्वयंपाक करायचा. सासूबाईंना आंघोळ घालणे, अंथरूण आवरणे, बेडपॅन देणे, त्यांना जेवायला घालणे… सगळी कामे करायची. अकरा वाजता शाळेत जायचे. सासूबाईजवळ लक्ष द्यायला एक मोलकरीण ठेवली. संध्याकाळी पाच वाजता घरी परत आल्यावर परत त्यांची शुश्रूषा करायची व आपले आवरून झोपी जायचे, असा तिचा दिनक्रम सुरू होता. पण रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. तिच्या सासूला मात्र तिची कीव येत होती. त्या तिला नेहमी म्हणत असत. “खरंच वसुधा श्रीने तुझे वाटोळे केले. केवळ मला सांभाळण्यासाठी त्याने तुझ्याशी लग्न केले. मला खरंच अंधारात ठेवले ग त्याने. नाहीतर मी हे लग्न होऊच दिले नसते.”
“जाऊ द्या सासूबाई. जे नशिबात आहे ते भोगलेच पाहिजे नाही का?” असं म्हणून तीच त्यांची समजूत घालत असे. श्रीकांतराव आठ-पंधरा दिवसातून एकदा घरी येत. आईच्या औषध पाण्याला व घरखर्चाला पैसे देत आणि निघून जात. पण त्या पैशाला वसुधाला हातसुद्धा लावावासा वाटत नव्हते. बायको आणि आईला सांभाळण्याचे कर्तव्य ते पार पाडत आहेत.
आपण एखाद्या मोलकरणीप्रमाणे त्यांची आई व घर सांभाळत आहोत, असे वसुधाला वाटत होते. कुठल्याही गोष्टीची इच्छाच तिला उरली नव्हती. पाण्याच्या घोटाबरोबर एक एक घास गिळून ती दिवस कंठत होती… आणि अचानक तिच्या सासूबाईंना हार्ट अ‍ॅटॅक आला. त्यांना आय.सी.यू. मध्ये ठेवलं. 2-3 दिवस ती हॉस्पिटलमध्ये बसून होती नि शेवटी त्या देवाघरी निघून गेल्या. या 2-3 दिवसात श्रीकांतराव एकदाही घराकडे फिरकले नाहीत. एकदम आईला अग्नी द्यायच्या वेळेसच हजर झाले.
आता मात्र वसुधा आणखीनच एकटी पडली. एवढे मोठे घर तिला खायला उठे. आता तर श्रीकांतरावांच्या चकरा वाढल्या पण त्या वेगळ्याच कारणासाठी. त्यांनी तिच्या मागे तगादा लावला की, “तू हे घर सोडून निघून जा. मी मंगलला घेऊन आता इथेच राहणार आहे.” आईचा अडसर दूर झाल्याने श्रीकांतराव आता घरीच येऊन राहणार होते. पण इतके दिवस घर सांभाळणारी वसुधा मात्र आता त्यांना डोळ्यासमोर नको होती.
पण वसुधा मात्र आता खंबीर झाली होती. ती घर सोडायला मुळीच तयार झाली नाही. घर आणि नोकरी असा तिचा दिनक्रम सुरूच होता. आणि एक दिवस घटस्फोटाचे कागद तिच्या हातात पडले. श्रीकांतरावांना तिच्यापासून घटस्फोट हवा होता. आता मात्र ती हबकून गेली. वकिलाच्या सल्ल्याने तिने घटस्फोटाला विरोध केला. प्राण गेला तरी मी हे घर सोडणार नाही, असे तिने श्रीकांतरावांना बजावले. कोर्टाच्या खेपा मारण्यात असेच दिवस निघून जात होते. मध्यंतरी महिनाभर श्रीकांतराव वसुधाकडे फिरकलेच नाहीत. काय झाले असावे? वसुधाला काही कळेना. आणखी त्यांचा काही तरी वेगळाच डाव असेल याबद्दल तिला शंका आली. तिने चौकशी केली तर तिला समजले की ते खूप आजारी आहेत. त्यांना अर्धांगवायू झाला आहे.
वसुधाला एकदम धक्काच बसला. एवढा धडधाकट माणूस आणि अर्धांगवायूने गलितगात्र झाला. मनावर दगड ठेवून ती पाहायला गेली. आज प्रथमच तिला ते केविलवाणे दिसले. पण ते एकटेच दवाखान्यात होते. त्यांच्याजवळ कोणीच नव्हते. ते आजारी पडल्यापासून त्यांची मंगल दोन्ही मुलांना घेऊन कुठेतरी निघून गेली होती. त्यांची शुश्रूषा करायला जवळ कोणीच नव्हते.
परावलंबी झालेल्या श्रीकांतरावांना बघून तिला त्यांची कीव आली. तिने डॉक्टरांची भेट घेतली व त्यांना नागपूरला स्वतःच्या घरी हलवले. अंथरुणावर पडून श्रीकांतराव वसुधाची धडपड बघत होते. “वसुधा मी तुझा अनंत अपराधी आहे. तूू एवढी माझी शुश्रूषा करतेस. खरंच हे घर, ही इस्टेट सगळं तुझेच आहे. आपण आता सुखाने राहूया. मला क्षमा कर.” “सुख? ते तर माझ्यापासून केव्हाच दूर पळालंय.” वसुधाने हळूच आपला हात त्यांच्या हातातून सोडवून घेतला. “तुम्हाला तुमचे घर हवे होते. घटस्फोट हवा होता.‘’
“नाही नाही. वसुधा मला काहीच नको. मला फक्त तू हवीस. मी खरंच फार स्वार्थी आहे. इतके दिवस मी कधीच विचार केला नाही. आणि देवाने मला ही अशी शिक्षा दिली. यापुढे मी तुला खरंच कधीही अंतर देणार नाही. ऐकशील ना माझं?”
“होय श्रीकांतराव. आज प्रथमच मी तुमच्या नावाचा उच्चार करत आहे. गेल्या 10 वर्षांपासून मी स्वतःचे मन मारत जगायला शिकले. प्रत्येक गोष्टीत अपमान गिळत राहिले. तुमच्या आईला सांभाळले. तुमचे घर सांभाळले. पण आता मात्र खरंच मी थकून गेले आहे. तुमचे घर मी तुमच्या ताब्यात दिले आहे. घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या करून ठेवल्या आहेत आणि आता मी सर्व ऋणातून मुक्त झाले आहे. पुण्याच्या अनाथ आश्रमामध्ये मला नोकरी मिळाली आहे. उद्या मला तिथे रुजू व्हायचे आहे. माझ्या आयुष्याची संध्याकाळ मी तिथेच घालवणार आहे. सुखासमाधानाने जगणार आहे. तिथल्या अनाथ मुलांची सेवा करणार आहे. मला तुमचे घर, पैसाअडका काही नको. येते मी…”
असे म्हणून एकदाही मागे न पाहता आपली बॅग घेऊन वसुधा बाहेर पडली.

Share this article